गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

भटकंती झाली सफल



एक भटकंती अशीही या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले. सौरकंदीलाच्या उजेडात ही आदिवासी वाडी उजळून निघाली आणि आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
आंबिवली गणी आदिवासी वाडीच्या प्रावासानंतर दै.सकाळ मधून "जंगलाचा राजा भिकारी' या मथळ्याखाली आदिवास्यांच्ता व्यथा मी मांडल्या .माझ्या या प्रयत्नाला यशही आले.या वृत्ताची दखल घेत गोरेगाव( जि.रायगड) येथील शेअर संस्थेने तातडीने या वाडीची माहिती घेतली. शेअरचे महाड विभागाचे कार्यकर्ते विजय रानमाळे, गणेश मुरगुडे व अमोल शिरगावकर यांनी या वाडीला भेट दिली. प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व शेअरच्या संचालिका निकोला मॅन्टेरो यांनी वाडीवर विजेची समस्या सोडविण्यासाठी 17 कुटुंबांना सौरकंदील प्रकल्प मंजूर केला. महाडचे नवनियुक्त तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या हस्ते या आदिवासींना सौरकंदीलांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला. आदिवासींनी या वेळी तहसीलदारांना आपल्या अडचणी सांगितल्या. तुषार इनामदार यांनी सौरकंदील वापरण्याची माहिती आदिवासींना दिली. या कार्यक्रमाला सरपंच प्रतिमा गायकवाड, उपसरपंच रमेश पवार, शेअरचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.पाणीटंचाईबाबत शेअर प्रयत्न करणार आहे. गणी आदिवासीवाडीवर जाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते.मीही अशी डोंगरावरून पायपीट करत गणीच्या व्यथा मांडल्या .माझी पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद मला वाटतो.

बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.
राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला ‘सर मला मारताय तुमचा बाप मरेल .‘ संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.
१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.‘असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा‘ अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.
यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला ‘दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.
‘ अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.
............
सुनिल पाटकर

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

जगाला प्रेम अर्पावे


दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली .
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेमारी,जलवाहतूक हे येथील पारंपारिक व्यवसाय.काळानुसार अन्य व्यवसायही गावात केले जातात.हे इतिहासकालिन गाव अचानक प्रकाशझोतात आले ते २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे.२५ जुलै २००५ या दिवशी या गावावर निसर्गाचा कोप झाला.या दिवशी पावसाने सर्व राज्यात हा:हाकार माजवला होता.सावित्री नदीला भयानक पूर आला होता .जवळचे महाड शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली होती.दासगावच्या किनार्‍यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरू लागले.रात्रीची वेळ. वीज गायब झालेली.अशा स्थितीत किनार्‍यालगतची माणसं डोंगरावरील घराच्या आसर्‍याला जाऊ लागली.आणि याच दरम्यान घरांच्या मागे असलेली डोंगर कोसळू लागला.काही क्षणातच दरड कोसळली .या दरडीखाली बघताबघता घरच्या घरे गाडली गेली.डोळ्या देखत निष्पाप जीव दरडीखाली गाडले गेले.या आपत्तीत दासगावने ४७ माणसे कायमची गमावली.या मध्ये प्राथमिक ,माध्यमिक शाळेतील १२ विद्यार्थी मृत झाली.दासगावच्या याच डोंगरात प्राथमिक शाळा आहे.या शाळेत शिकणारे गौरव प्रकाश खैरे, प्रतिज्ञा प्रकाश खैरे,अक्षता प्रकाश खैरे,रविराज प्रकाश निवाते,सिद्धांत संतोष तोंडकर,श्वेता सुरेश जैन ,संदेश दीनेश उकिर्डे या पहिली ते चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचाही दरडीखाली मृत्यू झाला.प्रकाश खैरे यांची तिनही मुले दगावली होती.कोसळलेला डोंगर पहाडा एवढे दु:ख पदरात टाकून गेली होता.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना सुरू केली आहे.या योजनेतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रु.ची रक्कम विमा कंपनी कडून अदा करण्यात आली.भविष्यातला आधारच निघून गेल्यांने मिळालेल्या पैशाचा आधारही पालकांना नकोसा वाटू लागला.परंतु या पालकांनी आपल्या दु:खातूनच इतरांच्या सुखाचा मार्ग शोधला. मिळालेल्या पैशातील काही रक्कम पालकांनी दासगावच्या प्राथमिक शाळेला देणगी दिली. आपल्या मृत पाल्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी शाळेला बेंचेस भेट दिल्या.आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक असतात पण असा आदर्श ठेवणारे विरळच ! आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.परंतु ‘त्या ’ मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.

ती

सर्व जेवल्यानंतर
तू जेवायला बसतेस
रिकामी भांडी पाहून
खुदकन हसतेस

तुला सवय झालेय आता
त्या रिकाम्या भांड्यांची
आणि
आम्हालाही सवय झालेय
तुझ्या अशा भरल्या प्रेमाची

सुनिल पाटकर

परदु:ख शीतल

उत्तमकथा मासिकातर्फे दरवर्षी कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. उत्तमकथा मासिकाच्या या कथा स्पर्धेत माझ्या परदु:ख शीतल या कथेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले .ही कथा ९ जून २००७ च्या उत्तमकथा मासिकात प्रसिद्ध झाली.
...........................................................................................................................



लांबलचक ढेकर देत राजाभाऊ अंगणात आला.हातात पानाची चंची अडकवलेली आणि अडकित्त्याने सुपारी कातरत राजाभाऊची नजर आजूबाजूला भिरभिरू लागली. कातरलेली सुपारी तोंडात टाकत त्यांने अडकित्ता चंचीत टाकला आनि पोटावरून हात फिरवत त्याने शतपावलीला सुरूवात केली.
नेसलेल्या लुंगीच्या वरुन डोकावणारं त्याचं भलमोठं पोट दिवसेंदिवस अधिकच वाढत होते.पोटाचा नगारा ,तब्बेतीने स्थूल आणि दिसायला घारागोरा...असा हा राजाभाऊ टिपिकल कोकणस्थ !.
शतपावलीला घालतानाच राजाभाऊ मध्येच खांद्यावर टाकलेली बनियन हाताने गरागरा फिरवून स्वत:ला वारा देत होता.राजाभाऊच्या या सवयी शेजा‌र्‍यांना तशा अगदी तोंडपाठ झालेल्या आणि त्याही पेक्षा अधिक, शेजा‌र्‍यांच्या घरी काय चाललंय हे राजाभाऊला चांगलंच ठाऊक असायचे.राजाभाऊचे गिम्हवण्याचं घरही अगदी मोक्यावर.....घराच्या अंगणात उभं राहिलं की कोणाकडे कोण जातयं..हे सारे कळायचं.घरासमोर भाजी नेणा‍र्‍या बायका घरी कोणती भाजी नेतात हे देखिल त्याला माहित असायचं आणि त्या जोरावर तो जावडेकरांना रस्त्यात थांबवायचा "काय जावडेकर , आज तोंडल्याची भाजी ?"राजाभाऊच्या या प्रश्नावर जावडेकरही अवाक व्हायचे.घराच्या आवारातून जावडेकरांच्या घरी काय चाललंय हे राजभाऊला कळायचं
गवाणकरांची सून रागाने तरातरा कुठे गेली?. जी.के.चा मुलगा आज इंटरव्हूला कुठे गेला होता ?.इथ पासून रानडेच्या मुलीला कुठले स्थळ आलयं याची इत्यंभूत माहिती राजाभाऊला असायची...आणि ती का नसावी ?.कारण दिवसभर जेवणे ,खाणे,गप्पा आणि आराम याशिवाय त्याच्या आयुष्यात विशेष काहिच नव्ह्ते.घरात म्हातारी आई अंथरुणाला खिळ्लेली असायची.तिच्या सेवेला एक मोलकरीण असे.तिचं नि राजाभाऊचं काहीतरी चक्कर असावं अशी चर्चा गावात असायची.परंतु हा भाग दुय्यम !.
सकाळी उठलं कि साफसफाई करायची, देवपूजा आणि त्यानंतर अंगणातील आरामखुर्चीत मनसोक्त अंग झोकून द्यायचं.पेपर वाचायचे .आरामखुर्ची समोर पाच सहा खुर्च्या मांडून ठेवायच्या. कमरेला लुंगी , अडकित्ता सुपारी जोडीला. सारी तयारी झाली की मग राजाभाऊची नजर शोधू लागायची गप्पा मारण्यासाठी एखाद्या जोडीदाराला.गप्पा मारण्यासाठी राजाभाऊला कोणत्याही वयोगटा्तील व्यक्ती चाले.अट एकच गप्पा रंगल्या पाहिजेत !
मुंबईत मोटारी बनवणार्‍या एका कंपनीत राजाभाऊ चांगल्या पगारावर नोकरीला होता.कंपनीने जेव्हा स्वेच्छानिवॄत्ती जाहिर केली त्यावेळी पहिली उडी मारणारा माणूस होता राजाभाऊ सोमण ! राजाभाऊने स्वेच्छानिवॄत्ती घेतली. त्यातून मिळालेले पैसे गुंतवून राजाभाऊ स्थायिक झाला तो आपल्या दापोली जवळच्या गिम्हवणे गावी ! राजाभाऊ घरही अगदी हर्णे- मुरुड रस्त्यावर.त्यामुळे घराच्या काही खोल्या पर्यटकांना भाड्यांने देऊन त्यातून बर्‍यार्पैकी उत्पन्न मिळवत असे.लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच राजाभाऊची बायको त्याला सोडून गेली.स्वच्छंदी जीवन जगणार्‍या राजाभाऊला कदाचित हा पाशही नकोसा झाला असावा ! कोणतीही काळजी नाही. कशाचीही फिकीर नाही असं बिनधास्त आयुष्य राजाभाऊच्या वाट्याला आले होते समर्थाना राजाभाऊ जर भेटला असता तर त्यांनी जगी सर्व सुखी कोण आहे ? असे विचारण्याचे धाडसच केलं नसतं
दुपारी आणि सायंकाळी अंगणात भरपूर गप्पा रंगायच्या..मनसोक्त किस्से सांगितले जायचे.आणि त्या गप्पांना हळूहळू झालर चढायची ती दु:खांची!..राजकारण ,भारनियमन,क्रिकेट पासून सुरू होणार्‍या गप्पा जेव्हा कौटुंबिक पातळीवर यायच्या तेव्हा मात्र अंगणही भारावून जायचं. राजाभाऊला नेमकं हेच हवं असायचं.जो पर्यंत गवाणकरांना सून आता कशी वागते ? हा प्रश्न विचारला जात नसे तोपर्यंत गवाणकर सूने विषयी भडाभडा बोलत नसत.मुलीचे कुठे जमतंय का ? असं विचारल्या शिवाय रानड्यांची कहाणी सुरू होत नसे.जावडेकरांची पेन्शन ,जी.के.च्या मुलाची नोकरी .याविषयांवर मग जो-तो भडाभडा बोलायचा आणि आपले मन हलके करायचा. याचा परिणाम राजाभाऊवर होत नसे.तो मात्र निर्विकारपणे आपल्या घड्याळाकडे पाही.‘चला चांगला टाईमपास झाला‘असं बोलुउन तो दुसर्या दिवशीचा विचार करत असे .दररोज घराच्या अंगणात दु:खाच्या,तक्रारीच्या कहाण्या सांगितल्या जायच्या आणि राजाभाऊ त्या ऐकून समाधानी होत असे.वेळ जात नसला कि तो एखाद्या शेजार्‍याला बोलावून घीए व त्याच्यापुढे त्याच्या वर्मी लागणारा विषय काढत असे की ज्यामुळे हा शेजारी आपल्या मनातलं सारं काही बोलून टाकायचा. शेजार्‍याचे मन हलके व्हायचं आणि .राजाभाऊचाही वेळ जायचा.वेळ घालवण्याचे एक हुकमी अस्त्र राजाभाऊकडे होते.
राजाभाऊने घड्याळात पाहिले दुपारचा एक वाजला होता.त्याने खिडकीतून आत डोकावले म्हातारी आई झोपलेली होती.दुपारी जरी ऊन असलं तरी घराजवळच्या भल्या मोठ्या झाडांमुळे अंगणात गर्द सावली येत असे.या सावलीत आरामखुर्ची सरकवत त्यावर राजाभाऊ रेलला.डोळ्यावर चष्मा लावत तो पेपर वाचू लागला.पेपर वचतानाही त्याची नजर मध्येच बाहेर भिरभिरत होती तेवढ्यात त्याला बाबुराव सावंत येताना दिसले..राजाभाऊने अंगणातून बसल्या जागेवरून हाक मारली " सावंत तात्या..... "
राजाभाऊच्या दणदणीत आवाजाने सावंत जागीच थांबले.हातातला पेपर बाजूला ठेवत राजाभाऊ फाटका पर्यंत गेला.
" कुठे गेला होतात ?" फाटक उघडत राजाभाऊनी विचारले.
" जरा भाच्याकडे गेलो होतो " सावंत रस्त्यावरूनच बोलले.
" अहो, या जरा बसा ."
" नको राजाभाऊ.अहो, घरी जायला उशीर होईल."
"अहो, या जरा .कधीमधी भेटणारी माणसं तुम्ही या ." राजाभाऊनं सावंताना गळ घातली.गोड्गोड बोलत राजाभाऊनी अखेर सावंताना अंगणात आणलचं.
" भाच्याकडे काय विशेष ?" खुर्चीत रेलत राजाभाऊनं विचारलं.
"विशेष काही नाही.अँग्रिकल्चर काँलेजला आहे.इथे हाँस्टेलला रहातो.बहिण म्हाणाली जरा लक्ष ठेवत जा."
"लक्ष ठेवायलाच पाहिजे ,त्यात तुम्ही मोठे ." सावंतांच्या वाक्यावर राजाभाऊ उत्तरला..’तुमचा मुलगा पण अँग्रिकल्चरला होता ना ?’ राजाभाऊनी खडा टाकलाच.
"तो एम.एस.सी झालाय. पुण्याला असतो.".
" मध्ये त्याला पाहिला होता ,सोबत बायको होती काय ?" राजाभाऊ हळूहळू सावंतांच्या वर्मावर घाव घालू लागला.सावंत थोडा वेळ स्तब्ध राहिले.
" लग्न कुठे पुण्याला केलं काय ? बोलवलं नाही आम्हाला ? " राजाभाऊच्या प्रश्नावर सावंतांची नजर झुकली.
" नाही,म्हणजे त्यानीच जमवलं." सावंत शांतपणे म्हणाले.
" जाऊ दे, अहो, त्यात काही विशेष नाही .हल्ली भरपूर लग्न अशीच होतात." राजाभाऊनं दिलासा दिला.
"चालायचं म्हटल की सगळं चालतं.आईवडिलांनी मुलांकडून जास्त आशा बाळगायच्या नाहीत हेच खरे" .सावंत गंभीर झाले होते.
"जातीतली आहे ना ? तुम्ही ९६ कुळी ना ?"
"जातीतली असती तर कशाला ? " सावंत तिरस्काराने म्हणाले.
"रीतभात तरी आहे का ?" राजाभाऊनं भारीला एक प्रश्न विचारलाच.
"कोण बघतंय ?.लग्न झाल्यावर सोपस्कार म्हणून गेलो होतो आम्ही .तुम्ही करा राजाराणीचा संसार ". सावंत नैराशाने म्हणाले.
"तुम्हाला सांगितलं होतं का त्याने ?"
"तो हरामखोर हो,पळून गेला आणि लग्न करून आला.आता हा शिकला सवरलेला ,२५ हजार पगार घेणारा मुलगा,त्याला आपण काय बोलणार ?" सावंत रागाने बोलले आणि राजाभाऊ त्यांच्याकडे पहात बसला.
सावंत सारं काही भरभरून बोलले.मुलाने परस्पर लग्न केल्याचे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं
" खरं सांगू राजाभाऊ म्हणून आम्ही दोघं कुठे बाहेर पडत नाही."
सावंतांच्या या वाक्यावर .राजाभाऊनं त्याना धीर दिला."तसं काही मानू नका सावंत ,अहो हल्ली चलतं सगळं".
"तुम्हाला नाही कळायचं राजाभाऊ परदु:ख शीतल असतं राजाभाऊ"
सावंतांच्या बोलण्यात अखेर ‘परदु:ख ’ हा शब्द आलाच.
‘परदु:ख शीतल असत ‘ हा शब्द या अंगणात राजाभाऊने हजारवेळा ऐकला होता.
"हे बघा तात्या, तुम्हाला काही वाईट वाटायला नको. कुठे नाही गेलात तरी माझ्याकडे या आणि तो तुमचा मुलगा आला तर त्यालाही माझ्याकडे पाठवा." राजाभाऊनं सावंताना दिलासा दिला.
राजाभाऊच्या अंगणातून सावंत हळुवार पावलं टाकत बाहेर पडले.थोडावेळही बसण्यास तयार नसलेल्या सावंतांच्या भावनेचा बांध असा काही फुटला कि तब्बल दोन तास सावंत आपल्या व्यथा राजाभाऊला सांगत होते.सावंत गेल्यावर राजाभाऊने हातपाय लांब केले.एका बाजूला शिकला सवरलेला सावंतांचा मुलगा परस्पर लग्न करून आला.तर दुसरीकडे रानड्यांची मुलगी पंधरा ठिकाणी दाखवूनही कोणाच्या पसंतीला येत नव्हती.मुलीच्या या चिंतेने रानडे हैराण झालेले असायचे.रानडे मुलगी दाखवून आले की ही बातमी राजाभाऊला कळायची आणि संध्याकाळी "मग ठरलं का मुलीच लग्न ?" असा खोचक प्रश्न राजाभाऊ रानड्यांना विचारायचा . रानडेही मन मोकळं करायचे आणि राजाभाऊचाही वेळ जायचा.
"ठरेल हो धीर धरा" असा वर दिलासा राजाभाऊ त्यांना द्यायचा." परदु:ख शीतल असतं राजाभाऊ तुम्हाला मुलगी नाही म्हणून हे दु:ख तुम्हाला कळणार नाही ." रानडे असं म्हणून गप्प व्हायचे.
घराच्या या अंगणात गप्पांतून अनेक दु:ख समोर आली. याच अंगणात ‘परदु:ख शीतल असतं ‘ हा शब्द प्रतिध्वनी सारखा उमटत असे.
राजाभाऊ मात्र निर्विकार असे .कसली दु:ख नि काय ! आपल्या सारखं आयुष्य पाहिजे.लोक काय म्हणून दु:खाच एवढ भांडवल करतात राजाभाऊच्या मनात हा विचार नेहमी येई. मुंबईतील आपली नोकरी किती चांगली होती . स्वेच्छानिवॄत्तीच्या कल्पनेने अनेक जण गळफटले.आता कसं होणार ही चिंता अनेकांना लागली होती पण आपण बिनधास्त स्वेच्छानिवॄत्ती घेतली .मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून रानडे रडतात.पुन्हा पुन्हा त्याच विषयावर दु:खी कष्टी होतात.छॆ:! च्यायला ! माझी बायको सोडून गेली तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही .सुरवतीला सगळे विचारायचे "राजाभाऊ वहिनी कुठे आहेत ? माहेरी गेल्या वाटतं ?" .त्यावेळी सगळ्यांना एकदाच सांगून टाकलं बायको मला सोडून गेली आहे.ती पुन्हा येणार नाही....एकदाच विषय फिनिश ! आरामखुर्चीत बसल्या बसल्या राजाभाऊच्या मनात विचार येत होते.
आपल्या अंगणात हजारो तक्रारी ,गार्‍हाणी ऐकून राजाभाऊ चक्रावून जायचा.जी.के म्हणायचे "राजाभाऊ दु:ख कुणाशी तरी उघडं केलं की मन हलकं होतं.एकवेळ माणूस सुख स्वार्थाने एकटा उपभोगेल पण दु:खासाठी त्याला सोबत असावी असं वाटत रहातं" .
"खरच असं वाटत असेल , दु:ख बोलून हलकं होत असेलं ?" राजाभाऊ या सार्‍या गोष्टीवर काहीकाळ विचार करत असे.
"जाऊ दे "असं म्हणून विषयही सहज सोडून देत असे. राजाभाऊकडे तसं बोलायला फारसं काही नव्हतं.माडाला नारळ किती आले आमसुलं किती विकली ....नाहीतर मुंबईतील गप्पा असे जुजबी विषय तो इतरांशी बोलायचा.पण इतरांच्या पोटात शिरून मात्र तो सारे बाहेर काढत असे.आणि नेमक्या याच गोष्टी त्याला विरंगुळा द्यायच्या.
पेपर वाचणं हा राजाभाऊचा आणखी एक छंद ! पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ,मोठ्या बातम्यांपासून अगदी छोट्या जाहिरातींपर्यंत सारा पेपर राजाभाऊ वाचून काढत असे .पेपर वाचतावाचता आजूबाजूला नजर भिरभिरत असायची.पण आज काहितरी वेगळं घडलं होतं.पेपर वाचता वाचता राजाभाऊ गंभीर झाला.एरव्ही पेपर वाचताना आजूबाजूला पाहणार्‍या राजाभाऊची नजर आज पेपरवर खिळली होती.
‘शारदा सहकारी बँन्केत आर्थिक घोटाळा बँन्क दिवाळखोरीत जाण्याची शक्यता ‘
या बातमीच्या मथळ्यावर राजाभाऊची नजर स्थिर झाली.त्याने पेपरातील संपूर्ण बातमी वाचून काढली.डोळ्यावरचा चष्मा काढला आणि गंभीर चेहर्‍याने तो खुर्चीत विचार करत बसला.बातमीतल्या ओळी तशानतशा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागल्या .
"आत्ताच्या आत्ता दापोलीली निघायला हवं". राजाभाऊ स्वत:शी पुटपुटला .खुचीतून उठत कपडे बदलण्यासठी तो मधल्या खोलीत आला.आई शांतपणे झोपली होती,कपाटाचा आवाज न करता अलगद त्याने पासबुक आणि डिपाँझिट्च्या पावत्या काढल्या.आईला झोपेतून न उठवताच शेजार्‍याला कल्पना देऊन तो घराबाहेर पडला.
शारदा सहकारी बँन्क पेपरातील बातमी राजाभाऊच्या डोळ्यासमोर येत होती.रिक्षा करून तो बँन्केत पोहचला.बँन्केसमोर खातेदारांची भलीमोठी रांग लागली होती.ते दॄश्य पाहून राजाभाऊ अवाक झाला." पैसे बुडाले बहुतेक.... झक मारली आणि इथे पैसे ठेवले"...".चेअरमनला बोलवा आणि आमचे पैसे परत करा.".अशा एकावर एक कानावर पडणार्‍या वाक्यानी त्याचे डोके चक्रावून गेलेतो शांतपणे शेजारच्या कठड्यावर बसला.स्वेच्छानिवॄत्ती घेतल्यानंतर राजाभाऊने बहुतेक पैसे याच बँन्केत गुंतविले होते.आणि त्या व्याजावर तो आपला प्रपंच चालवत असे.गेले तीन महिने पर्यटकांच्या गर्दीमुळे खोल्या बुक झाल्याने तो बँन्केत पैसे काढण्यासाठी आला नव्हता.
"तुमचे किती पैसे आहेत ?" शेजारच्या व्यक्तिच्या आवाजाने राजाभाऊ विचारातून जागा झाला.
"तीन लाख" राजाभाऊ शांतपणे म्हणाला.
"आमचे कमी आहेत ,सत्तर हजार.पैसे मिळतील का हो ? घर बांधयला काढलयं".
राजाभाऊ शेजारच्या माणसाकडे पहात बसला .ज्या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊलाही हवं होतं तोच प्रश्न ती व्यक्ति विचारत होती.बँन्केने खातेदारांनी संयम पाळावा अशी बाहेर नोटीस लावली होती.बँन्केच्या बाहेर राजाभाऊ दोन तास ताटकळत होता.परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने तो घरी परत आला.
घरची परिस्थिती गरीबीची असताना मुंबईचा रस्ता धरलेल्या राजाभाऊनं अहोरात्र मेहनत करून पैसे जमविले.हे पैसे बुडणार तर नाहीत ? या विचाराने तो कासाविस झाला.काडीकाडी जमवून साठवलेला पैसा....आपला पैसा काय हारामाचा पैसा आहे! कधी मिळतील पैसे, तो पर्यंत करायचे काय ?असे अनेक प्रश्न राजाभाऊ समोर आ वासून उभे होते.
घराकडे परततांना त्याची पावली थकली होती. डोळ्यातून फक्त अश्रू येणं बाकी होतं घरात न जाता तो अंगणातील खुर्चीत धपकन बसला.कपाळावर आलेला घाम त्याने रुमालाले पुसला.बँन्केच्या पासबुकावरून तो सारखासारखा हात फिरवत राहिला.बँन्केतील पैशाचा विमा असेल तर पैसे परत मिळतील.नाहीतर ,आयुष्याची सारी कमाई वाया जाणार या विचाराने तो चलबिचल झाला.
बँन्केतून परतल्यावर दोन दिवस झाले तरी राजाभाऊ कुणाशी काही बोलला नाही. दोन दिवसात कुणीही शेजारी फिरकलाही नाही.त्यामुळे राजाभाऊ अधिकच बेचैन झाला होता.ह्र्दयात दु:ख अगदी गच्च भरलं होतं.त्याला वाट करून दिली नाही तर त्याचा स्फोट होणार होता. दोन दिवसानंतर तो घराबाहेर पडला.घराच्या आवारात येरझार्‍या घालू लागला.रानडे ,सावंत,जावडेकर,वागळे ,गवाणकर कुणीतरी भेटतंय का? याची राजाभाऊ आतुरतेने वाट पहात होता.खूप खूप वाटू लागलं कुणाला तरी सांगावं ‘शारदा बँन्क बुडतेय.माझे पैसे बुडणार.‘. येरझारा घालताना राजाभाऊ स्वत:शीच बोलत होता.एवढ्यात त्याला गवाणकर येताना दिसले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.गवाणकरांना तरी सारं सांगता येईल या विचाराने तो पुढे आला.
"गवाणकर.." या आपल्या नेहमीच्या आवाजाने राजाभाऊने हाक मारली.
" राजाभाऊ,आता फार घाईत आहे .उद्या येतो ".गवाणकर तसेच बाहेरून निघाले.
"अहो ,गवाणकर,पाच मिनीटे तरी या "
"नको राजाभाऊ प्लीज ."राजाभाऊच्या विनंतीला मान न देताच गवाणकर सटकले.
वागळेही तसेच न थांबता निघून गेले.
रानड्यांना येताना पाहून राजाभाऊला धीर आला.रानड्यांसमोर मन मोकळं करता येईल हा विचार त्याच्या मनात येत असतांनाच नातवाला शाळेतून आणण्याची सबब पुढे करुन रानडेही निघून गेले.सावंताना भाजी आणण्याची घाई होती.त्यामुळे रात्री जेवून बसू असे आश्वासन देऊन सावंतही निघून गेले होते.
खूप वाट पाहूनही राजाभाऊला कुणीही भेटले नाही.एरव्ही तासनतास गप्पा मारून आपलं दु:ख हलकं करणारे सारे आज मात्र राजाभाऊचं एकण्याला हजर नव्हते .राजाभाऊ अक्षरश: रडकुंडीला आला. आपलं मन मोकळं करावं , आपलं दु:ख कुणा पुढेतरी हलकं करावं , आपल्याही दु:खात कुणीतरी वाटेकरी असावं असं राजाभाऊला खूप खूप वाटू लागलं .पण कुणीही त्याला भेटू शकले नाही.दु:खी मनाने तो माजघरात आला.आजारी आई काँट्वर झोपलेली होती.तिच्या पायाजवळ तो बसला.
‘आई ,मुंबईतून आणलेले पैसे ज्या बँन्केत ठेवले होते ती बँन्क.. ’...आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. एवढे दिवस दाबून ठेवलेले अश्रू डोळ्यातून भळाभळा बाहेर पडले.बिनधास्त ,स्वच्छंदी ,उद्याची तिळमात्र तमा न बाळगणारा राजाभाऊ, आईच्या पायाजवळ बसून मनसोक्त रडला.
घरा बाहेर आला तेव्हा राजाभाऊला खूप हलकं हलकं वाटलं.अंगणात ठेवल्या आरामखुर्चीत तो रेलला.त्याला खूप काही बोलयचं होतं..आभाळाकडे नजर टाकत, डोक्यावर हात ठेवून आभाळाकडे तो शांतपणे पहात होता.समोरच्या खुर्च्या रिकम्या होत्या.अंगण अगदी सामसूम होतं. परदु:ख शीतल असतं हे वेगळं सांगण्याची आता गरजच उरली नव्हती.

लेखक -सुनिल पाटकर
.........................................................समाप्त.......................

न थांबणारा पाऊस

तुझ्या अंगणातला पाऊस
माझ्या अंगणातला पाऊस

शेतात मरमर राबणा-या
ढवळ्या-पवळ्याचा पाऊस

टोपलीतून भाकरी आणणा-या
अनवाणी पावलांचा पाऊस

एका छत्रीत भिजलेल्या
अनेक प्रेमकथांचा पाऊस

रानफूलांच्या वाटेवर
हरवून गेलेला पाऊस

वाफाळलेल्या चहाच्या कपात
चिंब भिजलेला पाऊस

डोक्यावरून घेतलेल्या रजईत
दडून बसलेला पाऊस

पाण्यात भिरभिरणा-या
कागदी होड्यांचा पाऊस

गरागरा फिरणा-या
इवल्याशा छत्रीतला पाऊस

पावसात मनसोक्त भिजणारी
चिमुकली मुलं पाहिली की
आठवतो मला तो पाऊस

आभाळा एवढा डोंगर
कवेत घेऊन आलेला पाऊस

डोंगराखाली गाडलेले ते,
इवलेसे जीव आठवले की
माझ्याही डोळ्यातून बरसतो
न थांबणारा तो पाऊस

सुनिल पाटकर (५-८-२०१०)

शनिवार, ३१ जुलै, २०१०

एक भटकंती अशीही

.
सोनलीकोंडला आम्ही सकाळी ८ वा पोहचलो. आंबिवली गणी आदिवासी वाडीवर चालत जायला तेथून रस्ता होता.गावातील एका घराच्या अंगणात आम्ही दुचाकी उभी केली.गावक-यांनी दाखवल्यानुसार आम्ही गणीचा रस्ता धरला.माझा मित्र सामाजिक कार्यकर्ता होता,त्यांनी आणि मी गणीवर जाण्याचा बेत आखला.सकाळी बिस्किटे व चहा एवढ्याच आहारावर मी घरच्या बाहेर पडलो.गणीला जाण्याचा मार्ग काट्याकुट्यातून ,डोंगरातून होता.पहिल्याच पाऊलवाटेवर सापाचे दर्शन झाले.वाटेवर मोरांची पीसे पडलेली दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यांने थोडं जरी चालले तरी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.पाया खालचा सुका पालापाचोळा करर्कर वाजत होता.जंगलात गावक-यांनी गुरे मोकाट सोडलेली होती.मित्रा सोबत गप्पा सुरू असल्यांने चालणे पटकन होत होते. घामामुळे मी शर्टही काढून टाकला.डोंगर चढून झाल्यावर आम्ही एकदम पठारावर पोहचलो .आणि एकदाच आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन झाले.तेथील एका मोठ्या वृक्षाच्या गर्द सावलीत बसून आम्ही थोडी विश्रांती घेतली , पठारावर वाहाणारा वारा अंगावर घेतला आणि तिथून गणीचं जीवनमान पाहिले.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणारा भारत महासत्ता बनू पाहत आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे; परंतु इतक्‍या वर्षांनंतरही महाड तालुक्‍यातील आंबिवली गणी या आदिवासी वाडीवर कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या नाहीत. रस्ता, वीज, शाळा, घरकुले अशा सोईंपासून दूर असणारी ही वाडी सुवर्णमहोत्सव साजरा करणा-या महाराष्ट्रासाठी एक धक्काच आहे. हे मला स्पष्ट जाणवले.या माझ्या भटकंतीत मला जे जाणवले ते येथे मांडतोय.




