हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे.
घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकी गंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊस पाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांच उभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेला मोठा धबधबा आपल्या दृष्टिस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांना याचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.
डोंगराच्या कपारीत १००-१५० माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेश मंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.याठिकाणी धार्मिक विधी सतत सुरु असतात .खिचडीच्या प्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरम पिठलं-भाकरी ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळ नाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृह आहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथून घळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकण रेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.
शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र . ९२२५७८४१२७
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
..........................................
शिवथरघळची वाट कँमे-यातून ..
sundar, sundar.....
उत्तर द्याहटवा