आद्य क्रांतिकारक

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

आद्य क्रांतिकारक अशी ओळख असणारे  वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात ४ नोव्हेंबर १८४५ साली झाला . फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणी तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. इंग्रज सरकारच्या रेल्वे व सैन्य अर्थ विभागात त्यांनी नोकरी पत्करली. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले.१८७६ चा दुष्काळ,प्लेगची साथ ,यामुळे त्यांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध चीड निर्माण झाली,
आजारपणामुळे  अंथरुणाला खिळलेल्या  आपल्या आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली परंतू इंग्रज अधिकार्‍याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. परंतू त्यावेळच्या सुशिक्षित लोकांची फारशी साथ फडके यांना मिळाली नाही.फडक्यांनी मग महाराष्ट्रातील रामोशी,बेरड भिल्ल आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. सावकार ,जमिनदार, श्रीमंत यांच्या घरावर  धाड टाकून शस्त्र घेणे .गरीबांना पैसे वाटणे ही कामे वेगाने सुरु झाल्याने फडके लोकप्रिय झाले. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष ते विचलीत  करत. इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा निश्चय केला. आणि त्यानुसार मेजर डॅनियेल याची खास नेमणूक करण्यात आली. सरकारने फडक्यांना पकडून देणा-याला ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरचे डोके आणून देणार्‍यास त्याहून ७५ हजाराचे मोठे इनाम जाहीर केले आणि इनामाची पत्रके शनीवारवाड्याच्या परिसरात लावली. .
कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले. व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.फडक्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना  एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे  शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तुरुंगापासून ते दूर पळाले होते. परंतू शेवटी ते सापडले  या महान देशभक्ताचा १७ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगातच मृत्यू झाला
[

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा