बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

आता सर्वत्र भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत पोहोचला असून लावणीच्या वेळी शेतात म्हटली जाणारी पारंपरिक गाणी आता दुर्मिळ झाली आहेत. नवी पिढी, शेतीची नवी साधने यामुळे भातलावणीलाही आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे.

ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. पूर्वी खेडेगावात असणारी वर्दळ, मदतीला धावणारे सहकारी व सहजतेने मिळणारे शेतमजूर यामुळे शेतीची कामे झपाट्याने पूर्ण होत. गावेच्या गावे एकमेकांकडे लावणी करण्यासाठी जात होती. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात असत. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरविलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. शेतीच्या हंगामात भातलावणी हा उत्साहाचा हंगाम असे. शेतात पारंपरिक गाण्याचे सूर उमटत असत. इरले डोक्‍यावर घेतलेले, घोंगड्या अंगावर घेतलेले अनेक शेतकरी शेतात लावणीत मग्न असायचे. पेट्रोमॅक्‍सच्या उजेडात लावणी होत असल्याच्या आठवणीही येथील शेतकरी सांगतात. परंतु आता पारंपरिक गाणी दुर्मिळ झाली आहेत. नव्या पिढीला ही गाणी माहीत नाहीत.

सध्या भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. 100 ते 150 रुपये दिवसाची मजुरी असते. याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास 250 ते 300 रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. मजुरीसाठी आदिवासी येत असल्याने या दिवसांत आदिवासी वाड्यांवर शुकशुकाट असतो. इरले-घोंगड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे. शेतात बसण्यासाठी वापरली जाणारी लाकडी तिवई मात्र अजूनही आहे. तालुक्‍यात लावणीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वीसारखी रंगत लावणीला येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास किमान 15 माणसे व चार नांगर यांची गरज असते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावणीसाठी शेतक-यांची गर्दी दिसते. परंतु या शेतातून पारंपरिक गाण्यांचे स्वर मात्र कानावर पडत नाहीत. आधुनिक बियाणे, शेतीचे नवीन तंत्रज्ञान, शेती करणारी नवी पिढी, पैसे देऊन आणलेले मजूर यामुळे शेतीही आता व्यावसायिक होऊ लागली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा