शनिवार, २० ऑगस्ट, २०११

पोलादपूर येथील दुर्गसृष्टी




 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची काळानुसार पडझड होत आहे.परंतु तरिही या किल्ल्यांचा  इतिहास प्रत्येकाच्या मनामनात आहे. किल्ल्यांचा प्रतिकृतीतून इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचे काम पोलादपूर येथील तरुणांनी हाती घेतले आहे. ट्रेकिंग आणि भटकंतीच्या हौसेतून या तरुणांमध्ये किल्ल्यांविषयी निर्माण झालेली आवड दुर्गसृष्टीच्या रूपाने मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे साकारत आहे. 
 पोलादपूर बसस्थानकामागे १४ किल्ल्यांची प्रतिकृती असलेली "परमानंद दुर्गसृष्टी' पर्यटकांसाठी लवकरच खुली होणार आहे. यामुळे इतिहासप्रेमी व पर्यटकांना सर्व किल्ले एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. 
पोलादपूर येथील "यंग ब्लड ऍडव्हेंचर' ही संस्था १९८३ पासून गड व पदभ्रमणाचे काम करत आहे. या संस्थेमधील तरुण किल्ल्यांची माहिती घेत फिरत असतात. त्यातूनच या तरुणांना किल्ल्यांविषयी आवड निर्माण झाली
स्वामी परमानंदांचे स्थान इतिहासात फार मोठे असल्याची जाणीव या तरुणांना निर्माण झाली.पोलादपूर येथे परमानंद स्वामींचे समाधीस्थळ आहे.  परमानंदांचे कार्य सर्वांना कळावे आणि सर्व किल्ले एकाच ठिकाणी पाहता यावेत या उद्देशाने या संस्थेतील प्रशांत भूतकर, बिपीन शेठ, सचिन मेहता, सुभाष अधिकारी, विलास इंगवले, शैलेश तलाठी, पोलादपूरचे सरपंच अमोल भुवड यांनी पुढाकार घेऊन पोलादपूर येथे दुर्गसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला. तब्बल एक वर्ष या प्रकल्पाची आखणी चालली होती
. जानेवारी २००८ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. परमानंद स्वामींच्या या समाधीस्थळी तब्बल १४ किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले. सद्यःस्थितीत या ठिकाणी सिंहगड, शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगड, चाकण, सिंधुदुर्ग व प्रतापगड या किल्ल्यांची प्रतिकृती बांधून पूर्ण झाली आहे. तर विजयदुर्ग, देवगिरी, रायगड, पन्हाळा, विशाळगड या किल्ल्यांचे काम सुरू आहे. दगड, माती, विटा व सिमेंट यांच्या साह्याने किल्ले बांधले गेले आहेत. किल्ल्यांचे बुरुज, सुळके, पायऱ्या, तटबंदी व किल्ल्यातील साधनसामुग्रीतील बारकावे हुबेहूब साकारले आहेत. महाड येथील इतिहासतज्ज्ञ प्रा. अजय धनावडे यांचे या बांधकामावर पूर्णपणे लक्ष आहे. तर चंद्रकांत उतेकर यांनी प्रतापगड किल्ला तयार स्वरूपातच भेट दिलेला आहे. अनंत शेडगे यांनी संपूर्ण किल्ल्यांचे रंगकाम केले आहे.

 शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी १५ ऑगस्ट २०११ ला दुर्गसृष्टीला भेट दिली. या भेटीत त्यांनी दुर्गसृष्टी साकारणा-या तरुणांचे कौतुक केले.
...................................................................................
           

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

हिरव्यागार सृष्टिचा सहवास--शिवथरघळ


हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी  शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या  धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे.

घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकी गंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊस पाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांच उभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेला मोठा धबधबा आपल्या दृष्टिस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांना याचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.
डोंगराच्या कपारीत १००-१५० माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेश मंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.याठिकाणी धार्मिक विधी सतत सुरु असतात .खिचडीच्या प्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरम पिठलं-भाकरी ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळ नाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृह आहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथून घळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकण रेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.
शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र . ९२२५७८४१२७
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
..........................................
शिवथरघळची वाट कँमे-यातून ..








सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

ध्वजारोहणाचा मान


आज भारताचा म्हणजे माझ्या देशाचा स्वातंत्र्यदिन..दर वर्षी १५ आँगस्ट्ला मला आणि माझ्या मित्रांना आठवण होते ती आमच्या लहानपणी शाळेत होणा-या झेंडावंदनाची.झेंडावंदन झाले कि खाऊ काय मिळतो याकडे आमचे अधिक.लक्ष ....त्या लिमलेटच्या गोळ्या , रावळगाव चाँकलेट , बिस्किटे..लहानपणी याकडे बारीक लक्ष असायचे...आता म्हणे कँटबरीही वाट्तात...आता वाटतं या आनंदात झेंडावंदनापेक्षा खाऊच आकर्षण वाढत गेलं.. आणि राष्ट्रप्रेमा ऐवजी खाऊची मोठी पिढी यादेशात तयार झाली.तरीहि राष्ट्रगीत आवडीने म्हणणारी काही होतीचकी..
खाऊची व्याख्या वाढत गेली..कुणाला चारा आवडू लागला ,कुणी राष्ट्रकूल स्पर्धेत आपला हात मारला ,, ३ जी स्पेक्ट्रमने तर खाऊच घबाड अनेकांच्या हाती लागलं.. गहू ..साखर ..सिमेंट अगदी आमच्या शहिद जवानांच्या शवपेट्याही खाऊपुढे सुटल्या नाहीत .आईने लपविलेला खाऊचा डबा शोधण्यासाठी वापरली नाहीत अशी एकाहून एक सरस आयुधे आमच्या देशातील राज्यकर्त्यांनी वापरली..आणि केवळ आपला खाऊ सोडाच ईतरांच्या ताटातले ...अगदी खरकटेही यांनी सोडले नाही ...आणि आपण किती महान यातीलच एक येतो आणि झेंड्याची दोरी ओढून जातो ...म्हणे हा मान त्याचा ! आणि आमची मान झेंड्याबरोबर त्यांच्याही पुढे नतमस्तक होतेच ...
कारगिल मध्ये शहिद झालेले जवान ..ताजमध्ये  शहिद झालेला उन्नीकृष्णन ..करकरे ,सळासकर .कामटे ..गडचिरोलीत दररोज गोळ्या खाणारे पोलिस ..याच्या् नातेवाईकाचा  स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा खरा मान आहे..संसदेवरील हल्ल्यामध्ये मारले गेलेले सुरक्षा रक्षकांच्या वारसांना हा सन्मान पाहिजे कि या  हल्ल्यातील आरोपीला फाशीपासून वचविणा-यांचा तो मान आहे ? मुंबई हल्ल्यात कामी आलेल्या पोलिस आणि सैनीकांचा हा मान कि बडे शहरों मे छोटे  छोटे हादसे होते है असे  म्हणणा-यांचा . पंढपूरच्या विठ्ठ्लाच्या पहिल्या दर्शनाचा लाभ एका वारक-याला मिळतोच ना ,,भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवासात अनेक वारकरी आहेत .ध्वजारोहण करण्याचा मान या सामान्य वारक-याला  मिळाला पाहिजे .झेंड्याचा सन्मान राखला जाईल अश्यांनीच  ध्वजारोहण करावे नाहितर सरकारी सुट्टिचा आनंद आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त घ्यावा.
सुनिल पाटकर