रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मेहनतीला चांगले फळ आले असून त्यांनी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे यातून महिलांना उत्पन्न तर मिळलेच पण घराबाहेर न पड्णा-या या महिलांना व्यवसाय करण्याचे धाडसही अंगी आले..स्त्री शक्ती संघटित झाली तर काय होऊ शकते याचे हे जीवंत उदाहरण.
यापूर्वी फाळकेवाडीने स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम आदी पारितोषिके मिळविलेली आहेत. सरपंच सीताराम कदम यांनी, महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढे यावे या उद्देशाने प्रयत्न केले असून आर्थिक सबलीकरणासाठी बचत गटांना प्राधान्य दिले आहे.महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.अनेक बचत गट कर्ज मिळाल्यानंतर गाशा गुंडाळतात तर काही गट याचा योग्य तो विनियोग घेतांना दिसतात . फाळकेवाडीतील उज्ज्वला चव्हाण, सविता कदम, पुष्पा फाळके, उज्ज्वला कदम, सरिता चव्हाण, सुरेखा जाधव आदी महिलांनी "आदर्श महिला बचत गट' 2007 मध्ये स्थापन केला. या गटाने विन्हेरे येथील धरणाच्या कालव्यातून येणा-या पाण्याच्या ओलाव्यावर उडीद, मूग, वाल, पावटे आणि चवळी या कडधान्याची एक एकरमध्ये लागवड केली होती.कडधान्याची निगा राखण्याचे जोखमीचे काम या महिलांनी लिलया पेलले. अथक मेहनतीच्या जोरावर 300 किलो उडीद, 300 किलो मूग, 200 किलो वाल तसेच पावटे, चवळी यांचे उत्पादन या लागवडीतून त्यांना मिळाले आहे त्यातून या गटाला सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे., .प्रत्यक्ष कडधान्य काढताना आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद या महिलांच्या चेह-यावर दिसत होता. गेल्या वर्षी या महिलांनी कोबी फ्लॉवर व इतर भाजीपाला पिकविला होता. पावसाळ्यात याच जागेवर भातशेती केली जाते. त्याद्वारे 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सरकारची कर्जफेड करून गटाच्या नावे 80 हजारांहून अधिक रक्कम बचत खात्यात जमा आहे बचतगट महिलांचा जरी असला तरी वेळ्प्रसंगी पुरुषही मदतीचा हात पुढे करतात.शेतीतून मिळणा-या उत्पन्नातून महिला आपली घरची गरज प्रथम भागवतात व त्यानंतर विक्री करून बचतगटही चालवतात.
.............................