बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

संधींचा लाभ घ्या



युको बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत 1050 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती करण्यात येणार आहे. 30 नोव्हें. 2010 रोजीच्या तरुण/ तरुणींचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान आहे त्यांच्यासाठी यासाठीच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत असेल. लेखी परीक्षा 30 जाने. 2011 रोजी मुंबई येथे होणार असून, त्यामध्ये दोन पेपर्स असतील.

पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्‍टिव्ह स्वरूपाचा असून, त्यात 135 मिनिटांत सामान्यज्ञान व कॉम्प्युटर ज्ञान (50 प्रश्‍न, 60 मार्क); इंग्रजी (50 प्रश्‍न, 50 मार्क), अंकगणित (50 प्रश्‍न, 60 मार्क) व बुद्धिमत्ता चाचणी (75 प्रश्‍न, 80 मार्क) या चार विषयांवर 225 प्रश्‍न सोडवावे लागतील. दुसरा पेपर एक तासाचा असेल ज्यात 20 मार्कांचे 5 प्रश्‍न आर्थिक घडामोडी व कम्युनिकेशन स्किल्स या विषयांवर असतील.

या लेखी परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल व त्यातून अंतिम निवड केली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना 22,188 रु. प्रतिमहा या वेतनावर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सेवेत सामावून घेतले जाईल. प्रोबेशन दोन वर्षांचे असेल व त्यानंतर उमेदवाराची कार्यक्षमता बघून त्याला सेवेत कायम केले जाईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.ucobank.com या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत भरता येतील. याआधी या संकेतस्थळावरून फी चलन डाऊनलोड करून घेऊन बॅंकेच्या कोणत्याही शाखेत या चलनाद्वारे 400 रु. (एससी/एसटीसाठी 50 रु.) भरणे आवश्‍यक आहे.

कॉर्पोरेशन बॅंकेत 82 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती
कॉर्पोरेशन बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत 82 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर 2010 रोजी ज्या युवक/युवतींचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असेल व जे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असतील अशा उमेदवारांना यासाठी अर्ज करता येईल.
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत यांचा समावेश असेल, लेखी परीक्षा दिनांक 16 जाने. 2011 रोजी मुंबई येथे होईल. लेखी परीक्षेत दोन पेपर्स असतील, ज्यातील पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्‍टिव्ह स्वरूपाचा व 300 मार्कांचा, अडीच तासांचा असेल, ज्यात बुद्धिमत्ता चाचणी व कॉम्प्युटर ज्ञान (60 मिनिटे, 100 प्रश्‍न, 17 मार्क), अंकगणित (30 मिनिटे, 50 प्रश्‍न, 75 मार्क), सामान्य ज्ञान (30 मिनिटे, 50 प्रश्‍न, 25 मार्क) व इंग्रजी (30 मिनिटे, 50 प्रश्‍न, 25 मार्क) या विषयांवर प्रश्‍न असतील. दुसरा पेपर एक तासाचा असेल ज्यात 20 मार्कांचे पाच प्रश्‍न सोडवावे लागतील.
या लेखी परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावले जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांना 14500 - 25700 या वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. या संधीसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.corpbank.in या संकेत स्थळावरील "करीअर्स' या लिंकवर जाऊन 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत भरता येतील.
या आधी कार्पोरेशन बॅंकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन 300 रु. (एससी/एसटी साठी रु. 50) भरून चलन प्राप्त करून घ्यावे लागेल.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये 1163 क्‍लार्कची भरती
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक बॅंकेत 1163 क्‍लार्कच्या जागा भरण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबर 2010 रोजी ज्या युवक/युवतींचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असेल व जे किमान 50 टक्के गुण मिळवून 12 वी उत्तीर्ण आहेत किंवा ज्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आहे असे युवक/युवती या संधीचा फायदा घेऊ शकतील.
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा दि. 13 फेब्रुवारी 2011 रोजी मुंबई, पुणे व नागपूर या केंद्रांवर घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर्स असतील. पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्‍टिव्ह स्वरूपाचा असेल ज्यामध्ये 95 मिनिटांत 200 प्रश्‍न सोडवावे लागतील. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, अंकगणित व क्‍लेरिकल ऍप्टिट्यूड या विषयांवर 50 प्रश्‍न असतील, दुसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपाचा असेल.
यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना 7200-19300 या वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.centralbankofindia.co.in  या संकेतस्थळावर जाऊन भरावे लागतील.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 8 डिसेंबर 2011 आहे. बॅंकांमधील या  संधींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी परीक्षा फार अवघड असते असे नाही मात्र, 35-40 सेकंदात एक प्रश्‍न सोडवणे ही खरी कसोटी आहे. यासाठी अशा प्रकारचे प्रश्‍न सोडवण्याचे तंत्र व मंत्र समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठी अनेक पुस्तके बाजारात आहेत, काही प्रशिक्षण संस्थाही आहेत. मात्र दररोज किमान 8 ते 10 तास अभ्यास, भरपूर सराव याला मात्र पर्याय नाही.संबंधित बातम्याउल्लेखनीय रोजगार संधी बदल : काळाची गरज कर्मचाऱ्यांचे समुपदेशन बदल : काळाची गरज 'उद्या'च्या बोधातून मुक्त होणे हाच प्रगती साधण्यासाठीचा उत्तम मार्ग

  सौजन्य -विवेक वेलणकर ई-सकाळ

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार

गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवरील विविध जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार आहे. गावांमध्ये विहिरी, तलाव, हातपंप , पाणी योजना अशी पाणीपुरवठ्याची विविध साधने असतात. यापुढे प्रत्येक पाण्याच्या स्रोताला विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर फिरणा -या वाहनांप्रमाणेच पाणीपुरवठ्याच्या साधनांजवळही क्रमांक दर्शविणा -या पाट्या झळकणार आहेत.

पिवळ्या रंगाच्या पाटीवर काळ्या रंगात हा क्रमांक लिहिला जाईल. ऑइलपेंटने रंगविलेल्या पाट्या या स्रोताजवळ लावल्या जाणार आहेत.

पाणीपुरवठ्याचे स्रोत व साधनांचे महत्त्व टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात जाणवते. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व पाणी गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम सर्वत्र राबवत आहे. जिल्ह्यातही त्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या साधनांची नोंद ठेवणे, पाणी साठ्यांजवळ स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता चाचणी, दूषित स्रोतांची सुधारणा अशी कामे सरकारमार्फत राबविण्यात येत आहेत. यासाठी गावोगावी व वाडीवाडीवर पाण्याच्या स्रोतांची आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारतर्फे अशा सर्व साठ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. गावातील विंधनविहिरी, हातपंप, सार्वजनिक विहिरी, सर्व प्रकारच्या पाणी योजना अशी स्रोतांची माहिती संकलित करण्यात येईल. गावातील ज्या ठिकाणचे पाणी जास्त वापरले जाते, त्यानुसार क्रमवारीने ही अक्षरे रंगविली जाणार आहेत. क्रमांक रंगविण्यासाठी येणारा खर्चही सरकार पेयजल कार्यक्रमाच्या बचत खात्यात वर्ग करणार आहे.स्रोतांच्या या क्रमांकामुळे पाणीपुरवठ्याच्या पुढील योजनांचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

सेनापती बापट

सेनापती बापट
 पांडुरंग महादेव बापट , अहमदनगर जिल्हयातील पारनेर येथे गरीब कुंटूबात १२ नोव्हेंबर १८८० रोजी त्यांचा जन्म झाला .सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक अशी त्यांची ओळख . १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटयात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकर्‍यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला, त्यामूळे  बापट सेनापती या नावाने ओळखले जाऊ लागले, . माघ्यामिक आणि बी. ए. पर्यतचे उच्च शिक्षण पुणे येथे झाले. अर्थशास्त्र व इतिहास विषय घेऊन १९०३ साली बी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापिठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंजिनिअरिंग करण्यासाठी इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत असल्यामूळे शिष्यवृत्ती बंद होऊन त्यांचे शिक्षण अपूर्ण रा्हिले श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकाराक नेत्याशी परिचय होऊन त्यांच्या मदतीने पॅरिस येथे राहून तेथील रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बॉबची तंत्रविद्या त्यांनी हस्तगत केली. . त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतात व बंगालमधील क्रांतिकारक गटांपर्यत पोहोचविण्याचे गुप्त कार्य ते करत होते. क्रांतिकारकांच्या कटाच्या एका खटल्यात माफीच्या साक्षीदाराचे बापटांचे नाव उघड केल्यामूळे बापट हे १९०८ पासून साडे चार चार वर्षे भुमिगत राहिले. १९२१ पर्यत स्वत:च्या जन्मगाबी पारनेर येथे शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवा व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालविले या आंदोलनात कारावासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असताना राजद्रोह विषयक भाषणे केल्याबद्दल सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारावासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र् आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.सेनापतिंनी विपूल लेखनही केले.१९३३-३४ पर्यंतचे बव्हंशी पद्यात्मक आत्मचरित्र त्यांनी पद्यात लिहिले.

डार्विन आजोबांची शिकवणी

डार्विन आजोबांची शिकवणी
डॉ. अनिल अवचट
जगप्रवासाला निघालेल्या चार्ल्स डार्विनची बोट पॅसिफिकमधील गॅलापेगॉस बेटांच्या समूहाजवळ आली. तिथं एकाच समूहाचे प्राणी; पण बेटाबेटांवर त्याला त्यांच्यात फरक आढळू लागला. का? या "का'नं त्याचं डोकं भणाणलं.. आणि लखकन प्रकाश पडला. हा शोध लागण्याचा क्षण. काय होता हा साक्षात्कार? उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या अनुषंगानं डार्विनचा शोध घेताना, कुठंतरी आपल्याला अंतर्मुख करणारा हा स्वतःचाही शोध होतो...
मला डार्विननं दोनेक वर्षं पछाडलंय. भूत जसं उतरायला नकार देतं, तसंच झालंय. पुस्तकं जमवली, ज्ञानी लोकांना भेटलो; पण कुतूहल वाढतच गेलं. दुसरे महत्त्वाचे विषय पेपरांत, टीव्हीत येतात. कुणी काय काय सांगत असतं; पण सगळ्याला मागं सारून पुढं येतो तो डार्विन. खूप मोठी दाढी, टक्कल, अपरं नाक आणि शोधक डोळे. त्याला जन्मल्याला गेल्या वर्षी दोनशे वर्षं पूर्ण झाली; आणि त्याच्या उत्क्रांतीवरच्या पुस्तकाला दीडशे वर्षं झाली, ते निमित्त झालं. त्याच्यावर लेख यायला लागले; आणि बुडतच गेलो त्याच्यात.
वास्तविक त्याचं व्यक्तिमत्त्व अशा झपाटणाऱ्या "हिरो'चं अजिबात नाही. दुबळा, कृश. कायम व्याधींनी ग्रस्त. वरकरणी पाहाल, तर घाबरटही म्हणाल; कारण तो कधी घराबाहेरही पडत नसे. फिरायला तरी बाहेर पडावं ना; पण तो आपल्या घराच्या परिसरातल्या, आवारातल्या पायवाटेनं (सॅंडवॉक) फिरत असे तेवढंच. तो ज्यामुळं जगप्रसिद्ध आहे, त्या उत्क्रांतिवादावरचा त्याचा निबंध ज्या लिनियन सोसायटीपुढं सादर झाला, तोही त्यानं मांडलाच नाही. लोकांमध्ये त्याच्या पुस्तकावर वादळ उठलं. त्यातून ऑक्‍सफर्डला या विषयावर वाद-विवाद आयोजित केला गेला. त्याला अभूतपूर्व गर्दी होती; पण तिथंही हा गेला नाही. दोन्हीकडं त्याच्या मित्रांनीच ते काम केलं; पण त्याला घाबरट तरी कसं म्हणावं? आजवर जो सिद्धांत, जो विषय मांडण्याची कुणाची ताकद झाली नाही, तो त्यानं सज्जड पुराव्यानिशी मांडला; आणि त्या वादळानंतरही तो संशोधन करीत-लिहीतच राहिला... लोकभावनेचं, चर्चचं व इतर दडपण न मानता...
काय कोडं आहे हे?
मला शास्त्रज्ञांच्या कथा वाचायला खूप आवडतात. ते कुठल्या रणक्षेत्रावरचे किंवा सार्वजनिक क्षेत्रांतले वीर नसतात. एखाद्या विषयाच्या मागं लागत जन्मभर ते कसला तरी शोध घेत असतात. माझे एक संशोधक गुरुजी धोंडे सर. त्यांना विचारलं, ""शास्त्रज्ञाला निराशेची सवय असावी लागते का?'' ते हसून म्हणाले, ""सवय? अहो, आवडच असावी लागते.'' तसं या शास्त्रज्ञांचं विश्‍व म्हणजे आशा-निराशेचा खेळ. बहुधा निराशेचा. कित्येकांच्या हाती तर अखेरपर्यंत काही लागत नसणार; पण तरी ते का शोधत बसत असतील? ती मुळातली प्रेरणा असेल का, की जी त्यांना स्वस्थ बसू देत नसेल? मला रॉनजेन (स्पेलिंग रॉंटजेन) आठवतो, ज्यानं एक्‍स-रे शोधला तो. जेव्हा त्याला पुसटसं दिसलं, की हे किरण आरपार जाऊ शकतात; मग त्याच्यामागंच लागला. पहिला एक्‍स-रे त्याच्या बायकोच्या हाताचा. बोटातली अंगठीही त्यात आलीय. त्या किरणांमुळं कॅन्सर होतो, हे माहीत नव्हतं. तिला कॅन्सर झाला; ती गेली. रॉनजेननं एक्‍स-रेचं पेटंट घ्यायचं नाकारलं. सर्व जगाला शोध अर्पण केला. त्यामुळं तपासणीच्या क्षेत्रात क्रांतीच झाली; पण रॉनजेन आर्थिक विपन्नावस्थेत मरण पावला. तो यशस्वी, की अयशस्वी? कसं ठरवणार? मी तर त्याला सलामच करतो.
डार्विनभाऊचेही वाचताना मी असाच थरारून जातो. अहो, तो शाळेत आपल्यासारखाच. काही न येणारा. न रमणारा. त्याचे वडील मोठे डॉक्‍टर. मामांचं कुटुंब श्रीमंत. आजोबाही प्रसिद्ध. अशा कुटुंबातला मुलगा हा. शाळेत तो कधीच चमकला नाही. वडलांनी मेडिकलला घातलं. तिथूनही वर्षभरात परत; कारण त्या वेळची चिरफाड भूल न देता. भुलीचा शोधच नव्हता ना लागला. ते रक्त, तो आरडाओरडा पाहून परतच आला गडी. त्याला लहानपणापासून निसर्गात भटकायचा नाद. किडे जमवून संग्रह केला होता त्यानं. तो पाहून वडील संतापले. काय म्हणाले माहीत आहे? ""यू आर डिसग्रेस टू द फॅमिली!'' म्हणजे "तू घराण्याला कलंक आहेस!' बापरे. फारच रागावले असावेत. कारण त्या वेळच्या उच्चभ्रू इंग्लिश वातावरणात असे शब्द?
पण हे आपल्याला किती ओळखीचं वाटतंय, नाही? शाळेत जे चालतं, त्यात आपण रमत नाही. आपण ज्यात रमतो ते शाळेला, घरच्यांना चालत नाही. कसा मेळ घालावा? बहुतेक शास्त्रज्ञ, कलावंत - ज्यांनी जगाला वळण दिलं - त्या सगळ्यांचे शाळेनं हालच केले. तो एडिसन! ज्यानं शोधलेल्या दिव्याखाली आपण बसतो तो. मतिमंद म्हणून शाळेतून काढूनच टाकलं. मग तो रेल्वेत गोळ्या विकून जा-ये करू लागला. मग लक्षात आलं, इकडच्या बातम्या तिकडच्या लोकांना माहीत नसतात. त्यांच्यासाठी वर्तमानपत्र काढलं तर? पठ्ठ्यानं एका बोगीत हातानं चालवायचा छोटा प्रेस बसवला; आणि वर्तमानपत्र विकू लागला. तोच बातमीदार, तोच जुळारी, तोच छापणार, तोच विकणार. बोला! त्याच्या वर्गात पहिल्या येणाऱ्या मुलाला हे सुचलं असतं का? आणि त्यानं हे करून दाखवलं असतं का?
डार्विनच्या वडलांनी मग त्याला धर्मगुरू करायचं ठरवलं. आता काय करावं? वडलांची कमाल आहे! किडे गोळा करणाऱ्या पोराला धर्मगुरू करायची कल्पना किती अचाट! पण काय करता? प्रतिष्ठेच्या दृष्टीनं डॉक्‍टरच्या खालोखाल तेच होतं. म्हणजे आवडीसाठी जगायचं की प्रतिष्ठेसाठी? त्यांनी निर्णय करून टाकला. मग हा केंब्रिजला गेला. ती डिग्री पूर्ण केली. मग झाला की काय तो धर्मगुरू? मोठ्ठा गाऊन चढवून तीच ती प्रवचनं देणारा? नाही. वेगळंच झालं. सांगतो सगळं.
यानं तो धर्मशास्त्राचा अभ्यासक्रम चालू असताना, त्याची भटकंती चालूच ठेवली. वडलांना याची कल्पना नसणार. त्या विद्यापीठातल्या हेन्स्लॉ नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या तो नादी लागला. ते त्यांच्या भ्रमंतीत याला बरोबर नेऊ लागले. याची आवड पाहून तेही चकित झाले असावेत. त्या निसर्गवेड्या अभ्यासक गटातच तो सामील झाला.
सुटीत घरी आला. अशाच बाहेरच्या ट्रिपहून तो परत आला. वेल्समधे भूशास्त्राच्या ग्रुपबरोबर गेला होता; तर एक पत्र येऊन पडलं होतं. ज्या पत्रानं त्याचं जीवनच बदलून जाणार होतं; आणि जगाच्या ज्ञानाची दिशाही! इंग्लंडच्या राणी सरकारच्या मालकीचं एक गलबत जगप्रवासाला निघणार होतं. उद्देश? नवीन मुलूख, नवीन बेटं शोधणं. त्याचे नकाशे, तिथली माहिती गोळा करणं वगैरे. त्यांना बोटीवर एक निसर्गसंशोधक हवा होता. त्या काळात अशांना नॅचरॅलिस्ट म्हणायचे. डार्विन काही प्रशिक्षित नॅचरॅलिस्ट नव्हता. तरी हे बोलावणं कसं आलं? बघा, नादिष्टपणाचाही उपयोग होतो कुठं कुठं. त्या ग्रेट हेन्स्लॉ गुरुजींनी या नादिष्ट पोराच्या नावाची शिफारस केली; पण तरी इंटरव्ह्यू व्हायचाच होता; आणि निघायची तारीख तर अगदी जवळ आलेली. घरी विचारायला पाहिजे; कारण ही ट्रिप दोन वर्षांची होती. पाहतो तर वडलांचा रुद्रावतार. ""अजिबात या फंदात पडायचं नाही!'' डार्विननं किती अजीजी केली असणार. आईला पुढं केलं असणार. वडलांनी एक तिढा घातला. कुणाही एका सभ्य माणसाकडून तुला पाठिंबा आण. मग मी परवानगी देईन.

मग काय, डार्विनभाऊनं सेजविक मामाचं घर गाठलं. मामाचा वाडा चिरेबंदी असला, तरी हा भाचा मामाचा लाडका असणार. त्याचे विविध उद्योग, उचापती त्याला आवडत असणार. मामाकडून जोरदार शिफारस झाली. पत्रात त्यानं डार्विनच्या वडलांचे मुद्दे एकेक करून खोडून काढले होते. मग काय? डार्विनचा रस्ता खुला झाला. वडील त्यांच्या शब्दाला जागले म्हणून बरं. मग डार्विन गेला इंटरव्ह्यूला. कॅप्टनचं नाव होतं फिट्‌झरॉय. राजघराण्याशी नातं असलेला. तोही तरुण. त्याला तरुणाचीच कंपनी हवी होती. इंटरव्ह्यूमध्ये डार्विनची गच्छंती होता होता वाचली; कारण कॅप्टनसाहेब नाकेले गृहस्थ होते; आणि चांगल्या नाकाची माणसं चांगली, शूर वीर असं त्यांचं मत होतं. आता काय करायचं? आपले डार्विनसाहेब तर नकटेबुवा; पण त्याच्या बोलण्याची छाप पडली; आणि त्याची निवड झाली. काही दिवसांतच एवढ्या मोठ्या जगप्रवासाला निघायचं होतं.

तो प्रवास होता दोन वर्षांचा; पण झाला अखेरीस पाच वर्षांचा! त्या वेळी डार्विन केवढा होता? फक्त बावीस वर्षांचा! बोटीच्या प्रवासाचा आधीचा अनुभव? शून्य. शिवाय या कामाचा कसलाही मोबदला मिळणार नव्हता. खाऊनपिऊन कामं. तशी डार्विनच्या वडलांना वाटणारी भीती, नाराजी अनाठायी नव्हती; पण अज्ञातात पाऊल घालावंच लागतं ना. इस्टेट सांभाळत बसला असता तर? तर तो डार्विन झाला असता का? आपण प्रेमापोटी आपल्या पोरांना अगदी लहानपणापासून नकाराच्या जाळ्यात कसं अडकवून टाकतो, नाही? ट्रिपला पाठवताना शंभर वेळा विचार. पाठवलं तर हजार वेळा काळजी करणं. मी त्यातलाच. नुकती दहावीला बसलेली आमची मुक्ता एकदम हिमालयात निघाली. आधीचा काही अनुभव नाही; पण मन घट्ट करून पाठवलं. परत आली ती आमूलाग्र बदलून. नंतर कायम ट्रेक, पक्षिनिरीक्षण, साप पकडणं... हेच प्रमुख उद्योग. हा बदल आम्ही घरबसल्या देऊ शकलो असतो का?

हे सगळे ज्या बोटीनं जाणार होते, तिचं नाव एचएमएस बीगल. बोट म्हटल्यावर आजची मोठ्ठी, अनेक मजली सुखसोयींनी युक्त अशी बोट डोळ्यांसमोर येईल; पण ते होतं शिडांचं गलबत. तसं ते फार लहानही नव्हतं. त्यावर सत्तर माणसं राहत, काम करत होती. म्हणजे ते बऱ्यापैकी असणार. ती या सगळ्या जगप्रवासाला टिकली बुवा. मला वाटलं होतं, की ती वादळात सापडेल; किंवा चाचे आडवे येतील आणि लुटालूट करतील. तसं काही झालं नाही, ही किती चांगली गोष्ट! किती समुद्र पार केले, किती खंडांचे किनारे पाहिले... इंग्लंडहून निघाले, अटलांटिक पार करत दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात. ब्राझीलचा किनारा. तिथून खाली... मग दक्षिणेला वळसा घालून पश्‍चिम किनाऱ्याला, तिथं चिली पार करत गॅलापेगॉस या द्वीपसमूहापर्यंत. तिथून पॅसिफिक महासागर कसा पार केला असेल? काही बेटांवर थांबले; पण थेट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. हिंदी महासागरातून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून परत ब्राझील. तिथून परत इंग्लंड. केवढा प्रवास आहे हा! आणि तोही शिडावर चालणाऱ्या गलबतानं. तिथं तरी त्याला एक स्वतंत्र केबिन असावी की नाही? तर तसंही नाही. बोटीच्या एका बाजूच्या तळात, एका खोलीत तिघं जण. एकच खाट. ती त्यातला एक नकाशे काढणारा सीनियर होता, त्याला. बाकीचे दोघे हॅमॉकमध्ये (दोरीचा पाळणा) झोपायचे. मधे वावरायलाही फारशी जागा नाही.

कल्पना करा, हा श्रीमंत घरात वाढलेला पोरगा. किती हाल झाले असतील? पण काही तक्रार नाही डार्विनची. पहिल्या दिवसापासून बोट "लागायला' सुरवात झाली. उलट्यांनी तो बेजार झाला. कधी समुद्र खवळलेला असला, की होतो बऱ्याच जणांना हा त्रास; पण याला नेहमीच. अगदी अखेरपर्यंत हा त्रास झाला; (पुढं जन्मभरही तो आजारीच राहिला.) पण पठ्ठ्याची तक्रार नाही. आसपासच्या लोकांना त्याचं आश्‍चर्य वाटलं, की त्या त्रासानं त्याच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. अगदी त्रास होत असेल, तेव्हा काम करणं अशक्‍यच; पण जरा बरं वाटलं, की लगेच काम सुरू; आणि हेच पुढंही आयुष्यभर चालू. कमाल आहे की नाही? आपल्याला सर्दी झाली, डोकं चढलं, की काम बंद. ऑफिसला दांडी.

आपलं दुखणं म्हणजे या साऱ्याला निमित्तच.

डार्विन हे का सोसत होता? का त्यानं कुठं कधीच तक्रार केली नाही? का नशिबाला बोल दिला नाही? कारण उघड आहे. तो झपाटलेला माणूस होता. निसर्गातली कोडी उलगडण्याचं वेड त्याला लागलं होतं; आणि आयुष्यात एखादीच मिळते, अशी ही संधी त्याला मिळालेली. पहिल्यांदा ब्राझीलच्या किनाऱ्यावर गलबत नांगरलं; आणि डार्विन एखादा कुणी सोबतीला घेऊन जंगलात शिरला. त्याचं वर्णन त्यानं केलंय. असं विविधतेनं नटलेलं दाट जंगल पाहायला मिळणं... म्हणजे निसर्ग अभ्यासकाला स्वर्गच... या अर्थाचं काहीतरी. प्रत्येक ठिकाणी बोटीतून उतरला, की नदी असेल तर लहान होडकं घेऊन आत जायचं. तिथून पुढं पायी प्रवास. आजही ते जंगल किती दाट आहे ! त्या वेळी तर ते आणखीच घनदाट असणार, असल्या जंगलात वाटा कुठल्या? शिवाय जंगलातली जनावरं? चावणाऱ्या जळवा, किडे... हा किती आत जायचा, तर दीड-दोनशे मैल ! म्हणजे अडीचशे-तीनशे किलोमीटर ! म्हणजे पुण्याहून कोल्हापूर पायी... तेही रस्त्यानं जाण्यासारखं सुखानं नाही. झाडं-झुडपं दूर करत. कोल्हापूरच्या रस्त्यावर धाबे असतात. इथं काही नाही, इथं सापापासून वाघापर्यंत सगळे प्राणी. जाऊन कसा परत आला असेल सहीसलामत? नुसतं जाणं नव्हतं ते. ती निसर्गसौंदर्य पाहायला गेलेली ट्रॅव्हल कंपनीची ट्रिप नव्हती, तर ते होतं अतिशय कष्टांनी केलेलं संशोधन.

किती तऱ्हेतऱ्हेचे प्राणी तो बघत होता. पहिल्यांदाच त्याला एका महाकाय जनावराची खडकात अडकून पडलेली कवटी सापडली. ही कुणाची? मग ते प्राणी आता का दिसत नाहीत? एका मैदानी भागात दोन तऱ्हेचे ऱ्हिया (शहामृगसदृश) दिसले. त्यांच्यांत थोडा थोडा फरक होता. काही चौरस मैलांच्या परिसरात एकासारखे पण फरक असलेले हे दोन प्राणी देवानं का तयार केले असतील? तो तसा धार्मिक होता; पण आता प्रश्‍न पडू लागले होते. "बायबल'मध्ये लिहिलंय, देवानं ही सृष्टी निर्माण केली, ती आजतागायत तशीच आहे. मग हे फरक का दिसतात? ते नामशेष झालेले प्राणी? तेही देवानेच निर्मिले. मग ते पुसले का गेले? त्या वेळी दिसलेले सांगाडे, जीवाश्‍म उचलून पठ्ठ्या बोटीवर आणत होता. वनस्पतींचे नमुने गोळा केले. किडे तर असंख्यच; पण पक्षीही शिकार करून त्यात पेंढा भरून ठेवलेले. त्या वेळी फोटोग्राफी नव्हती. त्यामुळं संशोधकांना शिकार करावीच लागायची. छोट्या प्राण्यांची कातडीदेखील त्यानं जमवली.

हे सगळं बोटीवर आणायचं; मग बोटीचा मुक्काम हलायचा. एकेका ठिकाणी एखादा आठवडा, कधी जास्तही मुक्काम पडायचा. त्या पुढच्या प्रवासात तरी डार्विननं विश्रांती घ्यावी ना; पण जमवलेल्या प्रत्येक नमुन्याची नोंद, वर्णन, वर्गीकरणाचं काम चालू. रोजची डायरी लिहायचा. घरी मित्रांना पत्रं लिहायचा. ही पत्रं कशी जायची? त्या जंगलात काही पोस्टाच्या पेट्या नव्हत्या मावशी. बंदरावर इंग्लंडकडं जाणाऱ्या बोटी भेटल्या, की तो ही पत्रं तर द्यायचाच; पण जमवलेले अवाढव्य नमुनेही पाठवायचा. तिकडं त्याच्या घरातल्या काही खोल्या भरून गेल्या असणार.

पत्रं लिहिण्याची त्याची ही सवय पुढं आयुष्यभर राहिली. तो घराबाहेर फारसा पडत नव्हता, तरी या पत्रव्यवहारानं त्यानं अनेक मित्र जोडलेले होते. शास्त्रीय जगतात तर त्याचा पत्रांद्वारा चांगलाच संपर्क होता. उदयोन्मुख संशोधकांच्या पत्रांनाही तो सविस्तर उत्तरं द्यायचा. अभिप्राय कळवायला, वर्षाला त्यानं पंधराशेच्या पुढं पत्रं पाठवलीत म्हणजे दिवसाला पाच ! आणि तीही दोन ओळींची खुशाली-पत्रं नव्हेत; तर चांगलीच सविस्तर. आपण तर चांगलाच धडा घ्यायला पाहिजे यातनं. पत्र लिहायचा किती कंटाळा येतो. आज लिहू, उद्या लिहू करत मूळ पत्र हरवून जातं. आपण ते सगळं विसरून जातो. पुढं तो माणूस रागावून दुसरं पत्र लिहितो ः "पत्राला उत्तर द्यायची साधी सभ्यता नाही?' मग भानावर येऊन आपण पत्र शोधू लागतो; पण ते पाय फुटून कुठं फिरायला गेलेलं ! डार्विनचा हा मोठा पत्रव्यवहार त्याच्या मुलानं - फ्रान्सिस डार्विननं - प्रसिद्ध केलाय. त्यात किती नव्या नव्या गोष्टी कळतात. त्या त्याच्या पुस्तकांमध्येही नसतात; तसंच त्याचं डायरीलेखनही. माणूस का मोठा होतो, तो का मोठं काम करतो, त्याच्या मागं या क्षुल्लक वाटणाऱ्या सवयी असाव्यात, नाही?

विद्यापीठात असताना त्याला भू-शास्त्राचा (जिऑलॉजी) नाद लागला होता. या बीगल प्रवासात त्यानं वाचायला (एकमेव?) ग्रंथ घेतला होता, तो डॉ. लायेल (ङरूशश्रश्र) यांनी लिहिलेला. सतत तो वाचायचा; आणि त्याप्रमाणे निरीक्षणं करायचा. लायेलांशी त्याचा पत्रव्यवहारही होता, अगदी शेवटपर्यंत. लायेलनी त्याला खूप आधार दिला. पश्‍चिम किनाऱ्यावर असताना त्यानं एक भूकंप अनुभवला. एक भाग खचलेला पाहिला; आणि त्यावर वरचा भाग सरकून येऊन बसलेलाही पाहिला. तर दुसरीकडं खालचा एक भाग पाण्यावर उचलला जाऊन बेट बनलं. तप्त पृथ्वी थंड होताना काय झालं असेल, बेटं, समुद्र, डोंगर, जमीन, कसे तयार झाले असतील, हे प्रत्यक्षच पाहायला मिळालं. लायेल हेच म्हणत होते. त्यांच्या थिअरीला हा चांगलाच पुरावा मिळाला होता. डार्विनची ही काही निरीक्षणं, प्रवासपत्रं तिकडं इग्लंडमध्ये आधीच प्रसिद्ध होऊ लागली. वैज्ञानिक वर्तुळात या तरुण संशोधकाविषयी कुतूहल निर्माण झालं. आल्यावर लायेलनी तर त्याला त्यांच्या वैज्ञानिक मंडळाचं सदस्य करून घेतलं. "दक्षिण अमेरिकेचा भू-शास्त्रीय अभ्यास' असं पुस्तकही त्यानं लिहिलं.

त्या वेळी जीवाश्‍म ऊर्फ फॉसिल्स हाही शोध लागला होता. प्राणी, पक्षी, काही वनस्पतीही समुद्राच्या तळाशी गाळात गाडल्या जातात, त्यांचे थरांवर थर होतात, ते घट्ट होऊन त्यांचे खडक बनतात, जे मध्ये सापडते, त्यांचे ठसे त्यावर उमटतात. कधी कधी ते प्राणी नष्ट होताना, त्यांच्या पेशीन्‌पेशींत कॅल्शियम किंवा तत्सम पदार्थ जाऊन बसतात, त्यामुळं त्यांचे जसेच्या तसे घन आकार राहतात. हे सगळं किती हजार, लाख, कोटी वर्षांपूर्वी घडलेलं. त्या खडकाचं वय काढता येतं. मग आपोआपच या जीवांचंही कळणारच.

थोडक्‍यात काय, डार्विन हे दगडं-धोंडे वाहून का आणत होता, हे कळावं. एके ठिकाणी त्याला टेकडीच्या तुटलेल्या भागात पांढरं काही तरी दिसलं. ते उकरलं. तो मोठ्या प्राण्याचा अवशेष होता. तो काढीपर्यंत आणखी हाडं दिसली. सगळा डोंगर म्हणजे कबरस्तानच होतं. त्याचा अभ्यास केल्यावर तोच प्रश्‍न पडला. हे सगळं गेलं कुठं? त्यात आफ्रिकेतल्या गेंड्याचा भाऊबंद होता. हा इकडे कसा? आफ्रिकेतून इथं येणं शक्‍य नव्हतं. मग हे खंड पूर्वी एकच होते की काय? (पुढं वेग्नरनं हे शोधून काढलं.) एका प्रश्‍नातून अनेक प्रश्‍न. प्रश्‍न पडणं ही किती महत्त्वाची घटना असते! माणसाला प्रश्‍नच पडले नसते तर? आजवर जे ज्ञान साठलं आहे, ते मिळालं असतं का? फार प्रश्‍न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला किती नामोहरम केलं जातं, आपल्या शाळांमध्ये. आमच्या वर्गात सोमनाथ नावाचा काटकुळा मुलगा होता. गुरुजींनी काही शिकवलं, की प्रश्‍न विचारायला याचा हात वर झालाच समजा. मग गुरुजी हेटाळणीनं म्हणायचे, ""झालीच सोमनाथची लाकडं वर.'' सगळे हसायचे. तोही पठ्ठ्या असा, की तो नामोहरम नाही व्हायचा. कुतूहल नसतं, तर मानवी जीवन किती शुष्क झालं असतं. म्हणून सर्वज्ञतेचा दावा करणारे गुरू, महाराज ही मंडळी बघितली, सर्व प्रश्‍नांची उत्तरं आमच्या विचारसरणीत आहेत, असा दावा करणारे आग्रही कार्यकर्ते, पंडित पहिले, की आश्‍चर्य वाटतं. ज्ञानाचा केवढा महासागर आहे. तो एका कुणाला किंवा कुणा विचारसरणीला उलगडला असणं शक्‍य आहे का? कोणी शास्त्रज्ञ समुद्र किनाऱ्यावरून फिरत असता, कुणाच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यानं वाळूचा बारीकसा खडा उचलला. म्हणाला, ""एवढं माहीत आहे,'' आणि सागराकडं बोट दाखवून म्हणाला, ""अजून माहीत नसलेलं एवढं आहे.'' ही खरी नम्रता. खऱ्या शास्त्रज्ञाला, शास्त्रात-प्रश्‍नात बुडालेल्यालाच ती असू शकते. ""गप्प बस, जादा शहाणपणा करू नकोस,'' अशा संस्कृतीत ती
कशी असणार?

***
डार्विनच्या बुद्धीला धक्के बसत होते. तो धर्मशास्त्रातला केंब्रिजचा पदवीधर. त्यामुळं "बायबल'तर कोळूनच प्यालेला. "जुन्या करारा'त लिहिलेलं, तीच त्यांची श्रद्धा. पृथ्वीवर देवानं प्राणी, वनस्पती सृष्टी निर्माण केली, तेव्हापासून ती आजवर तशीच आहे. त्यात काही बदल नाही. माणूस नंतर निर्माण केला. ही सृष्टी माणसासाठीच तयार केली. या मनुष्यकेंद्री विचारानं आज निसर्गाचं जीवघेणं नुकसान करून घेतलंय आपण; पण तो विषय बाजूला. प्राणी, वनस्पती जेव्हा निर्माण केले, तेव्हापासून ते तसंच आहे, हा खरा मुद्दा. आश्‍चर्य म्हणजे सर्व वैज्ञानिक जगही तसंच समजत होतं. याला धक्के बसणं आधीच सुरू झालं होतं. "बायबल'प्रमाणं ही निर्मिती कधी झाली तर चार हजार वर्षांपूर्वी. एका धर्मपंडितानं सांगितलं, ""सहा हजार वर्षांपूर्वी.'' भूशास्त्रज्ञ पाहत होते, पृथ्वीवरच्या खडकांच्या वयाचे अंदाज करत होते. ते लाखो-कोटी वर्षांपूर्वीचे. फॉसिल ऊर्फ जीवाश्‍मांचं वयही तसंच; पण हे मांडायचं धाडस होत नव्हतं. वैज्ञानिक मंडळींत याचीच चर्चा मात्र चालू होती. उत्क्रांतीची ही कल्पना मांडली गेली होती. खुद्द डार्विनचे आजोबा उत्क्रांतीचे समर्थक; पण त्यांना हे कसं झालं, हे सांगता आलं नव्हतं. डार्विननं ते काम केलं, म्हणून त्याला महत्त्व. तर जंगलातून फिरणारा डार्विन आता विचार करू लागला, हे कसं? या प्रवासात उत्क्रांतीचे पुरावे मिळत होते; पण उत्तरं पुढं मिळायची होती.

प्रवासात काही दृश्‍यं विलक्षण होती. स्पॅनिश वंशाचे लोक स्थानिक आदिवासींना टिपून टिपून भोसकून मारत होते. स्त्रिया, लहान मुलांनाही. यानं त्यांना असं का करता विचारलं; तर ते म्हणाले, ""रानटी लोकांना मारून जग साफ करतोय.'' डार्विनला आश्‍चर्य वाटलं. संताप आला असणार. या आदिवासी जमातीपैकी एक जण त्यांच्या बीगलवर होता. आधीच त्याला इंग्लंडमध्ये आणून शिकवून सुधारून टाकलं, म्हणजे त्याच्यामार्फत शिक्षण, धर्मप्रसार करता येईल. त्याला त्या जमातीत आणून सोडलं; पण तो काही दिवसांतच ती सभ्यता सोडून परत त्या आदिवासींचं जीवन जगू लागला. मलाही या घटना फार विदारक वाटल्या. आदिवासींना टिपून मारणं काय; आणि आदिवासींना "सुधारण्या'साठी त्यांच्यात असा माणूस सोडणं काय, दोन्हींत फरक फक्त डिग्रीचा. त्यांना त्याचं जीवन जगू द्यावं की. ते नाकारणारे तुम्ही कोण? आणि तुम्ही तरी सुधारलेली कशावरून? त्या किंवा त्याआधीच्या काळात इग्लंडमधल्या कारखान्यांत, खाणींमध्ये बालकामगारांचं भीषण शोषण होत होतं. त्याला काय म्हणायचं? आणि भारतासारख्या अनेक देशांवर राज्य करून तिथल्या निसर्गसंपत्तीची लूट करणं, ही कुठली संस्कृती ?

बरं, जाऊ द्या. आपला डार्विनभाऊ त्यातला नव्हता; पण कॅप्टन फिट्‌झरॉय मात्र त्यातलाच. म्हणून त्या दोघांत अनेक बाबतींत मतभेद होऊ लागले. खटके उडू लागले. डार्विनला गुलामी अजिबात मान्य नव्हती; आणि ब्रिटिश सत्ता तर त्यावरच विसावलेली. किती दोष दिला, तरी कॅप्टनमुळं डार्विनला ही संधी मिळाली, म्हणून विज्ञानाला संधी मिळाली, म्हणून आपल्यालाही. पुढं डार्विनच्या पुस्तकावर गदारोळ माजला, तेव्हा फिट्‌झरॉय म्हणाला, ""हा असं काही करतोय, असं काही लिहिणार आहे हे त्या वेळी मला कळलं असतं, तर त्याच वेळी मी त्याला समुद्रात फेकून दिलं असतं.'' त्यानं तसं केलं नाही, हे आपलं नशीब.

बीगल हळूहळू दक्षिण अमेरिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यानं वरवर उत्तरेकडं येत होती. मुख्य भूमीच्या पश्‍चिमेला चारपाचशे मैलांवरच्या गॅलापेगॉस या बेटांच्या समूहापाशी आल्यावर मुक्काम पडला. पॅसिफिकमधली ही बेटं म्हणजे आता वैज्ञानिकांची पंढरी झाली आहे. बुद्धाला बोधिवृक्षाखाली जे ज्ञान झालं, तसंच डार्विनला इथं उत्क्रांतीबद्दल. तशी प्रवासात आधीपासूनच ती कल्पना दार ठोठावू लागली होतीच; पण इथं सगळं आभाळ स्वच्छ झालं. तिथं त्याला काही बेटांवर महाकाय कासवं दिसली. माणूस बसू शकेल इतकी मोठी. दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भूमीवरच्या गव्हर्नरनं याला सांगितलं होतं, की कुठल्याही कासवाची पाठ मला दाखव; मी ते कुठल्या बेटावरचं कासव आहे ते ओळखीन. थोडक्‍यात काय, बेटाप्रमाणं पाठी बदलतात. आपल्याकडं म्हण आहे, बारा मैलांवर भाषा बदलते, तशी.

त्या बेटांवर एक अलगच दुनिया होती. तिथले प्राणी-पक्षी वेगळेच होते. आजवर पाहिल्यापेक्षा वेगळे आकार, वेगळे रूप... जसं त्याला त्या सांगाड्यांनी, जीवाश्‍मांनी चकित केलं होतं, तसंच इथं झालं. ती दुनिया गेलेली, तर इथं तशीच प्रत्यक्षात उभी! एकाच जातीचे प्राणी, मग बेटाबेटांवर फरक पडायचं कारण काय? या प्रश्‍नानं त्याचं डोकं भणाणलं. आणि लखकन प्रकाश पडला. हा शोध लागण्याचा क्षण. प्रत्येक शास्त्रज्ञाच्या जीवनात हेवा वाटावा असा क्षण. कितीही संपत्ती ओता, डिग्र्यांच्या थप्प्या लावा, तो मिळत नाही; पण मेरी क्‍युरीसारख्या, एखाद्या शेडमध्ये प्रयोगशाळा थाटणाऱ्या गरीब नादिष्टाला मिळून जातो तो. सूफी संप्रदायात गुरू शिष्याच्या डोक्‍यावर हात ठेवतो. शिष्य बेशुद्ध पडतो; आणि शुद्ध येते तेव्हा त्याचं जग बदललेलं असतं. वैज्ञानिकांच्या डोक्‍यावर हात ठेवायला कोणी नसतं; पण साक्षात्कार? वा, वा! त्यानंतर त्याचंही जग बदलून जात असणार. जातंच. बोटीवरच्या एवढ्या हालअपेष्टा, जंगलातली एवढी तंगडतोड, नमुन्यांची एवढी ओझी वाहणं... डार्विन थकला असेल का? थकला असेल; पण त्याचं भान नसेल. इथं हा साक्षात्काराचा क्षण वैज्ञानिकाला आपोआप मिळत नसतो. प्रचंड धडपडीत, ध्यास घेऊन काम करण्यात तो विजेसारखा चमकतो; आणि समोरच येतो.

काय होता हा साक्षात्कार?

***
थांबा, आधी त्या पक्ष्यांचं सांगू. मग तो चमत्कार सांगतो. तर पक्ष्यांच्या वेगवेगळ्या पन्नास-पंचावन्न जाती शोधल्या. त्यांतल्या फिंच नावाच्या पक्ष्याच्या चोचींमध्ये फरक. बाकी शरीर तेच; पण चोचींत फरक. का बरं? काहींच्या चोची पोपटासारख्या टणक. कठीण फळं फोडता येतील किंवा बिया खाता याव्यात अशा. काहींच्या त्या मानानं पातळ. फुलांतला मधुरस चोखता येईल. काहींच्या चोची किडे खाण्याजोग्या; तर काहींच्या सुतार पक्ष्याप्रमाणं खोडाला खोदून आतले किडे खायला सोयीच्या. एका पक्ष्याच्या जातीत एवढी विविधता? जे स्पष्टीकरण सुचलं, त्यामुळं गॅलापेगॉस हे तीर्थक्षेत्र झालंय. आजही डार्विन गेला त्या बीगलच्या मार्गानं तरुण वैज्ञानिक जातात. त्या वेळी डार्विनला दिसलेल्या प्रजाती मिळतात का, ते पाहतात. त्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत.

तर ती सुचलेली कल्पना अशी. ती बेटं जवळजवळ असली, तरी त्यावरचं वातावरण वेगवेगळं आहे. काही ठिकाणी दाट झाडी; तर काही ठिकाणी कोरडी रेताड जमीन. फिंच पक्षी तिथं ज्या बेटावर आहेत, तिथं अन्न असेल, त्याला अनुरूप त्यांच्या चोची झाल्या. कासवांच्या बाबतीत जिथं त्यांना खायला जमिनीलगत वनस्पती आहेत, तिथं नेहमीच्या आकाराच्या पाठी आहेत. जिथं झुडपं आहेत, तिथं मान वर करता आली, तरच ते अन्न मिळेल, तिथं ती पाठ वेगळी आहे. वेगळी म्हणजे? डिझाईन वेगळं नाही. जिथं डोकं आहे, त्यावरचा पाठीचा भाग आत गेलाय. तिथं मान वर करायला जागा झालीय. म्हणून माना लांब करून ते थोडा वरचा पाला खाऊ शकतात. आहे की नाही निसर्गाची करामत? ही करामत कोणी केली नाही, तर ती झाली आहे. उत्क्रांती झाली हा डार्विनचा शोध नाही; तर उत्क्रांती कशी झाली, हा त्याचा शोध.

प्रत्येक जीव त्याची अपत्यं निर्माण करतो. प्रत्येक वेळी ही तंतोतंत कॉपी नसते. त्यात थोडा फरक पडतो. हजारो, लाखो वर्षांत हे बदल इतके वाढतात, की मूळ प्रजातीशी साम्य राहत नाही; आणि मग वेगळी प्रजाती तयार होते. डार्विननंतर झालेल्या संशोधनातून तर कळलं स्त्री आणि पुरुष किंवा नर-मादी असे तयार झाले. अपत्य त्या दोघांचे निम्मे-निम्मे गुण घेतं. कुठलं रूप घेतं, हा पूर्ण चान्स, योगायोग. त्यामुळे आपण बघतो, एका घरात आठ भावंडं; पण दिसायला, गुणांनी प्रत्येकांत फरक. त्यातून विविधता प्रचंड वाढली. प्रत्येक प्रजातीच्या अनेक प्रजाती. हे सगळं बराच काळ चाललेलं.

मधल्या काळात बाहेरची परिस्थिती बदलत होती. भूकंप होत होते. नवी बेटं निर्माण होत होती. हिमयुगं आली, प्रलय झाले. डोंगर खचून महाकाय दऱ्या निर्माण झाल्या. समुद्राचे तळ वर उचलले जाऊन त्यातनं हिमालयासारखे डोंगर तयार झाले. कित्येक प्राणी, वनस्पतींच्या प्रजाती पूर्ण नामशेष झाल्या. ज्यांच्यात टिकून राहण्यासाठी शारीरिक अनुकूलता होती, त्या टिकल्या. डायनासॉर तर पुसलेच गेले; पण मुंग्या, डास जगले. अगदी जपानच्या ऍटमबॉंब स्फोटानंतरही काही कीटक जगले. ही अनुकूलता म्हणजे निसर्गानं केलेली निवड. याचा अर्थ निसर्गाची कमिटी, सिलेक्‍शन करायला बसली नव्हती. ते आपोआप होत गेलं. म्हणायची पद्धत म्हणून नॅचरल सिलेक्‍शन. पुढं लॅबमध्ये माणसानं संकरित जाती निर्माण केल्या, हे निसर्गात आपोआप झालेलं. कसं झालं, तर प्रत्येक आवृत्तीत होणाऱ्या चुकांमुळं किंवा खरं तर पडलेल्या फरकांमुळं. या चुका किती पथ्यावर पडल्या. गुरुजींनी पेपर तपासल्यावर ज्यानं जास्त चुका केल्या, त्याचा पहिला नंबर असं म्हणावं तसं झालं. जितकी विविधता जास्त, तितकी टिकून राहण्याची शक्‍यता जास्त. आज आपण विविधता किती नाकारतो! पोरांना एकसारखे युनिफॉर्म घालायचे, मॅनेजमेंटवाल्यांची एकसारखी भाषा, सगळं रोबोसारखं. आता तर ठिकठिकाणची अन्न, कपडे, भाषा यांतली वैशिष्ट्यं लोपत चालली आहेत. सगळं एकसारखं होत आहे. विविधता या निसर्गाच्या मोठ्याच गुणाला आपण पारखे होत चाललो आहोत.

तर हे उत्तर सापडल्यानंतर डार्विन सगळ्यांना ते लावून पाहू लागला. नष्ट झाले त्याला कारण तेच; आणि शारीरिक बदल घडत गेले, त्यालाही कारण तेच. डार्विनच्या आधीच्या लामार्कच्या सिद्धांतात फरक आहे. तो म्हणतो, झाडपाला खाली मिळेनासा झाला, उंच मान करून जिराफ उंचावरचा पाला खाऊ लागले. त्यामुळं त्यांच्या माना लांब होत गेल्या. डार्विन म्हणतो, असं नाही. जिराफांच्या पुनरुत्पादनात चूक झाली. काहींच्या माना लांब झाल्या. ते टिकले. त्यांची प्रजा पुढं गेली. कोणी विचारेल, मग सगळीकडं असे जिराफ का नाही झाले? उत्तर असं, की सगळीकडं जिराफ नव्हते, सगळीकडं तशाच "चुका' झाल्या नाहीत; आणि सगळीकडं तशी तंतोतंत परिस्थिती नव्हती.

माणसाचंही तसंच. अफ्रिकेत पहिला माणूस जन्मला. मग ते टोळ्याटोळ्यांनी जगभर पसरले. ते उत्तरेकडं थंड प्रदेशात गेले असतील, तेव्हा कसे जगले असतील? अफ्रिका विषुववृत्तीय प्रदेशात. ऊन जास्त. म्हणून त्वचेखाली मेलॅनिन हे रंगद्रव्य देणाऱ्या पेशींची संख्या जास्त. उत्तरेकडे, थंड प्रदेशात सूर्य कमी दिवस, त्याची प्रखरताही खूप कमी. मग त्वचेखाली व्हिटॅमिन-डी कसं तयार होणार? कॉपीमध्ये ज्यांचे रंग उजळ होते, ते टिकले. बाकी? एक तर नामशेष, नाही तर स्थलांतर. एस्किमो तर अगदी लाल गोरे. मेलॅनिन जवळपास नसतेच. आता सगळंच बदललं. आपण कुठूनही कुठं जातो, स्थायिक होतो; कारण आपण आता कपडे, घरे, एसी... वगैरे बाहय साधनं निर्माण केली. त्या वेळी तसं नव्हतं. आता काळा माणूस अमेरिकेत, तर गोरा दक्षिण आफ्रिकेत. उन्हात उन्हाची, थंडीत थंडीची काळजी घेतली, की पुरतं; पण तरी पुनरुत्पादनात चुका अखंड होत आहेतच. ते थांबेल कसं?

डार्विनच्या नंतर इतरांना सापडलेलं उदाहरण फार चपखल आहे. इंग्लंडमध्ये पूर्वी फिकट पांढऱ्या रंगाचे पतंग (फुलपाखरांमधला मोठा प्रकार) होते. त्यांत काही अधूनमधून काळ्या, काळपट अशाही रंगांचे निर्माण होत; पण ते संख्येनं कमी. पुढं इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. कोळशाच्या धुरामुळं सगळा परिसर काळवंडला. झाडांची खोडंही काळी पडली. पांढरे पतंग त्यावर उठून दिसू लागले; आणि पक्षी त्यांना सहज पकडून खाऊ लागले. उलट काळे लपून गेले, ते जास्त जगले. काही काळानंतर कुणी निरीक्षण केलं, तर दिसलं, आता काळे बहुसंख्य; आणि पांढरे नगण्य. आधी फरक पडले होतेच; पण परिस्थिती बदलली. त्याबरोबर ही उलटापालट झाली. (असेच पांढऱ्या, भुऱ्या रंगाच्या उंदरांचंही उदाहरण आहे.)

उत्क्रांतीचा प्रवास सरळ रेषेत नसतो. तो उलट-सुलटही असू शकतो. सध्या काही आदिवासी समूहांमध्ये "सिकल सेल ऍनिमिया' हा आनुवंशिक दोष आहे. त्यांच्या तांबड्या पेशी गोल नसतात; विळा किंवा चंद्रकोरीच्या आकाराच्या. त्यामुळं कायम ऍनिमिया. कारण ऑक्‍सिजन वाहून नेण्याचं काम करणाऱ्या हिमोग्लोबिनचा तुटवडा. आई आणि वडील दोन्ही सिकल सेलवाले; तर मूल जेमतेम दहा-वीस वर्षं जगणार, पण त्यांच्यापैकी एक नॉर्मल असेल, तर मुलामध्ये सिकल सेल"ट्रेट' (संभावना) असते, असं. पण एके काळी सिकल सेल ट्रेट हा फायदा होता. कारण त्यांना मलेरिया होऊ शकत नाही. मलेरियाचे जंतू तांबड्या पेशीत शिरून त्यांच्या वाढीतील एक अवस्था पूर्ण करतात. ती या "सिकल'वाल्यांमध्ये होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा मलेरिया प्रचंड प्रमाणात होता, औषधं नव्हती, तेव्हा हे आदिवासी जगले. आता तोच दोष बनला. म्हणजे हे त्या पाकोळ्यांसारखंच झालं. आता इंग्लंडमधल्या औद्योगिक जगाचं रूप बदललं. आता एवढा आसमंत काळं करणारा कोळशाचा धूर नाही. आता पांढऱ्या पाकोळ्यांची संख्या परत वाढलेली असणार.

या नैसर्गिक निवडीच्या कारणानंतर डार्विननं शोधून काढलं, या चुका किंवा फरक होण्याचं आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे सेक्‍शुअल सिलेक्‍शन. नर किती योग्य आहे, बळकट आहे, हुशार आहे किंवा सुंदर आहे, यावर मादी अनेकांतून एकाच नराची निवड करते, आणि त्याच्याशी समागम करून प्रजा निर्माण करते. मोराला एवढा अवजड पिसारा का आहे? त्यामुळे शत्रूचं भक्ष्य होण्याचा धोका तो पत्करतो; कारण मादी त्यावरून निवड करणार आहे. पिसारा सुंदर आहे, त्यावर चमकते रंग आहेत, याचा अर्थ त्याचं शरीरही निरोगी-धष्टपुष्ट आहे. मधमाश्‍यांमध्ये राणी उंच भरारी घेते, तिच्या मागं अनेक नर लागतात. जो यशस्वी असतो, तो योग्य वर. चांगल्या अपत्यांची ती खात्री.

एका प्रकारच्या कीटकांमध्ये काही नरांचे डोळे लाल टिंबासारखे असतात. काही पांढरे असतात; पण लक्षात आलं, की माद्या लाल डोळेवाल्या नराचीच निवड करतात. शास्त्रज्ञांनी लाल, पांढरे असे सारख्या संख्येत नर सोडले (मर्यादित जागेत). काही दिवसांनंतर पाहिलं, तर सगळे नर लाल डोळेवाले. पांढरे संपूनच गेले. माद्यांनी हे लालवाले का निवडले? कोण जाणे! तुम्ही त्यांनाच विचारा. संस्कृतातले एक सुभाषित आहेच, (कुठले ते आठवत नाही) "स्त्री स्वभावाचा कुणाला पत्ता लागला आहे?' अशा अर्थाचे. हे अर्थात पुरुषी वाक्‍य; पण आठवले त्याला काय करणार?

काही बाबतींत निवडीचा प्रश्‍न नर आपसांतच सोडवतात. त्यांच्यात लढाई होऊन जो जिंकतो त्याची निवड. काही पक्ष्यांना असला हिंसकपणा मानवत नाही. मादीचं मन जिंकण्यासाठी ते आकाशात तऱ्हेतऱ्हेच्या गिरक्‍या मारून दाखवतात. मी एकदा पाह्यलंय. नीलकंठची (रोलर) जोडी. नर गिरक्‍या मारून दाखवत होता. परीक्षकाच्या खुर्चीत बाईसाहेब बसल्या होत्या. सुगरणीतला तर नरच घरटं बांधत असतो. ती जंगलात कुठंकुठं लटकलेली घरटी पाहिलीत? काय काय असतं ते? मॅडमला पसंत पडेपर्यंत तो ती घरटी तयार करतो. पसंत पडलं, तरच मग पुढचा संसार.

***
उत्क्रांतीला काही वेळ इथंच सोडू.
कारण डार्विनला घरी पोचवायला बीगल बोट खोळंबली आहे. एवढ्या खडतर जगप्रवासात काहीही अडचण आली नव्हती, हे विशेष. तो १८३६ मध्ये परत आला. आल्या आल्या भावाकडं लंडनमध्ये काही वर्षं राहिला. त्या काळात माल्थसचा लोकसंख्येविषयीचा निबंध वाचला. लोकसंख्या आणि अन्नाची उपलब्धता यांचं एकमेकांवर अवलंबून असणं, लोकसंख्या ज्या वेगानं वाढते, त्या वेगानं अन्नपुरवठा वाढत नाही; मग अस्तित्वासाठी स्पर्धा करावी लागते, असा काहीसा आशय. डार्विननं त्याची सांगड प्राणिसृष्टीशी लावली. प्राण्यांनाही अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. त्यात जे टिकतात ते जगतात; आणि त्याला पडलेला प्रश्‍न सुटलाच जसा.

परत आल्यावर तो सत्कार समारंभात गेला नाही, की हारतुरे घेतले नाहीत. चित्तथरारक प्रवासवर्णन सांगून सभा गाजवल्या नाहीत. निवांत घरी येऊन तो कामाला लागला. त्याचा एक मित्र जीवाश्‍मांमधला तज्ज्ञ होता. त्याच्याबरोबर आणलेल्या जीवाश्‍मांवर चर्चा. मग पक्षितज्ज्ञ मित्राबरोबर तो विषय त्यानं समजून घेतला. वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्स्लॉ हूकर यांना ते सगळे नमुने दाखवून झाले. म्हणजे मला शोध लागलाय, माझं तुम्ही ऐका, हा उतावळेपणा त्यानं केला नाही. तो शांत राहिला. त्या त्या तज्ज्ञांकडून ते ते विषय समजून घेतले; कारण त्यानं कसलंही औपचारिक, विद्यापीठातलं शिक्षण घेतलं नव्हतं. औपचारिक शिक्षणाला त्यानं महत्त्व दिलं. पुढं गजबजाटात राहणं नको, म्हणून लंडनच्या दक्षिणेला डाऊन्स गावी शांत परिसरात घर घेऊन राहिला.

तो लगेच उत्क्रांतीविषयी बोलला का नाही? एक तर त्यानं लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार होत्या. चर्चचा विरोध होणार होता; आणि दुसरं म्हणजे, त्यालाही त्या विषयाचा नीट अभ्यास करायचा होता. नीऽऽऽट म्हणजे किती काळ हो? काही महिने? एखाद-दुसरं वर्ष? छे, छे! तब्बल वीस वर्षं तो अभ्यासच करीत राहिला. आणलेले नमुने अक्षरशः हजारो होते. प्रत्येक नमुना घेऊन बसायचा. त्याची सविस्तर नोंद करायचा. त्याचे किती वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील, त्याचा सांगोपांग विचार करायचा... की नंतर पुढचा नमुना, असंख्य किडे, फुलपाखरं, पानं होती. पक्षी होते. उंदीरसदृश प्राण्याचे तर त्यानं कितीतरी (तीस-चाळीस) नमुने आणले होते. त्यांपैकी एका प्रजातीला शास्त्रीय जगाने डार्विनचेच नाव दिले. पहिल्यांदाच ती प्रजाती शोधली म्हणून. कधी त्याचे वैज्ञानिक मित्र येऊन या सगळ्यांवर चर्चा करीत. कधी वादही होत. त्यात प्रमुख हूकर आणि हक्‍सले. या सगळ्यांनी डार्विनला त्याचं संशोधन लिहिण्याचा खूप आग्रह केला; पण समाधान होईपर्यंत डार्विन संशोधन मांडणार नव्हता.

पण त्याला ते मांडावंच लागणार होतं. कारण तशी परिस्थिती निर्माण झाली. वॉलेस नावाच्या तरुण वैज्ञानिकानं त्याला त्याचा निबंध अभिप्रायासाठी पाठवला. तो वाचला आणि डार्विनच्या पायाखालची जमीनच जशी सरकली. डार्विन जे म्हणत होता, त्या निष्कर्षापर्यंत वॉलेस स्वतंत्रपणे आला होता. याचा अर्थ डार्विननं आयुष्यभर कष्टानं केलेलं काम मातीमोल झालं होतं. आता या थिअरीचा शोध वॉलेसच्या नावावर लागणार होता. विज्ञानाच्या इतिहासात त्याचं नाव नोंदलं जाणार होतं. जसा "तो' साक्षात्कार हे कैज्ञानिकांचं भाग्य, तशी ही त्याची दुसरी बाजू. आपल्या आधी कोणी तरी मांडेल, ही नेहमीची भीती. या क्षेत्रात चोऱ्याही अनेक झालेल्या. एकाचं संशोधन दुसरा सहजपणे लाटतो. त्याला सर्व फायदे मिळतात. शेवटी ती सुचलेली संगती महत्त्वाची. ती उचलली की झालं. त्याला पुराव्याचं पाठबळ कुणालाही देता येतं. आपल्या देशात पेटंटसाठी अर्ज केला, तरी भागत नाही. जगासाठी नोंदवावा लागतो. समजा, कायद्यानं आपली बाजू खरी असली, तरी ते कोर्टात प्रस्थापित करणं किती अवघड. ते करताना संशोधकाचा जीव जातो.

वॉलेस त्यातला नव्हता. तो डार्विनचा चाहता होता. त्याला भेटूनही गेला होता. वनस्पतींच्या प्रजाती वेगळ्या कशा काढाव्यात, याबाबत त्यानं डार्विनशी आधी पत्रव्यवहार केला होता. डार्विनचं प्रवासवर्णन वाचलं होतं. गरीब परिस्थितीत जन्मलेला, कष्टांची कामं केलेला माणूस. किडे, पाखरं जमवून संग्राहकांना विकायचा. डार्विनप्रमाणंच तो दक्षिण अमेरिकेतल्या जंगलात गेला; पण येताना त्याच्या बोटीला आग लागली. दुसऱ्या बोटीनं येऊन वॉलेसला कसंबसं वाचवलं; पण जमवलेले नमुने या सगळ्यांत नष्ट झालेले. नंतर तो पूर्वेकडं मलायाकडं गेला. इंडोनेशियामधले प्राणी-पक्षी-वनस्पती आणि पूर्वेकडं ऑस्ट्रेलियामधले यांच्यात फरक आहे, हे त्यानं सप्रमाण दाखवलं. त्या रेषेला वैज्ञानिक जगानं "वॉलेस लाइन' असं नाव दिलं आहे. तर या वॉलेसनं त्याचा निबंध डार्विनकडं पाठवला; आणि वाचून तो पुढे बुजुर्ग वैज्ञानिकांकडं म्हणजे लायेल वगैरेंकडे पाठवावा, असं सुचवलं.

डार्विननं जड मनानं तो तसा पाठवला. कोणी म्हणतं, डार्विननं त्या मित्रांना तार करून बोलावून घेतलं. एकूण एकच; पण त्या बुजुर्गांना हे संशोधन डार्विननं खूप वर्षं आधी केलंय, ते माहीत होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या संशोधनाचा आराखडा असलेला हा निबंध या मित्रांनी वाचलेला होता. मग या सगळ्यांनी पुढाकार घेतला. हे श्रेय दोघांनाही मिळालं पाहिजे, म्हणून दोघांचेही निबंध एकाच वेळी वैज्ञानिकांच्या "लिनियन सोसायटी'पुढं वाचावेत असं ठरवलं. हूकरनं आपण डार्विनचं संशोधन खूप वर्षांपूर्वी वाचलं असल्याचा निर्वाळा दिला. तो निबंध वाचायला डार्विनही नव्हता; आणि वॉलेस तर खूप दूर होता. डार्विनचा मुलगा गेल्यानं तो त्याच्या दफनविधीत व्यग्र होता. बघा, काय विलक्षण आयुष्य! निर्णायक क्षण जगता येतोच असं नाही. "लिनियन सोसायटी'त त्या वेळी उपस्थितीही बेताचीच होती. ऐकणारांनाही आपण काही क्रांतिकारक ऐकतोय, असं वाटलं नव्हतं.

थांबा. डार्विनच्या मुलावरून आठवलं. त्याच्या कुटुंबाविषयी आपण काहीच बोललो नाही. "बीगल'वरून परत आल्यावर काही काळ डार्विननं लग्नाचा विचारच केला नव्हता. मग त्यानं लग्नाचे फायदे-तोटे लिहून काढले. कसला हा शिस्तशीर स्वभाव! तोट्याच्या बाजूला पुस्तकं खरेदी करायला कमी पैसे राहतील हा मुद्दा. फायद्याची बाजू जड झाल्यावर लग्न करायचा निर्णय घेतला. वेजवूड आणि डार्विन कुटुंबात यापूर्वीही आपसात लग्नं झाली होतीच. मग डार्विननं "मामाच्या मुलीला' म्हणजे एमा वेजवूडला मागणी घातली. लग्न झालं. आठेक मुलं झाली. एमा धार्मिक होती. तिला डार्विनची मतं पटत नव्हती; पण नात्याच्या आड ते आलं नाही. डार्विन त्याचं संशोधन मांडायला उशीर करत होता, त्याचं एक कारण त्याला एमाच्या मनाची काळजी वाटत असावी.

तो अगदी कुटुंबवत्सल माणूस होता. मुलं खेळताना त्याच्या खोलीत येऊन धुडगूस घालत. ते डार्विनला चालत असे. कोणी पोर आजारी पडलं, की ते डार्विनच्या अभ्यासिकेतल्या कोचावर झोपायचं. डार्विन काम करता करता त्याचं हवं-नको बघायचा. नंतरच्या काळात त्याच्या लाडक्‍या मुलीचं निधन झालं. तिचं जाणं हा डार्विनच्या मनावर झालेला खोल घाव होता; पण त्यानं तो खचला नाही. दुप्पट काम करून ते सगळं दुःख त्यानं अक्षरशः कामात बुडवलंच. त्याची सगळी पुस्तकं ही त्यानंतरच्या काळातली.

तो निबंध वाचला गेल्यावर मात्र डार्विननं वर्षभरातच पुस्तक लिहिलं. खरं तर त्याला ते खूप सविस्तर, अनेक खंडांत लिहायचं होतं; पण आता थांबून चालणार नव्हतं. सूत्ररूपानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव "ओरिजिन ऑफ स्पेसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्‍शन' असं लांबलचक असलं, तरी ते "ओरिजिन ऑफ स्पेसीज' या नावानं ओळखलं जातं. "जॉन मरे'नं ते प्रसिद्ध केलं. काही दिवसांतच त्याची आवृत्ती संपली. जगभरात अनेक भाषांत भाषांतरं झाली. आजही ते पुस्तक जगभर, पुस्तकांच्या दुकानातील रॅकवर हजर आहे. त्या पुस्तकानं प्रचंड खळबळ माजली. नुसती वैज्ञानिक जगातच नव्हे; तर सर्वसामान्य लोकांमध्येही त्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या खपू लागल्या.

धार्मिक मतांच्या लोकांमध्ये विरोधही वाढत होता. ही सगळी सृष्टी देवानं सहा दिवसांत निर्माण केली. एकदा केली, ती तशीच राहिली. या मताला क्रिएशनिस्ट "भूमिका' म्हणायचे. या क्रिएशनिस्टांचा एक म्होरक्‍या होता. बिशप सॅम्युअल बिल्बरफोर्स. हा प्रतिपक्षाचा उपहास करीत भंबेरी उडवायचा, अशी त्याची प्रसिद्धी. त्याला "सोपी सॅम' हे लोकप्रिय नाव होतं. त्या सगळ्या विरोधकांनी विद्यापीठात चर्चा आयोजित केली. डार्विन कधी सभेत बोलायला जात नसे; पण सगळीकडं त्याचा मित्र टी. एच. हक्‍सले जात असे; आणि डार्विनची बाजू जोरदार मांडत असे. ते इतकं प्रभावी, की लोक त्याला डार्विनचा कुत्रा (बुलडॉग) म्हणत. तर या वादविवादाला तो जाणार होता. सॅम जरी वैज्ञानिक नसला, तरी रिचर्ड ओवेन या विरोधक वैज्ञानिकानं सॅमची तयारी करून घेतली. सभेला प्रचंड गर्दी. अनेक जण उभे; पण सॅमला पद्धतशीरपणे डार्विनची मतं खोडता आली नाहीत. त्यानं उपहासाचा आश्रय घेतला. हक्‍सलेकडे पाहून म्हणाला, "तुमचे पूर्वज माकड, हे आईकडून की वडलांकडून?' हक्‍सलेनं आपल्या भाषणात आधी डार्विनच्या मताचं पद्धतशीर समर्थन करून शेवटी म्हणाला, ""अशी बेजबाबदार विधानं करणाऱ्या मठ्ठ माणसापेक्षा माकड पूर्वज असलेलं पत्करीन.'' सभेत गोंधळ उडाला. हक्‍सलेनं सभा जिंकलीच.

वास्तविक डार्विननं कधीही म्हटलं नव्हतं, की माकड आपले पूर्वज म्हणून. त्या पुस्तकात तर माणसाचा असा उल्लेख वा चर्चा नाहीच; पण या लोकांनीच त्याला हे स्वरूप दिलं. पुढच्या लिखाणात आलेलं त्याचं मत म्हणजे माकड आणि माणूस यांचा पूर्वज एक आहे. आता तर चिम्पान्झींमध्ये आणि आपल्यामध्ये पंचाण्णव टक्के की किती जीन्स समान असल्याचं संशोधन आलंय. म्हणजे आपण उत्क्रांतीमधली भावंडं आहोत. तरी त्या वेळी माकडाचं शरीर आणि डार्विनचं तोंड अशी कितीतरी व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली. डार्विन म्हणत होता, उत्क्रांती सरळ रेषेत नाही झाली; तर फांद्या फुटत झाली. शिवाय "बळी तो कान पिळी' या अर्थाचं तो कधी म्हणालेला नाही. "प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता' हेच त्याचं म्हणणं; पण "सर्वायवल ऑफ फिटेस्ट'चा खूप विपर्यास झाला. मुळात हे वाक्‍य हर्बर्ट स्पेन्सर या तत्त्ववेत्त्याचं. ते डार्विनला चिकटलंच. वंशश्रेष्ठतेच्या (हिटलर टाइपच्या) लोकांनी त्यांच्या प्रसारासाठी हे विपर्यस्त करून वापरलं. त्याला "सोशल डार्विनिझम' नाव पडलं.

पुढं हळूहळू धूळ बसत गेली. डार्विनचा सिद्धांत शास्त्रीय जगानं स्वीकारला. त्याला बळकटी देणारे पुरावे पुढं येऊ लागले. त्या सुमारास वॅग्नर नावाच्या शास्त्रज्ञाला जर्मनीतल्या डोंगरात एक जीवाश्‍म सापडला, अर्चिओटेरिक्‍स प्राण्याचा. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचे भाग आहेत आणि काही पक्ष्यांचेही. त्यामुळं सरपटणाऱ्या प्राण्यांतून पक्षी उत्क्रांत झाले, या मताला पुष्टी मिळाली. शिवाय डार्विननं मुळातच एवढे सज्जड पुरावे देऊन विधानांची इतकी भक्कम बांधणी केली होती, की मतमतांतरं बाजूला पडली आणि डार्विन यशस्वी झाला.

वॉलेस फार चांगला माणूस. त्याला डार्विनच्या यशानं अजिबात असूया वाटली नाही; उलट तो म्हणायचा, "हे संशोधन खरं तर त्याचंच. त्याच्याबरोबर माझं नाव जोडलं जाणं, हे माझं भाग्य.' त्यानं एक पुस्तक डार्विनला अर्पण केलंय. "डार्विनिझम' नावाचं एक पुस्तकही लिहिलं. किती मनाचा मोठेपणा! त्याला भडकावणारे लोक असणारच आसपास; पण तो त्यांना बधला नाही. बोटीनं तो जेव्हा परत आला, तेव्हा स्वागताला कुठंही सहसा न जाणारा डार्विन हजर होता. पाहुणा म्हणून त्याला तो घरी घेऊन गेला. असे स्वार्थरहित संबंध, निखळ मैत्री पाहिली, की धन्य वाटतं. डार्विन, वॉलेसचा निबंध आल्यावर दाबून टाकू शकला असता. स्वतःचा निबंध घाईघाईनं लिहून त्यानं सादर केला असता, तर कुणाला काय कळणार होतं? पण त्यानं वॉलेसच्या सूचनेप्रमाणं तो लायलकडं पाठवून दिला. श्रेयासाठीच्या फसवाफसवीच्या जगात हे उदाहरण किती उठून दिसतं! गांधीजींनी नातवाला मानवाच्या मोठ्या चुका (ब्लंडर्स) कुठल्या सांगितल्या. त्यांनी सांगितलेली एक महाचूक आठवतेय, "सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी' (मानवताविरहित विज्ञान). किती खरं आहे ते. डार्विन-वॉलेस संबंधांत जी व्यक्त झाली, ती "सायन्स विथ फ्रेंडशिप.' (विज्ञान-मैत्रिपूर्ण)

पुढं वॉलेसची परिस्थिती ढासळत गेली. त्यानं केलेल्या गुंतवणुकी बुडाल्या. डार्विननं ज्या केल्या, त्या गुंतवणुकी चांगल्या, सुरक्षित होत्या. अखेरपर्यंत त्या चांगलं उत्पन्न देत राहिल्या. वॉलेसनं कुठं म्युझियम की प्राणिसंग्रहालयात क्‍युरेटर म्हणून नोकरी केली; पण तीही सुटली. विपन्नावस्था आली. त्याच्याच विचारांशी तो सुसंगत राहिला नाही. प्राणी उत्क्रांत झाले; पण मानव मात्र देवानंच निर्माण केला, असं म्हणू लागला. शेवटी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून डार्विननं खूप प्रयत्न केले. त्यानं, त्याच्या मित्रांनी प्रयत्न करून, थेट राणीकडे वजन खर्च करून वॉलेसला तहहयात पेन्शन मिळवून दिली. डार्विनपेक्षा तो चौदा वर्षांनी लहान, त्याच्यानंतरही तो खूप जगला. डार्विनच्या स्वभावात जराही स्वार्थ, बेफिकिरी असे दोष असते, तर त्यानं असं केलं नसतं.

मोठमोठ्या वैज्ञानिकांची, लेखकांची, कलावंतांची आयुष्यं पाहिली की दिसतं, त्यांच्या क्षेत्रात ते फार मोठे आहेत; पण वैयक्तिक आयुष्यात तितके मोठे नाहीत. काही अनुचित स्पर्धा करणारे, काही आणखी काही. त्या क्षेत्रातल्या मोठ्या कामाचा त्यांच्या मनावर का परिणाम होत नाही? अनेक मोठे कलावंत तर इतके क्षुद्र वागताना पाहिलेत, की आश्‍चर्य वाटतं. ज्यांना असा भव्यतेचा साक्षात्कार होतो, त्यानं त्याचं जीवन अंतर्बाह्य उजळून का जात नाही? मनं अधिक समंजस, उदार का होत नाहीत? ज्यांच्यात दोन्ही आहे, म्हणजे त्यांच्या क्षेत्रातलं डोंगराएवढं काम; आणि त्यांचा सरळ, निष्कपट, उदार स्वभाव, असे दुर्मिळ. डार्विन हा त्यातला. म्हणून मला तो इतका भावला. काही काळ त्याचंच वेड लागलं. अजून डार्विन आणि त्याची उत्क्रांती डोक्‍यावरून उतरतच नाही. एव्हाना डार्विनच्या आयुष्याबद्दल बऱ्यापैकी माहीत झालंय; पण उत्क्रांतीची भुरळ वाढतच आहे.

डार्विननं जे शोधलं, त्यातून संशोधनं बरीच पुढं गेलीत. खूप गोष्टी समजल्यात. पहिला जीव कसा जन्मला, हा डार्विनचा विषय नाही; पण त्यानंतर उत्क्रांती कशी होते, हे तो शोधत राहिला. पहिली पेशी किंवा जीव पाण्यात; त्यातही समुद्रात तयार झाला, यावर शास्त्रज्ञांचं एकमत आहे. तो कसा जन्मला हे माहीत करून घ्यायची अखंड धडपड सुरू आहे; पण आता ते बाजूला ठेवू. उत्क्रांतीमध्ये आपल्याला रस.

पहिला जीव अर्थात एकपेशीय असणार. त्याचं विभाजन होऊन दोन पेशी, दोनाचे चार, चाराचे आठ. जसे आज अमीबाचे होते. आपण पाहू शकतो तसं. पुढं या विभाजनात अधूनमधून "फरक' पडला किंवा चुका झाल्या. त्यातनं जीवांची विविधता बॅक्‍टेरियांचं युग आलं. त्यातला एक प्रकारचा बॅक्‍टेरिया, की सायनो बॅक्‍टेरिया, काय बुवा याचं महत्त्व! अहो, क्‍लोरोफिल झालं त्याच्या शरीरात. मग काय पृथ्वीवर प्रथमच अन्न तयार झालं. ऑक्‍सिजन सुटा झाला. त्याचं प्रमाण वाढलं. या सायनोनं आपल्याला प्राणच दिला जसा. लोक देवादिकांच्या, थोर व्यक्तींच्या तसबिरी घरात लावतात. आपण या प्राणवायू, अन्नदात्या सायनोचे फोटो का लावत नाही?

तर या सायनोपासून वनस्पतींचं जग सुरू झालं. त्याआधी सगळं एकच. फक्त जीव. समुद्रात पेशीला पेशी जोडलेलं शेवाळ तयार झालं. डबीच्या आकाराचे सूक्ष्म प्लॅंक्‍टन तयार झाले. आज जो प्राणवायू हवेत आहे, तो बराच या प्लॅंक्‍टनमुळे आहे. (याचाही फोटो लावायचा?) शेवाळ किनाऱ्यावर जाऊन पडायला लागलं. तिथं जगायला शिकलं. जमीन धरून ठेवायला मुळांसारखे अवयव फुटले. मग खाडीतून, नदीकिनारे, मग जमिनीवर. आता ते ताठ उभं राहू लागलं. पूर्वी पानं नव्हती. नुसत्या हिरव्या नळकांड्या. "चुकां'मधून काही टोकाला चपट्या झाल्या. त्यांना जास्त सूर्यप्रकाश मिळाला. ते जास्त जगले. वंश वाढला. मग पानं निर्माण झाली. मग फर्न ऊर्फ नेचे, त्यांची भुकटीसारखी स्पोअर्स वाऱ्यावर उडून रुजू लागली. जंगलं तयार झाली. नंतर कठीण आवरणाच्या बिया (खूप वर्षं जिवंत राहू शकणाऱ्या) तयार झाल्या. मग सूचिपर्णी वृक्ष (देवदार, सुरू वगैरे) तयार झाले. त्यातनं काही पानांना अचानक रंग आले. त्याकडं कीटक आकर्षित व्हायला लागले. मग आता फुलांचा जमाना. कीटक परागकणच खायला लागले, म्हणून फुलं तळात मधुरस ठेवू लागली. आणखी उत्क्रांती. आता कोण? तर कुठंही येणारं, प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारं गवत. ज्या गहू-ज्वारी-तांदळावर आपण जगतो ते गवत.

कीटकांवरून आठवलं, डार्विनला या प्रवासात एका अरण्यात एक ऑर्किडचं फूल मिळालं. त्यानं मधुरस ठेवायला एक खोल नळी होती. किती खोल? तर एक फूट. कोण कीटक, कसा जाणार फूटभर खाली ठेवलेला मधुरस चाखायला? आई जसा लाडवाचा डबा उचलून फळीवर ठेवते तसा, पोरांपासून लाडू वाचवायला; पण ते फूल पाहताच डार्विन म्हणाला, ""हे इतक्‍या लांब ज्यांची जीभ पोचू शकते असा कीटक अस्तित्वात असलाच पाहिजे. पुढे डार्विननंतर चाळीस वर्षांनी कुणा अभ्यासकाला तो कीटक सापडला. तो त्याची भली लांब जीभ गुंडाळून तोंडात ठेवत असे. बोला! ते फूल आणि तो कीटक जसे एकमेकांसाठीच जन्मले. फुलं नष्ट झाली, तर कीटक मरेल; आणि कीटक संपले तर ती वनस्पती संपेल. इतकं तोलूनमापून दोरीवर चालल्यासारखं अस्तित्व.

प्राण्यांमधली उत्क्रांती अशीच टप्प्याटप्प्यांनी. बरेच टप्पे पाण्यातच पार पडले. एकपेशीय ते पाठीचा कणा असलेल्या माशांपर्यंत. मधे जेली फिश आले, शंख-शिंपले आले. ऑक्‍टोपस आले. कासवं आली. सरपटणाऱ्या प्राण्यांची सुरवात पाण्यातच. सुसरी-मगरी. फक्त देवमासा हा सस्तन प्राणी म्हणजे जमिनीवरचा हिप्पोसदृश प्राणी पाण्याकडे परत आलेला.

लाटांबरोबर अनेक जलचर किनाऱ्यावर येऊन पडत. दुसरी लाट येईपर्यंत ते तग धरू लागले. कुणी सुरक्षित म्हणून किनाऱ्यावर अंडी घालू लागले, कुणी भक्षकांपासून बचाव करण्यासाठी किनाऱ्याचा उपयोग करू लागले. मासे आपल्या "फिन्स'चा उपयोग पुढं सरकण्यासाठी करू लागले. त्यांचे पायात रूपांतर होऊन बेडकासारखे उभयचर प्राणी तयार झाले. सरपटणाऱ्यांमधून जमिनीवरचे सरडे तयार झाले. साप आले. डायनासॉर त्यांतलेच. सरपटणाऱ्यांच्या पुढच्या पायांचे झाले पंख; आणि त्यातून निघाले पक्षी. पंख या गोष्टीचं विलक्षण आश्‍चर्य वाटतं. जसं वनस्पतींमधल्या पानांचं. पंखांचं मटेरिअल किती हलक्‍या वजनाचं; पण किती ताकदीचं! पोकळ नळ्या, पिसांचे केसही पोकळ. उघडले, की मोठ्या ताकदीनं उडत राहणारं. किती? हजारो मैल. एवढासा पक्षी आणि त्याचे एवढेसे पंख.

पक्षी वाटावा, असा एक प्रकार डायनासॉरमध्येही होता. सह्याद्रीमध्ये उडणारे सरडे आहेत. त्यांना पंख नाहीत; पण बरगडीनं त्वचा ताणून ग्लाईड करत ते खाली येऊ शकतात. पक्ष्यांचे हे निसर्गातले प्रयोगच म्हणायचे. एक तर सस्तन प्राणीही उडतो. आपले वटवाघूळ हो. उत्क्रांती फांद्याफांद्यांनी कशी वाढते बघा. कधी उड्या घेते, झेप घेते; कधी मागही फिरते.

अरेच्चा, खेकडे राहिलेच की. आपला कणा पाठीच्या आत; तर भोवतीचं कठीण कवच हाच त्यांचा कणा. मग विंचू आले. कोळी आले. हे सगळे आठ पायांचे प्राणी. पायाचे भाग झाले, त्यांना जोडणारे सांधे आले. आता हालचाल जास्त सोयीची. मग सहा पायांचे कीटक. ते तर भले मोठे विश्‍व. जमिनीवरच्या सजीवांत ऐंशी टक्के संख्या. ऍटमबॉंबला पुरून उरलेले. ते जगभर पसरलेले आहेत. माणसांनी त्यांच्यापुढं हात टेकले आहेत. उगाच कुणी गर्व करू नये, आपल्या बुद्धिमत्तेचा. बापू सांगतो, पृथ्वीच्या जन्मापासून गेल्या ४५० कोटी वर्षांचा आलेख बारा महिन्यांच्या स्केलमध्ये काढला, तर पहिला जीव जन्मला ऑगस्टमध्ये. बाकी सगळे नंतर. माणूस तर डिसेंबरात, तेही शेवटच्या दिवशी. तेही शेवटच्या पंधरा मिनिटांत. हे स्केल पुस्तकात पाहिले, तर इतर प्राणी, पक्षी, कीटकही फार आधीचे नाहीत. नोव्हेंबरात जन्मलेले; पण काळाच्या हिशेबाने तीसेक कोटी वर्षं आधी जन्मलेले. एका दिवसाला एक कोटी हे आपलं स्केल. आपले ते थोरले भाऊ आणि बहिणीच.

पण माणूस कसा उत्क्रांत झाला? एक तर तो दोन पायांवर चालायला लागला. त्याचे हात वळू शकले. त्याची बोटं सुटी झाली. अंगठा वेगळा झाला. तो अंगठा चार बोटांच्या समोर आणता येऊ लागला. त्यामुळं वस्तू पकडून स्वतःकडं वळवून तो पाहू लागला. निरीक्षण वाढलं. मेंदूची वाढ सुरू झाली. दोन पायांवर चालू लागल्यावर स्वरयंत्र काही इंच खाली आलं. जास्त आवाज काढण्याची क्षमता आली. भाषा तयार झाली. मेंदूला नव्या गोष्टी सुचू लागल्या. जमू लागल्या. मग काय प्रगतीच प्रगती! इतका प्रगत मेंदू, इतकी निर्मितिक्षमता, संवेदनशील मन मिळाल्यावर माणसानं नंदनवन निर्माण करायचं होतं; पण काय परिस्थिती झाली ती पाहतोच आहोत.

थांबा, माझ्या गुरूंविषयी सांगायचं राहिलंच की. वनस्पतिशास्त्रात बुडलेले प्रा. श्री. द. महाजन ऊर्फ आमचा बापू. कुठलाही प्रश्‍न पडला, की आपण पुस्तक शोधू, त्याऐवजी मी बापूचं दार ठोठावतो; आणि ज्ञानात आंघोळ करून बाहेर येतो. प्राणी, कीटक वगैरे बाबतीत कुतूहल निर्माण झालं, की लावतो फोन आमच्या शाळासोबती रघुनाथला, म्हणजे डॉ. रघुनाथ डुंबरे. तो गावी असला, तरी काम समजून पुण्याला येतो आणि माझी तृष्णा भागवतो. वर या दोन्ही घरी चहा-नाश्‍ता होतोच. माधव गाडगीळ, नंदा खरे, अनिल गोरे यांसारख्या सुहृदांनाही भंडावून सोडतो.

तर माणसाकडे परत येऊ आपण.

***
डार्विनचं एक वाक्‍य म्हणजे त्याच्या म्हणण्याचं सार आहेः "एखादी प्रजाती स्ट्रॉंग आहे, बळकट आहे, म्हणून ती टिकेल असं नाही. एखादी बुद्धीनं हुशार आहे, म्हणून ती जगेल असंही नाही; तर ती जर परिस्थितीशी जुळवून घेणारी ऍडॅप्टेबल असेल तरच ती जगते. जास्त ताकदवान की कमी, हा निसर्गात प्रश्‍न नसतो. तुम्ही जगू शकता की नाही हे महत्त्वाचं, माणसानं बोध घ्यावा असं हे वाक्‍य. दादागिरी जास्त टिकणार नाही, उगाच डोकं चालवून, डावपेच आखणाऱ्यांची ही सद्दी फार काळ राहत नाही; बदललेल्या परिस्थितीविषयी तक्रार न करता "जे जुळवून घेतात, ते जास्त टिकतात', डार्विनचं ते विधान प्रजातींना उद्देशून असलं, तरी आपण या निमित्तानं आपल्याकडं बघू या की. गरिबी आली, दुष्काळ आले, तक्रार करीत बसणारे आणि हातपाय गाळणारेही संपून जातात. ती परिस्थिती स्वीकारून जे कामाला लागतात, जुळवून घेतात, ते टिकतात.

उत्क्रांतीच्या प्रवासात सहकार्यालाही खूप महत्त्व आहे. मुंगी, मधमाशी का टिकली? तर परस्परसहकार्य हे उत्तर आहे. अनेक प्रजाती समूहानं राहणाऱ्या आहेत. हत्तींचे कळप, हरणांचे कळप; तसे माणसांचेही कळप. हे कळप परस्पर-सहकार्याशिवाय कसे टिकतील? शिवाय कित्येकदा प्राणी पुढे जाऊन दुसऱ्या प्रजातींना मदत करतात, याचीही अनेक उदाहरणं. वाघ निघाला, की माकडे ओरडू लागतात. खरं तर असं करून ते स्वतःचा जीव धोक्‍यात घालतात; पण तरीही इतरांसाठी ते हे करतात. तेच भक्षक येताना दिसला, की पक्षी कलकलाट करतात. म्हणून जगण्यासाठी, अन्नासाठी स्पर्धा तर करावीच लागते प्रत्येक जिवाला; पण सहकार्य करून अन्न मिळवलं, सहकार्य करून जमातीचं संरक्षण केलं तर? मग हा तर जगण्याचा अधिक उत्क्रांत मार्ग. म्हणजे दोन रस्ते मिळाले. एक म्हणजे अनुरूप व्हायचा, थोडक्‍यात अंथरूण पाहून पाय पसरायचा. दुसरा हातात हात घालून चालायचा. माणसांसाठी डार्विननं किती मोलाची जगायची रीत सांगितलीय. घेऊ यात का त्याच्याकडनं काही?

आपल्या मठीत वर्षानुवर्षं कोंडून घेऊन डार्विननं जगाला काय काय दिलंय! विज्ञानानं तर झेपच घेतली जशी. अवकाशाचं संशोधन करणारा कॅनडातला एक शास्त्रज्ञ म्हणतो, "मी माझ्या शास्त्रात संशोधन करताना डार्विनच्या पद्धतीनं विचार करायचो- माझ्या अडचणी दूरच व्हायच्या' कुणा रशियन शास्त्रज्ञानं म्हटलं, की जीवशास्त्राच्या कुठल्याही शाखेत जा, डार्विनच्या उत्क्रांतीचा संदर्भ घेतल्याशिवाय आपण पुढंच जाऊ शकत नाही. "सायंटिफिक अमेरिकन' या विज्ञानाच्या मासिकात चित्र होतं, एका पुस्तकरूपी दगडांच्या कमानीचं. कमानीच्या बरोब्बर मधे सगळी कमान तोलून धरणारा, एका बाजूनं जास्त रुंद असणारा एक की-स्टोन असतो, ते म्हणजे डार्विनचे पुस्तक. कमानीचे खालचे इतर दगड म्हणजे वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, कीटकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र इत्यादी. मधला दगड सगळ्यांत महत्त्वाचा.

डार्विनवर लिहिताना एका वैज्ञानिक मासिकानं लिहिलंय, ते किती खरं आहे. "आजवर जगाला वळण देणारे न्यूटन, आइन्स्टाईन, फ्रॉईडसारखे खूप शास्त्रज्ञ झाले; पण त्यांच्या संशोधनावर नंतर बरेच आक्षेप आले. नंतर आलेल्या संशोधनानं त्यांच्या मांडणीतला काही भाग अप्रस्तुत ठरला. असं बरंच झालं; पण डार्विनच असा, की त्याची "नॅचरल सिलेक्‍शन'ची कल्पना जशीच्या तशी टिकून राहिलीय. नंतर आलेल्या संशोधनामुळे उलट त्याच्या विचारांना पुष्टीच मिळालीय. म्हणून तो आपला सगळ्यांचा बाप. त्या वेळी साधनं किती कमी होती. कॅमेरा नव्हता, हे आधी आलंय. मायक्रोस्कोप अगदी प्राथमिक अवस्थेतला. त्याचा फोटो पाहिला, तर साधी एकाखाली एक अशी दोन भिंगं, तीही बाजूनं उघडी. नंतर खूप चांगले मायक्रोस्कोप आले. त्याही पुढं इलेक्‍ट्रॉन मायक्रोस्कोप, आता तर त्याही पुढचं काही. त्या वेळी पेशीमधला केंद्रक (न्युक्‍लिअस) दिसत होता. तो पुनरुत्पादनाच्या काळात "ऍक्‍टिव' होतानाही दिसायचा, त्याचा आकार वाढायचा; पण तेवढंच. आतमध्ये डी.एन.ए. आहे, त्यावर जीन्स ऊर्फ जनुके आहेत, हे काही माहीत नव्हतं. मेंडेलच्या प्रयोगानं अनेक दारं खुली झाली. डी.एन.ए.चा शोध तर १९५३ चा. त्यानंतर जेनेटिक्‍सची झपाट्यानं प्रगती. आता तर प्रत्येक प्राण्याचे जीनचे आराखडे तयार आहेत. नको असलेला सदोष जीन काढता येतो. डार्विनच्या काळी हे काही नव्हतं; पण त्या डोळ्यांनी निरीक्षण करणाऱ्या आणि डोकं चालवणाऱ्या (साधं नव्हे हो, याला लॅटरल थिंकिंग लागतं!) डार्विननं असं काही करून दाखवलंय, की देखते रहना! पण जनुकांनी सिद्ध काय केलं? तर डार्विन म्हणतो तेच. जीन्सची आतली गडबड विलक्षण आहे. ते अजब शास्त्र आहे; पण शेवटी काय? पुनरुत्पादनात "चूक' किंवा फरक होतो; आणि पुढं डार्विन म्हणतो तसंच. तेव्हा तसंच; आणि आजही तेच. हा खरा संशोधक.'
तो साधनांशिवाय अडून नाही बसत. आधीच्या पिढीतलं शेडमध्ये कित्येक महत्त्वाचे शोध लावणारे संशोधक कुठं आणि आजचे कुठं! आजच्यासारख्या तेव्हा कुठं होत्या सक्षम प्रयोगशाळा? कुठं होते त्यांना आजच्यासारखे गलेलठ्ठ पगार? आत्ताचे बरेच संशोधक कंपनीचे नोकर, त्यांचा अभ्यास कंपनीच्या हितासाठी. त्या वेळेच्या शास्त्रज्ञांसारखे हे चंद्र-सूर्य शोधायला किंवा सृष्टीचं मूळ पाहायला निघालेले खुळे शास्त्रज्ञ नाहीत. नशीब, आज तुरळक का होईना; पण त्या शास्त्रज्ञांचे वंशज मौजूद आहेत तरी.

"ओरिजिन'नंतर डार्विन एकदम "सेलिब्रिटी' होऊन गेला. एखादा आपल्यासारखा त्या लाटेवर वाहत राहिला असता. आता काय, एवढं यश मिळालंय; काम, कष्ट, सगळं संपल्यात जमा. सेलिब्रिटी म्हणजे वलयांकित जीवन. तुम्ही सार्वजनिक पार्ट्या, कार्यक्रम यांना उपस्थित राहायचं. पत्रकारांचा गराडा, कॅमेऱ्याच्या क्‍लिकक्‍लिकाट. (हो डार्विनच्या उत्तरायुष्यात कॅमेरे आले होते.) वेगवेगळ्या विद्यापीठांची ऍवॉर्ड स्वीकारणं.... इत्यादी, आता उरलो उद्‌घाटनापुरता ! डार्विननं यांतलं काही म्हणता काही केलं नाही. परत तसाच काटेकोर अभ्यास सुरू. "ओरिजिन'वरच्या चर्चेत जे आक्षेप आले होते, त्याला सविस्तर सप्रमाण उत्तरं द्यायची होती. "ओरिजिन'मध्ये माणसाच्या उत्क्रांतीवर काही नव्हतं. त्यावर त्यानं "डिसेंट ऑफ मॅन' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. तो ग्रंथही आधीच्या ग्रंथानंतर अकरा वर्षांनी प्रसिद्ध झाला. माणूस आणि प्राणी यांच्या भावनिक अभिव्यक्तीवर आणखी एक पुस्तक लिहिलं. प्राण्यांच्या वर्तनावर लिहिलं गेलेलं ते पहिलंच पुस्तक. वनस्पतींचा अभ्यास करायला त्यानं ग्रीन हाऊस उभारलं होतं. तिथं तो प्रयोग करीत असे. त्यावर त्याची पुस्तकं आहेत: "कीटकभक्षक वनस्पती', आणि "झाडांवर चढणाऱ्या वेलींच्या हालचाली, सवयीं.'

या कुठल्या शास्त्रांचं शिक्षण नसलेला हा माणूस. सगळ्या शिक्षण-व्यवस्थेला डार्विननं आरसा दाखवला आहे. खरोखर मुलाला आपण शिकवतो का; जे शिकवतो ते त्याच्या जीवनात कितपत प्रस्तुत आहे; ज्याला शिकवतो, त्याची काही आवडनिवड, कल असतो का; आणि तो पाहणं आवश्‍यक नाही का, असे अनेक प्रश्‍न पडले आहेत. केंब्रिज, ऑक्‍सफर्ड ही तर जगप्रसिद्ध विद्यापीठं. तिथल्या कित्येक प्रशिक्षितांनी डार्विनला पातळी सोडून विरोध केला. दुसऱ्याच्या विचारांना समजून घ्यावं. मग आपली मतं मांडावी, देवाणघेवाण करावी, ही संस्कृती त्यांच्या विद्यापीठानं त्यांना शिकवली नव्हती का? चर्चबद्दलही तसंच. करुणेनं ओतप्रोत भरलेला, लोकांसाठी प्राण देणारा आणि मारणाऱ्यांनाही क्षमा करणारा ख्रिस्त शिकवणार, की धर्माचं पुस्तकी शिक्षण देणार? दीनदुबळ्यांची सेवा करणं महत्त्वाचं, की भरजरी कपडे घालून मिरवणं महत्त्वाचं?

डार्विन नशीबवान म्हणून वादविवादावर निभावलं, त्याआधी कोपर्निकसचा शिष्य वैज्ञानिक ब्रूनो याला जिवंत जाळलं हो. काय गुन्हा होता? तर सूर्याभोवती पृथ्वी फिरतेय याचा पुनरुच्चार केला म्हणून. हंगेरीत कास्परवूल्फ नावाचा संशोधक होता. त्यानं संशोधन केलं ते वीर्यातले शुक्रजंतू आणि स्त्रियांमधल्या बीजांडांचं. पूर्वी समजत होते, या प्रत्येकात एक जीव असतोच; फक्त देवाच्या इच्छेनं, कृपेनं त्यातला एखादा जन्म घेतो; बाकी अपयशी ठरतात. कास्परवूल्फनं दाखवलं- असं नाही; शुक्रजंतू आणि बीजांड जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जिवाचा गर्भ तयार होतो. यात देवाच्या इच्छेचा, कृपेचा प्रश्‍न येत नाही. झालं. लोकांनी त्याच्यावर, त्याच्या घरावर हल्ला केला. कसाबसा निसटला. इंग्लंडमध्ये आला. हे असं का व्हावं? धर्मानं लोकांना चांगल्या जीवनाकडं वळवावं, हे त्यांचं काम. सृष्टीचा इतिहास लिहिणं, संशोधन करणं, हे काम वैज्ञानिकांना करू द्यावं.
डार्विननं किती संयम पाळलाय. धर्माविषयी अपशब्द नाही. त्याचं कुठंकुठं धर्मग्रंथातल्या विधानांवर भाष्य आहे; पण तेही सौम्य भाषेत. त्यानं वैज्ञानिक विधानं केली. त्यामागं पुराव्यांचे पर्वत उभे केले. कसलाही बेजबाबदारपणा नाही. तो नास्तिक होता का? त्याचं एक वाक्‍य आहे- जीवाच्या उत्पत्तीचं कोडं जोवर सुटलेलं नाही, तोवर मी "ऍग्नॉस्टिक' राहणं पसंत करीन. म्हणजे देव नाहीच म्हणण्याऐवजी, "मला माहीत नाही, असूही शकेल, नसूही शकेल.' देव नाही म्हणायलाही पुराव्यानं सिद्ध करायला हवं ना, डार्विन ते कसं म्हणेल? तो तर हाडाचा संशोधक.

धर्माच्या आग्रही लोकांची संख्या आजही केवढी आहे. या सगळ्याला दीडशे वर्षं झाली. विज्ञानानं, सर्व जगानं डार्विनची उत्क्रांती स्वीकारली. तरी सर्वांत प्रगत म्हणतो, त्या अमेरिकेत कॅन्सससारख्या काही राज्यांत शाळांमध्ये उत्क्रांती शिकवायची बंदी आहे. टेक्‍सासमध्येही आहे, असं ऐकलंय. तिथली मुलं अजूनही "जेनेसिस'मधलं देवानं सहा दिवसांत सृष्टी तयार केली असं शिकतात. आपल्याकडे सामाजिक बाबतीत हवं तेवढं क्रौर्य आहे. खालच्या जातींची गुलामी, ते चितेत ढकलणाऱ्या सतीपर्यंत; पण ज्ञानाच्या क्षेत्रात तेवढं क्रौर्य नाही. विरोधी मतांचा परंपरेत काहीसा स्वीकार आहेच. दशावतारातले मत्स्य, कच्छ, वराह हे आपण ऐकत आलोय. मत्स्यनंतर त्यांनी बेडूक घातला असता तर? या मंडुकाच्या नावानं एक उपनिषद आहे. तो सर्वांचा माहितीचा प्राणी. पुढं कच्छ म्हणजे कासवं. त्यात सरपटणारे प्राणी आले. मग त्यातून तयार झालेले पक्षी आले असते तर? म्हणजे जगात आपण कॉलर ताठ करून वावरलो असतो. आपल्या संस्कृतीचं एक बरं आहे- तिथं विरोधी मतवाल्यांनाही सामावून घेतलं जातं. अगदी देव नाही म्हणणाऱ्या सांख्य दर्शनालाही; आणि त्या परंपरेतल्या चार्वाकालाही. इथं त्याला कुणी जाळून नाही मारलं, त्याची कुचेष्टा केली. गैरसमज पसरवले. आपल्याकडं शस्त्र आहे बहिष्काराचं. जाळून मारत नाहीत; पण जगणं अशक्‍य करून टाकणार. ज्ञानदेव आणि भावंडांवर बहिष्कार, एकनाथांवर बहिष्कार. देशोदेशीच्या धर्ममार्तंडांना, उच्चवर्गीयांना नव्या विचाराची अशी भीती का वाटावी? त्यांच्याशी वादविवाद करावेत. विचारांची देवाणघेवाण करावी आणि पुढं चालावं; त्याऐवजी नवा विचार दडपून टाकणं, हाच मार्ग त्यांनी निवडावा? नवा विचार आणणाऱ्याला या उपेक्षा ते हिंसा अशा जाळातून जावं का लागावं? की या उच्च लोकांना भीती वाटते का, की या एकविचारानं आपलं आसन डळमळीत होईल एवढी धर्मसत्ता त्यांच्याकडं आहे, राजे-सरदारांकडं त्यांचं भलं मोठं सैन्य आहे. त्या सगळ्यांपुढं तर ही माणसं किरकोळ होती. तरीही? मग त्यांचा पायाच भुसभुशीत आहे की काय? वर एवढे इमले बांधले, तरी पाया कच्चाच. ख्रिस्त असता, तर असं नसतं म्हणाला. त्याला सुळावर चढवणाऱ्यांनाही त्यानं क्षमा केली, मग या सगळ्या धर्मांचं पुढं असं का होतं? ज्ञानोबा, एकनाथ, तुकाराम यांना छळणाऱ्यांत हे धर्ममार्तंडच का पुढं असतात? वास्तविक, करुणा हा आपल्या मनाचा नैसर्गिक स्थायीभाव. तो असा सतत दडपून का टाकला जातो? डार्विन, कबीर, ज्ञानोबा, सॉक्रेटिस... ही सगळी सुसंस्कृत माणसं होती. आपलं म्हणणं मांडलं आणि शांत राहिली. उच्च वर्गीयांनी, वर्णीयांनी दिलेले चटके शांतपणे सोसले.
पण ज्ञानाची काय ताकद असते बघा ! "कितना भी हो घना अंधेरा, भागत है जब देखे ज्योत' एका ज्योतीला एवढ्या मोठ्या अंधारानं घाबरावं? आणि जर हा विचार असा, की वावटळी उठल्या तरी ज्योत शाबूत राहते. डार्विनसारख्या बुजऱ्या, मितभाषी माणसाच्या एका पुस्तकानं तर भूकंप होऊन अशी पडझड झाली, की त्यातून पुढची वाटच दिसू लागली. अनेक शास्त्रांचे चेहरेमोहरे बदलले, अनेक नव्या शास्त्रांचा उगम झाला. त्यानं विजयाची आरोळी मारली नाही, की जिंकल्यावर खेळाडू नाचतात, तसा नाचला नाही. तो तसंच त्याच्या मठीत काम करीत राहिला. त्याचं एक वाक्‍य आहे- "जो आपल्या जीवनातला एक तास फुकट घालवतो, त्याला आयुष्याची किंमतच कळली नाही.' आपण आपल्याकडं बघावं म्हणजे झालं. त्या दाढीवाल्या, कृश डार्विनकडून शिकावं तेवढं थोडं.
एक घटना वाचल्याचं आठवतं. १८४४ मध्ये, म्हणजे "ओरिजिन' प्रसिद्ध व्हायच्या आधी सोळा, की अठरा वर्षं डार्विननं या सगळ्या संशोधनाचा जवळपास दोनशे पानी आराखडा लिहिला. पत्नीला पत्र लिहिलं, "मला मधल्या काळात मृत्यू आला, तर हे लिखाण प्रसिद्ध कर' आणि त्यासाठी चारशे पौंड ठेवून ते पाकीट बंद करून ठेवून दिलं. त्याचं हस्तलिखित एमा काय प्रसिद्ध करणार नव्हती? पण तिला तीही काळजी नको. हा चांगुलपणा. स्वतःच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या खर्चाकरिता उशीखाली पैसे ठेवून शांतपणे जीवन संपवणारे आपले आगरकर आठवले. काय ही सज्जन माणसांची जात! सगळे का नाही झाले असे यांच्यासारखे उत्क्रांत? प्रश्‍नच पडला आहे.
डार्विन क्षीण होत चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन पावला. इंग्लंडच्या राणीनं त्याचं शव पुरण्यास वेस्ट मिन्स्टर ऍबेमध्ये जागा दिली. हा मोठा सन्मान समजला जातो. तिथं एक तर राजघराण्यातले लोक किंवा असे लोकोत्तर कर्तृत्वाचे कोणी यांच्या कबरी आहेत. न्यूटनची कबरही तिथंच आहे. त्याची शवपेटी त्याच्या मित्रांनी उचलली. हूकर, हक्‍सले आणि वॉलेस त्यांत होते. मृत्यूपूर्वी लिहिलेलं त्याचं एक वाक्‍य प्रसिद्ध आहे- "मी अनेक चुका, घोडचुकाही केल्या; पण त्या दुरुस्त करण्यासाठी एखादा माणूस प्रयत्नांची जेवढी शर्थ करू शकेल, तेवढी मी केली.' ज्यानं जगाची चूक दुरुस्त केली, त्याचं हे वाक्‍य. तो असा माळी, जमीन खुरपून असा वृक्ष लावला, की त्याला अनेक ज्ञानशाखा फुटल्या. त्यानं दिलासा दिला, की आतून आलेल्या प्रेरणेच्या मागं गेलं, की बाकी कशाची गरज नसते. त्यानं हे शिकवलं, की विज्ञानात नुसती कल्पना सुचणं महत्त्वाचं नसतं, तर त्यानंतर कठोर परिश्रमांचा डोंगर उभा करावा लागतो. त्यानं दाखवलं, कसं जगावं, कुटुंबवत्सल राहून तुम्हाला लोकोत्तर काम करता येऊ शकतं. त्यासाठी घरादाराची राखरांगोळी करायची गरज नसते. त्यानं कधी पदवीची आस धरली नाही, की तो कधी पैशामागं लागला नाही. त्याला कसली महत्त्वाकांक्षा नव्हती, की कुणाशी स्पर्धा नव्हती. एका प्रकारे तो संतच होता की!
आणि हो, नुकतंच त्याचं एक वाक्‍य वाचलं ः "मानवी नैतिक संस्कृतीचा सर्वोच्च उत्कर्षबिंदू कुठला, तर त्याला जेव्हा प्रतीत होईल, की आपण आपल्या विचारांवर काबू ठेवला पाहिजे' या अर्थाचं ते वाक्‍य. मी चक्रावलोच. म्हणजे विचारांना अनिर्बंध वाहू देणं घातक? मग आपले सगळे संत तेच म्हणतात, की ज्ञानोबा, तुकोबा, कबीर... अगदी अलीकडच्या गाडगेबाबांपर्यंत. त्यांची वैचारिक बैठक असू द्या वेगळी; पण निष्कर्ष? तर विचारांवर नियंत्रण ठेवलं, तर मानवी संस्कृती उत्क्रांत होईल. स्वतःवर किती नियंत्रण ठेवता येतं, हे डार्विननं दाखवून दिलंच आहे, आणि संतांनी-बुद्धानं... सर्वांनीच.
मग डार्विन आजोबा, उत्क्रांती आपोआप होत असते, हे पटलंच बघा; पण संस्कृती उत्क्रांत करता येईल का, आपल्या स्वतःच्या विचारांवरच्या नियंत्रणानं? ...तर येईल, असं सांगून मोठाच दिलासा दिलात, डार्विन आजोबा.

------------------------------------------------------------

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

भारताची भ्रष्टाचारात घोडदौड.

भारताची भ्रष्टाचारात घोडदौड..
सौजन्य-सकाळ वृत्तसेवा

जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणा-या भारताने भ्रष्ट्राचाराच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने (टीआय) भ्रष्टाचाराच्या निर्देशांकानुसार विविध देशांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात भारत हा 87 व्या क्रमांकाचा भ्रष्ट देश आहे. 2009 मध्ये 84 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने भ्रष्टाचारात घोडदौड करत 87 वा क्रमांक पटकाविला आहे. या क्रमवारीत आशियातील भूतान हा देश सर्वांत कमी भ्रष्ट देश आहे.
बर्लिन येथील निमसरकारी असलेल्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संघटनेने 178 देशांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या क्रमवारीत चीन 78 व्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तान भारताहून अधिक भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत आहे. तो 143 व्या क्रमांकावर आहे.
संस्थेच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे. संघटनेने ही क्रमवारी चढत्या क्रमाने लावली आहे. याचाच अर्थ कमी क्रमांक हा कमी भ्रष्टाचार सूचित करतो. तर, अधिक क्रमांक अधिक भ्रष्टाचारा दाखवितो. क्रमवारीतील एकूण देशांपैकी तीनचतुर्थांश देशांनी शून्य ते दहा या क्रमवारीत पाचहून कमी गुण मिळविले आहे. याचाच अर्थ जगभरात भ्रष्टाचाराची समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मागील वर्षी भारताला 3.4 गुण मिळाले होते. तर, यावर्षी 3.3 गुण मिळाले आहेत. भ्रष्टाचार विरोधात कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे टीआयचे म्हणणे आहे.
याबाबत टीआयचे अध्यक्ष ह्युगेट लैबेल म्हणाले, की सध्याचे नियम आणि कायदे अधिक बळकट बनविण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्ट लोकांना आपली संपत्ती लपविण्याची कोणतीही व्यवस्था नसावी.
या क्रमवारीत सोमालिया हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय. त्यानंतर अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो. इराक चौथ्या क्रमांकावर आहे.
भूतान हा जगातील स्वच्छ म्हणजे कमीत कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर अमेरिका 22 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, सिंगापूर, न्यूझिलंड हे देशही कमी भ्रष्ट आहेत. तर सोमालिया (1.1गुण) हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय.

आद्य क्रांतिकारक

आद्य क्रांतिकारक अशी ओळख असणारे  वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात ४ नोव्हेंबर १८४५ साली झाला . फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणी तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. इंग्रज सरकारच्या रेल्वे व सैन्य अर्थ विभागात त्यांनी नोकरी पत्करली. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले.१८७६ चा दुष्काळ,प्लेगची साथ ,यामुळे त्यांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध चीड निर्माण झाली,
आजारपणामुळे  अंथरुणाला खिळलेल्या  आपल्या आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली परंतू इंग्रज अधिकार्‍याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. परंतू त्यावेळच्या सुशिक्षित लोकांची फारशी साथ फडके यांना मिळाली नाही.फडक्यांनी मग महाराष्ट्रातील रामोशी,बेरड भिल्ल आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. सावकार ,जमिनदार, श्रीमंत यांच्या घरावर  धाड टाकून शस्त्र घेणे .गरीबांना पैसे वाटणे ही कामे वेगाने सुरु झाल्याने फडके लोकप्रिय झाले. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष ते विचलीत  करत. इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा निश्चय केला. आणि त्यानुसार मेजर डॅनियेल याची खास नेमणूक करण्यात आली. सरकारने फडक्यांना पकडून देणा-याला ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरचे डोके आणून देणार्‍यास त्याहून ७५ हजाराचे मोठे इनाम जाहीर केले आणि इनामाची पत्रके शनीवारवाड्याच्या परिसरात लावली. .
कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले. व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.फडक्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना  एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे  शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तुरुंगापासून ते दूर पळाले होते. परंतू शेवटी ते सापडले  या महान देशभक्ताचा १७ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगातच मृत्यू झाला
[