. सरकारच्या आदिवासींसाठी अनेक योजना आहेत; परंतु आंबिवली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गणी ही आदिवासीवाडी या योजनांपासून शेकडो कोस दूर आहे. दुर्गम भागात वसलेल्या या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता सोडाच; पण कच्चा रस्ताही नाही. चोचिंदे व सोनाली कोंड या दोन ठिकाणांहून वाडीवर जाता येते. वाडीवर जाणारी वाट डोंगराळ, निसरडी आहे. थोडासा जरी पाय सरकला तरी खाली घसरण्याची भीती आहे. दगड व काट्याकुट्यांतून जाणा-या या वाटेवर भरपूर सापही आहेत. डोंगरातील या वाडीवर जाण्यासाठी एक तास पायी प्रवास करावा लागतो. याच वाटेवरून आदिवासी, त्यांच्या महिला व लहान मुले ये-जा करतात. शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात; परंतु या वाडीला साधा कच्चा रस्ताही नाही. .
.एक वृद्धा लाकडाच्या मोळ्या बांधत होती.झोपड्यांत लहान मुलं , आदिवासी महिला ओल्या काजुबिया सोलत होत्या , उदरनिर्वाहासाठी कै-या, काजूच्या बिया, लाकूडफाटा गोळा करून, तो महाडच्या बाजारपेठेत विकायला आणला जातो. प्रचंड मेहनतीनंतर चार पैसे त्यांच्या हाती लागतात .या वाडीवर 12 कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांची आठवी पिढी येथे राहत असल्याचे समजले. वाडीवर सरकारी योजनेतील एकही घरकुल नाही. गवताचे मंडप तयार करून, कुडामेढ्याच्या घरात आदिवासी राहत आहेत. काहींनी तर चक्क उघड्यावर आपला संसार थाटलेला आहे. इंदिरा आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नाही. गावोगावी, वस्तीवस्तीवर शाळा हे सरकारचे धोरण; पण या वाडीवर शाळा नाही. मुलांसाठी अंगणवाडी अथवा प्राथमिक शाळा नाही. पायथ्याशी असणाऱ्या चोचिंदे व सोनाली कोंड या शाळांमध्ये लहान मुले चालत येऊ शकत नाहीत.
वाडीवरील काही मुले रत्नागिरी जिल्ह्यातील लाटवण व महाडमधील रेवतळे येथे शिकतात; परंतु तेथूनही काही पळून येतात. मुलींना शिक्षणच नाही. वाडीवरील मुलींचे शिक्षण झालेले नाही.पाच मुले शाळेतून बाहेर पडलेली आहेत. शिक्षण नसल्याने पुढच्या पिढीची प्रगतीही थांबलेली आहे.मुलामुलींची लग्न लवकर केली जातात. तालुक्‍यात 100 टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा "महावितरण' करीत असली तरी या वाडीवर कायम अंधार असतो. वीज सोडाच; परंतु विजेचे खांबही वाडीच्या जवळपास नाहीत. पाण्याची सोय एक किलोमीटर अंतरावर. तेथून पाऊलवाटेने त्यांना पाणी आणावे लागते.लहान मुलं डोक्यावरून पाणी आणतांना मी पाहिले. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटल्यावर आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगराळ पठार असल्याने पावसाळी येथे शेती अथवा आंबा, काजू लागवडही होऊ शकते; परंतु शेती अवजारे, बैलजोडी, बियाणे, लागवडीसाठी मदत या सोई-सुविधा आदिवासींपर्यंत पोचत नाहीत. सरकारी अधिकारी वाडीवर कधी जात नसल्याने आदिवासींच्या अडचणी व गरजा यांची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही.
वाडीवरची सारीच परिस्थिती भायावह अशी होती.माझ्या मित्राने वाडीवर आदिवासी कुटुंबाच्या नोंदी व इतर सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले.तब्बल ३ तासानंतर आम्ही वाडीवरुन खाली उतरलो.परततांना आदिवासीं बांधवांनी दिलेल्या कै-या आमच्या सोबत होत्या.स्वत:विक्रीसाठी ठेवलेल्या कै-यातील काही कै-या त्यांनी आम्हाला फुकट दिल्या.आग्रह करुनही त्यांनी पैसे घेतले नाही.रस्ता, वीज, शाळा, घरकुले कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या या वाडीवर इतकी माणुसकी मात्र पोहचली होती.

बुधवार, २८ जुलै, २०१०

राजे

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे,यांना शहाणे समजू नका,
हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी,
तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो,
आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला,
ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,
तुमच्या राजेशाहीसमोर
माझा माथा टेकवतो.
राजे, चला
मी तुम्हाला
तु तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

दैवी चमत्कार `वाळणकुंड `


कोकणात निसर्गाचे तसेच अनेक दैवी चमत्कार पहावयास मिळतात. काही चमत्कार तर तोंडात बोटे घालायाला लावणारे असतात.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण अशाचा एक चमत्काराचे प्रतीक मानावे लागेल.खास माशांसाठी प्रसिद्ध असलेले वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते.खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात.येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत.पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही .नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात .माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात.माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते.लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते.या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे.वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात.येथील मासे कोणीही कधीही मारत नाही महाड़ पासून सुमारे २० कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे .थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात.झूमचा कँमेरा असेल तर फूलपाखरांना कँमेर्‍यात बंद करता येईल.पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात.ही फूलं पाहतांना जाईन विचारीत रानफूला ‘ हे गाणे आठविल्या शिवाय रहात नाही.येथे थेट वाहन जाते.चालण्याची अजिबात गरज नाही.

तर वाट कसली पहाताय ...चला निघा वाळणकुंडीला ...... येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड , शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते.ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.

अप्रतीम गांधारपाले लेणी


मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात
कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर्व १५०-२५० या कालखंडात गांधारपाले गावाचा उल्लेख पालीपट्टण अस होत असे. डोंगरात दोन स्तरामध्ये ही लेणी खोदलेली आहे.लेण्यांच्या मूळ रेखांकनावरून लेणी हिनयान काळातील असल्याचे इतिहास तज्ञांचे मत आहे.लेण्यातील सर्व खोल्यांची संख्या २९ आहे.पहिल्या वरच्या स्तरात १ ते २० आणि दुसर्‍या स्तरात २१ ते २९ अशी लेणी आहेत.सर्व लेणी पूर्वार्भिमुख आहेत.लेण्यात बसण्यासाठी दगडी बाके तयार केलेली दिसतात.२/४ खोल्या मिळून पाण्याची व्यवस्था केलेली पहावयास मिळते.ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, अनेक लोकांना बसता यावे या साठी भव्य सभागृह या लेण्यात आहे.लेण्यांच्या काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेख पहावयास मिळतात.लेणी क्र.१ मध्ये भव्य सभागृह आहे.एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायावर धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे.दोन्ही बाजूस दोन चामरधारी व वरच्या बाजूस दोन विद्याधर आहेत.यावर मकरतोरणाचे नक्षीकाम आहे यालेण्याच्या पुढील भागात पाण्याची तीन टाक्या आहेत. लेणी क्र.९ हे लेणे चैत्यगृह असून येथील सर्वात लक्षवेधी वास्तुशिल्पकाम येथे दिसून येते.या लेणीत एक शिलालेख आहे.राजपुत्र कान्यभोज, विष्णूपनीत असे नामोल्लेख आढळतात.लेणी क्र.२७ मध्ये प्राकृत ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखात वादसिरी.संघरखित ,गृह्पती श्रॆष्ठी या व्यक्ती नामांचा समावेश दिसतो. खोल्या सभागृह,दिर्घिका, स्तंभ ,
अर्धस्तंभ ,.चैत्यगृह ,शिलालेख ,ओटे, वेलबुट्टी ,नक्षीकाम.लहान मोठी प्रवेशद्वारे,भोजनगृह,स्तूप,गाभारा,दगडी पाण्याची टाके,प्रतीमा,असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.पर्यटक ,अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत.महामार्गावर असल्याने येथे यायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत.पावसाळ्यात लेण्यांच्या वरून पडणारे धबधबे ,समोर सावित्री-गांधारी नद्यांचा विस्तिर्ण जलाशय...हे दृश्य ही मनमोहक असते.कोकणात ,रायगड ,महाबळेश्वर नाहीतर गोव्याकडे जातांना थोडावेळ इथे थांबा आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा सुंदर नमुना पाहून जा.

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ कि।मि.चा अतिशय सुन्दर,स्वछ आंणि सुरक्षित किनारा लाभाला आहे.या किनार्‍यावर केवाड्याची बने आहेत .या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे.सुवर्ण गणेश सापडलेल्या बागेत मराठीतील पहिला ताम्रपट सापडला आहे .येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते .येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत.अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनासाची फळे पहावयास मिळतात .दिवेआगारचे नारळपाणीही दिवेआगारमध्ये माघ.शु.चार ला गंणेश जन्मोस्तव तर सुवर्ण गंणेशाचा प्रकटदिन कार्तिक वद्य ४ ला साजरा होतो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे
...............................
.Diveagar Beach  and Suvarnaganesha Temple:

Diveagar Beach is located approximately 170 kilometers south of Mumbai. The beach is accessible from the Mumbai-Goa highway
Diveagar beach is or approximately six kilometers long. At one end of the beach is a fishing settlement, while the other end has a sanctuary of migratory seagulls.
The beach contains a number of Suru trees (Casuarina), which are common to coastal Maharashtra. The access to the beach has a dense cover of Belu trees, which are otherwise uncommon in the area.
Another major attraction in Diveagar village is a temple of Lord Ganesh. The idol has a mask which is made of pure gold. This mask was discovered by Mrs Patil, a few decades back buried along with other treasure in a thick copper trunk in her beetel farm, opposite Abhynkar's House.
Diveagar is a popular beach destination along with nearby towns of Shrivardhan Origin of the Peshwas and Harihareshwar.
Sand Bubble Crabs can be found on the beach and at nearby Harihareshwar one can find Dolphins.

आजीची भातुकली


भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात.
पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत. त्याच्याकडे १ हजाय २५०
भातुकलीची खेळणी .लहान चूल ,घुसळण,पाटा-वरवंटा,पोहरा ,उखळ,ताक घुसळणारी बाई ,दळणारी बाई,पाण्याचा बंब,अडकित्ता,दूध ठेवण्याचे कपाट.सागर्गोते, सारिपाट .काचपाणी.बिट्या, डबा ऐसपैस असे खेळ
पहावयास मिळतात.विलास करंदीकर अनेक ठिकाणी आजीची भातुकली नावाने या वस्तूंचे प्रदर्शन भरवत असतात.गिनिज बूक व लिम्का बूकने याची दखलही घेतली आहे.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस।पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.लहानपणीच्या ईवल्याश्या छत्रीत....मित्रांसोबत सोडलेल्या कागदी होड्यांत..., तरुणाईत धबधब्याखाली लुटलेल्या त्या मजेत...असा हा पाऊस॥कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गँलरीत मनसोक्त धडकणारा.सृष्टीला नवचैतन्य देणा-या प्रत्येकाला वेड लावणा-या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडले असेल तर ते कवीने. आपल्या सुंदर शब्दामध्ये पावसाला बंदिस्त करण्याचे धाडस फक्त हा कवीच करु शकतो.म्हणूनच मराठी कवितांमध्ये, गाण्यांमध्ये या पावसाची विविध रुपं उलगडत गेलेली दिसतात. पाऊस जसा वर्षानुवर्षे पडतोय ,पडत राहणारही आहे तसतसे हे बालगीतही प्रत्येकला आपल्या बालपणात भेटत राहील.
येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा
हे बालगीत लहानपणापासूनच मनात पक्क बसतं.हे बालगीत गुणगुणतच आपल्याला पावसची ओळख होते.शाळेत जातांना पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद कायम रहावा आणि शाळेला सुट्टी मिळावी यासाठी बालमने
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

अशी आर्जव करतात. बालमनातील ही इच्छा पाडगावकरांनी किती अलगद पकडली आहे पहा.मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेत
जांभळासारखे पिकून आले,
ढग हे टपोरे झुकून आले.
सरी नी सरी झडेल रे,
पाऊस पाऊस पडेल रे.
असे पावसाचे वर्णन केले आहे.तर पावसाळी वातावरणाची शब्दरूपी मांडणी बा.भ.बोरकरांनी फार सुंदररित्या केली आहे.
गडद निळे, गडद निळे जलद भरून आले
शितल तनू, चपल चरण ,अनिल गण निघाले.

बोरकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे. पावसाचा आनंद जितका लहान मुलांना होतो तितकीच काळजी घराबाहेर पडलेल्या आपल्या पतीची एका पत्नीला असते.प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे जाणवणारे हे दृश्य कवी अनिल यांनी फार सुंदर रेखाटले आहे.

बाई या पावसानं लावली झिमझिम
भिजली की माळरान ,उदासल मन ,
नदी नाले एक झाले ,पूर भरूनीया आले
जीवलग पडे बाई कुठे अडकून,
नच पडे चैन बाई य जीवाला

एका बाजूला पतीची काळजी करणारी व्याकुळ पत्नी तर दुसरीकडे पावसात मनसोक्त भिजण्या-या तरुणीचा ओसंडून वाहणारा आनंद शांता शेळके यांनी शब्दामध्ये अगदी सहज पकडला आहे.

आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं.

मुसळधार पडणारा हा पाऊस गुलाबी असा गारवा घेऊन येतो आणि या गारव्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा अनावर होऊन जाते.आद्य कवियत्री बहिणाबाईंनी प्रत्येकाच्या मनातील इच्छा केव्हाच ओळखली.आणि ती शब्दात पकडूनही ठेवली.

येता पाऊस पाऊस .पावसाची लागे झडी
आता खा रे वडे , भजे
घरामध्ये बसा दडी
बहिणाबाई पावसाबद्दल पुढे असं म्हणतात.

देवा पाऊस पाऊस , तुझ्या डोयातले आस
देवा तुझा रे आरास, जीवा तुझी रे मिरास

नव्या दमाचे कवि संदीप खरे यांनी पावसाला आगदी सुंदर सोप्या भाषेत शब्दबध्द केलय

गोष्ट सुरू होईल ,तेव्हा सुरू झाला पाहिजे
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे.

असा हा पाऊस..अनेक कवींना जसा तो दिसला ,भावला त्यांनी अनुभवला तसा तो त्यांनी शब्दबध्द केला.असा हा पाऊस..कधी अचानक गायब होणारा , बळीराजाला आभाळाकडे पहायला लावणारा तर कधी सारे काही जलमय करून टाकणारा.कुणाला तो हवाहवासा वाटतो.. तर कुणाला कंटाळवाणा.विद्यार्थ्यांची शाळा बुडवणारा..तरुणांना प्रेमात पाडणारा ,वृद्धांना गारठवणारा तर आईला काळजीत टाकणारा.त्यांने अनेकांना सावरलं तर अनेकांना उध्वस्तही केलं. असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल.

शनिवार, २४ जुलै, २०१०

नयना

एक लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि।व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आणि त्यांची उत्तरे यांनी हा छोटा पडदा व्यापून गेला होता.आणि त्याही पेक्षा, कित्येक पटीने आँफिसमधल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचे पडदे तिने काबीज केले होते.दिवसभर लोकल मध्ये लोंबकळणारे,बसच्या रांगेत तासनतास उभे राहून प्रवास करणारे , गळ्याला टिफिन अडकवून आँफिसला पळणारे माझ्यासारखे अनेकजण ,त्यांची अनेक वर्षे उराशी असणारी स्वप्नं या गाडीने पुन्हा जिवंत केली होती.बाकी आम्ही मध्यमवर्गीय... ! स्वप्नांवर जगणारे ,स्वप्नातच रममाण होणारे !स्वप्नात आम्ही कधी तेंडूलकर होतो आणि सामना जिंकून देतो. कधी आम्ही अमिताभ होतो आणि ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता ’असे म्हणत स्वाभिमानी होतो.एखादी सुंदर तरूणी आमच्या प्रेमात पडते तिला आम्ही ताज मध्ये जेवायला.स्वप्नात !.नाहीतर माँरिशीसच्या एका रमणीय बेटावर निवांत झोपून ज्यूस पितो हे देखिल स्वप्नातच ! पण आम्हा मध्यमवर्गीयांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून देणाचं काम केलं ते नितीन छ्ड्डाने ! छोट्या का होईना पण,स्वत:च्या कारमध्ये आपल्या पत्नीमुलांसह बसण्याचं भाग्य मिळणार होतं.खरंतर ही कल्पनाही पुढील काही दिवस सुखात जगण्यासाठी आम्हाला पुरेशी होती.तसा माझा संबंध लहानपणीच काय तो गाड्यांशी आला होता.काका मामांनी आणून दिलेल्या जत्रेतील त्या छोट्या गाड्या फिरवता-फिरवता मी लहानाचा मोठा झालो.अगदी माझ्यासारख्या इतर मध्यमवर्गीयांसारखा !.पण ,टि.व्ही वर अनेक दिवस दिसणार्‍या त्या छोट्याशा गाडीने लहानपणीची आवड पुन्हा मनात निर्माण केली होती.तिच नावही अगदी सुंदर होतं ‘ नयना ’खरंच !नितीन छ्ड्डाने आम्हा मध्यमवर्गीयांना गाडीत बसविण्याचा विचार जर केला नसता तर आँफिस बाहेर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी गाड्या पाहण्यात आमचं उभं आयुष्य गेलं असतं.!गेले दोन दिवस टि.व्ही वरच्या त्या बातम्या मीही पहात होतो.एकदाची पिवळ्या रंगाची नयना मला दिसली.पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि मनाशी पक्का निश्चय झाला , नयनाला घरी आणायची .गाडी अगदी रोडवर येईपर्यंत दिडलाख गेले तरी चालतील पण, नयना दारात उभी राहिलीच पाहीजे ! गाडीत बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे !तसं लहाणपणापासूनच मला गाड्यांचं खूप आकर्षण. माझ्या एका मित्राच्या वडिलांची त्या काळी गाडी होती.त्या गाडीतून मित्राबरोबर शाळेत जाण्याचा योग कधी - कधी यायचा.सुट्टीत त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद गाडीत आम्ही खेळतही असू.माझ्या वह्यांमध्येही गाड्यांचे फोटो असायचेत्या वेळी गाड्या कमी होत्या. पण काँलेजला गेल्यावर ही आवड वाढली.मी चारचाकी चालवायला शिकलो.आयुष्यात एकदा तरी गाडी घ्यायची,त्यातून मनसोक्त फिरायचं आणि वाटलं तर नंतर विकून टाकायची.पण,गाडी घ्यायचीच ! गाडी घेण्याची इच्छा अजूनही कायम होती.परिस्थिमुळे शिक्षण अर्धवट राहिले.सुदैवाने मुंबईत चांगली नोकरी मिळाली.माझ्या कार्यालयात माझ्या सारखे अनेक जण होते नी ते सुद्धा ही लाखाची गाडी घेण्यासाठी उत्सुक होते.आमच्या कार्यालयात ही नयना एक चर्चेचा विषय झाली होती.देसाई म्हणाला "बापट,बायकोला कालच बजावलय आपल्याला कुठलंही व्यसन नाही,आता तु विघ्न आणू नकोस ,मी गाडी घेणार आहे."तर सुर्वे कार्यालयामध्ये पहिली गाडी आपली असणार हा निश्चयच करून आला होता."पण,त्याने प्रदुषण हूणार आहे .पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे " गोडबोले मँडम फाईलमध्ये डोकावत म्हणाल्या.त्यांच्या या वाक्यावर माझा पारा चढला." कसलं आलयं प्रदुषण ? बाकीच्या गाड्यांनी काय प्रदुषण होत नाही.गरीबांची गाडी आली ना, मग पार्किंग काय , प्रदुषण काय ? सारं काही दिसेल .हे श्रीमंतांचे शोध , त्यांनीच फक्त गाड्या चालवायच्या काय ?"माझा राग पाहून सारे थोडावेळ गप्प राहिले." हे अगदी बरोबर बोललात आण्णा " शिंदे शिपाई ओरडला.आँफिस,ट्रेन, बस, सोसायटीमध्ये या एक लाखाच्या गाडीची चर्चा रंगत होती.घरीही माझ्या डोक्यातून हा विषय जाईना."हे बघ काय लिहिलयं पेपरात,म्हणे या गाडीचा आवाज मोठा आहे" एवढ्या मोठ्या पेपरात माझं लक्ष त्याच बातमीकडे गेलं."काय झालं मोठा आवाज असेल तर ? ट्रक ,डंपरच्या नसतो मोठा आवाज "माझ्या या बडबडीकडे बायको शांतपणे पहात होती.माझा त्रागा पाहून ती म्हणाली "तो गाडीचा विषय सोडून इतर विषयांवर बोलाल का तुम्ही.घर नाही ,आँफिस नाही बघावं तेव्हा गाडी गाडीन गाडी.थोडं मन शांत ठेवा ."बायकोचा आवाज ऐकून मी थोडा शांत बसलो .थोड्यावेळानं मी तिच्या जवळ बसलो." तुला काय वाटतं आपण नयना घ्यावी ?माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं स्वत:च्या गाडीत बसायचं " माझा चेहरा पाहून बायको हसली."कैवल्य पण करत नव्हता कधी असा हट्ट.तसं तुम्ही इतके वर्षात स्वत:साठी काहीच केलं नाहीत. तुम्हाला आवडली आहे ना, घ्या गाडी. पण,पैशाचं काय?""आहेत पैसे. रिमाचं लग्न झालयं , ती जबाबदारी आता नाही ,ब्लाँकचे हप्ते संपलेत .रिमाच्या लग्नाला अपेक्षेपेक्षा कमी खर्च आला. मी पैसे काढून ठेवलेत बाजूला ,आपली ओढाताण होणार नाही."माझ्या बोलण्यावर ती सुखावली.माझ्या मनाची तळमळ तिला कळली होती." हे बघा, आता गाडी घ्यायची नक्की झालयं.यापुढे घरी ,बाहेर ,टि.व्ही वर गाडीचा विषय बंद.बुकिंग सुरू होईल तेव्हाच या विषयावर बोलायचं,समजलं ?"बायकोने हसतहसतच मला दम दिला.त्यानंतर गाडीचा विषय आमच्या घरी क्वचितच निघे.दरम्यान गाडीसाठी लागणारे दीड लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले. माझी नोकरी ,त्यात ब्लाँकचा हप्ता मुलांची शिक्षण ,प्रपंचाच्या या रगाड्यात गाडी घेण्याचा विषय कधिच मागे पडला होता॥पण आता सारं स्थिरावलं होतं मुलगा इंजिनिअर झाल्यावर अंधेरीच्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागला होता.भावाची मुले स्थिरावल्याने गावीही पैसे पाठविण्याची चिंता नव्हती.कैवल्य नोकरीला लागल्याने माझाही प्रापंचिक भार कमी झाला होता.त्याच्या इतर मित्रांप्रमाणे तोही अमेरिकेला जाण्याच्या मन:स्थितीत होता.आम्ही गावाहून तालुक्याला ,तालुक्याहून मुंबईत आलो.आताची पिढी मुंबईतून अमेरिकेला जाण्याआठी उत्सुक आहे.नेटवर बसून कैवल्यचे काहीनकाही सुरू असायचे.परदेशी नोकरीसाठी नेटवरून तो बायोडेटा पाठवित असे.त्यांने घरी न सांगताच पासपोर्टही काढला होता. पासपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळलं आमचे चिरंजिव परदेश गमनाची तयारी करत आहेत ! एक दिवस आपला मुलगा सातासमुद्रा पलिकडे जाणार हे मी माझ्या मनाला समजावलं होतं.आँफिसमधील सहकारी म्हणायचेही "बापट ,रिटार्यमेंट्नंतर अमेरिकेत जाण्याचा योग आहे तुझ्या नशिबात." आणि माझी मान अभिमानाने उंचावायची.बरेच दिवस मागे पडलेला नयनाचा विषय पुन्हा अचनक चर्चेत आला तो नयना शोरुमला आल्याने ! ‘नयना शोरुमला दाखल ’ अशा बातम्या वृत्तपत्रात झळकल्या आणि गाड्यांची शोरुम गर्दी खेचू लागली.फक्त एक लाख लोकांनाच नयना मिळणार म्हणून माझ्या सारखे अनेक जण हिरमूसले.शेवटी इथेही नशिबाचा भाग होताच.बायकोला नेऊन नयना दाखविली.तिला गाडी आवडली.चांगला गुरुवार पाहून ३ हजार रुपये भरून नयना बुक केली.माझ्या आयुष्यातील तो एक आनंदाचा क्षण होता.पण त्या बरोबर एक काळजीही होती एक लाख लोकांत आपला नंबर लागेल ना ?.पण , बायकोने दिलासा दिला ".इतकी वर्षे गाडीच स्वप्न पाहताय, आपल्याला गाडी नक्की मिळेल."बुकिंगनंतर काही दिवस पिवळ्या रंगाची ती इवलिशी नयना मला डोळ्यासमोर सारखी दिसत असे.सहा महिन्यात नयना आपल्याला खरेदी करावी लागेल याचा अंदाज बांधून मी पैशाचे नियोजन केले होते .पावसाळ्यातील चार महिने बघताबघता निघून गेले आम्ही गाडी बुकिंग केल्याची बातमी सर्व नातेवाईकांत वार्‍यासारखी पसरली होती.अन एक दिवस कैवल्यने घरी बाँम्ब्च टाकला."पप्पा ,मला जाँब मिळतोय यु.एसला ,काय करू ?"त्याच्या या वाक्यावर मी आणि पत्नी त्याच्याकडे पहातच बसलो." सकाळी सकाळी गंमत करू नको कैवल्य" त्याच्या आईने त्याला सुनावलं."गंमत नाही करत मी खरंच मला जाँब मिळतोय ."त्याच्या वाक्याने आमचे चेहरे आनंदाने फुलले.या आनंदामागे थोडं दु:खही दाटलेले होते." काय करू काय विचारतोस ?जायचं .""पप्पा, जास्त नाही तीन-चार वर्षे तिकडे जाँब करून इकडे येईन." आमची मन:स्थिती कैवल्यला कळली असावी म्हणूनच तो असं बोलला. त्याच्या बोलण्यानं मला दिलासा मिळाला." काय जाँब आहे ?""पप्पा, उद्या इंटरव्ह्यू आहे फोर्टला,मोठी कंपनी आहे.त्यानंतर सर्व काही ठरेल."" बेस्ट लक ,तू जा.फक्त सर्व माहिती नीट घेऊन ठेव."" त्याची काळजी करू नका ,फक्त मम्मीला समजावा."" नक्की ,ते तू माझ्यावर सोड "मी आत्मविश्वासानं सांगितलं.कैवल्यला परदेशात नोकरी मिळणार या कल्पनेने माझी छाती अभिमानाने फुलून आली होती.त्याच्या आईला मात्र वाईट वाटलं होतं.आत्तापर्यंत शेजारीपाजारी आपला नातेवाईक अमेरिकेत असल्याच्या फुशारक्या मारायचे.आता मीही फुशारक्या मारायला तयार झालो होतो.कैवल्यचा इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला.आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला यु.एस.मध्ये जाँब निश्चित झाला.पगारही भलाभक्कम होता.इतर सोयी सवलतींची तर सरबत्ती होती.परंतु तरिही कैवल्य नाराज होता.मोठ्या उत्साहासाने इंटरव्ह्यूला गेलेल्या कैवल्यचा उत्साह मावळलेला दिसत होता.शेवटी न राहवून मी त्याला विचारलं." का रे नाराज तू ? एवढा चांगला जाँब आहे ना ?""पप्पा, जाँब चांगला आहे.तिकडे गेल्यावर पैसेही खूप मिळतील पण तिथे जाण्यासाठी कमीतकमी दोन लाख रूपयांची गरज आहे.आणि एवढे पैसे म्हणजे ?...."हताश झालेला कैवल्य पुढे काहीच बोलला नाही.शेवटी मी त्याची समजूत काढली."अरे, पैसे लागणारच ,पेरल्या शिवाय थोडंच उगवणार.आणि पैसे काय फुकट जाणार आहेत.हे बघ पैशांची तू काळजी करु नकोस.तयारीला लाग .""पण ,पप्पा...."" आता म्हटलं ना तयारीला लाग ." त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो. आणि कैवल्यचा चेहरा हास्याने उजळला.कैवल्य परदेशी जाणार म्हणून ही थोडी दु:खीच होती.परंतु मी तिला समजावलं. ‘ मुलाच्या भवितव्याच्या आड भावना आणू नकोस ’असं सांगितल्यावर ती थोडी सावरली होती.एक दिवस तिने मला अचानक विचारलं " पैशाचं काय करणार आहात तुम्ही ?"तिच्या वाक्यावर मी हसलो."हसून प्रश्न सुटत नाहीत." ती म्हणाली.’ अगं ,तू असं विचारतेस की सगळे पैसे संपले.""तसं नाही पण तयारी तर करायली हवी.""बँन्केत आहेत ,काही एफ़.डी.मोडायला लागतील.आज उद्या त्या मोडीन ." माझ्या वाक्यावर तिला थोडं बर वाटलं." आणि गाडीचं काय करणार ?समजा नंबर लागला तर ?"तिने माझ्या वर्मावरच बोट ठेवलं.जो विषय मी टाळतं होतो तो तिनं अचूक काढला."गाडीचं काय ?नंतर बघू.रिटायर्ड झाल्यावर घेऊ."" अहो, पण तुमचं स्वप्न ?"" मुलांच्या स्वप्नांपुढे आपली स्वप्ने काय महत्वाची ?तसं त्या गाडीचा विषयही मागे पडलाय.मी गाडीसाठी ठेवलेली दिड लाख काढतो.थोडी भर करू. कैवल्यला चांगली संधी आलेय.ती वाया जाता कामा नये."बायको माझ्याकडे बघतच बसली."बघतेस काय अशी, आपण मध्यमवर्गीय , आपल प्रपंच हेच आपलं सुख, मुलांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने महत्वाची असतील ,तर मी स्वार्थी नाही का? " माझ्या मनातल्या भावना तिला कळल्या होत्या.आठ-दहा दिवसातच मी पैशाचा बंदोबस्त केला.नयनासाठी ठेवलेले पैसे आणि एफ़.डी.मोडून मी सर्व पैसे घरी आणले.आणि कैवल्यची जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली.एफ़.डी.मोडताना एक लाखाची ती देखणी पिवळी गाडी माझ्या डोळ्यासमोर येत होती.गेले चाळीस वर्षे पाहात आलेलं स्वप्न हवेत विरून गेलं .ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येणंही कठीण होतं.पण , त्याचवेळी एक नवीन स्वप्न डोळ्यात आकार घेत होतं...माझ्या मुलाच्या २५ लाखाच्या गाडीत बसण्याचं !


