रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार

गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवरील विविध जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार आहे. गावांमध्ये विहिरी, तलाव, हातपंप , पाणी योजना अशी पाणीपुरवठ्याची विविध साधने असतात. यापुढे प्रत्येक पाण्याच्या स्रोताला विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर फिरणा -या वाहनांप्रमाणेच पाणीपुरवठ्याच्या साधनांजवळही क्रमांक दर्शविणा -या पाट्या झळकणार आहेत.

पिवळ्या रंगाच्या पाटीवर काळ्या रंगात हा क्रमांक लिहिला जाईल. ऑइलपेंटने रंगविलेल्या पाट्या या स्रोताजवळ लावल्या जाणार आहेत.

पाणीपुरवठ्याचे स्रोत व साधनांचे महत्त्व टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात जाणवते. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व पाणी गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम सर्वत्र राबवत आहे. जिल्ह्यातही त्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या साधनांची नोंद ठेवणे, पाणी साठ्यांजवळ स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता चाचणी, दूषित स्रोतांची सुधारणा अशी कामे सरकारमार्फत राबविण्यात येत आहेत. यासाठी गावोगावी व वाडीवाडीवर पाण्याच्या स्रोतांची आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारतर्फे अशा सर्व साठ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. गावातील विंधनविहिरी, हातपंप, सार्वजनिक विहिरी, सर्व प्रकारच्या पाणी योजना अशी स्रोतांची माहिती संकलित करण्यात येईल. गावातील ज्या ठिकाणचे पाणी जास्त वापरले जाते, त्यानुसार क्रमवारीने ही अक्षरे रंगविली जाणार आहेत. क्रमांक रंगविण्यासाठी येणारा खर्चही सरकार पेयजल कार्यक्रमाच्या बचत खात्यात वर्ग करणार आहे.स्रोतांच्या या क्रमांकामुळे पाणीपुरवठ्याच्या पुढील योजनांचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा