प्रत्येक शिक्षकाने वाचावा असा लेख

शुक्रवार, ११ मार्च, २०११शाळेत उल्हास! (अनिल अवचट)

सौजन्य-esakal.com

त्या छोट्या गावात एक जुनी शाळा होती. दगडी भिंती, वर कौलं. ती पूर्वीची लोकल बोर्डाची शाळा. आता जिल्हा परिषदेची. त्यांनाही धड चालवता आली नाही म्हणून एका संस्थेला चालवायला दिलेली; पण तरी शाळा वर येईना. सातवीपर्यंत शाळा, तरी निकाल खाली खाली जाणारे. शिक्षकांना पगार कमी, म्हणून शिक्षक टिकायचे नाहीत; पण त्यातल्या त्यात तांबोळीबाई टिकून होत्या, म्हणून बरं. त्या मुख्याध्यापिका होत्या. निकाल लागले की वरिष्ठांकडून कानउघाडणी. त्याला तोंड दिलं की तोवर पावसाळा सुरू. जुनं छप्पर. मग पाण्याच्या धारा, शाळेत थेट. पण दुरुस्तीला पैसे नाहीत.
अशा अवस्थेत एक तरुण शिक्षक भटकत त्या गावात आला. गावाजवळ मोठा डोंगर, त्यावर जंगल होतं. तिथं तो ट्रेकिंगला येत असणार. तांबोळी बाईंनी आधीच सांगितले : "इथं पगार कमी आहेत, तेही अनियमित. चालेल का?' तो म्हणाला ः "पगाराचा प्रश्‍न नाही. मला शिकवण्याचं स्वातंत्र्य मिळेल का?'
"म्हणजे?'
"मी रूढ पद्धतीनं शिकवणार नाही. मला हवं ते, हवं तसं आणि हवं तिथं शिकवणार.'
बाई स्तंभित झाल्या. म्हणाल्या,"पण मग रिझल्टचं काय?'
"ते काम आपोआप होईल. मला सातवीचा वर्ग द्या.'
त्याचं नाव उल्हास पाटील. वर्गावर आल्या आल्याच त्यानं मुलांना सांगितलं : "त्यांना मुलांनी उल्हासदादा म्हणावं. सर नाही, गुरुजी नाही, मास्तर नाही. फक्त उल्हासदादा. आपण दादाला अहो-जाहो म्हणतो का? नाही ना! मग तसंच "ए उल्हासदादा' असं म्हणायचं. मुलांना हा धक्काच होता. टेबलावर छडी आपटणारे, कान पकडून उठाबशा काढायला लावणारे, अंगठे धरून उभे करणारे शिक्षक त्यांना माहीत होते. पण हे अजबच. जिभा रुळायला वेळ लागला; पण झालं शेवटी. त्या एका कृतीनं उल्हासदादानं मुलांना जिंकलंच. इतर शिक्षकांना हे खटकलं; पण काय करणार? उल्हासदादाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं. उल्हासदादाचा वर्ग क्वचित शाळेत भरत असे. थोड्या गप्पा झाल्या की चालले बाहेर. एरवी वर्षातून फारतर एक-दोनदा पिकनिक असायची. इथं तशी रोजच -कधी झाडाखाली बसायचं, पलीकडं एक महालक्ष्मीचं देऊळ होतं. तिथं कुणी फारसं फिरकत नसे. तिथं बसत. त्या पोरांनी ते देऊळ आतून-बाहेरून असं स्वच्छ केलंय म्हणता. शाळेचं पटांगणही मोठं होतं. तिथंही त्यांचे तास चालत; तर दूरच्या डोंगरावरही. डोंगरावर पोरांनी एक कपार शोधून काढली. त्या गुहेत सगळ्यांना बसायला एैसपैस जागा होती. तिथून खालचं मोठं दृश्‍य दिसायचं. शाळा दिसे, गाव दिसे. मुलांना आपापली घरंही वरून ओळखून काढायचा नादच लागला होता.
तांबोळीबाई चिंतेत पडल्या. हा बाबा कुठं कुठं नेतोय पोरांना! एरवी पिकनिकला पोरांना घेऊन जायला कुणी शिक्षक तयार नसतो. एखाद्या पोराचा पाय घसरून ते पडलं तर जबाबदार कोण? इथं हा दादा सगळ्यांना घेऊन रोज जातोय. पोरांची तक्रार नाही की त्यांच्या पालकांची. पण ते ठीक आहे एक वेळ; पण अभ्यासाचं काय? पण त्यांना माहीत नव्हतं, की पोरांचा अभ्यास चाललेलाच होता. तो पुस्तकातला नव्हे; तर पुस्तकाबाहेरचा. त्यांना झटपट डोंगरावर चढता येत होतं. कुठल्याही झाडावर ते छानपैकी चढू-उतरू शकत. जंगलात अनेक रसरशीत फळं दिसत; पण पोरं ती तोडून खात नसत. कारण दादानं त्यांना झाडांची खूप माहिती दिली होती. कुठली फळं खाल्ली तर पोट बिघडतं, जुलाब सुरू होतात, हे त्यांना आता माहीत होतं. रामेठ्याचं झुडूप दाखवलं, त्याचा कुठलाही भाग चावला तर हिरड्या सुजतात, याचा त्यानं प्रत्यक्ष अनुभवही सांगितला होता. काही झाडांची पानं चुरगळून वास घेतला, की छान वास येतो, हेही पोरांना आता माहीत झालं होतं. साप दिसला की पोरं आता घाबरत नसत. स्थिर उभी राहत. त्याला जाऊ देत. त्या सापाचं नाव दादा त्यांना सांगायचा. मातीत, चिखलात उमटलेले प्राण्यांच्या पावलांचे ठसे ते ओळखत. गावच्या नदीच्या डोहात डुंबत असत. असं बरंच, बरंच काही.
मग? हा काय अभ्यास झाला? झाडावर चढणं काय परीक्षेला येतं? त्याला काय मार्क असतात? पण दादा मुलांना म्हणायचा, "हे आधी आलं पाहिजे. हे जगण्यासाठी आवश्‍यक आहे. नंतर बाकीचं.' मुलं एकमेकांना मदत करायची. डोंगरावर चढताना खालच्याला हात द्यायची. एक मुलगी अशी, ती दमलेल्या सगळ्यांचे पाय चेपून द्यायची. त्यामुळं डोंगरावर चढून मुलं गवतात पसरायची. मग "ताई'च्या नावानं बोलावणी सुरू. नवीन प्रकारचा किडा दिसला की पोरं तो पकडून दादाला दाखवायची. मग तो माहीत असला की त्याच्याविषयी दादा माहिती सांगायचा. माहीत नसेल तर, घरी असलेल्या पुस्तकात सगळेजण बघायचे. शोधून त्याची माहिती, नाव सापडलं की जल्लोष व्हायचा. तसंच पक्ष्यांबद्दलही. अनेक पक्ष्यांचे आवाज (शिट्ट्या म्हणा, कॉल म्हणा) मुलं हुबेहूब काढत.
भूगोलाचा अभ्यास कसा सुरू झाला माहिताहे? गावाचा, परिसराचा नकाशा करायची टूम निघाली. कागदाला कागद जोडून एक मोठा कागद तयार झाला. कुठून सुरवात करायची? गावाचा मध्य कुठला म्हणायचा? चर्चा झाली. मग ठरलं की, गावाच्या मधोमध चावडी आहे, तिथं दोन रस्ते क्रॉस होतात, तो चौक आहे. शिवाय मुख्य रस्त्याला दोन समांतर रस्ते. गावाला तीन वेशी. पलीकडं थोड्या अंतरावर नदी. तिच्या काठचं देऊळ. अंतरं कशी काढायची? दादाजवळ मोठा टेप होता; पण तो एकच. मग मुलांनी दोऱ्या जमवल्या. दहा फुटांची एक दोरी, असं माप; मग अशा अनेक दोऱ्या घेऊन पोरं गावभर फिरून मापं घेऊ लागली. गावकरी चकित झाले. ही कसली मोजणी? मग उल्हासदादाविषयी आणि त्याच्या वर्गाविषयी कळलं. गावकरी पारावर बसून बोलू लागले : "आजवर एवढे मास्तर पाहिलेत; पण हा काही निराळाच.' मोठ्या झाडांचीही नकाशात नोंद होत होती. त्यांची नावं, त्यांची वयं ती पोरं वृद्ध गावकऱ्यांना विचारू लागली. मग तेही त्या झाडांच्या आठवणी सांगू लागले.
घराघरांतही दादाच्या टोळीची चर्चा. मुलं नुसती उत्तेजित झालेली. पूर्वी आयांना या पोरांना उठवण्यापासून केवढा त्रास. आवरून शाळेत ढकलणं ही केवढी कटकट; पण आता पोरं वेळेआधीच शाळेत पळायची. सगळे अचंबित झालेले.
तिकडे हा वर्ग वगळता सगळी शाळाही चकित झालेली. शिक्षक तर उलटेपालटेच! इतर वर्गातली मुलं विचारू लागली ः "आम्हाला असं का नाही?'
तांबोळी बाई समजूत घालायच्या : "तुम्ही पुढं त्या वर्गात जाणारच आहात.'
टीचर-रूममध्ये शिक्षक म्हणायचे : "ते नकाशे वगैरे ठीक आहे; पण "साहेबां'नी अजून गणिताला हात घातलेला नाहीए. तेव्हा कळेल मजा.'
शास्त्राचे सर म्हणायचे : "आणि फिजिक्‍स? फ्या फ्या उडेल तिथं.'
असं म्हणून ते सगळं फ्या फ्या हसायचे! दादा हे सगळं ऐकायचा आणि तोही सौम्यपणं हसायचा. म्हणायचा ः "बघू. जमेल तसं.'
पण त्यानं एव्हाना मुलांना मैदानात नेऊन भूमिती शिकवायला सुरवात केली होतीच आणि भूमिती वेगळी कशाला, फिजिक्‍सही होतंच. जे विषय असतील ते होतेच. झाडावर चढून दोन लहान-मोठे दगड उल्हासदादानं मुलांना खाली टाकायला लावले. वजनात फरक असून ते दगड एकदम रप्पकन खाली आपटले. यावरून गुरुत्वाकर्षणाचा भाग त्यानं मुलांना सांगितला. एका मुलाला जमिनीवर समांतर दगड फेकायला सांगितला. शेवटी शेवटी तो हळूहळू खाली आला. मुलानं दिलेली शक्ती संपल्यावर गुरुत्वाकर्षण त्याला कसं खेचून घेतं, हे सांगितलं. त्यावरून मुलं "न्यूटनचा नियम' शिकली. गावातल्या विहिरीवरच्या रहाटगाडग्यावर "पुली' किंवा "कप्पी'चा भाग ती शिकली.
जमिनीत एक खांब रोवला. एक दोरी बांधून एका मुलानं हातातल्या काठीनं मातीत वर्तुळ काढलं. त्यातून त्यांना त्रिज्या कळली, व्यास कळला. अशी अनेक वर्तुळं काढून त्याचं डिझाइन तयार केलं; मग गावात कुठं कुठं वर्तुळं दिसतात, हा प्रश्‍न दादाने टाकला. चष्मा, सायकलचं, बैलगाडीचं चाक, ताट-वाटी अशी मोठीच यादी तयार झाली! दोन मुलींनी फुगडी खेळली आणि तेही वर्तुळ दाखवून सगळ्यांची दाद घेतली. मग चौकानाची (पुस्तक, घर वगैरे) उदाहरणं... असंही बरंच झालं.

शंकूचा आकार सांगितला. खाली एक वर्तुळ, वर एक बिंदू...यांना जोडणारा आकार. मुलांना सापडता सापडेना. दादानं हसून एका दिशेनं बोट दाखवलं. मुलांना कळेचना. मग कोणीतरी ओरडलं, "अरे, देऊळ!'
देवळाचा शिखराचा भाग, खरंच की! शंकूच तो! सगळे "देऊळ, देऊळ' करून नाचू लागले. मग देवळात जाऊन घंटेमध्ये गोल पाहिला, शंकराच्या पिंडीत दंडगोल पाहिला आणि धान्य साठवायच्या कणगीतही कुणाला दंडगोल त्याच वेळी सापडला. सगळी मुलं दाहीदिशा दौडत होती आणि मिळालेली माहिती, सुचलेला विचार घेऊन दादाकडं परतत होती.
सगळ्या शाळेचे, म्हणजे इतर शिक्षकांचे डोळे लागले होते ते, हे गणित कसं शिकवतात याकडं. दादानं पोरांची एक मीटिंग घेतली. वेशीबाहेरच्या पारावर. सांगितलं की - "आपल्याला व्यापार करायचाय.' मुलांना काही कळेना. मग दादानं सांगितलं ः "शेतकऱ्याकडून काहीतरी विकत घ्यायचं आणि ज्याला गरज आहे त्याला विचारायचं.'
काय विकता येईल? धान्य? भाजीपाला? की फळळ? धान्य हा पर्याय सर्वांनी निवडला. ती सगळी शेतकऱ्यांचीच मुलं होती. धंद्याला लागतं भांडवल; पण ते आपल्याजवळ नाही; मग आपापल्या आई-वडिलांकडून पाच पाच किलो गहू उसना आणायचा...वगैरे.
मुलांनी अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. व्यापारी शेतकऱ्याला कुठला भाव देताहेत ते काढलं. बाजाराच्या दिवशी बाजारात जाऊन गव्हाचा काय भाव आहे, ते काढलं. परत झाडाखाली "बिझनेस मीटिंग'! शेतकऱ्याकडून थोडं जास्त भावानं धान्य घ्यायचं आणि बाजारभावापेक्षा कमी दरानं विकायचं. झालं. वानरसेना कामाला लागली. घराघरांतून धान्य आलं. हिशेब ठेवायला मुलं चोख होती. विक्री सुरू झाली. जाहिरात करायला मुलं बाजारभर ओरडत होती. कमी दरात तेवढाच चांगला माल म्हटल्यावर हां हां म्हणता त्यांचं धान्य संपून गेलं. परत हिशेबाची मीटिंग. पाच पाच किलोचे पैसे घरोघर पोचवण्यात आले. घरचे चकित. त्यांनी पोरांच्या हौसेपायी धान्य देऊन टाकलं होतं. वडिलांनी मुलाला विचारलं ः "हे जास्त पैसे आहेत.'
तो म्हणाला : "असू द्यात. तुम्ही आमचे भागीदार आहात.'
आईनं पुढं येऊन पोराला जवळ ओढलं. थोपटत म्हणाली : "वा रं, माझा छोटा वेपारी.'
तरीही पैसे उरलेच. मग मुलांनी दर आठवड्याला व्यापार केला. कधी धान्याचा, कधी कडधान्याचा, कधी पेरूचा, कधी आंब्याचाही. तांबोळी बाईंची परवानगी काढली आणि त्यांनी त्या पैशातून शाळेच्या छपराची दुरुस्ती केली. शाळेला रंग लावला. रंग लावायला सगळी शाळा सहभागी. इवलेसे हातही इवल्या ब्रशांनी त्यांची शाळा रंगवत होते. मग त्यानंतर त्यांनी सर्वत्र चित्रंही काढली आणि अखेरीस ती शाळा मुलांची शाळा झाली.
परीक्षेला महिना राहिला. दादानं सांगितलं आता त्यांना : "पाहिजे तो अभ्यास करायचा.'
मुलं गोंधळली. म्हणाली :"परत तो पुस्तकी अभ्यास?'
दादा म्हणाला : "आपण मजा करता करता तो केलाच आहे, आता फक्त त्याची उजळणी.'
हां हां म्हणता पोरांनी तोही अभ्यास करून टाकला. परीक्षेत सगळे पास झाले. सगळ्या पोरांना दु:ख झालं. आता शाळा संपली! दादाचा सहवास संपला. सर्व शाळेनं उत्साहानं उल्हासदादाचा सत्कार समारंभ केला. त्यात ही खंत पोरांनी बोलून दाखवली. दादा म्हणाला ः "तुम्ही जाल तिथं हे "बी' घेऊन जा आणि रुजवा!'
तांबोळी बाईंना काळजी पडली. उल्हासदादा राहतोय की जातोय... पण त्याचा उलगडा दादानंही केला नाही.
काही मुलं पुढं शिकणार नव्हती. शहरात जाऊन राहण्याइतके पैसे त्यांच्या पालकांकडं नव्हते. ते शेतीतच लागणार होते. मग त्यांनी ठरवलं की, दादाला मदत म्हणून ते दिवसातला काही वेळ शाळेत येत राहतील.
आता या गोष्टीचा शेवट काय करू या ?
उल्हासदादानं सर्वांना त्याच्या प्रयोगात ओढलं. ती शाळा वेगळीच शाळा झाली. तांबोळी बाई रिटायर होणार होत्या. त्यांनी दादाकडं सूत्रं सोपवली.
नको, हा अपेक्षित शेवट आहे.
मग जरा रोमॅंटिक?
दादाला शोधत शोधत एक तरुण मुलगी आली आणि ती त्याच्या गळ्यात पडली. काही तरी वेगळं करण्यासाठी कुणालाही न सांगताच तो घरातून बाहेर पडला होता. त्याच्या या मैत्रिणीलाही न सांगता. मग काय? दादा गेला तिच्या बरोबर?
नको नको!
बरं.. सनसनाटी शेवट करू या ?
त्याला शोधत पोलिस येतात. हा सापडल्यावर त्याला बेड्या घालतात. कारण हा गंभीर गुन्हा करून फरार झालेला असतो; पण इतका प्रगल्भ कोवळ्या मनाचा माणूस असं करू शकेल? तर दुसऱ्याला वाचवायला त्यानं गुन्हा अंगावर घेतला असेल का? पण मग तो फरार का झाला? शिक्षेला सामोरं जायचं सरळ! की त्यापूर्वी काही तरी चांगलं करावेसं वाटलं म्हणून फरार होऊन तो या शाळेत आला?
डोकं चालेनासं झालं.
काही का होईना शेवट. त्या मुलांना जे मिळायचं, ते मिळालं ना. ते जगण्यातली कला शिकले ते पुरेसं नाही का? इतर शिक्षकांपैकी काहींचे तरी डोळे उघडले असतील आणि ते मुलांसमवेत शिक्षण देत-घेत असतील...
कदाचित दादाच्या वर्गातल्या दहा-पाच मुलांनी शिक्षण पुरं करून अशी शाळा काढली असेल तर...? आणि तीही अधिक दुर्गम खेड्यात. तर...?
मग हा कसा वाटतो शेवट?
शेवट?
अहो, ही तर आता कुठं छान सुरवात आहे!!