लेखक - सुनिल पाटकर
.....................

प्रपंच दिवाळी अंक २००९ मध्ये आयोजित केलेल्या शिर्षक कथा स्पर्धेत माझ्या नयना कथेची ६५० कथांमधून निवड झाली.











......

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

भ्रष्टाचाराची पाळेमूळे
भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ‘ चलता है ’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही. काही भ्रष्टाचाराचे किस्से मला दिसलेले आपणा समोर ठेवतोय .....कृपया हे वाचून ‘ चलता है ’ म्हणू नका.
भारत निर्माण
भारत सरकारची एक अभिनव योजना आहे भारत निर्माण .! टि.व्हि वर वृत्तपत्रात या योजनेच्या अनेक जाहीराती झळकतात.पाणीपुरवठा हा यातील एक मुख्य भाग. ज्या गावांना कमी पाणीपुरवठा होतो. टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, प्रदुषणामुळे पाणीपुरवठा खराब झालेली गावे अशा गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी आखलेली ही योजना. केन्द्र सरकारचा भरपूर पैसा असल्याने तो संपवण्याकडे राज्याचा कल असतो त्यामुळे नियमात नसलेल्या गावांचाही या योजनेत समावेश केला जातो. पुरेसे पाणी व अगोदरच एक पाणीपुरवठा योजना असतांनाही गावांसाठी दुसरी योजना ही घेतली जाते. योजनेसाठी अगाऊ निधी ग्रामपंचायत अथवा पाणीपुरवठा समीतीकडे जातो.हा पैसा खात्यातून काढला जातो, स्वत:साठी वापरला जातो आणि योजना अपूर्ण रहाते.या योजनेसाठी लोकसंख्या मुख्य अट आहे .गावाची सध्याची लोकसंख्या यात पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरली जाते. माणशी २३६०/- रुपये या प्रमाणे योजनेचे अंदाजपत्रक तयार होते. एखाद्या गावाची लोकसंख्या १०० असल्यास १०० x २३६० =२३६०००/- रुपये एवढी योजनेची किंमत होते.
भ्रष्टाचाराचा किस्सा --
ही योजना राबविणार्‍या एका गावाची लोकसंख्या ३०० आहे. परंतु गावातील पुढारी ,ठेकेदार .सरकारी अधिकारी हुशार ! त्यांनी लोकसंख्या वाढविली शिवाय गावात पहाण्यासाठी दगडगोटे या शिवाय काहिही नसतांना गावात हजारो पर्यटक येतात असे दाखवून लोकसंख्या अजून वाढविली आणि योजनेची किंमत १ कोटी १२ लाख रुपये इतकी केली.जी योजना २०-२५ लाखात झाली असती तिला तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्च दाखवला.सरकारी अधिकारी व नेते यांच्या संगनमताने योजनेला मंजूरी मिळाली.पण हे गौडबंगाल काही जागरूक नागरीक ,प्रसारमाध्यम यांच्या मुळे उजेडात आले .मित्रानो अशा अनेक प्रकारामूळे ही योजना बारगळत चाललेली आहे.केन्द्राचा पैसा वाया जात आहे .योजनेचे पैसे खात्यातून काढून संपले पण योजना पूर्ण नाही अशी अनेक प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.या योजनेतून कोट्यावधी रुपये पाणीपुरवठ्यासाठी खर्च झाले पण आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो .
भ्रष्टाचाराचे अजूनही काही किस्से गुलदस्त्यात......

सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

स्वाईन फ्लु

स्वाईन फ्लु आजाराने भल्याभल्यांची तारांबळ उडविली ,बघावे तिकडे तोंडावर मास्क ,रुमाल नाहितर फडकं बांधलेले अनेक जण दिसू लागले.स्वाईन फ्लु आजाराने पळणारे आम्ही.. तसे समाजात वावरतांना अनेक वेळा मास्क बांधूनच वावरत असल्याची जाणीव यावेळी मात्र प्रकर्षाने झाली.शाळेतील फि वाढ असू दे नाहितर वाढलेली तुरडाळ असू दे.सरकारी कार्यालयात दाखल्यासाठी १०० रु.हातावर टेकतानाही आम्ही तोंडावर मास्क बांधलेला असतोच की !.भारनियमन होऊनही आम्ही विजेसाठी जादा दर मोजायचे, ६ वा वेतन आयोग आम्हाला नसला तरी महागाई आम्ही सोसायची.उच्च शिक्षणासाठी लाखों रुपये डोनेशन देताना आपल्या तोंडावर आणि डोळ्यावर मास्क हा असतो.रेशनचे कुणाच्यातरी वाट्याचे धान्य काळ्याबाजारात विकताना डोळ्यांना दिसते पण बोलणार कसे ? तोंडावर मास्क ! हा मास्क ही बाजारात जादा भावाने घेताना कुणी काहिच बोलत नाही कारण त्यांच्या तोंडावर अगोदरच एक मास्क आहे. तोंडावर मास्क ,कानात ईअर फोन नाहितर कानाला चिकटलेला मोबाईल, डोळ्यावर गाँगल .मरणाच्या भितीने आपण पळतोय खरे पण अश्या कितीतरी व्ह्यायरसने आपलं जीवन या अगोदरच ग्रासून टाकलं आहे याची साधी जाणिव आपल्याला आहे का ?

Next Genaration

रायगडावर जायचं म्हणजे आता चालत,चढत जाणाची गरज नाही.केवळ चारच मिनीटात रोपवेने आपण
रायगडावर जातो.आमच्या आधुनिकतेचे, प्रगतीचे हे आणखी एक उदाहरण.याच रायगड जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात पाणीपाणी करतात.ही एक वस्तुस्थिती.
दोन हजार सालापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याच्या घोषणा तशा कानात आता बुजून गेल्यात.रस्त्यांनी जाताना डोक्यावर तीनतीन हंडे आणि कंबरेला कळशी घेऊन ४-५ कि.मी.पाण्यासाठी अनवाणी जाणार्‍या आमच्या मायभगिनी पाहिल्या कि स्वातंत्र्यप्राप्तीची ६३ वर्ष आठवतात. ६३ वर्षात आमची प्रगती वाखाणण्याजोगी..खेड्यातल्या प्रत्येक दुकानात मला शीतपेयाच्या बाटल्या दिसतात.लटकणार्‍या चिप्स्च्या बंद पिशव्या दिसतात.एखाद्या भिंतीवर next genaration असे लिहिलेली भलीमोठी जाहिरात दिसते.त्यांच्या मताप्रमाणे पुढच्या पिढीला अशी शीतपेय कदाचित हवीही असतील.रायगडावरील हाँटेल असो नाहीतर कुठलही खेडेगाव असो! अनेक दुकानं अशा शीतपेयाच्या बाटल्यांनी भरून गेलेली असतात.
आटलेल्या विहीरी, प्रदुषीत नद्या, भ्रष्ट शासन , अधिकार्‍यांमुळे रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजना सार काही आता सरवल्या प्रमाणे आपल्या नजरेआड झालयं.अनेक गावात आता बिअर शाँपीही दिसू लागल्या आहेत.गावागावात ,वळणावळणावर शीतपेयांचे ट्रक धावतात आणि जाहिरातीतून क्रिकेटपट्टूही शीतपेय प्या असे सांगतात.त्याचवेळी भर उन्हात,पायाला चटके सोसत..डोक्यावर हंडे व कंबरेला कळशी घेऊन जाणारी ती , या शासनाला आणि आपल्या नशीबाला काय सांगणार?.खेडयात राहाणार्‍या जनतेला फक्त एकवेळ पाणी हवयं.
शीतपेय घेऊन जाणारा ट्रक जेव्हा गावातील प्रत्येक वळ्णावर थांबतो तिथेच पाण्याच्या आशेने कित्येक जण आवंढा गिळताना दिसतात.
next genaration असं म्हणत त्यांनी पुढच्या पिढीचं भवितव्य ३०० मि.ली च्या बाटलीत कधीच सिलबंद करून टाकलयं.
.....................................

बहिणाबाईंचे काव्य आजच्या काळातही मार्गदर्शक

मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवयित्री बहिणाबाई’,,,,
जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात.
घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्शक ठरणार्‍या आहेत .मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्‍या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.
आजचं युग ग्लोबलायझेशनचे युग आहे, प्रत्येकाला काही ना काही मिळ्वण्याची आस आहे.त्यातही माणूस समाधानी नाही.अशा असमाधानी वृत्तितून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते,स्व:त करत असलेल्या कामावर श्रद्धा नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही .कामाच्या समाधानापेक्षा गलेलठ पगार आज सर्वांची गरज बनत चाललीय.प्रत्येक गोष्ट सहज आणि कमी श्रमात मिळावी अशी अनेकांची इच्छा असते पण कष्टाला शाँर्टकट नसतो.श्रमाशिवाय काही नाही.हाताला चटका बसल्याशिवाय भाकर मिळत नाही हे बहिणाबाईंनी सांगितले आहे
अरे संसार संसार
जसा तवा चुल्हयावर
आधि हाताला चटके
तवा मिळते भाकर
कामाच्या ताणतणावाखाली जगणार्‍यांना बहिणाबाईंची ही कविता उत्तम मार्ग दाखवीणारी ठरेल.त्या म्हणतात
येरे येरे माझ्या जिवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप
काम करताना देवाचं रूप पाहिलं ,कामालाच देव मानल तर काम निभावून नेण सहज शक्य होईल.मनाला समाधान न मिळाल्यानं माणूस मन:शांती ,ज्योतिषी अशा गोष्टींकडे ओढला जातो.आजकाल अनेक वाहिन्या ,ज्योतिषीच्यांचे कार्यक्रम दाखवतात.वास्तुशास्त्र ,फेंगशुइ प्रतिष्टॆचे बनले आहे.पण ज्योतिष म्हणजे काय हे बहिणाबाईंनी कित्येक वर्षापूर्वी जाणलं.दारी आलेल्या ज्योतिषीला त्यांनी परत पाठवले.माझ नशीब मला माहित आहे असं सांगणार्‍या बहिणाबाईं खंबीर महिलेचे दर्शन घडवतात.
बापा नको मारु थापा
असो खर्‍या, असो खोट्या
नहि नशिब नशिब
तय हाताच्या रेघोट्या
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
आजच्या काळात जी स्थिती ज्योतिषाची तीच देवधर्माची.आजकाल मंदिराचाही बाजार मांडलेला दिसतो.देवाला हिरेजडित मोबाईल,गणपतीच्या चरणी २०० कि.सोनं,देवदर्शनाला सेलिब्रेटी अशा अनेक बातम्या वृत्तपत्रात ,वाहिन्यांवर वारंवार दिसतात आणि देवाला गरीब श्रीमंत अशा भेदभावात तोलल जातय.याची जाणीव बहिणाबाईंना झाली होती.
सोन्यारूपान मढला,मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा इठोबा,पानाफूलामधी राजी
अरे बालाजी.-इठोबा दोन्ही एकज रे देव
गरीबीनं सम्रीतीनं केला केला दुजाभाव
गरीब आणि श्रीमंत अशा दुजाभावात देवाला भक्तांनी अडकवल्याचे वर्णन जितक्या प्रभावीपणे त्यांनी केलय़ तितक्याच भावपूर्ण शब्दात दर्शनाला जाऊ न शकणा-या शेतक-याची व्यथा मांडलेय.राज्यात दुष्काळ,कर्जबाजारीपणामुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या या काळात एखाद्या शेतक-याच्या तोंडी ही ओवी चपखल बसू शकते.
अरे पांडूरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपा आड येत
सावकाराचं रे सोंग
बहिणाबाईंची गाणी केवळ तत्त्वज्ञान सांगणारी नव्हती तर बहिणाबाईंना विनोदाचीहि जाण होती.आज पी.जे.ग्राफिटीचं युग आहे. २४ तास टिकत नाही तिला टिकली क म्हणतात?
असा प्रश्न आजचा तरुण सहज विचारतो तसे काही प्रश्न बहिणाबाईंनीही विचारले आहेत.परंतु त्यांच्या विनोदामध्ये भावार्थ दडला आहे.ज्याच्यातून पीठ येत त्याला जातं म्हणू नये ,तसेच गुढी उभारतो त्याला म्हणती पाडवा आणि ऊभा जमिनीमध्ये आड त्याला म्हणती उभ्याले.असे गमतीदार प्रश्नही त्यांच्या गाण्यातून प्रकट्लेले दिसतात.
माणसाचं आयुष्य,मानवी मन याचा फार मोठा अभ्यास बहिणाबाईंना अनुभवातून झालेला दिसतो.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
उतारे नसललं माणसाचं मन कालही तसच होतं आजही तसच आहे.माणूस माणूसपण विसरल्याची उदाहरणे समाजात मोठ्या प्रमाणत दिसतात .भ्रष्टाचार,अत्याचार,प्रांतिक-भाषिक वादिवाद ,बाँम्बस्फोट अशा घटनांनी माणसाचं माणूसपण हरवून गेलं आहे
मानसा मानसा कधी व्हशील मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस
इतके वर्षांनंतर आजही बहिणाबाईंनी रेखाटलेले मानवीवृत्तीचं दर्शन कुठे बदललय ?
सहज कुठेही कधीही सुचलेली बहिणाबाईंची गाणी आजच्या युगातही खूप काही सांगून जातात.ज्याला बहिणाबाईंची गाणी ज्याला कळली त्याला जीवन कळले असं म्हणावं लागेल.
बहिणाबाईंना जीवन कधीच कळलं होतं.
आला सास गेला सास
जीवा तुझं रं तंतर
असे जनम मरन
एका सासाचं अंतर
जीवनाचं अगाध तत्त्वज्ञानआपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवयित्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही
अबाधित राहिल अशीच आहे.
...........................................................................................
लेखक-सुनिल पाटकर

अर्धा कप चहा

चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्‍या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्‍या‘ असेल १०-१२ वर्षाचा! .हातात चहाची किटली आणि बोटात अडकवलेले कप.कपात चहा ओतून तो दरवाजाजवळ आमचा चहा संपायची वाट पाहात उभा होता.सहज माझी नजर त्याच्या हाताकडे गेली.त्याच्या मनगटावर मला एक डाग दिसला.मी त्याला विचारलं ‘हा डाग कसला ?’ माझ्या प्रश्नावर तो घाबरला,रडवेलाही झाला.खूप वेळा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ‘मालकाने गरम झारीचा डाग दिला,हातून चहाचा कप फुटला म्हणून ’.मला त्याला खूप काही विचारायचे होते त्याचे नाव.. त्याचे गाव .पण मालक ओरडेल या भितीनं तो काहिही न बोलता चहाचे कप उचलून निघून गेला.सहज चर्चा करताकरता एवढच कळल कि त्याला ५०० रु.पगार मिळतो आणि ते पैसे तो घरी पाठवतो.
दिवसभर त्याचा विचार मनात घोळत होता.हाँटेलातील तो पोर्‍या ...त्यांची नाव पण अशीच छोटया ,बारक्या, काळ्या..असे लाखों बालमजूर आज आपल्यात वावरतात
सायंकाळी घरी आलो.कंटाळा घालवण्यासाठी टि.व्ही लावला.. टि.व्ही वर जाहिरात लागली होती.एस्सल वर्ड में रहुंगा मै...घर नही जाऊंगा मै.....हसणारी..आगगाडीत बसणारी...बागडणारी मुलं या जाहिरातीत खूप मजा करत होती.आपल्याला,आपल्या मुलांना अगदी तोंडपाठ झालेली ही जाहिरात.
एकिकडे हसणारी..बागडणारी मुलं आणि त्यावर सहज उडविले जाणारे २००-३०० रुपये.आपल्या देशात केवढी ही विषमता.
महासत्ताक बनू पाहणार्‍या माझ्या भारतात आजही कित्येक गल्ली-बोळात ,टपरीवर, हातगाडीवर हजारों छोटया ,बारक्या, काळ्या फक्त जगण्यासाठी धडपडत आहेत हे मला त्या अर्धा कप चहाने दाखवून दिलय.
............................................................................................................................

एका राजाची गोष्ट

ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात .हजारो कदाचित लाखोही असेच त्यांची वाट पाहात उभे होते.ते त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यासाठी ,त्यांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी तर काही आनंदानी नाचण्यासाठी। कुणी त्याना व्यासपीठावर घेउन जाण्यासाठी उत्सुक होते.तर कुणी त्यांच्यासोबत आपण फोटोत कसे येऊ यासाठी तयार होते.पत्रकार ही आपली डायरी घेऊन तयार होते.तसे तिला याचे काही नविन वाटत नव्हते ,काही गोष्टी तिच्या 75 वर्षाच्या नजरेत जशाच्यातश्या बसलेल्या॥ काही व्यक्ति बदलल्या ..काही कपडे.., तर काही टोप्या..छोट्याशा टेकडीवरची तिची झोपडी आजही तशीच होती.तिच्या कुशीत तिची पणतवंड वाट पाहात होती रात्री आई-बाप काहीतरी खायला आणेल या आशेवर ।
चार मडकी पाणी पिऊन संपलेली..चुलीत विझलेली लाकडे .चूल फक्त पाणी तापविण्यासाठी .आपल्या पणतवंडाना समजावत ती म्हणाली `आता बघ इमान येईल त्यातून राजा उतरेल ।आपल्याला काहीतरी खायला देईल...तुला कपडा , बाबाला नोकरी ।तिचे शब्द ओठाताच राहिले आकाशात हेलीकाप्टर भिरभिरु लागले .त्यांच्या नावाचा जयजयकार झाला पणतवंडाना घेउन ती बाहेर आली .`ते बघ ईमान. राजा आला मूलं हेलिकोँपटरकडे बघून उड्या मारू लागली ।
ते उत्तरले लाखों फूले तांच्या अंगावर उधळली गेली॥ जयजयकारात ते स्टेजकडे निघाले तिथे ते नेहमीची भाषणे देणार होते.मैदानावरची डोळ्यात गेलेली धुळ तिने झटकली.डोळ्यातून तसं पाणीच आलं.थोड्या वेळेन मूलं पुन्हा रडू लागली .भूक...भूक करू लागली. ती अस्वस्थ झाली दूरवर राजाचे भाषण तिच्या कानावर येत होते पोरांचा बाप दारू पिऊन ढकलत येत होता .आई काहीतरी घेऊन आली पोर तिच्याकडे धावली .तिच्या हाताताले ओढून पटापट खायला सुरवात केली.पोराना खाताना बघून आई सुखावली ।
भाषण संपल्यावर राजा परतला ,पोर यावेळी धावली नाहीत .म्हातारीही झोपडिच्या बाहेर आली नाही . राजा बदलला... झोपडी तीच होती ।साठ वर्षानन्तरही कुठलाच राजा तिच्या झोपडिकडे वळला नाही ।
कधितरी खूप वर्षापूर्वी तिच्या बालपणी एक राजा तिच्या झोपडीत आला होता .उघडा.......फक्त पंचा नेसलेला .....हातात काठी घेऊन .....तिच्या सारख्या असंख्य माता भागिनीना तो भेटला होता.त्यांची सुखदू;ख जाणून गेला होता त्यावेळी त्याच्या विमानाची धुळ तिच्या डोळ्यात गेली नाही कारण तो चालत आला होता अनवाणी ।
आज म्हातारी तीच होती बदलला होता फक्त राजा .बदललेला राजा उघडा नव्हता .त्याच्या अंगावर होती खादी आणि हातात होता महागडा मोबाइल....तो राजा सत्यासाठी झगडत होता , हां राजा सत्तेसाठी झगडत आहे ।

सुनील पाटकर