भटकंती झाली सफल

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०एक भटकंती अशीही या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले. सौरकंदीलाच्या उजेडात ही आदिवासी वाडी उजळून निघाली आणि आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
आंबिवली गणी आदिवासी वाडीच्या प्रावासानंतर दै.सकाळ मधून "जंगलाचा राजा भिकारी' या मथळ्याखाली आदिवास्यांच्ता व्यथा मी मांडल्या .माझ्या या प्रयत्नाला यशही आले.या वृत्ताची दखल घेत गोरेगाव( जि.रायगड) येथील शेअर संस्थेने तातडीने या वाडीची माहिती घेतली. शेअरचे महाड विभागाचे कार्यकर्ते विजय रानमाळे, गणेश मुरगुडे व अमोल शिरगावकर यांनी या वाडीला भेट दिली. प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व शेअरच्या संचालिका निकोला मॅन्टेरो यांनी वाडीवर विजेची समस्या सोडविण्यासाठी 17 कुटुंबांना सौरकंदील प्रकल्प मंजूर केला. महाडचे नवनियुक्त तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या हस्ते या आदिवासींना सौरकंदीलांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला. आदिवासींनी या वेळी तहसीलदारांना आपल्या अडचणी सांगितल्या. तुषार इनामदार यांनी सौरकंदील वापरण्याची माहिती आदिवासींना दिली. या कार्यक्रमाला सरपंच प्रतिमा गायकवाड, उपसरपंच रमेश पवार, शेअरचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.पाणीटंचाईबाबत शेअर प्रयत्न करणार आहे. गणी आदिवासीवाडीवर जाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते.मीही अशी डोंगरावरून पायपीट करत गणीच्या व्यथा मांडल्या .माझी पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद मला वाटतो.

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.
राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला ‘सर मला मारताय तुमचा बाप मरेल .‘ संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.
१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.‘असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा‘ अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.
यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला ‘दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.
‘ अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.
............
सुनिल पाटकर

जगाला प्रेम अर्पावे

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०


दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली .
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेमारी,जलवाहतूक हे येथील पारंपारिक व्यवसाय.काळानुसार अन्य व्यवसायही गावात केले जातात.हे इतिहासकालिन गाव अचानक प्रकाशझोतात आले ते २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे.२५ जुलै २००५ या दिवशी या गावावर निसर्गाचा कोप झाला.या दिवशी पावसाने सर्व राज्यात हा:हाकार माजवला होता.सावित्री नदीला भयानक पूर आला होता .जवळचे महाड शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली होती.दासगावच्या किनार्‍यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरू लागले.रात्रीची वेळ. वीज गायब झालेली.अशा स्थितीत किनार्‍यालगतची माणसं डोंगरावरील घराच्या आसर्‍याला जाऊ लागली.आणि याच दरम्यान घरांच्या मागे असलेली डोंगर कोसळू लागला.काही क्षणातच दरड कोसळली .या दरडीखाली बघताबघता घरच्या घरे गाडली गेली.डोळ्या देखत निष्पाप जीव दरडीखाली गाडले गेले.या आपत्तीत दासगावने ४७ माणसे कायमची गमावली.या मध्ये प्राथमिक ,माध्यमिक शाळेतील १२ विद्यार्थी मृत झाली.दासगावच्या याच डोंगरात प्राथमिक शाळा आहे.या शाळेत शिकणारे गौरव प्रकाश खैरे, प्रतिज्ञा प्रकाश खैरे,अक्षता प्रकाश खैरे,रविराज प्रकाश निवाते,सिद्धांत संतोष तोंडकर,श्वेता सुरेश जैन ,संदेश दीनेश उकिर्डे या पहिली ते चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचाही दरडीखाली मृत्यू झाला.प्रकाश खैरे यांची तिनही मुले दगावली होती.कोसळलेला डोंगर पहाडा एवढे दु:ख पदरात टाकून गेली होता.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना सुरू केली आहे.या योजनेतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रु.ची रक्कम विमा कंपनी कडून अदा करण्यात आली.भविष्यातला आधारच निघून गेल्यांने मिळालेल्या पैशाचा आधारही पालकांना नकोसा वाटू लागला.परंतु या पालकांनी आपल्या दु:खातूनच इतरांच्या सुखाचा मार्ग शोधला. मिळालेल्या पैशातील काही रक्कम पालकांनी दासगावच्या प्राथमिक शाळेला देणगी दिली. आपल्या मृत पाल्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी शाळेला बेंचेस भेट दिल्या.आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक असतात पण असा आदर्श ठेवणारे विरळच ! आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.परंतु ‘त्या ’ मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.

ती

सर्व जेवल्यानंतर
तू जेवायला बसतेस
रिकामी भांडी पाहून
खुदकन हसतेस

तुला सवय झालेय आता
त्या रिकाम्या भांड्यांची
आणि
आम्हालाही सवय झालेय
तुझ्या अशा भरल्या प्रेमाची

सुनिल पाटकर

परदु:ख शीतल

उत्तमकथा मासिकातर्फे दरवर्षी कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. उत्तमकथा मासिकाच्या या कथा स्पर्धेत माझ्या परदु:ख शीतल या कथेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले .ही कथा ९ जून २००७ च्या उत्तमकथा मासिकात प्रसिद्ध झाली.
...........................................................................................................................लांबलचक ढेकर देत राजाभाऊ अंगणात आला.हातात पानाची चंची अडकवलेली आणि अडकित्त्याने सुपारी कातरत राजाभाऊची नजर आजूबाजूला भिरभिरू लागली. कातरलेली सुपारी तोंडात टाकत त्यांने अडकित्ता चंचीत टाकला आनि पोटावरून हात फिरवत त्याने शतपावलीला सुरूवात केली.
नेसलेल्या लुंगीच्या वरुन डोकावणारं त्याचं भलमोठं पोट दिवसेंदिवस अधिकच वाढत होते.पोटाचा नगारा ,तब्बेतीने स्थूल आणि दिसायला घारागोरा...असा हा राजाभाऊ टिपिकल कोकणस्थ !.
शतपावलीला घालतानाच राजाभाऊ मध्येच खांद्यावर टाकलेली बनियन हाताने गरागरा फिरवून स्वत:ला वारा देत होता.राजाभाऊच्या या सवयी शेजा‌र्‍यांना तशा अगदी तोंडपाठ झालेल्या आणि त्याही पेक्षा अधिक, शेजा‌र्‍यांच्या घरी काय चाललंय हे राजाभाऊला चांगलंच ठाऊक असायचे.राजाभाऊचे गिम्हवण्याचं घरही अगदी मोक्यावर.....घराच्या अंगणात उभं राहिलं की कोणाकडे कोण जातयं..हे सारे कळायचं.घरासमोर भाजी नेणा‍र्‍या बायका घरी कोणती भाजी नेतात हे देखिल त्याला माहित असायचं आणि त्या जोरावर तो जावडेकरांना रस्त्यात थांबवायचा "काय जावडेकर , आज तोंडल्याची भाजी ?"राजाभाऊच्या या प्रश्नावर जावडेकरही अवाक व्हायचे.घराच्या आवारातून जावडेकरांच्या घरी काय चाललंय हे राजभाऊला कळायचं
गवाणकरांची सून रागाने तरातरा कुठे गेली?. जी.के.चा मुलगा आज इंटरव्हूला कुठे गेला होता ?.इथ पासून रानडेच्या मुलीला कुठले स्थळ आलयं याची इत्यंभूत माहिती राजाभाऊला असायची...आणि ती का नसावी ?.कारण दिवसभर जेवणे ,खाणे,गप्पा आणि आराम याशिवाय त्याच्या आयुष्यात विशेष काहिच नव्ह्ते.घरात म्हातारी आई अंथरुणाला खिळ्लेली असायची.तिच्या सेवेला एक मोलकरीण असे.तिचं नि राजाभाऊचं काहीतरी चक्कर असावं अशी चर्चा गावात असायची.परंतु हा भाग दुय्यम !.
सकाळी उठलं कि साफसफाई करायची, देवपूजा आणि त्यानंतर अंगणातील आरामखुर्चीत मनसोक्त अंग झोकून द्यायचं.पेपर वाचायचे .आरामखुर्ची समोर पाच सहा खुर्च्या मांडून ठेवायच्या. कमरेला लुंगी , अडकित्ता सुपारी जोडीला. सारी तयारी झाली की मग राजाभाऊची नजर शोधू लागायची गप्पा मारण्यासाठी एखाद्या जोडीदाराला.गप्पा मारण्यासाठी राजाभाऊला कोणत्याही वयोगटा्तील व्यक्ती चाले.अट एकच गप्पा रंगल्या पाहिजेत !
मुंबईत मोटारी बनवणार्‍या एका कंपनीत राजाभाऊ चांगल्या पगारावर नोकरीला होता.कंपनीने जेव्हा स्वेच्छानिवॄत्ती जाहिर केली त्यावेळी पहिली उडी मारणारा माणूस होता राजाभाऊ सोमण ! राजाभाऊने स्वेच्छानिवॄत्ती घेतली. त्यातून मिळालेले पैसे गुंतवून राजाभाऊ स्थायिक झाला तो आपल्या दापोली जवळच्या गिम्हवणे गावी ! राजाभाऊ घरही अगदी हर्णे- मुरुड रस्त्यावर.त्यामुळे घराच्या काही खोल्या पर्यटकांना भाड्यांने देऊन त्यातून बर्‍यार्पैकी उत्पन्न मिळवत असे.लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच राजाभाऊची बायको त्याला सोडून गेली.स्वच्छंदी जीवन जगणार्‍या राजाभाऊला कदाचित हा पाशही नकोसा झाला असावा ! कोणतीही काळजी नाही. कशाचीही फिकीर नाही असं बिनधास्त आयुष्य राजाभाऊच्या वाट्याला आले होते समर्थाना राजाभाऊ जर भेटला असता तर त्यांनी जगी सर्व सुखी कोण आहे ? असे विचारण्याचे धाडसच केलं नसतं
दुपारी आणि सायंकाळी अंगणात भरपूर गप्पा रंगायच्या..मनसोक्त किस्से सांगितले जायचे.आणि त्या गप्पांना हळूहळू झालर चढायची ती दु:खांची!..राजकारण ,भारनियमन,क्रिकेट पासून सुरू होणार्‍या गप्पा जेव्हा कौटुंबिक पातळीवर यायच्या तेव्हा मात्र अंगणही भारावून जायचं. राजाभाऊला नेमकं हेच हवं असायचं.जो पर्यंत गवाणकरांना सून आता कशी वागते ? हा प्रश्न विचारला जात नसे तोपर्यंत गवाणकर सूने विषयी भडाभडा बोलत नसत.मुलीचे कुठे जमतंय का ? असं विचारल्या शिवाय रानड्यांची कहाणी सुरू होत नसे.जावडेकरांची पेन्शन ,जी.के.च्या मुलाची नोकरी .याविषयांवर मग जो-तो भडाभडा बोलायचा आणि आपले मन हलके करायचा. याचा परिणाम राजाभाऊवर होत नसे.तो मात्र निर्विकारपणे आपल्या घड्याळाकडे पाही.‘चला चांगला टाईमपास झाला‘असं बोलुउन तो दुसर्या दिवशीचा विचार करत असे .दररोज घराच्या अंगणात दु:खाच्या,तक्रारीच्या कहाण्या सांगितल्या जायच्या आणि राजाभाऊ त्या ऐकून समाधानी होत असे.वेळ जात नसला कि तो एखाद्या शेजार्‍याला बोलावून घीए व त्याच्यापुढे त्याच्या वर्मी लागणारा विषय काढत असे की ज्यामुळे हा शेजारी आपल्या मनातलं सारं काही बोलून टाकायचा. शेजार्‍याचे मन हलके व्हायचं आणि .राजाभाऊचाही वेळ जायचा.वेळ घालवण्याचे एक हुकमी अस्त्र राजाभाऊकडे होते.
राजाभाऊने घड्याळात पाहिले दुपारचा एक वाजला होता.त्याने खिडकीतून आत डोकावले म्हातारी आई झोपलेली होती.दुपारी जरी ऊन असलं तरी घराजवळच्या भल्या मोठ्या झाडांमुळे अंगणात गर्द सावली येत असे.या सावलीत आरामखुर्ची सरकवत त्यावर राजाभाऊ रेलला.डोळ्यावर चष्मा लावत तो पेपर वाचू लागला.पेपर वचतानाही त्याची नजर मध्येच बाहेर भिरभिरत होती तेवढ्यात त्याला बाबुराव सावंत येताना दिसले..राजाभाऊने अंगणातून बसल्या जागेवरून हाक मारली " सावंत तात्या..... "
राजाभाऊच्या दणदणीत आवाजाने सावंत जागीच थांबले.हातातला पेपर बाजूला ठेवत राजाभाऊ फाटका पर्यंत गेला.
" कुठे गेला होतात ?" फाटक उघडत राजाभाऊनी विचारले.
" जरा भाच्याकडे गेलो होतो " सावंत रस्त्यावरूनच बोलले.
" अहो, या जरा बसा ."
" नको राजाभाऊ.अहो, घरी जायला उशीर होईल."
"अहो, या जरा .कधीमधी भेटणारी माणसं तुम्ही या ." राजाभाऊनं सावंताना गळ घातली.गोड्गोड बोलत राजाभाऊनी अखेर सावंताना अंगणात आणलचं.
" भाच्याकडे काय विशेष ?" खुर्चीत रेलत राजाभाऊनं विचारलं.
"विशेष काही नाही.अँग्रिकल्चर काँलेजला आहे.इथे हाँस्टेलला रहातो.बहिण म्हाणाली जरा लक्ष ठेवत जा."
"लक्ष ठेवायलाच पाहिजे ,त्यात तुम्ही मोठे ." सावंतांच्या वाक्यावर राजाभाऊ उत्तरला..’तुमचा मुलगा पण अँग्रिकल्चरला होता ना ?’ राजाभाऊनी खडा टाकलाच.
"तो एम.एस.सी झालाय. पुण्याला असतो.".
" मध्ये त्याला पाहिला होता ,सोबत बायको होती काय ?" राजाभाऊ हळूहळू सावंतांच्या वर्मावर घाव घालू लागला.सावंत थोडा वेळ स्तब्ध राहिले.
" लग्न कुठे पुण्याला केलं काय ? बोलवलं नाही आम्हाला ? " राजाभाऊच्या प्रश्नावर सावंतांची नजर झुकली.
" नाही,म्हणजे त्यानीच जमवलं." सावंत शांतपणे म्हणाले.
" जाऊ दे, अहो, त्यात काही विशेष नाही .हल्ली भरपूर लग्न अशीच होतात." राजाभाऊनं दिलासा दिला.
"चालायचं म्हटल की सगळं चालतं.आईवडिलांनी मुलांकडून जास्त आशा बाळगायच्या नाहीत हेच खरे" .सावंत गंभीर झाले होते.
"जातीतली आहे ना ? तुम्ही ९६ कुळी ना ?"
"जातीतली असती तर कशाला ? " सावंत तिरस्काराने म्हणाले.
"रीतभात तरी आहे का ?" राजाभाऊनं भारीला एक प्रश्न विचारलाच.
"कोण बघतंय ?.लग्न झाल्यावर सोपस्कार म्हणून गेलो होतो आम्ही .तुम्ही करा राजाराणीचा संसार ". सावंत नैराशाने म्हणाले.
"तुम्हाला सांगितलं होतं का त्याने ?"
"तो हरामखोर हो,पळून गेला आणि लग्न करून आला.आता हा शिकला सवरलेला ,२५ हजार पगार घेणारा मुलगा,त्याला आपण काय बोलणार ?" सावंत रागाने बोलले आणि राजाभाऊ त्यांच्याकडे पहात बसला.
सावंत सारं काही भरभरून बोलले.मुलाने परस्पर लग्न केल्याचे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं
" खरं सांगू राजाभाऊ म्हणून आम्ही दोघं कुठे बाहेर पडत नाही."
सावंतांच्या या वाक्यावर .राजाभाऊनं त्याना धीर दिला."तसं काही मानू नका सावंत ,अहो हल्ली चलतं सगळं".
"तुम्हाला नाही कळायचं राजाभाऊ परदु:ख शीतल असतं राजाभाऊ"
सावंतांच्या बोलण्यात अखेर ‘परदु:ख ’ हा शब्द आलाच.
‘परदु:ख शीतल असत ‘ हा शब्द या अंगणात राजाभाऊने हजारवेळा ऐकला होता.
"हे बघा तात्या, तुम्हाला काही वाईट वाटायला नको. कुठे नाही गेलात तरी माझ्याकडे या आणि तो तुमचा मुलगा आला तर त्यालाही माझ्याकडे पाठवा." राजाभाऊनं सावंताना दिलासा दिला.
राजाभाऊच्या अंगणातून सावंत हळुवार पावलं टाकत बाहेर पडले.थोडावेळही बसण्यास तयार नसलेल्या सावंतांच्या भावनेचा बांध असा काही फुटला कि तब्बल दोन तास सावंत आपल्या व्यथा राजाभाऊला सांगत होते.सावंत गेल्यावर राजाभाऊने हातपाय लांब केले.एका बाजूला शिकला सवरलेला सावंतांचा मुलगा परस्पर लग्न करून आला.तर दुसरीकडे रानड्यांची मुलगी पंधरा ठिकाणी दाखवूनही कोणाच्या पसंतीला येत नव्हती.मुलीच्या या चिंतेने रानडे हैराण झालेले असायचे.रानडे मुलगी दाखवून आले की ही बातमी राजाभाऊला कळायची आणि संध्याकाळी "मग ठरलं का मुलीच लग्न ?" असा खोचक प्रश्न राजाभाऊ रानड्यांना विचारायचा . रानडेही मन मोकळं करायचे आणि राजाभाऊचाही वेळ जायचा.
"ठरेल हो धीर धरा" असा वर दिलासा राजाभाऊ त्यांना द्यायचा." परदु:ख शीतल असतं राजाभाऊ तुम्हाला मुलगी नाही म्हणून हे दु:ख तुम्हाला कळणार नाही ." रानडे असं म्हणून गप्प व्हायचे.
घराच्या या अंगणात गप्पांतून अनेक दु:ख समोर आली. याच अंगणात ‘परदु:ख शीतल असतं ‘ हा शब्द प्रतिध्वनी सारखा उमटत असे.
राजाभाऊ मात्र निर्विकार असे .कसली दु:ख नि काय ! आपल्या सारखं आयुष्य पाहिजे.लोक काय म्हणून दु:खाच एवढ भांडवल करतात राजाभाऊच्या मनात हा विचार नेहमी येई. मुंबईतील आपली नोकरी किती चांगली होती . स्वेच्छानिवॄत्तीच्या कल्पनेने अनेक जण गळफटले.आता कसं होणार ही चिंता अनेकांना लागली होती पण आपण बिनधास्त स्वेच्छानिवॄत्ती घेतली .मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून रानडे रडतात.पुन्हा पुन्हा त्याच विषयावर दु:खी कष्टी होतात.छॆ:! च्यायला ! माझी बायको सोडून गेली तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही .सुरवतीला सगळे विचारायचे "राजाभाऊ वहिनी कुठे आहेत ? माहेरी गेल्या वाटतं ?" .त्यावेळी सगळ्यांना एकदाच सांगून टाकलं बायको मला सोडून गेली आहे.ती पुन्हा येणार नाही....एकदाच विषय फिनिश ! आरामखुर्चीत बसल्या बसल्या राजाभाऊच्या मनात विचार येत होते.
आपल्या अंगणात हजारो तक्रारी ,गार्‍हाणी ऐकून राजाभाऊ चक्रावून जायचा.जी.के म्हणायचे "राजाभाऊ दु:ख कुणाशी तरी उघडं केलं की मन हलकं होतं.एकवेळ माणूस सुख स्वार्थाने एकटा उपभोगेल पण दु:खासाठी त्याला सोबत असावी असं वाटत रहातं" .
"खरच असं वाटत असेल , दु:ख बोलून हलकं होत असेलं ?" राजाभाऊ या सार्‍या गोष्टीवर काहीकाळ विचार करत असे.
"जाऊ दे "असं म्हणून विषयही सहज सोडून देत असे. राजाभाऊकडे तसं बोलायला फारसं काही नव्हतं.माडाला नारळ किती आले आमसुलं किती विकली ....नाहीतर मुंबईतील गप्पा असे जुजबी विषय तो इतरांशी बोलायचा.पण इतरांच्या पोटात शिरून मात्र तो सारे बाहेर काढत असे.आणि नेमक्या याच गोष्टी त्याला विरंगुळा द्यायच्या.
पेपर वाचणं हा राजाभाऊचा आणखी एक छंद ! पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ,मोठ्या बातम्यांपासून अगदी छोट्या जाहिरातींपर्यंत सारा पेपर राजाभाऊ वाचून काढत असे .पेपर वाचतावाचता आजूबाजूला नजर भिरभिरत असायची.पण आज काहितरी वेगळं घडलं होतं.पेपर वाचता वाचता राजाभाऊ गंभीर झाला.एरव्ही पेपर वाचताना आजूबाजूला पाहणार्‍या राजाभाऊची नजर आज पेपरवर खिळली होती.
‘शारदा सहकारी बँन्केत आर्थिक घोटाळा बँन्क दिवाळखोरीत जाण्याची शक्यता ‘
या बातमीच्या मथळ्यावर राजाभाऊची नजर स्थिर झाली.त्याने पेपरातील संपूर्ण बातमी वाचून काढली.डोळ्यावरचा चष्मा काढला आणि गंभीर चेहर्‍याने तो खुर्चीत विचार करत बसला.बातमीतल्या ओळी तशानतशा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागल्या .
"आत्ताच्या आत्ता दापोलीली निघायला हवं". राजाभाऊ स्वत:शी पुटपुटला .खुचीतून उठत कपडे बदलण्यासठी तो मधल्या खोलीत आला.आई शांतपणे झोपली होती,कपाटाचा आवाज न करता अलगद त्याने पासबुक आणि डिपाँझिट्च्या पावत्या काढल्या.आईला झोपेतून न उठवताच शेजार्‍याला कल्पना देऊन तो घराबाहेर पडला.
शारदा सहकारी बँन्क पेपरातील बातमी राजाभाऊच्या डोळ्यासमोर येत होती.रिक्षा करून तो बँन्केत पोहचला.बँन्केसमोर खातेदारांची भलीमोठी रांग लागली होती.ते दॄश्य पाहून राजाभाऊ अवाक झाला." पैसे बुडाले बहुतेक.... झक मारली आणि इथे पैसे ठेवले"...".चेअरमनला बोलवा आणि आमचे पैसे परत करा.".अशा एकावर एक कानावर पडणार्‍या वाक्यानी त्याचे डोके चक्रावून गेलेतो शांतपणे शेजारच्या कठड्यावर बसला.स्वेच्छानिवॄत्ती घेतल्यानंतर राजाभाऊने बहुतेक पैसे याच बँन्केत गुंतविले होते.आणि त्या व्याजावर तो आपला प्रपंच चालवत असे.गेले तीन महिने पर्यटकांच्या गर्दीमुळे खोल्या बुक झाल्याने तो बँन्केत पैसे काढण्यासाठी आला नव्हता.
"तुमचे किती पैसे आहेत ?" शेजारच्या व्यक्तिच्या आवाजाने राजाभाऊ विचारातून जागा झाला.
"तीन लाख" राजाभाऊ शांतपणे म्हणाला.
"आमचे कमी आहेत ,सत्तर हजार.पैसे मिळतील का हो ? घर बांधयला काढलयं".
राजाभाऊ शेजारच्या माणसाकडे पहात बसला .ज्या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊलाही हवं होतं तोच प्रश्न ती व्यक्ति विचारत होती.बँन्केने खातेदारांनी संयम पाळावा अशी बाहेर नोटीस लावली होती.बँन्केच्या बाहेर राजाभाऊ दोन तास ताटकळत होता.परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने तो घरी परत आला.
घरची परिस्थिती गरीबीची असताना मुंबईचा रस्ता धरलेल्या राजाभाऊनं अहोरात्र मेहनत करून पैसे जमविले.हे पैसे बुडणार तर नाहीत ? या विचाराने तो कासाविस झाला.काडीकाडी जमवून साठवलेला पैसा....आपला पैसा काय हारामाचा पैसा आहे! कधी मिळतील पैसे, तो पर्यंत करायचे काय ?असे अनेक प्रश्न राजाभाऊ समोर आ वासून उभे होते.
घराकडे परततांना त्याची पावली थकली होती. डोळ्यातून फक्त अश्रू येणं बाकी होतं घरात न जाता तो अंगणातील खुर्चीत धपकन बसला.कपाळावर आलेला घाम त्याने रुमालाले पुसला.बँन्केच्या पासबुकावरून तो सारखासारखा हात फिरवत राहिला.बँन्केतील पैशाचा विमा असेल तर पैसे परत मिळतील.नाहीतर ,आयुष्याची सारी कमाई वाया जाणार या विचाराने तो चलबिचल झाला.
बँन्केतून परतल्यावर दोन दिवस झाले तरी राजाभाऊ कुणाशी काही बोलला नाही. दोन दिवसात कुणीही शेजारी फिरकलाही नाही.त्यामुळे राजाभाऊ अधिकच बेचैन झाला होता.ह्र्दयात दु:ख अगदी गच्च भरलं होतं.त्याला वाट करून दिली नाही तर त्याचा स्फोट होणार होता. दोन दिवसानंतर तो घराबाहेर पडला.घराच्या आवारात येरझार्‍या घालू लागला.रानडे ,सावंत,जावडेकर,वागळे ,गवाणकर कुणीतरी भेटतंय का? याची राजाभाऊ आतुरतेने वाट पहात होता.खूप खूप वाटू लागलं कुणाला तरी सांगावं ‘शारदा बँन्क बुडतेय.माझे पैसे बुडणार.‘. येरझारा घालताना राजाभाऊ स्वत:शीच बोलत होता.एवढ्यात त्याला गवाणकर येताना दिसले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.गवाणकरांना तरी सारं सांगता येईल या विचाराने तो पुढे आला.
"गवाणकर.." या आपल्या नेहमीच्या आवाजाने राजाभाऊने हाक मारली.
" राजाभाऊ,आता फार घाईत आहे .उद्या येतो ".गवाणकर तसेच बाहेरून निघाले.
"अहो ,गवाणकर,पाच मिनीटे तरी या "
"नको राजाभाऊ प्लीज ."राजाभाऊच्या विनंतीला मान न देताच गवाणकर सटकले.
वागळेही तसेच न थांबता निघून गेले.
रानड्यांना येताना पाहून राजाभाऊला धीर आला.रानड्यांसमोर मन मोकळं करता येईल हा विचार त्याच्या मनात येत असतांनाच नातवाला शाळेतून आणण्याची सबब पुढे करुन रानडेही निघून गेले.सावंताना भाजी आणण्याची घाई होती.त्यामुळे रात्री जेवून बसू असे आश्वासन देऊन सावंतही निघून गेले होते.
खूप वाट पाहूनही राजाभाऊला कुणीही भेटले नाही.एरव्ही तासनतास गप्पा मारून आपलं दु:ख हलकं करणारे सारे आज मात्र राजाभाऊचं एकण्याला हजर नव्हते .राजाभाऊ अक्षरश: रडकुंडीला आला. आपलं मन मोकळं करावं , आपलं दु:ख कुणा पुढेतरी हलकं करावं , आपल्याही दु:खात कुणीतरी वाटेकरी असावं असं राजाभाऊला खूप खूप वाटू लागलं .पण कुणीही त्याला भेटू शकले नाही.दु:खी मनाने तो माजघरात आला.आजारी आई काँट्वर झोपलेली होती.तिच्या पायाजवळ तो बसला.
‘आई ,मुंबईतून आणलेले पैसे ज्या बँन्केत ठेवले होते ती बँन्क.. ’...आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. एवढे दिवस दाबून ठेवलेले अश्रू डोळ्यातून भळाभळा बाहेर पडले.बिनधास्त ,स्वच्छंदी ,उद्याची तिळमात्र तमा न बाळगणारा राजाभाऊ, आईच्या पायाजवळ बसून मनसोक्त रडला.
घरा बाहेर आला तेव्हा राजाभाऊला खूप हलकं हलकं वाटलं.अंगणात ठेवल्या आरामखुर्चीत तो रेलला.त्याला खूप काही बोलयचं होतं..आभाळाकडे नजर टाकत, डोक्यावर हात ठेवून आभाळाकडे तो शांतपणे पहात होता.समोरच्या खुर्च्या रिकम्या होत्या.अंगण अगदी सामसूम होतं. परदु:ख शीतल असतं हे वेगळं सांगण्याची आता गरजच उरली नव्हती.

लेखक -सुनिल पाटकर
.........................................................समाप्त.......................

न थांबणारा पाऊस

तुझ्या अंगणातला पाऊस
माझ्या अंगणातला पाऊस

शेतात मरमर राबणा-या
ढवळ्या-पवळ्याचा पाऊस

टोपलीतून भाकरी आणणा-या
अनवाणी पावलांचा पाऊस

एका छत्रीत भिजलेल्या
अनेक प्रेमकथांचा पाऊस

रानफूलांच्या वाटेवर
हरवून गेलेला पाऊस

वाफाळलेल्या चहाच्या कपात
चिंब भिजलेला पाऊस

डोक्यावरून घेतलेल्या रजईत
दडून बसलेला पाऊस

पाण्यात भिरभिरणा-या
कागदी होड्यांचा पाऊस

गरागरा फिरणा-या
इवल्याशा छत्रीतला पाऊस

पावसात मनसोक्त भिजणारी
चिमुकली मुलं पाहिली की
आठवतो मला तो पाऊस

आभाळा एवढा डोंगर
कवेत घेऊन आलेला पाऊस

डोंगराखाली गाडलेले ते,
इवलेसे जीव आठवले की
माझ्याही डोळ्यातून बरसतो
न थांबणारा तो पाऊस

सुनिल पाटकर (५-८-२०१०)