मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

भारताची भ्रष्टाचारात घोडदौड.

भारताची भ्रष्टाचारात घोडदौड..
सौजन्य-सकाळ वृत्तसेवा

जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणा-या भारताने भ्रष्ट्राचाराच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने (टीआय) भ्रष्टाचाराच्या निर्देशांकानुसार विविध देशांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात भारत हा 87 व्या क्रमांकाचा भ्रष्ट देश आहे. 2009 मध्ये 84 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने भ्रष्टाचारात घोडदौड करत 87 वा क्रमांक पटकाविला आहे. या क्रमवारीत आशियातील भूतान हा देश सर्वांत कमी भ्रष्ट देश आहे.
बर्लिन येथील निमसरकारी असलेल्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संघटनेने 178 देशांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या क्रमवारीत चीन 78 व्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तान भारताहून अधिक भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत आहे. तो 143 व्या क्रमांकावर आहे.
संस्थेच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे. संघटनेने ही क्रमवारी चढत्या क्रमाने लावली आहे. याचाच अर्थ कमी क्रमांक हा कमी भ्रष्टाचार सूचित करतो. तर, अधिक क्रमांक अधिक भ्रष्टाचारा दाखवितो. क्रमवारीतील एकूण देशांपैकी तीनचतुर्थांश देशांनी शून्य ते दहा या क्रमवारीत पाचहून कमी गुण मिळविले आहे. याचाच अर्थ जगभरात भ्रष्टाचाराची समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मागील वर्षी भारताला 3.4 गुण मिळाले होते. तर, यावर्षी 3.3 गुण मिळाले आहेत. भ्रष्टाचार विरोधात कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे टीआयचे म्हणणे आहे.
याबाबत टीआयचे अध्यक्ष ह्युगेट लैबेल म्हणाले, की सध्याचे नियम आणि कायदे अधिक बळकट बनविण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्ट लोकांना आपली संपत्ती लपविण्याची कोणतीही व्यवस्था नसावी.
या क्रमवारीत सोमालिया हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय. त्यानंतर अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो. इराक चौथ्या क्रमांकावर आहे.
भूतान हा जगातील स्वच्छ म्हणजे कमीत कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर अमेरिका 22 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, सिंगापूर, न्यूझिलंड हे देशही कमी भ्रष्ट आहेत. तर सोमालिया (1.1गुण) हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा