मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा अनेक वर्ष रेंगाळलेला विषय राहिला आहे. अपघातांच्या या आकडेवारीवरून चौपदरीकरणाची गरज लक्षात येते. अतिवेग, मद्य पिऊन वाहन चालविणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष, वाहतुकीचे नियम न पाळणे, ओव्हरटेक अशी अनेक कारणे अपघातांसाठी आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते पोलादपूर हा महामार्गाचा भाग महाड वाहतूक पोलिस विभागाकडे येतो. या दरम्यान 2010 मध्ये 298 अपघात झाले. प्राणांतिक अपघातांची संख्या 51 आहे. गंभीर अपघातांची संख्या 69 आहे, तर 57 किरकोळ अपघात या मार्गावर झाले. 31 अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व अपघातांमध्ये 436 जण जखमी झाले. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान महामार्ग विभागाने अपघात क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुंदीकरण केले आहे. पांढऱ्या रंगाच्या रेडिअम पट्ट्यांचा वापर, पोलिसांकडून अपघातांच्या ठिकाणी नामनिर्देशक फलकही लावून जागृती करण्यात आली आहे. महाड येथील विसावा कॉर्नर या मृत्यूचा सापळा असलेल्या ठिकाणी रुंदीकरण, सुरक्षिततेसाठी पिंप लावणे, तसेच रेडियमचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. अशा विविध योजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. महामार्ग पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर मागील वर्षी धडक कारवाई केली. यामुळेही अपघातांवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले आहे. पोलिसांनी 7 हजार 868 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 8 लाख 9 हजार 300 रुपयांची दंडवसुली करून सरकारी तिजोरीत भर टाकली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा