गांधीवादाची शोकांतिका

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

गांधीवादाची शोकांतिका 
राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यांचा निर्णय करता येणार नाही. राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत, असे काही व्यवहारवादी हल्ली मानतात. सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते. परंतु केवळ सत्तास्पर्धेत टिकून राहण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान असावे लागते. तत्त्वशून्य, दिशाहीन, सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही. निव्वळ छक्क्य़ापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित राहता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही. हेच महात्मा गांधींनी आपल्या आचरणातून आणि तत्त्वज्ञानातून सांगितले आहे. आणि त्याचाच आज आपल्याला पार विसर पडला आहे.
महात्मा गांधींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना अनेकांनी त्यांना अनेक नावांनी संबोधले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हटले. मला वाटते, सर्व संबोधनांत हे संबोधन अधिक सार्थ आहे. महात्मा गांधींनी खऱ्याखुऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रीय घडण केली. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरता त्यांनी देशव्यापी चळवळ उभारली आणि शेवटपर्यंत तिचे नेतृत्व केले. त्याकरता आवश्यक ते राजकारणी व्यवहारकौशल्य त्यांच्यापाशी होते. परंतु तेवढय़ाने ‘राष्ट्रपिता’ या संबोधनास ते पात्र झाले नसते. कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती हा राष्ट्रीय घडणीचा केवळ एक भाग आहे. निव्वळ व्यवहारकुशल राजकारणाने कदाचित स्वातंत्र्यप्राप्ती झाली असती, परंतु राष्ट्रनिर्मिती झाली नसती. राष्ट्राची घडण करावयाची तर राजकारणाला राजकीय तत्त्वज्ञानाची जोड द्यावी लागते, हे त्यांनी आरंभीच ओळखले आणि प्रथमपासूनच आपल्या राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान दिले. असे तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचवावयाचे तर त्याला थोडाबहुत आचारधर्म चिकटवावा लागतो. महात्मा गांधी हे एक अत्यंत कुशल समाजधुरीण असल्याने त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला जनमनाची पकड घेईल असा आचारधर्म चिकटवला आणि शिस्तबद्ध राजकीय संघटना उभी करण्यास आवश्यक म्हणून या आचारधर्माचा आग्रह धरला. दुर्दैवाने महात्मा गांधींच्या काही अनुयायांना एवढा आचारधर्मच काय तो समजला. असा आचारधर्म स्थल-काल-परिस्थितीसापेक्ष असतो आणि असावयास हवा, हेही ते विसरले. दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती, तशी या अनुयायांवर नव्हती. त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला. ‘गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी’ म्हणून त्यांना कोणी म्हटले तर ‘आपले काही चुकत तर नाही ना?’ असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वत:चे कौतुकच वाटू लागले. या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोडय़ात स्वत:ला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वत:चे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.
या एकांतिक गांधीवाद्यांच्या दुसऱ्या टोकाला स्वत:ला ‘बुद्धिवादी’ म्हणवून घेणारी काही मंडळी होती. राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे, ही गोष्टच मुळात या मंडळींच्या बुद्धीला गम्य झाली नाही. याचे कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीव्यतिरिक्त राष्ट्रउभारणीचे काही कार्य आहे, हेच त्यांना उमगले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपुरते बोलावयाचे तर तेही त्यांच्यासारखे दहा-वीस बुद्धिमान आपल्या राजकीय कौशल्याने इंग्रजांपासून मिळवू शकतील अशी त्यांची मनोमन खात्री होती. ही मंडळी सर्व दृष्टींनी बुद्धिमान असली तरी जनमानसासंबंधीचे त्यांचे अज्ञान आश्चर्यकारक होते. राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि नवराष्ट्र उभारणीच्या या साऱ्या खटाटोपात जनताजनार्दन आणि जनमानस यांचा संबंध काय, याचेच आकलन त्यांना कधी झाले नाही. साहजिकच महात्मा गांधींच्या सर्वस्पर्शी, धुरंदर राजकीय नेतृत्वापुढे ही मंडळी हतप्रभ झाली.
महात्मा गांधींच्या पश्चात राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरूंकडे आली. पंडित नेहरू बुद्धिवादी असले तरी त्यांना जनमानसाची पूर्ण ओळख होती. राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे, हा गांधीवादाचा आशय त्यांनी जाणला होता. त्यामुळे त्यांनीही आपल्या राजकारणाला विरोधी वा विसंगत नाही, परंतु तरीही स्वतंत्र अशा राजकीय तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि राष्ट्रउभारणीचे कार्य चालू राहिले.
पंडित नेहरूंच्या पश्चात आज पुनश्च याविषयी बुद्धिभ्रंश झालेला दिसतो. भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे. ते आणखी काही पिढय़ा चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही, सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे, इत्यादी गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे. किंबहुना सर्व तात्त्विक व नैतिक विचारांची ‘पुस्तकी’ म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा ‘व्यवहारवाद’ म्हणून उदोउदो करावा, अशी प्रथा पडत आहे. एकांतिक गांधीवाद्यांनी एकेकाळी माजविलेल्या कर्मकांडाच्या स्तोमाची ही प्रतिक्रिया आहे.
म्हणूनच राजकारण, समाजकारण किंबहुना सर्व मानवी व्यवहार यांना काहीतरी तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान हवे, हा जो गांधीवादाचा आशय आहे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तात्त्विक अधिष्ठान म्हणजे तत्त्वज्ञानाची लोखंडी चौकट नव्हे. राजकारण, समाजकारण हे बोलून-चालून मानवी व्यवहार आहेत. त्यात वावरावयाचे तर व्यावहारिक तारतम्याचे स्वातंत्र्य हवे. परंतु म्हणून योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यासंबंधीचा निर्णय करणे सुटत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. हे निर्णय सुसंगतपणे करावयाचे तर कुठल्यातरी तात्त्विक, नैतिक निकषांची गरज भासते. उपमाच द्यावयाची तर संगीतातील षड्जाची देता येईल. संगीतात षड्जाला जे महत्त्व आहे, तेच राजकारणात, समाजकारणात तात्त्विक वा नैतिक अधिष्ठानाला आहे. कलाकार त्याच्या आंतरिक स्वरात मिळेल तो षड्ज स्वीकारतो. त्यावर आपली बैठक स्थिर करतो. एवढे केले म्हणजे कोणताही राग कोणत्याही ढंगाने गाण्यास तो मोकळा असतो. मात्र, स्वीकारलेला षड्ज त्याला सोडता येत नाही. षड्ज सुटला तर कलाकार काय गातो, ते त्याचे त्यालाही कळणार नाही. तो भरकटत जाईल. सूर आणि बेसूर यांचा निर्णय करता येणार नाही. किंबहुना संगीत संगीतच राहणार नाही. तीच गोष्ट राजकारणाची आहे. राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय, अयोग्य काय; न्याय्य काय, अन्याय्य काय; नैतिक काय, अनैतिक काय; यांचा निर्णय करता येणार नाही.. राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत, असे काही व्यवहारवादी मानतात. सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते. त्यांना एवढेच सांगावयाचे की, केवळ सत्तास्पर्धेत टिकून राहण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक, नैतिक अधिष्ठान असावे लागते. तत्त्वशून्य, दिशाहीन, सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही. निव्वळ छक्क्य़ापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित राहता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही.
विशाल मानवतावाद आणि त्याच्याशी सुसंगत अशी स्वनिष्ठा हे गांधीवादाचे षड्ज-पंचम आहेत. विशाल मानवतावादाने महात्मा गांधींनी आपल्या राजकारणास आवश्यक ते नैतिक अधिष्ठान दिले. स्वाभिमान व स्वनिष्ठेची तार छेडून त्यांनी राष्ट्रजागृतीचा मंत्र दिला. महात्मा गांधी उभे राहिले आणि भारत उभा राहिला. त्याकरिता राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास यांचीही वाट पाहावी लागली नाही. राजकीय पारतंत्र्यात आणि आर्थिक दारिद्रय़ातही देशाला मानवतावादाच्या नैतिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने आणि स्वनिष्ठेने मान ताठ करून उभे राहणे शक्य आहे, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.
गरीब माणसाने स्वाभिमानाने जगावयाचे तर दारिद्रय़ाबरोबर येणारे सर्व न्यूनगंड सोडून दिले पाहिजेत आणि आपले अंथरुण पाहून पाय पसरण्यास शिकले पाहिजे. श्रीमंत माणसाचा सहवास घडला म्हणजे गरीब माणसाला आपल्या अन्न-वस्त्राबद्दल साहजिकच कमीपणा वाटतो आणि तो श्रीमंत अन्न-वस्त्राचे नसते नाटक करू पाहतो. असल्या न्यूनगंडाने श्रीमंती येत नाही. मात्र, स्वाभिमान नष्ट होतो आणि अंती अपमान पदरी येतो. महात्मा गांधींनी देशाला क्षणार्धात या न्यूनगंडापासून मुक्त केले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपले अन्न-वस्त्र पुरे-अपुरे असेल तसे स्वाभिमानाने वापरण्यास शिकविले. गांधीवाद्यांनी त्याचा मथितार्थ बाजूस ठेवला आणि या साध्या व्यवहारी स्वाभिमानी शिकवणीचा अर्थ केला, की माणसाने आपल्या भौतिक गरजाच शक्य तितक्या कमी केल्या पाहिजेत, हीच गांधीवादाची शिकवण आहे. त्यातून काही प्रामाणिक कर्मकांड आणि पुष्कळशी भोंदूगिरी निर्माण झाली.
स्वाभिमानाबरोबरच महात्मा गांधींनी देशाला स्वनिष्ठेची शिकवण दिली. स्वनिष्ठा म्हणजे आम्ही आमच्यापाशी आहेत त्या साधनांनिशी स्वत:च्या पायावर उभे राहू आणि एक एक पाऊल पुढे टाकू, हा विश्वास! स्वावलंबनाने, स्वनिष्ठेने मनुष्य अंतर्मुख होतो. आपण आपल्यापाशी असलेल्या सर्व साहित्याचा, साधनांचा पूर्ण उपयोग करून घेत आहोत का, हा प्रश्न सतत विचारीत राहतो. याउलट, परावलंबनाचे आहे. परावलंबी मनुष्य बहिर्मुख असतो. कोणाच्यातरी साहाय्याखेरीज आपण आपल्या पायावर उभे राहूच शकत नाही अशीच मनाची धारणा असली म्हणजे मनुष्य स्वत:चे सामथ्र्य, साहित्य व साधने यांचा विचारच करीत नाही. आधुनिकता, अद्ययावतता यांनी दिपून गेल्यामुळे त्याला आपल्यापाशी असलेले साहित्य व साधने निरुपयोगी वाटतात आणि तो अधिकाधिक परावलंबी बनतो.
आपणापाशी असलेल्या साहित्य-साधनांचा पूर्ण उपयोग म्हणजे स्वनिष्ठा. तिचे प्रतीक म्हणून महात्मा गांधींनी सूतकताईचा कार्यक्रम सांगितला. परंतु गांधीवाद्यांनी त्याचाही मथितार्थ बाजूस ठेवून त्याचे कर्मकांड केले आणि त्यात सोवळेओवळे आणले. आहेत त्या साधनांवर निष्ठा म्हणजे नवीन साधने निषिद्ध असे ठरवले आणि आर्थिक प्राप्ती तत्त्वत:च अशक्य केली.
स्वाभिमान व स्वनिष्ठा या गांधीवादाच्या मूळतत्त्वांचा अशा रीतीने गांधीवाद्यांनी विपर्यास केल्यामुळे स्वत:स बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या गांधीवादाच्या टीकाकारांना साहजिकच फावले. गांधीवादाने गरीब माणसास स्वाभिमानाने जगण्यास शिकवले. बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की, गांधीवादास दारिद्रय़ मंजूर आहे. गांधीवाद हा तत्त्वत:च संपन्न जीवनाच्या विरोधी आहे. गांधीवादाने गरीब माणसास असेल त्या साहित्यनिशी कामास प्रवृत्त केले. बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की, गांधीवादाचा नवीन साधनास आणि पर्यायाने विज्ञानासच विरोध आहे. तात्पर्य, गांधीवाद हा भौतिक व आर्थिक प्रगतीस विरोधी व मारक आहे असे बुद्धिवाद्यांनी ठरविले.
सध्या व्यवहारवादाचा अंमल जारी आहे. व्यवहारवादाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठानाचे तर वावडे आहेच; परंतु साधा स्वाभिमानही आर्थिक विकासाच्या आड येतो. स्वाभिमान, वस्तुनिष्ठा याऐवजी मतलब व स्वार्थ याच आर्थिक विकासाच्या प्रेरणा आहेत असे व्यवहारवाद्यांनी ठरविलेले दिसते. त्यामुळे व्यवहारवादाचाच एक भाग म्हणून गांधीवादाचे केवळ ढोंग राहिले आहे. बाकी गांधीवादातील स्वाभिमान व स्वनिष्ठेचा विसर पडलेला आहे. आज देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्र्यरक्षणास अपरिहार्य अशा समजुतीने, देश आर्थिकदृष्टय़ा पूर्वीपेक्षा सुस्थितीत असतानाही अधिक आर्थिक विकासास अवश्य आहे अशा समजुतीने, व्यवहारवादी राजकीय व सामाजिक नेते आणि राज्यकर्ते जगभर लाचारपणे, दीनवाणेपणे भीक मागत हिंडत आहेत. जेमतेम २५-३० वर्षांपूर्वीच परतंत्र, पराधीन आणि पराभूत बनलेले स्वतंत्र भारताचे नेते- ही दोन चित्रे शेजारी शेजारी ठेवून बघण्याजोगी आहेत.
राज्यकर्त्यांनी अंगीकारलेले हे परावलंबी धोरण देशात खोलवर रुजले आहे. कोठे काही फुकट मिळते का, हे शोधत राज्यकर्ते जगभर भीक मागत हिंडत आहेत आणि सरकारकडून काही फुकट पदरात पाडून घेता येते का, याचा शोध घेत देशातील नागरिक धावाधाव करीत आहेत. याला म्हणतात ‘कल्याणकारी शासन’! आपण बाहेर भीक मागावी आणि देशात लोकांना भीक मागण्यास शिकवावे, असा हा सत्तेवर राहण्याचा सोपा मार्ग सापडला आहे. मग स्वाभिमान व स्वनिष्ठेची आठवण कोणास होणार?
ही अधोगती थांबवायची असेल तर राष्ट्रकारणास मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे आणि राष्ट्रउभारणीकरता स्वाभिमान व स्वनिष्ठेचा मंत्र जागृत ठेवला पाहिजे. गांधीवादाची ही त्रिसूत्री आहे. तिचे प्रतिबिंब दैनंदिन व्यवहारात पडू शकेल असा एक सर्वव्यापी, सर्वस्पर्शी कार्यक्रमही महात्मा गांधींनी सांगितला आहे. तो आजही उपयोगी पडण्यासारखा आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र, शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग हा तो कार्यक्रम होय. केवळ वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेने गरीब जीवनही कितीतरी प्रसन्न करणे शक्य आहे. केवळ स्वच्छतेने नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल. त्याकरता कोणाच्याही मदतीची गरज नाही. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते, मग रोजची उठण्या-बसण्याची स्वच्छता कशाला? आज औषधपाण्याचा, दवाखान्यांचा प्रसार झाला आहे. परंतु वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने; स्वच्छतेने नाही. प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा. परंतु गावातील दरुगधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही. मलमूत्र, शेणकाडी इ. वस्तू नीट गोळा करून त्यांचा सेंद्रिय खताकरता उपयोग केला तर गावातील दरुगधी जाईल, रोगराई नष्ट होईल आणि शिवाय शेतीच्या उत्पादनास हातभार लागेल. हे करण्याकरता कोणाची मदत लागत नाही. हे आपले आपण करावयाचे आहे. भूमीतून आपण जो सत्त्वांश घेतो, तो भूमीस परत करावयाचा आहे. तसे केले तर हीच भूमी आपणास अधिक आधार देईल.  इतके हे साधे तत्त्व आहे. मग हे आपण का करीत नाही? कारण स्वावलंबन, स्वाभिमान, स्वनिष्ठा यासंबंधी लोकशिक्षण व लोकजागृती करण्यापेक्षा परकीयांकडून रासायनिक खते भीक मागून आणणे सरकारला सोपे वाटते आणि मलमूत्र, शेणकाडी यांचा रोजचा व्यवहार करण्यापेक्षा सल्फेटचे पोते उघडून टाकणे शेतकऱ्यास सोईचे वाटते. हे आज सुखकर वाटणारे परावलंबन परिणामी आत्मघाती ठरल्याखेरीज राहणार नाही, हीच गांधीवादाची मुख्य शिकवण आहे.
स्वाभिमान, स्वनिष्ठा आणि त्यांचे प्रतिबिंब दैनंदिन जीवनात पडू शकेल असा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी कार्यक्रम हाच गांधीवादाचा आशय आहे. त्याचे आज पुनरुत्थान झाले पाहिजे.    
(‘गांधी नावाचे महात्मा’ या 
आगामी पुस्तकातून) 
संपादक : रॉय किणीकर,  
साहाय्यक : अनिल किणीकर
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती, तशी त्यांच्या अनुयायांवर नव्हती. त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला. ‘गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी’ म्हणून त्यांना कोणी म्हटले तर ‘आपले काही चुकत तर नाही ना?’ असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वत:चे कौतुकच वाटू लागले. या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोडय़ात स्वत:ला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वत:चे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र, शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग करण्याचा कार्यक्रम गांधीजींनी दिला. केवळ स्वच्छतेनेच नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते, मग रोजची उठण्या-बसण्याची स्वच्छता हवी कशाला? आज सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने; स्वच्छतेने नाही. प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा. परंतु गावातील दरुगधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही.
भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे. ते आणखी काही पिढय़ा चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही, सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे, या गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची त्यांना गरजही वाटेनाशी झाली आहे. किंबहुना सर्व तात्त्विक व नैतिक विचारांची ‘पुस्तकी’ म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा ‘व्यवहारवाद’ म्हणून उदोउदो करावा अशी प्रथा पडत आहे.
अर्थतज्ज्ञ डॉ. वि. म. दांडेकर यांनी केलेली गांधीवादाची मीमांसा.. लोकसत्ता २९ जानेवारी २०१२

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा