भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

काशिद बीच

रोहा - मुरुड रस्त्यावर असणारा  काशिदचा समुद्रकिनारा गोव्यामधील समुद्रकिना-यांची आठवण करून देतो. रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण तर आहेच परंतु एक अप्रतिम आणि भेट द्यायला हवा असा हा  समुद्रकिनारा आहे. विकएंडला पर्यटकांची इथे समुद्रस्नानासाठी झुंबड असते.पार्किगसाठीही जागा नसते त्यामुळे विकएंड अथवा सुट्टी हंगाम सोडून इथे येणे चांगले.या ठिकाणी घोडागाडी,उंटावरिल सफर ,किनार्‍यावरील झोपाळे असल्याने बच्चे कंपनी खुष होऊन जाते तर तरूणांसाठी वाँटर स्कुटर आहेत.चांगली सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद समुद्रकिनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.काशिदच्या किनार्‍यासमोर सुरुचे सुंदर बनही आहे.मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांच्या शूटींगसाठी हा  समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.या किना-यावर वेळ कसा जातो हे कळतही नाही आणि तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात,बीच असावा तर असा !
बीच असावा तर असा !




घोडागाडी

वाँटर स्कुटर 

सुरुचे  बन

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

हिरव्यागार सृष्टिचा सहवास--शिवथरघळ


हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी  शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या  धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे.

घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकी गंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊस पाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांच उभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेला मोठा धबधबा आपल्या दृष्टिस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांना याचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.
डोंगराच्या कपारीत १००-१५० माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेश मंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.याठिकाणी धार्मिक विधी सतत सुरु असतात .खिचडीच्या प्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरम पिठलं-भाकरी ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळ नाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृह आहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथून घळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकण रेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.
शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र . ९२२५७८४१२७
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
..........................................
शिवथरघळची वाट कँमे-यातून ..








गुरुवार, २ जून, २०११

आमची दमणवारी


आमची दमणवारी
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो.२८ तारखेला सकाळी १० वा वापी रेल्वेस्थानकावर पोहचलो आणि टँक्सी स्टँड्वर दमण....दमण....असा ओरडा कानावर पडला.वापी ते दमण शेअर टँक्सी सर्व्हिस आहे .त्यांमुळे दमणला जाण्याची काळजी नव्हती. रेल्वेस्थानकाच्या जवळच कचोरी खाल्ली आणि थेट टँक्सीत बसलो.वापीत उन्हाळा जाणवत होता परंतु दमणला त्या तुलनेत जरा बरे वाटत होते. दमण टँक्सी स्टँड्वर उतरल्यावर पायी चालण्यास सुरुवात केली.आणि नजरेला पडलेल्या पहिल्याच हाँटेलवर डेरा टाकला.शनिवार आणि त्यातच सुट्टीचा हंगाम यामुळे दमण हाऊसफुल्ल होते.भर दुपारीही पर्यटकांची गर्दी होती.परंतु येथे वर्दळ सुरु होते ती सायंकाळी..
छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी म्हणजे दमण ...दमण हे नानी दमण आणि मोटी दमण अशा दोन भागांमध्ये विभागलेले आहे.दमणगंगा नदीवरील पुलांने हे दोन भाग जोडले गेले आहेत ,नदीवरील जूना पूल अतिवृष्टीमुळे कोसळला होता . कोसळलेल्या जागी लोखंडी पूल जोडला आहे .या पुलाजवळ नवा पूल बांधला आहे. नानी दमण गजबजलेला भाग आहे तर  मोटी दमण निसर्गरम्य आहे .याभागात निवासी व सरकारी कार्यालये आहेत.याभागात आल्यावर गोव्यात आल्याचा भास होतो. साडेचारशे वर्षे , अगदी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 1961 पर्यंत पोर्तुगीज सत्तेच्या अमलाखाली असलेल्या दमणमध्ये पोर्तुगीज अंमलाच्या पाऊलखुणा  आजही आपल्याला दिसून येतातं. इथे  गुजराती , इंग्रजी , हिंदीप्रमाणेच पोर्तुगीज भाषाही बोलली जाते आणि हिंदू , ख्रिश्चन , मुस्लिम आणि पारशी या सर्वांचं अस्तित्व इथे आढळतं. दमणला पाहण्यासारखे नानी दमण आणि मोटी दमण हे दोन किल्ले ,किल्ल्यातील चर्च . देवका आणि जाम्पोर हे दोन सुंदर समुद्र किनारे.. मिरासोल व वैभव वाँटरपार्क, जेटी गार्डन, अशी मोजकीच ठिकाणे..हि सर्व ठिकाणे पाहवी लागतात रिक्षाने..दमणला टूर आँपरेटर हा प्रकारच नाही त्यामुळे  सर्व ठिकाणे आपल्याला स्वत:च पाहवी लागतात .त्यात त्रास होतो आणि वेळ वाया जातो.सर्व ठिकाणी शेअर पद्धत असल्याने पैसे वाचतात पण पार्टनरची वाट पाहवी लागते.
आम्ही रहात असलेल्या हाँटेल शेजारीच शाँपिंग मार्केट आहे अशी माहीती हाँटेल मालकाने दिल्यानंतर सौ.चा आनंद गगनात मावेनासा झाला.या मार्केटला फाँरेन गुड  मार्केट असे म्हणतात.घड्यांळे.,मोबाईल,कपडे ,परफ्युम,चाँकलेट,चप्पल,इलेक्ट्राँनिक्स वस्तू ,खेळणी ,पर्स ,सौंदर्यप्रसाधने, अशा अनेक एका पेक्षा एक सरस वस्तु या ठिकाणी आहेत.शिवाय परदेशी चाँकलेटस ,बिस्किटे यांचे विविध प्रकार मायमून या दुकानात पहावयास मिळतात.आम्ही बराचसा वेळ  मार्केटमध्ये घालवला.ही सर्व दुकाने दमण पोलिस ठाण्या जवळच आहेत.
सायंकाळी आम्ही देवकाबीच गाठला . देवकाबीच दमण पासून ५ कि.मी अंतरावर आहे.दमण मधील अनेक उत्तम हाँटेल या बीचवर आहेत.हा बीच काहीना आवडतो काहीना नाही.हा बीच तसा वेगळा बीच आहे.या ठिकाणी खडक मोठया प्रमाणात आहेत .या खडकांमध्ये पाणी साठलेले होते .त्यामध्ये बच्चेकंपनी मनसोक्त डुम्बत होती.वेगवेगळ्या आकाराचे खडक,शिंपले,सागरीप्राणी येथे दिसतात.याच बीचवर लहान मुलांसाठी बाग आहे.तेथे टाँयट्रेन व लहान मुलांसाठी खेळणी आहेत.आम्ही गेलो तेव्हा ओहोटी होती तरीही खडकांवरुन आत चालत जाऊन समुद्रात जाण्याचा आनंद घेणारे आमच्यासारखे अनेक जण होते.देवकाबीचवरून पुन्हा  शेअर रिक्षा पकडून आम्ही दमण शहरात आलो . सायंकाळी उशिरा  नानी दमणचा किल्ला पाहण्यासाठी पायीच बाहेर पडलो.नानी दमणमध्ये 1614 ते 1627 दरम्यान मुघल साम्राज्याला आव्हान देण्यासाठी बांधलेला सेन्ट जेरोम फोर्ट आहे. किल्ल्याला तीन बुरुज आहेत आणि दोन द्वारं आहेत. एक शहरात उघडतं , तर दुसरं नदीच्या किनारी बंदरावर उघडतं. किल्ल्यात एक शाळा आणि ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारता येतो आणि समोरच मोटी दमणचा किल्ला आणि तिथलं दीपगृह दिसत असतं.या ठिकाणी फोटो काढण्याची मजा कही औरच होती.
  सायंकाळी दमण जेटीचा हा परिसर सुंदर वाटत होता .खाडीकिनारी अतिशय सुंदर वाराही सुटला होता .या जेटीवर समुद्रनारायणाचे मंदिर आहे.किल्ल्याजवळच फास्टफूडच्या अनेक गाड्या पर्यटकांची भूक भागवत होत्या.या ठिकाणी मिळणारे अंड्यांचे रोल हे प्रसिध्द स्ट्रीटफूड आहे.या शिवाय रोलचे अनेक प्रकार येथे मिळतात.पिझ्झा ,बर्गरही दमणमध्ये मिळतात,परंतु आम्हाला उत्तम जेवण मात्र दमणला मिळाले नाही,दमणमध्ये मद्य मुबलक व स्वस्तात मिळते.अगदी बीचवरही टोपलीतून स्थानिक महिला बिअर विकत असतात ,त्यामुळे येथे मौजमजा करण्यासाठी येणा-यांची संख्या खूप आहे
दुस-या दिवशी लवकरच जाम्पोर बीच वर पोहचलो.दमण पासून हा बीच ११ कि.मी अंतरावर आहे. मोटी दंमणच्या शेवटी हा अतिशय सुंदर असा किनारा आहे.लांबलचक किनारा,बारिक वाळू ,किना-यावर येणा-या मध्यम लाटा यामुळे हा बीच प्रेमात पडावे असा आहे.अत्यंत सुरक्षित बीच असल्याने लहानेमोठे सर्वच येथे मनसोक्त भिजतांना दिसत होते,समुद्रस्नानासाठी हा उत्तम किनारा आहे.उंटाची राईड ,पँराग्लायडींग.असे खेळ तेथे खेळता येतात.या बिचवर आम्ही खूपच मजा केली.येथून परततांना मोटि दमण फोर्ट पाहून घेतला.या किल्ल्याच्या आतील भागात अनेक सरकारी ईमारती आहेत .अतिशय देखणे असे चर्च आहे.कॅथेड्रल ऑफ बॉम जेसू हे 1603 मधलं चर्च म्हणजे लाकडावरील वास्तुकलेचा अतिशय सुंदर नमुना आहे.आतील भागात  दीपस्तंभ आहे,
दमण पाहून आम्ही पुन्हा वापी रेल्वेस्थानकाकडे निघालो.मुंबईला जाणा-या गाडीला वेळ असल्याने आम्ही वापीतच जेवण करण्याचा निर्णय घेतला .वापी रेल्वेस्थानका जवळ असणा-या बापुज रेस्टाँरन्ट मध्ये आम्ही शिरलो .पंजाबी थाळीची आँर्डर दिली.उत्तम जेवण दमणला मिळाले नाही त्याची कमतरता येथे भरून निघाली.अतिशय चविष्ट जेवण येथे जेवायला मिळाले सोबत मधूर ताक होतेच.हे सर्व अगदी  योग्य दरात, पोट्पूजा करून दिमतीला वापीतील प्रसिध्द नमकिन, केळ्याचे वेफर्स , निळीशार जांभळे ,चिकू घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
.
कसे जावे- पश्चिम रेल्वेवरील वापी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचायचं , वापीवरून टॅक्सीने दरडोई २० रुपये किंवा पूर्ण टॅक्सी दीडशे रुपयांत दमणमध्ये नेऊन सोडते.स्वत:चे वाहन असल्यास पश्चिम दुतगती मार्गाने वापीपर्यंत पोहोचायचं आणि तिथून दमणकडे वळायचं.

कुठे रहाल - शनिवार-रविवार दमणला गर्दी असल्याने आधी बुकिंग करूनच दमणला निघावं.हॉटेल बुकिंगसाठी ओळ्खपत्र,पँनकार्ड असा कोणतातरी पुरावा आवश्यक आहे.
 दमणमधील काही हॉटेल्स ---मिरासोल लेक रिसॉर्ट 2220674. गुरुकृपा हॉटेल 2255046 अशोका हॉटेल 2254239.हॉटेल मिरामार - 2254471, 2250671, ब्रायटन हॉटेल : 2251208, 2251209, सॉव्हरेन हॉटेल 2255023, 2250236, नटराज हॉटेल 2254415, मरीना हॉटेल 2254420, दरिया दर्शन हॉटेल 2254386, , सिल्टन हॉटेल 2254558, सुमेर हाऊस 2254474.या शिवाय बजेट हॉटेल्सही येथे उपलब्ध आहेत. दमणचा एस.टि.डी कोड आहे( 0260)
.......................................
































बुधवार, २८ जुलै, २०१०

दैवी चमत्कार `वाळणकुंड `


कोकणात निसर्गाचे तसेच अनेक दैवी चमत्कार पहावयास मिळतात. काही चमत्कार तर तोंडात बोटे घालायाला लावणारे असतात.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण अशाचा एक चमत्काराचे प्रतीक मानावे लागेल.खास माशांसाठी प्रसिद्ध असलेले वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते.खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात.येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत.पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही .नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात .माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात.माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते.लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते.या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे.वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात.येथील मासे कोणीही कधीही मारत नाही महाड़ पासून सुमारे २० कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे .थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात.झूमचा कँमेरा असेल तर फूलपाखरांना कँमेर्‍यात बंद करता येईल.पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात.ही फूलं पाहतांना जाईन विचारीत रानफूला ‘ हे गाणे आठविल्या शिवाय रहात नाही.येथे थेट वाहन जाते.चालण्याची अजिबात गरज नाही.

तर वाट कसली पहाताय ...चला निघा वाळणकुंडीला ...... येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड , शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते.ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.

अप्रतीम गांधारपाले लेणी


मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात
कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर्व १५०-२५० या कालखंडात गांधारपाले गावाचा उल्लेख पालीपट्टण अस होत असे. डोंगरात दोन स्तरामध्ये ही लेणी खोदलेली आहे.लेण्यांच्या मूळ रेखांकनावरून लेणी हिनयान काळातील असल्याचे इतिहास तज्ञांचे मत आहे.लेण्यातील सर्व खोल्यांची संख्या २९ आहे.पहिल्या वरच्या स्तरात १ ते २० आणि दुसर्‍या स्तरात २१ ते २९ अशी लेणी आहेत.सर्व लेणी पूर्वार्भिमुख आहेत.लेण्यात बसण्यासाठी दगडी बाके तयार केलेली दिसतात.२/४ खोल्या मिळून पाण्याची व्यवस्था केलेली पहावयास मिळते.ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, अनेक लोकांना बसता यावे या साठी भव्य सभागृह या लेण्यात आहे.लेण्यांच्या काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेख पहावयास मिळतात.लेणी क्र.१ मध्ये भव्य सभागृह आहे.एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायावर धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे.दोन्ही बाजूस दोन चामरधारी व वरच्या बाजूस दोन विद्याधर आहेत.यावर मकरतोरणाचे नक्षीकाम आहे यालेण्याच्या पुढील भागात पाण्याची तीन टाक्या आहेत. लेणी क्र.९ हे लेणे चैत्यगृह असून येथील सर्वात लक्षवेधी वास्तुशिल्पकाम येथे दिसून येते.या लेणीत एक शिलालेख आहे.राजपुत्र कान्यभोज, विष्णूपनीत असे नामोल्लेख आढळतात.लेणी क्र.२७ मध्ये प्राकृत ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखात वादसिरी.संघरखित ,गृह्पती श्रॆष्ठी या व्यक्ती नामांचा समावेश दिसतो. खोल्या सभागृह,दिर्घिका, स्तंभ ,
अर्धस्तंभ ,.चैत्यगृह ,शिलालेख ,ओटे, वेलबुट्टी ,नक्षीकाम.लहान मोठी प्रवेशद्वारे,भोजनगृह,स्तूप,गाभारा,दगडी पाण्याची टाके,प्रतीमा,असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.पर्यटक ,अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत.महामार्गावर असल्याने येथे यायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत.पावसाळ्यात लेण्यांच्या वरून पडणारे धबधबे ,समोर सावित्री-गांधारी नद्यांचा विस्तिर्ण जलाशय...हे दृश्य ही मनमोहक असते.कोकणात ,रायगड ,महाबळेश्वर नाहीतर गोव्याकडे जातांना थोडावेळ इथे थांबा आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा सुंदर नमुना पाहून जा.

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ कि।मि.चा अतिशय सुन्दर,स्वछ आंणि सुरक्षित किनारा लाभाला आहे.या किनार्‍यावर केवाड्याची बने आहेत .या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे.सुवर्ण गणेश सापडलेल्या बागेत मराठीतील पहिला ताम्रपट सापडला आहे .येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते .येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत.अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनासाची फळे पहावयास मिळतात .दिवेआगारचे नारळपाणीही दिवेआगारमध्ये माघ.शु.चार ला गंणेश जन्मोस्तव तर सुवर्ण गंणेशाचा प्रकटदिन कार्तिक वद्य ४ ला साजरा होतो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे
...............................
.Diveagar Beach  and Suvarnaganesha Temple:

Diveagar Beach is located approximately 170 kilometers south of Mumbai. The beach is accessible from the Mumbai-Goa highway
Diveagar beach is or approximately six kilometers long. At one end of the beach is a fishing settlement, while the other end has a sanctuary of migratory seagulls.
The beach contains a number of Suru trees (Casuarina), which are common to coastal Maharashtra. The access to the beach has a dense cover of Belu trees, which are otherwise uncommon in the area.
Another major attraction in Diveagar village is a temple of Lord Ganesh. The idol has a mask which is made of pure gold. This mask was discovered by Mrs Patil, a few decades back buried along with other treasure in a thick copper trunk in her beetel farm, opposite Abhynkar's House.
Diveagar is a popular beach destination along with nearby towns of Shrivardhan Origin of the Peshwas and Harihareshwar.
Sand Bubble Crabs can be found on the beach and at nearby Harihareshwar one can find Dolphins.