शनिवार, २० ऑगस्ट, २०११

पोलादपूर येथील दुर्गसृष्टी




 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची काळानुसार पडझड होत आहे.परंतु तरिही या किल्ल्यांचा  इतिहास प्रत्येकाच्या मनामनात आहे. किल्ल्यांचा प्रतिकृतीतून इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचे काम पोलादपूर येथील तरुणांनी हाती घेतले आहे. ट्रेकिंग आणि भटकंतीच्या हौसेतून या तरुणांमध्ये किल्ल्यांविषयी निर्माण झालेली आवड दुर्गसृष्टीच्या रूपाने मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे साकारत आहे. 
 पोलादपूर बसस्थानकामागे १४ किल्ल्यांची प्रतिकृती असलेली "परमानंद दुर्गसृष्टी' पर्यटकांसाठी लवकरच खुली होणार आहे. यामुळे इतिहासप्रेमी व पर्यटकांना सर्व किल्ले एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. 
पोलादपूर येथील "यंग ब्लड ऍडव्हेंचर' ही संस्था १९८३ पासून गड व पदभ्रमणाचे काम करत आहे. या संस्थेमधील तरुण किल्ल्यांची माहिती घेत फिरत असतात. त्यातूनच या तरुणांना किल्ल्यांविषयी आवड निर्माण झाली
स्वामी परमानंदांचे स्थान इतिहासात फार मोठे असल्याची जाणीव या तरुणांना निर्माण झाली.पोलादपूर येथे परमानंद स्वामींचे समाधीस्थळ आहे.  परमानंदांचे कार्य सर्वांना कळावे आणि सर्व किल्ले एकाच ठिकाणी पाहता यावेत या उद्देशाने या संस्थेतील प्रशांत भूतकर, बिपीन शेठ, सचिन मेहता, सुभाष अधिकारी, विलास इंगवले, शैलेश तलाठी, पोलादपूरचे सरपंच अमोल भुवड यांनी पुढाकार घेऊन पोलादपूर येथे दुर्गसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला. तब्बल एक वर्ष या प्रकल्पाची आखणी चालली होती
. जानेवारी २००८ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. परमानंद स्वामींच्या या समाधीस्थळी तब्बल १४ किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले. सद्यःस्थितीत या ठिकाणी सिंहगड, शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगड, चाकण, सिंधुदुर्ग व प्रतापगड या किल्ल्यांची प्रतिकृती बांधून पूर्ण झाली आहे. तर विजयदुर्ग, देवगिरी, रायगड, पन्हाळा, विशाळगड या किल्ल्यांचे काम सुरू आहे. दगड, माती, विटा व सिमेंट यांच्या साह्याने किल्ले बांधले गेले आहेत. किल्ल्यांचे बुरुज, सुळके, पायऱ्या, तटबंदी व किल्ल्यातील साधनसामुग्रीतील बारकावे हुबेहूब साकारले आहेत. महाड येथील इतिहासतज्ज्ञ प्रा. अजय धनावडे यांचे या बांधकामावर पूर्णपणे लक्ष आहे. तर चंद्रकांत उतेकर यांनी प्रतापगड किल्ला तयार स्वरूपातच भेट दिलेला आहे. अनंत शेडगे यांनी संपूर्ण किल्ल्यांचे रंगकाम केले आहे.

 शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी १५ ऑगस्ट २०११ ला दुर्गसृष्टीला भेट दिली. या भेटीत त्यांनी दुर्गसृष्टी साकारणा-या तरुणांचे कौतुक केले.
...................................................................................
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा