ज़रा लिहू का लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज़रा लिहू का लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ मे, २०११

आदर्श महिला


 रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मेहनतीला चांगले फळ आले असून त्यांनी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे यातून महिलांना उत्पन्न तर मिळलेच पण घराबाहेर न पड्णा-या या महिलांना व्यवसाय करण्याचे धाडसही अंगी आले..स्त्री शक्ती संघटित झाली तर काय होऊ शकते याचे हे जीवंत उदाहरण.

यापूर्वी फाळकेवाडीने स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम आदी पारितोषिके मिळविलेली आहेत. सरपंच सीताराम कदम यांनी, महिलांनी सर्व क्षेत्रांत पुढे यावे या उद्देशाने प्रयत्न केले असून आर्थिक सबलीकरणासाठी बचत गटांना प्राधान्य दिले आहे.महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.अनेक बचत गट कर्ज मिळाल्यानंतर गाशा गुंडाळतात  तर काही गट याचा योग्य तो विनियोग घेतांना दिसतात . फाळकेवाडीतील उज्ज्वला चव्हाण, सविता कदम, पुष्पा फाळके, उज्ज्वला कदम, सरिता चव्हाण, सुरेखा जाधव आदी महिलांनी "आदर्श महिला बचत गट' 2007 मध्ये स्थापन केला. या गटाने विन्हेरे येथील धरणाच्या कालव्यातून येणा-या पाण्याच्या ओलाव्यावर उडीद, मूग, वाल, पावटे आणि चवळी या कडधान्याची एक एकरमध्ये लागवड केली होती.कडधान्याची निगा राखण्याचे जोखमीचे काम या महिलांनी लिलया पेलले.  अथक मेहनतीच्या जोरावर 300 किलो उडीद, 300 किलो मूग, 200 किलो वाल तसेच पावटे, चवळी यांचे उत्पादन या लागवडीतून त्यांना मिळाले आहे त्यातून या गटाला सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे., .प्रत्यक्ष कडधान्य काढताना आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद या महिलांच्या चेह-यावर दिसत होता. गेल्या वर्षी या महिलांनी कोबी फ्लॉवर व इतर भाजीपाला पिकविला होता. पावसाळ्यात याच जागेवर भातशेती केली जाते. त्याद्वारे 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. सरकारची कर्जफेड करून गटाच्या नावे 80 हजारांहून अधिक रक्कम बचत खात्यात जमा आहे बचतगट महिलांचा जरी असला तरी वेळ्प्रसंगी पुरुषही मदतीचा हात पुढे करतात.शेतीतून मिळणा-या उत्पन्नातून महिला आपली घरची गरज प्रथम भागवतात व त्यानंतर विक्री करून बचतगटही चालवतात.
.............................

बुधवार, ५ जानेवारी, २०११

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण घटले

मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते पोलादपूर या दरम्यान 2009 या वर्षीच्या तुलनेत 2010 मध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. महामार्ग पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये एकूण 298 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 69 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 2009 मध्ये या मार्गावर 379 अपघातांमध्ये 100 जणांना प्राण गमवावे लागले होते. दोन वर्षांमध्ये या मार्गावर अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा अनेक वर्ष रेंगाळलेला विषय राहिला आहे. अपघातांच्या या आकडेवारीवरून चौपदरीकरणाची गरज लक्षात येते. अतिवेग, मद्य पिऊन वाहन चालविणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष, वाहतुकीचे नियम न पाळणे, ओव्हरटेक अशी अनेक कारणे अपघातांसाठी आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते पोलादपूर हा महामार्गाचा भाग महाड वाहतूक पोलिस विभागाकडे येतो. या दरम्यान 2010 मध्ये 298 अपघात झाले. प्राणांतिक अपघातांची संख्या 51 आहे. गंभीर अपघातांची संख्या 69 आहे, तर 57 किरकोळ अपघात या मार्गावर झाले. 31 अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व अपघातांमध्ये 436 जण जखमी झाले. इंदापूर ते पोलादपूर दरम्यान महामार्ग विभागाने अपघात क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुंदीकरण केले आहे. पांढऱ्या रंगाच्या रेडिअम पट्ट्यांचा वापर, पोलिसांकडून अपघातांच्या ठिकाणी नामनिर्देशक फलकही लावून जागृती करण्यात आली आहे. महाड येथील विसावा कॉर्नर या मृत्यूचा सापळा असलेल्या ठिकाणी रुंदीकरण, सुरक्षिततेसाठी पिंप लावणे, तसेच रेडियमचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. अशा विविध योजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. महामार्ग पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर मागील वर्षी धडक कारवाई केली. यामुळेही अपघातांवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले आहे. पोलिसांनी 7 हजार 868 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 8 लाख 9 हजार 300 रुपयांची दंडवसुली करून सरकारी तिजोरीत भर टाकली आहे.

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे
प्राथमिक शाळा


.वापरात नसलेली  बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे
विद्यार्थी
.
महाड तालुक्यातील पारवाडी-आदिवासी वाडीवरील हे चित्र ..असे चित्र असल्यावर शाळेला चाललो आम्ही असे मुले आवडीने म्हणतील का ?.पारवाडी-आदिवासी वाडी येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत.येथील विद्यार्थ्यांची नावे पारवाडी येथील शाळेत दाखल करण्यात आली होती.परंतु ही शाळा या लहान विद्यार्थ्यांसाठी दूर असल्यांने आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेत गळती होत असे,शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी या साठी जिल्हापरिषदेने पारवाडी-आदिवासी वाडीवर नवी शाळा सुरु केली.
दरवाज्यावर लिहिलेले शाळेचे नाव  


पहिली-दुसरीच्या वर्गात सध्या ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांना शिकविण्यासाठी चांगला पगार असणारे २ शिक्षक आहेत.जिल्हापरिषदेने  नवी शाळा सुरु केली पण  पुढे काय ? आज या मुलांची अक्षरश: चेष्टाच चालविली आहे.वाडीवर बचत गटाची वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड आहे ,शेडमध्ये गुरांची विष्ठा पडलेली ,अत्यंत अस्वच्छता अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अध्यापन कसे मिळणार ?.शिकण्याचा फळा तुतलेला आहे.तो भिंतीला टेकून ठेवलेला दिसला.नविन आणावा..जुना दुरुस्त करावा अशी मानसिकता चांगला पगार घेणा-या येथील शिक्षकांची नाही
तुटलेला फळा
.
शेडची केव्हांही पडेल अशी भिंत आहे त्यावर पाढे ,अद्याक्षरे,महिने लिहिलेले आहेत.नव्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर नसल्याने शाळेला इमारत नाही.शाळेबाबत एवढी अनास्था आहे कि २०० रु .सधा नामफलकही शाळेला नाही.शेडच्या जून्या गंजलेल्या दरवाज्यावर  खडूने शाळेचे नाव लिहिलेले आहे.करोडो रुपयांचे डिजिटल बोर्ड आपल्या वाढदिवसाला लावाणा-या लोकप्रतिनिधींना ही बाब लक्षात येऊ नये हे दुर्दैव !.शाळेत साधे कपाट नाही.शाळेतील सर्व मुले आदिवासी त्यांची नावे शिधापत्रींकावर नाहीत त्यामुळे त्यांना आदिवासी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही.स्थलांतरामुळे उपस्थितीही कमी आहे.
भिंतीवरील अद्याक्षरे


शासन प्रत्येक सरकारी शाळांना अनुदान देते.नामफलक,फळा ई.खर्च यातून सहज भागवता येतो परंतु येथे तसे दिसत नाही.शिक्षण विषयक माहितीपत्रके ,भित्तिपत्रके शाळेत लावलेली नाहीत विद्यार्थी आहेत पण इमारत नाही...शिक्षक आहेत पण शाळेविषयी आसक्ती नाही अशी स्थिती या शाळेची आहे.एका बाजूला ए.सी. तर दुसरीकडे शी.शी.. एका बाजूला टोलेजंगी इमारती तर दुसरीकडे पडीक बकरी शेड.  २१ व्या शतकाकडे जाणा-या आपल्या देशाला हे चित्र शोभनीय नाही.

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

प्रगतीच्या वाटेवर -अशीही एक आदिवासीवाडी

आदिवासींची अतिशय चांगली घरे 
आदिवासी समाज म्हटला कि व्यसनांध ...अज्ञानी ..अंधश्रध्दाळू अशी अनेक बिरुदावली त्यांच्या मागे लावली जातात,सरकारने कितीहि योजना यांच्या्साठी राबविल्या तरी हा समाज सुधारणार नाही अशी धारणा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनीही करून घेतलेली आहे .परंतु हा समज खोटा ठरवत सर्वांपुढे आदर्श ठेवलाय तो एकलव्य आदिवासीवाडीने .


रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील लाटवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही आदिवासीवाडी येते.रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या या एकलव्य आदिवासीवाडीने प्रगतीच्या वाटेवर आदिवासी समाजही मागे नाही हे दाखवून दिले आहे.येथिल आदिवासींची घरे ,स्त्री ,पुरुष व मुलांचे राहणीमान ,त्यांचे आर्थिक व सामाजिक योगदान, शिक्षणाविषयीची आस्था सारे काही वाखाणण्याजोगे आहे.
महाड -दापोली मार्गावर लाटवण गावाजवळ ही वाडी आहे,वाडीवर आदिवासी समाजाची २८ घरे आहेत. आदिवासींची घरे म्हणजे झोपडी ,कुडामेढीची ..परंतु .येथिल आदिवासींची घरे इतरांच्या घरांसारखी आहेत.जांभा दगड वापरून उत्तम बांधकाम केलेली घरे . दारे-खिडक्या असलेली ,स्वच्छ सारवलेली अंगणे ,अतिशय चांगली घरे या वाडीवर पहावयाला मिळतात.बहुसंख्य आदिवासीच्या घरी टि.व्ही आहेत.घरावर डिश अँटिना आहेत.फोन आहेत.बहुसंख्य आदिवासीना घरकुल योजनेचा लाभही मिळालेला आहे.सर्व गृह्पयोगी वस्तुंनी सजलेली घरे यथील आर्थिक स्तर दाखवितात .याचे मुळ कारण म्हणजे कामावलेला पैस गुंतविणे.जुनी मंडळी सोडली तर वाडीवर व्यसनाचे प्रमाण नगण्य आहे. अनेकांची बँकेत खाती आहेत,मासेमारी ,लाकूड्तोड ,बागकाम व मोलमजूरी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय त्यांनी जोपासला आहे.काही जण गवंडीकाम शिकले असल्यांने घरे बांधून देण्याची कामेही ते करतात.त्यामुळे त्यांच्या हाती पैसा आला आहे.वाडीवर दोघांकडे मोटारसायकलही आहेत.
 एकलव्य आदिवासीवाडी
एकलव्य वाडीवर आदिवासी वस्ती ७०-८० वर्षांपासून आहे.स्थानिक मंडळ घरटी २० रु.काढून बचत करतात.अडीनडीला हा पैसा वापरला जातो.वाडीवर ५० लहानमोठी मुले आहेत.परंतु सर्व शाळेत जातात.येथील शैक्षणिक स्तरही उंचावत आहे.संदीप घोगरेकर हा तरूण नुकताच डि.एड झाला आहे तर मोहन जाधव हा महाविद्यालयात शिकत आहे.अन्य मुले आश्रमशाळेत शिकतात.वाडीचा स्वतंत्र क्रिकेट संघ आहे , ४ जानेवारीला डोंगरदेवीची पूजा व उत्सव सर्व समाज एकत्र साजरा करतो.स्त्रीया पाचवारी साडी नेसतात.एका महिलेने सरपंचपदही भुषविले आहे.आदिवासीं मधील हा बदल वाखाणण्याजोगा आहे.आदिवासी समाज इतर समाजा बरोबर प्रगतीच्या वाटेवर येतोय याचे उत्तम उदाहरण म्हणून एकलव्य आदिवासीवाडीकडे पाहता येईल.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी

अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

अल्पसंख्याक समाजाला  या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल. तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.

विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाअल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.

विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार

गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवरील विविध जलस्रोतांना स्वतःची ओळख मिळणार आहे. गावांमध्ये विहिरी, तलाव, हातपंप , पाणी योजना अशी पाणीपुरवठ्याची विविध साधने असतात. यापुढे प्रत्येक पाण्याच्या स्रोताला विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर फिरणा -या वाहनांप्रमाणेच पाणीपुरवठ्याच्या साधनांजवळही क्रमांक दर्शविणा -या पाट्या झळकणार आहेत.

पिवळ्या रंगाच्या पाटीवर काळ्या रंगात हा क्रमांक लिहिला जाईल. ऑइलपेंटने रंगविलेल्या पाट्या या स्रोताजवळ लावल्या जाणार आहेत.

पाणीपुरवठ्याचे स्रोत व साधनांचे महत्त्व टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात जाणवते. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व पाणी गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम सर्वत्र राबवत आहे. जिल्ह्यातही त्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या साधनांची नोंद ठेवणे, पाणी साठ्यांजवळ स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता चाचणी, दूषित स्रोतांची सुधारणा अशी कामे सरकारमार्फत राबविण्यात येत आहेत. यासाठी गावोगावी व वाडीवाडीवर पाण्याच्या स्रोतांची आकडेवारी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारतर्फे अशा सर्व साठ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. गावातील विंधनविहिरी, हातपंप, सार्वजनिक विहिरी, सर्व प्रकारच्या पाणी योजना अशी स्रोतांची माहिती संकलित करण्यात येईल. गावातील ज्या ठिकाणचे पाणी जास्त वापरले जाते, त्यानुसार क्रमवारीने ही अक्षरे रंगविली जाणार आहेत. क्रमांक रंगविण्यासाठी येणारा खर्चही सरकार पेयजल कार्यक्रमाच्या बचत खात्यात वर्ग करणार आहे.स्रोतांच्या या क्रमांकामुळे पाणीपुरवठ्याच्या पुढील योजनांचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

चप्पल पुराण

     नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा  इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ... गावातील एका झाडाखाली चप्पल बांधणी पासून चकाचक अशा माँल पर्यंत प्रवास करत पोहोचलेले चप्पल आणि बूट....
        चपलांच्या दुकानात गेलं कि इवलाश्या आकारा पासून अगदी फताड्या पायापर्यंत सर्वच आकारामध्ये चप्पल आणि बूट पहायला मिळतात.बूटातही नाविन्य आहेच..लेदरचे चकाकणारे बूट ते रफ अँन्ड ट्फ स्पोर्ट्स शूज पर्यंत रंगीबेरंगी बूटांचा प्रवासही वाखणण्याजोगा .माणसाच्या आयुष्यात  चप्पल आणि बूटांना तसे तुच्छ स्थान...पण खर सांगू थोडा विचार केला तर त्यांचे स्थान बहूमोल असे आहे.कपड्यानंतर माणूस सर्वाधिक काय वापरत असेल तर ती  चप्पल !. प्रत्येक सुखदु:खात , द-याखो-यात.,काट्याकुट्यात ,ऊनपावसात चप्पल आणि बूट आपल्याला साथ देतात.आणिबाणिच्या प्रसंगात उपयोगात येणारे हमखास हत्यार म्हणजे चप्पलच .
            देवाच्या दर्शनाला उभे असलो तरी आपली नजर चपलांकडे असतेचकी.चप्पल आणि बूट कुणी चोरणार नाही ना ? हा विचार मनात येतच असतो.खडाखडा बूटांचा आवाज करत चालणारे पोलिस -सैनिक पाहिले कि अंगावर रोमांच उभे राहतात.प्रभुरामचंद्र वनवासात गेल्यावर त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्यकारभार केला होता.आता नेत्यांचा चपला उचलून हुजरेगिरी करून अनेक जण स्वामीनिष्ठा दाखवतांना आपण पाहतो.अंगावर चप्पल नाहितर बूट फेकून मारण्याचे नवीन फँड हल्ली जोर धरतेय. जाँर्ज बूश, पी.सी.चिदंबरम ,अडवाणी, बिहार विधानसभाध्यक्ष  , उमर अब्दुल्ला, अशोक चव्हाण यांच्यावर चप्पल-बूट फेकून मारलेली उदाहरणे आहेत.अभिनेता जितेन्द्र पासून आरोपीने न्यायाधिशाला  चप्पल-बूट फेकून मारल्याचे आपण वाचलेले आहे.त्यामुंळे सद्यस्थितीत चपलांना महत्व प्राप्त झाले.
      चप्पल ,बूट ,ज्युता ,सँन्डल ,शूज ,सभ्य भाषेत पादत्राणे तर गावरान भाषेत पायताण -वहाण असे विविध शब्दप्रयोग आपल्या वापरात कायम असतात.नोकरीसाठी मुलाखत देणा-या उमेदवाराला कपड्यांइतके चप्पल-बूटांकडेही लक्ष द्यावे लागते ,छेड काढणा-या मवाल्यांपासून दूर रहायचे असेल तर महिलांना चपलांचा कित्ती-कित्ती आधार वाटतो.मेरा ज्युता है जपानी म्हणत चप्पल सिनेमात पोहचली.बूटांवर कँमेरा मारल्या खेरीज हिरोची सिनेमात एन्ट्री कधी झालेय ?.लग्नकार्यात वराचे जोडे लपवल्या शिवाय करवलीला हक्काची कमाई कशी होणार ?.पिकपिक आवाज करणारे बूट घालून चालणा-या लहान मुलाकडे सारेच कसे प्रेमाने बघतात. टाचांच्या चपला घालून स्त्रीयाही उंच व्हायला बघतात.कोल्हापूरी चपलांचा आवाज तर भारदस्तपणा दाखवणारा.जीन्स पँन्ट्वर शोभणारे बूट तरूण तरुणींचे व्यक्तिमत्व कसे खुलवते.आपल्या सामाजिक वैयक्तिक जीवनात चपलांना कळतनकळत महत्व आलेले आहे.हे महत्व वाकप्रचार-म्हणींपर्यंत पोहचले आहे.पाहूण्याच्या बूटाने विंचू मारणे ,बापाचे जोडे मुलाला झाले कि मुलगा मोठा झाला.मुलीचे लग्न जुळवतांना जोडा झिजवावा लागतोच.पायातली वहाण पायात बरी असं म्हणत एखाद्याची लायकी काढली जाते.त्याला चपलेशी उभा करू नका..चपलेने हाणा असा शब्द रागाच्या भरात निघतो. हे सार खरं असले तरीहि रात्री-अपरात्री घराबाहेर पडतांना पायात चप्पल घालून जा रे असा वृद्ध व्यक्तिंचा हमखास सल्ला असतो. केवढा हा चपलेवर भरवसा...आपल्या सोबत असणा-या या चपलेने आपले विश्व किती व्यापलयं ना ?,
       लहाणपणी आई आणि आता पत्नी मला बजावते अरे ते बूट बदल आता किती झिजलेत ?
माझे बूट खराब झाले म्हणून मी कच-याच्या कुंडीत टाकून दिले.काही दिवसांनी माझे तेच बूट एका भिका-याच्या पायात मी पाहिले.माझी गरज संपलेले ते बूट आज कुणाची तरी गरज झाले होते.स्वत: झिजून दूस-याला सुगंध चंदन देते हे आपल्याला माहित आहे .पण स्वत: झिजून आपल्याला आनंद देणा-या चपलेच्या बाबतीत आपण सापत्नभाव ठेवतो ,आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला साथ देणारी चप्पल आपल्या कडून  तशी दुर्लक्षित राहते.
.................................................................................

बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत

आता सर्वत्र भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत पोहोचला असून लावणीच्या वेळी शेतात म्हटली जाणारी पारंपरिक गाणी आता दुर्मिळ झाली आहेत. नवी पिढी, शेतीची नवी साधने यामुळे भातलावणीलाही आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे.

ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. पूर्वी खेडेगावात असणारी वर्दळ, मदतीला धावणारे सहकारी व सहजतेने मिळणारे शेतमजूर यामुळे शेतीची कामे झपाट्याने पूर्ण होत. गावेच्या गावे एकमेकांकडे लावणी करण्यासाठी जात होती. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात असत. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरविलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. शेतीच्या हंगामात भातलावणी हा उत्साहाचा हंगाम असे. शेतात पारंपरिक गाण्याचे सूर उमटत असत. इरले डोक्‍यावर घेतलेले, घोंगड्या अंगावर घेतलेले अनेक शेतकरी शेतात लावणीत मग्न असायचे. पेट्रोमॅक्‍सच्या उजेडात लावणी होत असल्याच्या आठवणीही येथील शेतकरी सांगतात. परंतु आता पारंपरिक गाणी दुर्मिळ झाली आहेत. नव्या पिढीला ही गाणी माहीत नाहीत.

सध्या भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. 100 ते 150 रुपये दिवसाची मजुरी असते. याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास 250 ते 300 रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. मजुरीसाठी आदिवासी येत असल्याने या दिवसांत आदिवासी वाड्यांवर शुकशुकाट असतो. इरले-घोंगड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे. शेतात बसण्यासाठी वापरली जाणारी लाकडी तिवई मात्र अजूनही आहे. तालुक्‍यात लावणीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वीसारखी रंगत लावणीला येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास किमान 15 माणसे व चार नांगर यांची गरज असते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावणीसाठी शेतक-यांची गर्दी दिसते. परंतु या शेतातून पारंपरिक गाण्यांचे स्वर मात्र कानावर पडत नाहीत. आधुनिक बियाणे, शेतीचे नवीन तंत्रज्ञान, शेती करणारी नवी पिढी, पैसे देऊन आणलेले मजूर यामुळे शेतीही आता व्यावसायिक होऊ लागली आहे.

बुधवार, २८ जुलै, २०१०

आजीची भातुकली


भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात.
पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत. त्याच्याकडे १ हजाय २५०
भातुकलीची खेळणी .लहान चूल ,घुसळण,पाटा-वरवंटा,पोहरा ,उखळ,ताक घुसळणारी बाई ,दळणारी बाई,पाण्याचा बंब,अडकित्ता,दूध ठेवण्याचे कपाट.सागर्गोते, सारिपाट .काचपाणी.बिट्या, डबा ऐसपैस असे खेळ
पहावयास मिळतात.विलास करंदीकर अनेक ठिकाणी आजीची भातुकली नावाने या वस्तूंचे प्रदर्शन भरवत असतात.गिनिज बूक व लिम्का बूकने याची दखलही घेतली आहे.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस।पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.लहानपणीच्या ईवल्याश्या छत्रीत....मित्रांसोबत सोडलेल्या कागदी होड्यांत..., तरुणाईत धबधब्याखाली लुटलेल्या त्या मजेत...असा हा पाऊस॥कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गँलरीत मनसोक्त धडकणारा.सृष्टीला नवचैतन्य देणा-या प्रत्येकाला वेड लावणा-या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडले असेल तर ते कवीने. आपल्या सुंदर शब्दामध्ये पावसाला बंदिस्त करण्याचे धाडस फक्त हा कवीच करु शकतो.म्हणूनच मराठी कवितांमध्ये, गाण्यांमध्ये या पावसाची विविध रुपं उलगडत गेलेली दिसतात. पाऊस जसा वर्षानुवर्षे पडतोय ,पडत राहणारही आहे तसतसे हे बालगीतही प्रत्येकला आपल्या बालपणात भेटत राहील.
येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा
हे बालगीत लहानपणापासूनच मनात पक्क बसतं.हे बालगीत गुणगुणतच आपल्याला पावसची ओळख होते.शाळेत जातांना पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद कायम रहावा आणि शाळेला सुट्टी मिळावी यासाठी बालमने
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

अशी आर्जव करतात. बालमनातील ही इच्छा पाडगावकरांनी किती अलगद पकडली आहे पहा.मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत
जांभळासारखे पिकून आले,
ढग हे टपोरे झुकून आले.
सरी नी सरी झडेल रे,
पाऊस पाऊस पडेल रे.
असे पावसाचे वर्णन केले आहे.तर पावसाळी वातावरणाची शब्दरूपी मांडणी बा.भ.बोरकरांनी फार सुंदररित्या केली आहे.
गडद निळे, गडद निळे जलद भरून आले
शितल तनू, चपल चरण ,अनिल गण निघाले.

बोरकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. पावसाचा आनंद जितका लहान मुलांना होतो तितकीच काळजी घराबाहेर पडलेल्या आपल्या पतीची एका पत्नीला असते.प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे जाणवणारे हे दृश्य कवी अनिल यांनी फार सुंदर रेखाटले आहे.

बाई या पावसानं लावली झिमझिम
भिजली की माळरान ,उदासल मन ,
नदी नाले एक झाले ,पूर भरूनीया आले
जीवलग पडे बाई कुठे अडकून,
नच पडे चैन बाई य जीवाला

एका बाजूला पतीची काळजी करणारी व्याकुळ पत्नी तर दुसरीकडे पावसात मनसोक्त भिजण्या-या तरुणीचा ओसंडून वाहणारा आनंद शांता शेळके यांनी शब्दामध्ये अगदी सहज पकडला आहे.

आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं.

मुसळधार पडणारा हा पाऊस गुलाबी असा गारवा घेऊन येतो आणि या गारव्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा अनावर होऊन जाते.आद्य कवियत्री बहिणाबाईंनी प्रत्येकाच्या मनातील इच्छा केव्हाच ओळखली.आणि ती शब्दात पकडूनही ठेवली.

येता पाऊस पाऊस .पावसाची लागे झडी
आता खा रे वडे , भजे
घरामध्ये बसा दडी
बहिणाबाई पावसाबद्दल पुढे असं म्हणतात.

देवा पाऊस पाऊस , तुझ्या डोयातले आस
देवा तुझा रे आरास, जीवा तुझी रे मिरास

नव्या दमाचे कवि संदीप खरे यांनी पावसाला आगदी सुंदर सोप्या भाषेत शब्दबध्द केलय

गोष्ट सुरू होईल ,तेव्हा सुरू झाला पाहिजे
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे.

असा हा पाऊस..अनेक कवींना जसा तो दिसला ,भावला त्यांनी अनुभवला तसा तो त्यांनी शब्दबध्द केला.असा हा पाऊस..कधी अचानक गायब होणारा , बळीराजाला आभाळाकडे पहायला लावणारा तर कधी सारे काही जलमय करून टाकणारा.कुणाला तो हवाहवासा वाटतो.. तर कुणाला कंटाळवाणा.विद्यार्थ्यांची शाळा बुडवणारा..तरुणांना प्रेमात पाडणारा ,वृद्धांना गारठवणारा तर आईला काळजीत टाकणारा.त्यांने अनेकांना सावरलं तर अनेकांना उध्वस्तही केलं. असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल.