मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

गोष्ट लवासा लेक सिटीची...

गोष्ट लवासा लेक सिटीची...
 सौजन्य- Global Marathi

पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला असलेली मोठी होर्डिग्ज लक्ष वेधून घेतात. लवासाकडे, लवासा- काही अंतरावरच! पूर्वी दासवे, मुगाव, लवार्डे अशा गावांना शोधत, लोकांना रस्ता विचारत जावे लागायचे, ती आता या होर्डिग्जमुळे सापडायला अडचण येत नाही. आणि रस्ता! अख्ख्या महाराष्ट्रात असे गुळगुळीत रस्ते सापडायचे नाहीत! त्यामुळे पूर्वी अशक्य कोटीतला वाटणारा हा प्रवास केव्हाच होऊन जातो. पण त्यामुळे वाटणा-या आनंदावर विरजण पडते ते या लवासाने घातलेल्या हैदोसाचे. काही मूठभर श्रीमंतांना खूप पैसे कमवून झाले, की चैनचंगळीसाठी एक ठिकाण विकसित करण्याकरता लवासाने केलेली निसर्गाची कत्तल,पर्यावरणाचा -हास, लोकांच्या फसवणुकी, कायद्याची वासलात. हे सारे पाहून थक्क आणि व्यथित व्हायला होते. तथाकथित भांडवली भरभराटीचा, चंगळवादाचा रस्ता विनाशातूनच आणि विनाशाकडेच जातो, हे अधोरेखित करणारी ही लवासा लेकसिटी!

लवासा लेकसिटीच्या भुलवणा-या जाहिराती नवश्रीमंतांना खुणावताहेत तर सामान्यजनांना गोंधळात टाकताहेत. सहा-सात वर्षे पुणे जिल्ह्य़ातील लेकसिटी गाजत आहे. त्याबाबत अलीकडे जनआयोगाने अंतरिम अहवाल सादर केला. या जनआयोगाचे सदस्य आहेत. अरविंद केजरीवाल - दिल्ली (मॅगसेसे पुरस्कार विजेते), अ‍ॅड. वाय. पी. सिंग - मुंबई (माजी सीबीआय, अधिकारी), अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, धुळे (आदिवासी समस्यांचे अभ्यासक) एस. एम. मुश्रीफ, पुणे (निवृत्त इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस) अहवालातून पुढे आलेली वस्तुस्थिती कुणालाही विचार करायला लावणारी आहे.

पुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिम सीमेवर उत्तुंग सह्य़ पर्वत आहे. या पर्वतराजीचे फाटे पश्चिम - पूर्व दिशेने पसरलेले आहेत. या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर ९-१० हजार मि. मी. पाऊस पडतो. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खो-यात अनेक धरणे बांधलेली आहेत. ब्रिटिश आमदनीमध्ये पुणे शहराचा पाणीपुरवठा व पुणे जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाला शेतीसाठी पाणी देण्यासाठी खडकवासला (पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी) येथे मुठा नदीवर धरण बांधण्यात आले. (तीन अब्ज घनफूट क्षमता) मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व पुढे शेतीसाठी पाणी पोचवले जाई.

पुणे शहराची व शेतीसाठी पाण्याची गरज वाढत गेल्याने स्वातंत्र्योत्तर काळात १९५७ पासून मुठा खो-यात नवीन धरण प्रकल्प हाती घेण्यात आले. १९५७ साली पानशेत धरणाचे बांधकाम सुरू झाले. ते १९६२ मध्ये पुरे करायचे होते. परंतु शासनाने घिसाडघाईने काम अर्धवट असताना १९६१ सालीच धरणात पाणी साठवले. काम अर्धेकच्चे असल्याने १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले व पुण्यात जलप्रलय होऊन कोटय़वधीचे नुकसान झाले. महापुराच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. पानशेत धरण पुन्हा पुरे होण्यास १९७५ साल उजाडले.

अंबी व मोशी या मुठेच्या उपनद्या. अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस ४० कि. मी. वर पानशेतनजीक तानाजी सागर (११ अब्ज घनफूट क्षमता), मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर (१३.५ अब्ज घनफूट क्षमता) आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आलेली आहेत. टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे. मुठा नदीवरच्या वरील चार धरणांच्या प्रकल्पात एकूण सुमारे ३० अब्ज घनफूट पाणीसाठा होऊ शकतो. (१ घनफूट = २८ लिटर) वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.

पुण्याचा वाटा ११.५ अब्ज घनफूट आहे. उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. सह्य़ पर्वतराजीवर धुवांधर पाऊस पडत असल्याने धरणांचा हा प्रदेश संरक्षित व वृक्षवेलींनी आच्छादित राखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा डोंगरांची वेगाने धूप होऊन पुणे शहराचा पाणीपुरवठा व शेतीसाठी सिंचन पुरवणारी ही मोठी धरणे गाळाने भरून पाणी साठा वेगाने कमी होईल. या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी न घेता, महाराष्ट्र शासनाच्या नागरी विकास खात्याने हिल स्टेशन उभारण्याच्या प्रस्तावास परवानगी दिली.

भारतातील हे पहिलेच ‘मानवनिर्मित’ हिलस्टेशन असल्याचा दावा लवासाच्या जाहिरातीत केला आहे. ‘मानवनिर्मित’ म्हणजे डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हिल स्टेशन! महाराष्ट्रातील इतर हिल स्टेशन विचारात घेतली तरी अस्तित्वात असलेल्या विस्तीर्ण डोंगरपठारावर (उदा. महाबळेश्वर, माथेरान) हिल स्टेशन बांधली जातात. परंतु लवासा हिल स्टेशन उभे केले जाणार आहे.

मुख्यत: डोंगरांच्या उतारावर सपाटीकरण करून तेथील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि माथे विस्तीर्ण नाहीत आणि विशेष म्हणजे ते वरसगाव धरणाचे पाणलोटक्षेत्र असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्याऐवजी तेथे डोंगर फोडून लेक सिटी उभारणे विनाशकारी आहे. लवासा प्रकल्पाखाली १८ डोंगररांगांवरील १०० चौरस किलोमीटर क्षेत्र येते. हे क्षेत्र वरसगाव धरणाभोवतीच्या पर्वतांचे माथे व उतारांवर पसरलेले आहे. त्यामध्ये ४५ चौ. किलोमीटर (४५०० हेक्टर) क्षेत्राची भर पडण्याची शक्यता आहे.

लवासाच्या सध्याच्या क्षेत्रांमध्ये मोशी नदीच्या खो-यातील १७ गावे आणि मुठा नदीच्या खो-यातील तीन गावे येतात. डोंगर उतारावरील गावात ठाकर, कातकरी व कुणबी शेतकरी कुटुंबे आहेत आणि डोंगरपठारावर मुख्यत: धनगर कुटुंबे आहेत. लवासा कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांनी विविध कामांसाठी द्रुतगतीने परवाने दिले, एवढेच नव्हे तर या कंपनीवर अनेक नजराण्यांचाही वर्षांव केला आहे, असे जनआयोग अहवाल नमूद करतो. लवासा लेकसिटीवर शासनाची एवढी मेहेरनजर का? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे, लवासाच्या प्रवर्तकांमध्ये.

आज ज्याला लवासा म्हणून ओळखले जाते. त्या कंपनीची मुळात ११ फेब्रुवारी २००० रोजी ‘पर्ली ब्ल्यू लेक रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने नोंदणी करण्यात आली. या कंपनीचे सुरुवातीचे संचालक होते अनिरुद्ध देशपांडे, विठ्ठल मणियार, अनिरुद्ध सेवलेकर. मुळशी तालुक्यातील मोशी नदीच्या खो-यात वरसगाव धरणाच्या काठावर हॉटेल बांधायचे असा सुरुवातीचा प्लॅन होता. १२ डिसेंबर २००० रोजी या कंपनीचे ‘द लेक सिटी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड’ असे नामांतर करण्यात आले. यावेळी अनिरुद्ध देशपांडे, अनिरुद्ध सेवलेकर, विठ्ठल मणियार,गणपत इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग, वेंकटेश्वरा हॅचरीज, सदानंद सुळे, सुप्रिया सुळे आणि इतर काहींची भागधारक म्हणून नोंद होती.

जून २००४ मध्ये या कंपनीचे पुन्हा एकदा ‘लवासा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड’ असे नामांतर करण्यात आले. केवळ एक हॉटेल न बांधता हिलस्टेशन उभारण्याचा प्रकल्प या कंपनीने हाती घेतला. लवासाच्या नावामागे असलेल्या संचालक-प्रवर्तकांची नावे वाचली की, राज्य सरकारच्या सर्वच विभागांची कार्यक्षमता अचानक का वाढते, कायद्यांना कशी-कुठे मुरड घातली जाते आणि स्थानिक लोक आणि पर्यावरण पालापाचोळ्यासारखे का उडवून लावण्यात येतात हे लक्षात येते.

लवासा प्रकल्पासाठी मोशी नदीच्या उगमस्थानाजवळच्या खोऱ्यात बंधारे बांधण्याची योजना आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे १.०३१ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी कंपनीने मिळवली आहे. या परिसराला जून महिन्यात भेट दिली असता असे आढळले की, दासवे येथील लवासा धरण पाण्याने भरलेले, पण वरसगाव धरण मात्र कोरडे!

धामणओहोळ येथे बंधा-याची कामे चालू आहेत. पुणे शहराच्या ४० लाख लोकसंख्येच्या महिनाभरच्या सर्व गरजा भागवण्यासाठी वापरले जाते, तेवढे पाणी लवासा लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशा ऐषारामी कारणांसाठी वापरण्याचा अग्रहक्क कंपनीने मिळवला आहे. शिवाय वरसगाव व टेमघर धरणाचे पाणी वापरण्याची परवानगीही खडकवासला सिंचन विभागाने दिली आहे. त्याविरोधात १५ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.



कृष्णाखोरे विकास निगम, महाराष्ट्र राज्य महसूल खाते व वनखाते यांनी लवासा कंपनीला सवलतीत जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. कृष्णा खोरे निगमच्या मालकीची सुमारे १३० हेक्टर जमीन ३० वर्षांच्या भाडे पट्टय़ाने लवासाला २८.८.२००२ रोजी देण्यात आली. फक्त रु. २.७५ लाख वार्षिक आकार आहे. आजचा या जमिनीचा बाजारातील भाटेपट्टा अंदाजे ९०० कोटी रुपये आहे असे कळते.

महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा कायद्याखाली १९७६ साली वरसगाव धरणक्षेत्रात ३७३ हेक्टर जमीन अतिरिक्त ठरवली गेली. ती जमीन सरकारजमा करून भूमिहीनांना वाटण्याची तरतूद आहे. परंतु त्याची अंमलबजावणी कधीच करण्यात आली नाही. आता मात्र ती जागा अतिरिक्त जाहीर करून महसूल खात्याने अल्प दरात लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली आहे.

लेकसिटीस पोचण्यासाठी व सिटी अंतर्गत घाटरस्ते आणि बंगले, हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे इत्यादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई चालू आहे व लाखो झाडे,झुडपे, वेली यांची बिनदिक्कत तोड केली जाते आहे. हा सारा परिसर मौल्यवान झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, बेहडा, धावडा, खैर, ऐन, अंजन, शिरीष, कडुलिंब, लिंबारा, करंज, पळस, शिसम, आवळा,कोकम, शिवण, असना, बावा, बांबू, शिकेकाई, अनेक औषधी वनस्पतींचे इथे आगार आहे.

या सा-या मौल्यवान ठेव्याची बेमुर्वतखोरपणे कत्तल चालू आहे. लवासा कॉर्पोरेशनला शासनाने मुद्रांक शुल्क माफ केले आहे. कंपनीने २४ सप्टेंबर २००२ रोजी सूट मिळण्यासाठी अर्ज केला आणि २५ सप्टेंबर २००२ रोजी सूट मिळालीही! शासनाने १००० ते ५००० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले आहे. मध्यस्थ व कंपनीचे हस्तक विविध मार्गानी जमीन मालकांची फसगत करून जमिनी बळकावत असल्याचे जनआयोगाला आढळून आले. सुविधायुक्त पर्यायी जागेचे आमिष दाखवून जमिनीचा ताबा घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे आढळले.

बनावट खरेदीखत करून ७/१२ उताऱ्यात परस्पर बदल करून जमीन ताब्यात घेण्यात आली. जमीन विकली असता त्याच्या वारसांशी विक्री व्यवहार सुरू केला, तेव्हा सध्याच्या मालकाने जाहीर नोटीस देऊन हरकत घेतली. पण उपयोग झाला नाही. जमीन खरेदी न करता जमिनीतून रस्ता खोदला. त्याविरोधात तक्रार केली असता दमदाटी झाली. पोलीस तक्रार नोंदवून घेत नाही. जमिनीच्या किमतीपोटी दिलेल्या रक्कमेचा चेक वटला नाही. मालक हवालदील, कोर्टकचेऱ्या करून पैसे वसूल करणे दुरापास्त. किरकोळ रकमेत करार करून मोठय़ा रकमेची पोकळ आश्वासने देऊन जमीन बळकावणे, धमकावणी देऊन आदिवासींची जमीन बळकावणे अशा विविध तक्रारी जनआयोगाच्या नजरेस आल्या.

लवासा लेकसिटी हा विनाशकारी प्रकल्प बंद करून निसर्गसंवर्धक विकासयोजना राबवणे अगत्याचे आहे. पानशेत धरणाच्या पाणलोटक्षेत्राचे संरक्षण करणे अगत्याचे असल्याने या प्रश्नाचा अभ्यास करून त्या परिसराचे शास्त्रशुद्ध संरक्षण कसे करावे याविषयीचा अहवाल १९८६ साली प्रस्तुत लेखिका आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. तेताली पी. यांनी केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्याच्या संशोधन अनुदानाखाली पुरा करून पर्यावरण खात्यास सादर केलेला आहे.

त्यामध्ये पानशेत व वरसगाव धरणाच्या पाणलोटक्षेत्राचा सांभाळ व संवर्धन यादृष्टीने केलेल्या महत्त्वाच्या शिफारसी लक्षात घेणे प्रस्तुत ठरेल. या पाणलोटक्षेत्राचे तीन भाग पडलेले आहेत. एक नदीच्या उगमापासून ९-१० किलोमीटपर्यंतचा विभाग (क्षेत्रफळ ५५ चौ. कि.मी.) दोन, मधला २० किलोमीटपर्यंतचा विभाग (पाच ते सहा हजार मिमी पाऊस) तीन, धरणालगत पश्चिमेस ९-१० किलोमीटपर्यंतचा विभाग (२२०० ते ३८०० मिमी पाऊस) पर्जन्यमान लक्षात घेऊन या प्रत्येक विभागामध्ये कोणती झाडे, झुडपे, वेली, गवत जोपासावे, याबाबत तपशीलवार सूचना अहवालात केल्या आहेत. या सर्व वनस्पती त्या परिसरातल्याच आहेत. येथील डोंगर १००० ते १२५० मीटर उंचीचे व तीव्र उताराचे आहेत. त्यामुळे माथ्यानजीकचा प्रदेश पूर्णपणे वृक्षवेलींनी आच्छादित राखणे आवश्यक आहे.

या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अनुक्रमे अंबी नदी व मोशी नदी उगम पावतात. येथे घनदाट झाडी, वेली, झुडपे, गवत यांचे दाट आच्छादन पावसाचा मारा झेलण्यासाठी आणि पाणी मुरण्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी त्या भागात शास्त्रीय पद्धतीने वनरक्षण व वनसंवर्धन करणे आवश्यक आहे. ओढय़ाकाठी, रामेठा, आवळा, तुरण इ. ची लागवड आवश्यक आहे. समतलरेषेवर धावडा, कदंब, पांगारा, करवंद, बोर, आंबा, हिरडा, बेहडा, अंजन, पळस, असना, शिसवी, कडुलिंब, जांभूळ, करंज, बांबू, उंबर, नांद्रुक आणि सरोवरकाठानजीक उताराचे रक्षण करण्यासाठी ऐन, जांभूळ, बांबू, वळुंज, निरगुडी, शिकेकाई यांचे रक्षण आणि लागवड करणे आवश्यक आहे. जंगलरक्षण केल्यावर प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचे संवर्धन होईल.

या समृद्ध निसर्गाचा अभ्यास, निरीक्षक, भटकंती असे ज्ञानसंवर्धक व आरोग्यदायी उपक्रम हाती घेणे शक्य होईल. या परिसराचा खास नैसिर्गक ठेवा जतन करून तो सर्व जनतेला खुला राहिला पाहिजे. समुद्रकिनारे, डोंगरद-या,नद्या, सरोवरे यांचे खासगीकरण करून मूठभर धनदांडग्यांच्या चैनचंगळीसाठी त्यावर मक्तेदारी स्थापन करून ते कुंपणबंद होता कामा नयेत. त्या परिसराचा विकास करत असताना हे भान बाळगले तर स्थानिक रहिवाशांच्या उपजीविकेची सोय आणि सदर संरक्षित क्षेत्रात त्यांचे योग्य पुनर्वसन होऊ शकेल. पुणे शहर व पुणे जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त शेतीसाठी करदात्यांच्या पैशातून शासनाने कोटय़वधी रुपये खर्च करून चार धरणे बांधली. आज लाखोंचे जीवन त्या पाण्यावर अवलंबून आहे.

अशा धरणांच्या पाणलोटातील जंगले समूळ उद्ध्वस्त करून आणि डोंगरमाथे व उतार यावर बुलडोझर फिरवून पाणलोटक्षेत्राचा विध्वंस कशासाठी चालू आहे? देशातील पर्यावरण विषयक, सिंचन व प्रदूषण विषयक, आदिवासी जमीन हक्क, कमाल शेतजमीन धारणाविषयक कायदे धाब्यावर बसवून, शासनाच्या मालकीच्या जमिनी सवलतीच्या आकारात कंपनीला बहाल करून, सार्वजनिक धरणक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी देऊन, कोटय़वधीच्या मुद्रांक शुल्काच्या सवलती देऊन लवासा लेकसिटी बांधली जात आहे आणि त्याप्रश्नी न्यायासाठी जनसंघटना धडपडत असताना बिनदिक्कतपणे ती योजना पुढे रेटली जात आहे. हे लोकशाही भारतात कसे घडू शकते आणि कोणासाठी?
................................................

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

चप्पल पुराण

     नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा  इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ... गावातील एका झाडाखाली चप्पल बांधणी पासून चकाचक अशा माँल पर्यंत प्रवास करत पोहोचलेले चप्पल आणि बूट....
        चपलांच्या दुकानात गेलं कि इवलाश्या आकारा पासून अगदी फताड्या पायापर्यंत सर्वच आकारामध्ये चप्पल आणि बूट पहायला मिळतात.बूटातही नाविन्य आहेच..लेदरचे चकाकणारे बूट ते रफ अँन्ड ट्फ स्पोर्ट्स शूज पर्यंत रंगीबेरंगी बूटांचा प्रवासही वाखणण्याजोगा .माणसाच्या आयुष्यात  चप्पल आणि बूटांना तसे तुच्छ स्थान...पण खर सांगू थोडा विचार केला तर त्यांचे स्थान बहूमोल असे आहे.कपड्यानंतर माणूस सर्वाधिक काय वापरत असेल तर ती  चप्पल !. प्रत्येक सुखदु:खात , द-याखो-यात.,काट्याकुट्यात ,ऊनपावसात चप्पल आणि बूट आपल्याला साथ देतात.आणिबाणिच्या प्रसंगात उपयोगात येणारे हमखास हत्यार म्हणजे चप्पलच .
            देवाच्या दर्शनाला उभे असलो तरी आपली नजर चपलांकडे असतेचकी.चप्पल आणि बूट कुणी चोरणार नाही ना ? हा विचार मनात येतच असतो.खडाखडा बूटांचा आवाज करत चालणारे पोलिस -सैनिक पाहिले कि अंगावर रोमांच उभे राहतात.प्रभुरामचंद्र वनवासात गेल्यावर त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्यकारभार केला होता.आता नेत्यांचा चपला उचलून हुजरेगिरी करून अनेक जण स्वामीनिष्ठा दाखवतांना आपण पाहतो.अंगावर चप्पल नाहितर बूट फेकून मारण्याचे नवीन फँड हल्ली जोर धरतेय. जाँर्ज बूश, पी.सी.चिदंबरम ,अडवाणी, बिहार विधानसभाध्यक्ष  , उमर अब्दुल्ला, अशोक चव्हाण यांच्यावर चप्पल-बूट फेकून मारलेली उदाहरणे आहेत.अभिनेता जितेन्द्र पासून आरोपीने न्यायाधिशाला  चप्पल-बूट फेकून मारल्याचे आपण वाचलेले आहे.त्यामुंळे सद्यस्थितीत चपलांना महत्व प्राप्त झाले.
      चप्पल ,बूट ,ज्युता ,सँन्डल ,शूज ,सभ्य भाषेत पादत्राणे तर गावरान भाषेत पायताण -वहाण असे विविध शब्दप्रयोग आपल्या वापरात कायम असतात.नोकरीसाठी मुलाखत देणा-या उमेदवाराला कपड्यांइतके चप्पल-बूटांकडेही लक्ष द्यावे लागते ,छेड काढणा-या मवाल्यांपासून दूर रहायचे असेल तर महिलांना चपलांचा कित्ती-कित्ती आधार वाटतो.मेरा ज्युता है जपानी म्हणत चप्पल सिनेमात पोहचली.बूटांवर कँमेरा मारल्या खेरीज हिरोची सिनेमात एन्ट्री कधी झालेय ?.लग्नकार्यात वराचे जोडे लपवल्या शिवाय करवलीला हक्काची कमाई कशी होणार ?.पिकपिक आवाज करणारे बूट घालून चालणा-या लहान मुलाकडे सारेच कसे प्रेमाने बघतात. टाचांच्या चपला घालून स्त्रीयाही उंच व्हायला बघतात.कोल्हापूरी चपलांचा आवाज तर भारदस्तपणा दाखवणारा.जीन्स पँन्ट्वर शोभणारे बूट तरूण तरुणींचे व्यक्तिमत्व कसे खुलवते.आपल्या सामाजिक वैयक्तिक जीवनात चपलांना कळतनकळत महत्व आलेले आहे.हे महत्व वाकप्रचार-म्हणींपर्यंत पोहचले आहे.पाहूण्याच्या बूटाने विंचू मारणे ,बापाचे जोडे मुलाला झाले कि मुलगा मोठा झाला.मुलीचे लग्न जुळवतांना जोडा झिजवावा लागतोच.पायातली वहाण पायात बरी असं म्हणत एखाद्याची लायकी काढली जाते.त्याला चपलेशी उभा करू नका..चपलेने हाणा असा शब्द रागाच्या भरात निघतो. हे सार खरं असले तरीहि रात्री-अपरात्री घराबाहेर पडतांना पायात चप्पल घालून जा रे असा वृद्ध व्यक्तिंचा हमखास सल्ला असतो. केवढा हा चपलेवर भरवसा...आपल्या सोबत असणा-या या चपलेने आपले विश्व किती व्यापलयं ना ?,
       लहाणपणी आई आणि आता पत्नी मला बजावते अरे ते बूट बदल आता किती झिजलेत ?
माझे बूट खराब झाले म्हणून मी कच-याच्या कुंडीत टाकून दिले.काही दिवसांनी माझे तेच बूट एका भिका-याच्या पायात मी पाहिले.माझी गरज संपलेले ते बूट आज कुणाची तरी गरज झाले होते.स्वत: झिजून दूस-याला सुगंध चंदन देते हे आपल्याला माहित आहे .पण स्वत: झिजून आपल्याला आनंद देणा-या चपलेच्या बाबतीत आपण सापत्नभाव ठेवतो ,आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला साथ देणारी चप्पल आपल्या कडून  तशी दुर्लक्षित राहते.
.................................................................................

बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत

आता सर्वत्र भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बदलत्या समाजजीवनाचा परिणाम शेतापर्यंत पोहोचला असून लावणीच्या वेळी शेतात म्हटली जाणारी पारंपरिक गाणी आता दुर्मिळ झाली आहेत. नवी पिढी, शेतीची नवी साधने यामुळे भातलावणीलाही आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे.

ग्रामीण भागात आजही भात हेच प्रमुख पीक आहे. पूर्वी खेडेगावात असणारी वर्दळ, मदतीला धावणारे सहकारी व सहजतेने मिळणारे शेतमजूर यामुळे शेतीची कामे झपाट्याने पूर्ण होत. गावेच्या गावे एकमेकांकडे लावणी करण्यासाठी जात होती. एकमेकांना नांगर, बैल, अवजारे दिली जात असत. आता शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. पावसाचा लहरीपणा, नव्या पिढीने शेतीकडे फिरविलेली पाठ, नोकरीनिमित्ताने शहराकडे गेलेला लोंढा यामुळे शेती करणे अवघड होऊ लागले आहे. शेतीच्या हंगामात भातलावणी हा उत्साहाचा हंगाम असे. शेतात पारंपरिक गाण्याचे सूर उमटत असत. इरले डोक्‍यावर घेतलेले, घोंगड्या अंगावर घेतलेले अनेक शेतकरी शेतात लावणीत मग्न असायचे. पेट्रोमॅक्‍सच्या उजेडात लावणी होत असल्याच्या आठवणीही येथील शेतकरी सांगतात. परंतु आता पारंपरिक गाणी दुर्मिळ झाली आहेत. नव्या पिढीला ही गाणी माहीत नाहीत.

सध्या भातलावणीसाठी मजूर आणावे लागतात. 100 ते 150 रुपये दिवसाची मजुरी असते. याशिवाय श्रमपरिहार म्हणून मांसाहारी जेवणही असते. सर्वात जास्त दर नांगराचा असतो. नांगर व बैल भाड्याने आणल्यास 250 ते 300 रुपये दिवसाचे भाडे आकारले जाते. मजुरीसाठी आदिवासी येत असल्याने या दिवसांत आदिवासी वाड्यांवर शुकशुकाट असतो. इरले-घोंगड्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आहे. शेतात बसण्यासाठी वापरली जाणारी लाकडी तिवई मात्र अजूनही आहे. तालुक्‍यात लावणीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वीसारखी रंगत लावणीला येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. एक एकर शेतात लावणी करायची झाल्यास किमान 15 माणसे व चार नांगर यांची गरज असते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावणीसाठी शेतक-यांची गर्दी दिसते. परंतु या शेतातून पारंपरिक गाण्यांचे स्वर मात्र कानावर पडत नाहीत. आधुनिक बियाणे, शेतीचे नवीन तंत्रज्ञान, शेती करणारी नवी पिढी, पैसे देऊन आणलेले मजूर यामुळे शेतीही आता व्यावसायिक होऊ लागली आहे.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

गांधीजी भेटत गेलेले – अनिल अवचट

सौजन्य-GlobalMarathi
महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.
काय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर ज्योतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी ज्योतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, ''काही म्हणा, तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.''
मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’ तो हसला व म्हणाला, ''गांधीजी.''
मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वर्षे झाली, तरी! ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणतात की, कधी नव्हेत इतके गांधीजी आज रेलेव्हंट ठरले आहेत. या समस्यांचा विचार करताना त्यांनी काय म्हटले आहे, हे पाहूनच पुढे जावे लागते… वगैरे वगैरे.
एकीकडे गांधींचा खून करणा-यावर नाटकं येताहेत, काहीजण तर फाळणीचा दोष गांधीजींवरच ठेवताहेत. पाकिस्तानला पंचावन्न कोटी गांधीजींनी द्यायला लावले, हा त्यांचा गुन्हा मानतात. फाळणीच्या काळात माझ्या मामाने सांगितलेली हकिगत अशी, की एक माणूस त्याला म्हणाला, ‘गांधी कुठे आहे, बघायचेय?’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचेखाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक? त्यांचा जनमानसावर प्रभाव होता म्हणून? मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाता-यावर कुणी गोळी झाडावी? माझा एक तरुण मित्र सांगत होता, त्याचे कॉलेजातले मित्र तर गांधींचा उल्लेख बुढ्ढा, टकल्या असा करतात. कोणी त्यांना हे शिकवले?
काही जणांनी गांधीजींच्या मुलाची व्यथा मांडली आहे. त्यांनी मुलांना नीट वागवले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, इत्यादी. ते खरेच आहे. पण हे अनेक महापुरुषांबाबत झालेले दिसते. सर्व माणसे सर्वच बाबतीत बरोबर किंवा यशस्वी असतात, असं नसतं. सुभाषबाबूंच्या बाबतीतही गांधीजींचे चुकले असणे शक्य आहे. त्यांनी स्वत:च आपल्या हिमालयाएवढ्या चुका झाल्याचे लिहिले आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यात सगळेच बरोबर, योग्य असेच ते वागले, हे शक्य नाही. पण तरीही त्यातनं गांधीजी काही उतरतात का?
****
अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्मण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्ताभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.
सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. मेडिकल कॉलेजमध्ये मी मॅगेझिनचा संपादक होतो. पानभर सावरकरांचा फोटो छापून ते मॅगेझिन त्यांना अर्पण केलं होतं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. क्रांतिकारकांची चरित्रे वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्मण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या.या सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत.
मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्यराष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते.
****
आमचं वर्ध्याला शिबीर होतं. इथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहस्र बुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं.
उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत? किती लोक तुमच्यामागे येतील? सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार? असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन हे सर्व करायला किती कार्यकर्ते लागतील? ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय? की त्यांनाही गोळ्या घालायच्या? असे किती लोकांना गोळ्या घालणार? या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर?…’
बाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रश्नांची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो.
वर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळले की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्न विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले.
मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा! असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का?’ मी चक्रावलोच.
‘या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’ ही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती! नंतर ‘ती’गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती?
पुढे काही वर्षांनी लॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघूनतरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’
‘मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’
गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’
लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.
गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? त्यांच्या करिष्म्यामुळे का? मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल.
अभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ सत्याग्रह करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार? त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’
त्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात? काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य.
पडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गो-यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गो-या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणा-या एका गो-या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म्हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणा-या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली.
गांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं?
गांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुस-या पार्टीला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र ते घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला. पण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं?
दोन घटना फार हृद्य आहेत... नाताळला तिकीट असतानाही गो-यांनी त्यांना फर्स्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी? कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे सा-यांच्याच लक्षात आलं.
दुसरी घटना त्यानंतरची.
घोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोल्जर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणा-या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गो-याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव-बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला.
ती पकडलेली दांडी, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का? थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो.
शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता, येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का? माहीत नाही; पण शक्य आहे.
गांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते
आज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय? निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरा निमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर?
खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं? आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण? बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं? तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत.
गांधीजींकडून आणखी एक गोष्ट मला नेहमी शिकावीशी वाटते. गांधी सिनेमात एक दृश्य आहे (आणि ते अनेकांनी लिहूनही ठेवले आहे.) नेहरू, पटेल आदी मंडळींची महत्त्वाच्या विषयावर बैठक चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्यानं पाहू लागतात. ते म्हणतात, ‘माझ्या बकरीला चारा घालायची वेळ झाली.’ सगळ्यांच्या चेहे-यावर वैताग, काय हे खूळ असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे, तसा बकरीला चारा घालणं हाही.
दुसरा प्रसंग. मी एका डॉक्युमेंटरीत पाहिलेला. गांधीजी दिल्लीतल्या व्हॉइसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघतात. ते ‘हरिजन वस्ती’मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणं मोकळा रस्ता चालताना दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झाले, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत. कधी भिरभिरले नाहीत, कधी उडून गेले नाहीत. ते आपल्या गतीनं चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं. म्हणून सामान्य माणसांना ते आपले वाटले असले पाहिजेत.
गांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिका-यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती.
नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे.
खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.
मी ‘साधना’ साप्ताहिकात काम करताना अनेक गांधी परंपरेतल्या लोकांशी संबंध आला. आचार्य भागवत यायचे. ते गेल्यावर मी त्यांच्यावर विशेषांक काढला होता. दादा धर्माधिकारींशीही स्नेह जमला. त्यांचे व्यवस्थित, पूर्वग्रहविरहित विचार मला फार आवडायचे. ‘स्त्री-मुक्ती’वरचे त्या वृद्धाचे विचार इतके पुढचे, की आम्हालाही न झेपणारे. बाबा आमट्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’, ‘वर्कर्स युनिव्हसिर्टी’ या पुस्तकांनी असेच भारलेले. सोमनाथ शिबिरात एका सर्वोदयी वृद्धानं मला वळकटी बांधायला शिकवलं होतं. त्यांची पांढरट जाड सतरंजी गुंडाळलेली ती खास सर्वोदयी गठडी होती. कुणी माणसं शिक्षणक्षेत्रात होती. ‘नई तालीम’ ही वर्ध्याची शाळा म्हणजे मुक्तशिक्षणाची आद्य शाळाच.
गांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद्र सरकारात प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अयशस्वी ठरेना का; पण जगाला आर्थिक प्रश्नावरचा भारतातून पुढं अलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो.
मी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाईवगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा!’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो!)
आजवरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं? कर्जबाजारी शेतक-यांचे गळफास! आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्य होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाकरचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून.
काही वेळा चर्चा सुरू होते, की ‘स्वातंत्र्य कोणी मिळवलं?’ मला वाटतं, अनेकांनी. 1857च्या लढ्यापासून तो गांधीप्रणीत चळवळीपर्यंत. पण भारतातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्याची इच्छा कोणी निर्माण केली, या प्रश्नाला मात्र एकच उत्तर मी देईन, गांधीजी. भारतव्यापी, सर्व थरांमध्ये प्रभाव टाकलेली ही एकच व्यक्ती. बाकीच्यांची वर्तुळं लहान आहेत.
गांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलेनियम’वर प्रभाव टाकणा-या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्याबरोबरीनं लिहिलं जाईल.)
माटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवर्णीय समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्न तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय.
मधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का?’ हे ‘हो’म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी? तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते?’
हे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये?
आणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते? तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली.
पंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात! दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.
माझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत. त्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटातल्या काही नाण्यांच्या चो-या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सगळं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडिलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो त्यांच्या आणि वडिलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो.
गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले? तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का? त्या काळात मी धार्मिक मार्गात होतो. ध्यान करायचो. निर्विचार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं.
हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी ब-याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणा-या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फे-यातून सुटका? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की.
मग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण.
या वर्षातच मला वर्ध्याला जाण्याचा योग आला. तिथल्या विभा गुप्ताने ‘ग्रामीण तंत्रज्ञान परिषद’ आयोजित केली होती. तिथे जुने गांधीवादी भेटले, तसेच आज खेड्यापाड्यात काम करणारे तरुणही. कोणी बांबू हा विषय घेतलाय, तर कोणी संडास; कोणी शेतीमधले प्रयोग करतंय, तर कोणी तलम खादी काढायचा ध्यास घेतलाय. कुणी जुन्याचं उत्खनन करतोय, तर कोणी जुन्या नव्याचा मेळ घालत बसलाय… असा सगळा पागलखाना.
दांडीयात्रेच्या समाप्तीचा तो दिवस. म्हणून आम्हाला सेवाग्राम मधल्या ‘बापू कुटी’ला सक्काळीच नेणार होते. त्यामुळे मी आनंदून गेलो होतो. किती वर्षांनी परत बघणार ती कुटी. माझं इंप्रेशन तसंच रहावं, निदान कमी तरी होऊ नये, असं वाटत होतं.
पण त्या परिसरात पाऊल टाकल्यावर मन प्रसन्न झालं, ते अखेरपर्यंत. झाडं-झाडं बरीच आणि मधे मधे बरीच कौलारू, मातीची टुमदार घरं. वर नळीची कौलं. सारवलेल्या मातीचा छान, डोळ्यांना त्रास न देणारा रंग. बाहेर व्हरांडे. त्याला जे खांब उभे केले, ते कुठेही न आकार दिलेले वासे. लाकूड कामास तेलाचा काळा रंग; मातीच्या रंगाला किंचित उठाव देणारा.
मोकळ्या परिसरात आम्हा सगळ्यांना बसवलं. आश्रमातल्या लोकांमागोमाग आम्ही ‘आश्रम भजनावली’ तल्या प्रार्थना म्हटल्या. तो काळ हळूहळू अंगावर चढू लागला. काय असेल त्यावेळी इथं वातारण. नेहरू, पटेल, आजाद, गफारखान… अशी माणसं इथं कितीदा आली असतील आणि अशीच इथं वावरली असतील. प्रार्थनेलाही बसली असतील. इथल्या प्रत्येक सामान्य माणसामध्ये एका ध्येयामुळं असामान्यत्व संचारलं असेल. चढाओढ असलीच तर ती त्यागाची. समर्पणाला सीमाच नसेल आणि या सगळ्यामागं एक जादूभरलं व्यक्तित्व असेल, गांधीजी.
प्रार्थना संपल्यावर सगळे पांगले. मी बापू-कुटीकडे निघालो. यावेळी आणखी वैशिष्ट्यं जाणवली. आपल्या भिंतीकुडाच्या, मातीने सावरलेल्या होत्या आणि त्या वरून मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळं सगळं घर वरून एकमेकांशी जोडलं गेलेलं. खालीही तसंच. कुठे सहसा दारं नाहीत. होते ते फक्त आडोसे. अप्रत्यक्ष प्रकाश सर्वत्र झिरपत होता.
गांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेश प्रवासात पूर्वीच्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं? बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती.
पिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करत आहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं? गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान.
................................................................

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

यूपीएससी परीक्षा अन्‌ पालकांची भूमिका

( सौजन्य- ई-सकाळ)
कृष्णा भोगे, कार्याध्यक्ष, राज्य मानव विकास मिशन

आपल्या मुला-मुलींनी जीवनात फार मोठे व्हावे, समाजात त्यांना मान सन्मान मिळावा आणि सुखी जीवन जगा, अशा प्रकारची इच्छा जवळजवळ सर्वच पालकांची असते. त्यामुळे सर्वच पालकांना असे वाटते, की त्यांच्या मुला-मुलींनी "यूपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी व्हावे. मात्र, त्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्‍यक ठरते.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक मुला-मुलींचा कल डॉक्‍टर, इंजिनियर होण्याकडे असावयाचा; परंतु मागील काही वर्षांमध्ये 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अखिल भारतीय सेवेमध्ये प्रवेश करण्याकडे दिसून येतो.

बरेचसे पालक सातवी किंवा आठवीपासूनच आपल्या मुलांना युपीएससी परीक्षेबाबत आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यात वावगे असे काही नाही. तथापि, अगदी सातवी किंवा आठवीपासूनच मुलांमध्ये यूपीएससी परीक्षेचा कल निर्माण करणे फारसे योग्य नाही. यासंबंधात मुला-मुलींच्या आवडी निवडीचाही विचार करणे गरजेचे आहे. कोणताही मुलगा, मुलगी सातवी किंवा आठवीमध्ये पुढील आयुष्याच्या दिशेबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याकरिता विद्यार्थ्याने कमीत कमी 12 वी पावेतो शिक्षण घेणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक पालकास असे वाटते की त्यांच्या मुला-मुलींनी फार मोठे व्हावे आणि त्या मुलांना यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हाधिकारी किंवा तत्सम पदावर काम करावे; परंतु केवळ इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करून उद्दिष्ट साध्य होत नाही. याकरिता कुटुंबात पोषक वातावरण निर्माण करणेही गरजेचे आहे. पोषक वातावरण याचा अर्थ असे वातावरण की, ज्यामुळे मुला- मुलींमध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल. ते भविष्यात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधीचा अभ्यास करून त्याबाबत सर्वंकष विश्‍लेषण करू शकतील आणि त्यांच्या मानसिकतेस व प्रवृत्तीस पोषक अशा व्यवसायाची निवड करू शकतील. याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांशी मनमोकळी चर्चा करणेही गरजेचे आहे. बहुतेक पालक आपल्या पाल्याशी मोकळ्या मनाने चर्चा करीत नाहीत. आपल्या पाल्याचे विचार समजून घेण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. सुखी आणि समाधानी जीवनाकरिता अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट व्यवसायावर अवलंबून न राहता उपलब्ध सर्व बाबींचा सखोल आणि संतुलित पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुला-मुलींची मानसिकता, त्यांची आवड निवड आणि त्यांचे खरे बलस्थान या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतींच्या आधारे आपल्या पाल्यांच्या भविष्याबाबत एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही; तसेच एक प्रकारे घेतलेला निर्णय आपल्या पाल्यावर लादणे हेही योग्य नाही. जे विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत ते सुद्धा आज व्यवसायांमध्ये फार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांपेक्षा किती तरी अधिक पगार मिळतो आहे; तसेच त्यांना सामाजिक मान-सन्मान सुद्धा मिळतो आहे. त्यामुळे पगार व सामाजि
क दर्जा प्राप्त करण्याकरिता फक्त यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे, हा गैरसमजसुद्धा काढून टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी जबरदस्तीने यूपीएससी परीक्षा आपल्या पाल्यावर लादू नये. अर्थात पोषक वातावरण निर्माण करून योग्य पद्धतीने सामंजश्‍याचे आणि खेळीमेळीचे वातावरणात आपल्या मुला-मुलींच्या विचारात योग्य तो बदल घडवून आणणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. पालकास हे शक्‍य होत नसेल तर परिचित आणि विश्‍वासातील काही व्यक्तींची मदत घेण्यास हरकत नाही.

काही पालक मुला-मुलींनी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याकरिता आणि त्यासोबतच कला शाखेत पदवी संपादन करण्याकरिता दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवितात. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वर्षाचा खर्च रु. दोन ते तीन लाख पावेतो इतका येतो आणि तीन वर्षांकरिता मुलास दिल्ली येथे ठेवावयाचे झाल्यास पालकास सात ते आठ लाख पावेतो इतका खर्च करावा लागतो. इतके करूनही यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळेलच याची खात्री देता येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या पालकांकडे भरपूर पैसा आहे, अशाच पालकांनी आपल्या पाल्यास दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरात पाठवावे; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे, अशा पालकांनी मात्र चुकूनही कर्ज काढून आपल्या मुलास दिल्ली किंवा इतरत्र ठिकाणी पाठवू नये. मुलांचा निर्धार पक्का असेल आणि श्रम करण्याची मानसिक तयारी झाली असेल तर तो विद्यार्थी लहान शहरांत राहूनसुद्धा यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकतो. आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वच माहिती लहान शहरातसुद्धा उपलब्ध होऊ शकते. यूपीएससीचा अभ्यास करण्याकरिता राहत्या घरी स्वतंत्र खोली असणे गरजेचे आहे. घरी येणाऱ्या मित्रमंडळी आणि नातेसंबंधातील व्यक्तींमुळे मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेता घराचे शेजारी एखादी खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी मुलांच्या अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.

समविचारी आणि समसवयीच्या 2 ते 3 मुलांनी एकत्र येऊन अभ्यास केल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होतो; तसेच खोलीचे भाड्यावरील खर्चातही बचत होते. पालकांनीसुद्धा याबाबत पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.
केवळ कोचिंग क्‍लास लावल्यामुळे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. दृढ निर्धार आणि कठोर परिश्रमाच्याच आधारे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळू शकते.
............................

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

शाळेतील खिचडी "बिरबलाची खिचडी'


विद्यार्थ्यांची गळती थांबावी आणि दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना पुरेसे उष्मांक असलेले अन्न मिळावे, या उद्देशाने सरकारने शालेय पोषण आहार योजना प्रत्येक शाळेत सुरू केली आहे. या पोषण आहार योजनेत या वर्षीपासून बदल केल्याने ग्रामीण भागामध्ये मुलांना पोषण आहार देणे शिक्षक व ग्रामस्थांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सरकारच्या या बदललेल्या योजनेत अनेक त्रुटी असल्याने खिचडी शिजवण्यास ग्रामस्थांमध्ये नकारात्मक सूर दिसत आहे.
राज्यातील प्राथमिक शाळा व अनुदानित खासगी शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. यापूर्वी रास्त भाव धान्य दुकानातून तांदूळ शाळेत नेऊन तेथे खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना दिली जात होती. या वर्षीपासून योजनेत बदल करण्यात आला . नवीन योजनेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 प्रथिने तसेच चौथी ते सातवीसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिने असा आहार दिला जाणार आहे. धान्यांचा पुरवठा कंत्राटदारांकडून थेट शाळेला केला जाणार असून तांदूळ, बेसन, कडधान्य, तेल, सोयाबीन, हळद, तिखट इत्यादी सर्व सामान शाळेत दिले जाणार आहे. दररोज उष्मांकांच्या तुलनेत शाळेने विद्यार्थ्यांना हा आहार शिजवून द्यायचा आहे. एका विद्यार्थ्यासाठी 5 ग्रॅम तेल, 14 ग्रॅम कडधान्य, 15 ग्रॅम सोयाबीन,24 ग्रॅम बेसन असा विचित्र तक्ता तयार करण्यात आला आहे, त्यामुळे या तक्‍त्यानुसार आहार कसा तयार करायचा हा मोठा प्रश्‍न आहे.
शाळेतील पटसंख्येनुसार ठेकेदाराकडून शाळेत धान्य उतरून घेताना त्याचे वजन कसे करणार असा प्रश्‍न आहे. वजन करण्यासाठी सर्व शाळांना वजनकाटा पाहिजे; मात्र कोणत्याही शाळेकडे तो नाही. मुलांना पुरविलेले धान्य, वापरलेले धान्य आणि साठा याची सांगड घालताना शिक्षकांची त्रेधा उडणार आहे. हे धान्य शिजवून देण्यासाठी बचत गट, मंडळे, गरीब महिला यांना प्राधान्य द्यावे, असे सरकारचे म्हणणे आहे.कोकणातील अनेक शाळांचा पट 10 ते 20 च्या आतमध्ये आहे. 100 हून अधिक पटसंख्या असणा-या शाळा खूपच कमी आहेत. एखाद्या शाळेची पटसंख्या 10 असेल, तर तेथे इंधन खर्च प्रतिविद्यार्थी 50 पैसे याप्रमाणे पाच रुपये मिळेल. केवळ पाच रुपयांसाठी धान्य शिजविण्याचे काम कोण करणार? शिजविण्यासाठी अनुदान नसल्याने धान्य शिजवणे डोकेदुखी ठरणार आहे. प्रत्येक शाळेत धान्यपुरवठा करणा-याने वेळेत धान्य पोहोचवायचे आहे. अनेक शाळा वाडीवाडीवर व डोंगरात विखुरल्या आहेत. काही शाळांपर्यंत रस्ते नाहीत. अत्यंत दुर्गम भागातील शाळांमध्ये पुरवठादार वेळेत धान्य कसा पोहोचवणार हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा अनेक अडचणीत ही योजना सापडली आहे. सरकारी दुकानदारांकडून पुरवठा काढून घेऊन खासगी पुरवठादारांना धान्य शाळेत पोहोचवण्यास दिले जाणार असल्याने धान्यपुरवठादारांना भ्रष्टाचाराचे कुरणच मिळण्याची शक्‍यता पालकांनी व्यक्त केली आहे. डाळीमध्ये मसूरडाळ अथवा मुगडाळ असा पर्याय पुरवठा करताना ठेवला आहे. आज या दोन्ही डाळींच्या दरात मोठी तफावत आहे. तेलपुरवठा कोणता करायचा यामध्ये एकमत नाही... तिखट, मीठ, हळद, बेसण हे कोणते असावे याबाबतही खुलासा नाही,त्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे पिठले आणि सोयाबीन हे मुलांना न आवडणारे पदार्थ आवर्जून ठेवलेले आहेत .कांदा फोडणी साहित्य नसल्यांने बेचव अन्न मुले खात आहेत.धान्य साठवणूक करण्यासाठी शाळांकडे पिम्प व इतर सोय नाही. मुलांना विशिष्ट उष्मांक मिळावेत एवढाच या योजनेचा हेतू असेल तर एखाद्या चांगल्या कंपनीला पौष्टीक बिस्किट अथवा तत्सम पाकिटे पुरविण्याचे काम देऊन हि योजना सोपी का केली जात नाही. सरकारच्या या बदललेल्या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शाळेतील खिचडी "बिरबलाची खिचडी' ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

आता एम.डी कसा होणार ?

खूप दिवसांनी डाँ.श्री व.सौ.करंदीकर यांना परदेशात जाण्याचा योग आला.परदेश टूर महिनाभराची असल्यांने आपल्या उत्तम चालणा-या हाँस्पिटलची जबाबदारी त्यांनी आपल्या नुकत्याच एम.बी.बी.एस. झालेल्या मुलाकडे दिली.आणि करंदीकर दांपत्य परदेश टूरवर निघून गेले.
महिनाभराची टूर आटोपून डाँ.करंदीकर हाँस्पिटलमध्ये पुन्हा रुजू झाले.त्यावेळी त्यांना जोशीबाई भेटल्या . जोशीबाई डाँ.करंदीकरांकडे पाठ्दुखीवर गेले अनेक वर्षे उपचार घेत आहेत.
डाँ.करंदीकरांनी जोशीबाईंना विचारले.‘मी नसतांना हाँस्पिटल ठीक चालले होते ना ? आमच्या नवीन मुलाला जमले ना सर्व ?.
जोशीबाई म्हणाल्या तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा हुशार आहे.हातगुण पण आहे.अहो माझी पाठ्दुखी १५ दिवसात बरी केली त्यांने.
रात्री डाँ.करंदीकर आपल्या मुलाला म्हणाले चांगला दवाखाना चालवशील अरे त्या जोशीबाई इतके
वर्षे उपचार घेत होत्या म्हणून तू एम.बी.बी.एस झालास आता एम.डी कसा होणार ?

ती एक वस्तू

ती एक वस्तू
असं म्हणतात पहिलं प्रेम , पहिली खरेदी ,शाळेचा पहिला दिवस ,पहिल्या पगारातून आणलेली वस्तु काहिही विसरता येत नाही.आमच्याकडे तांब्यापितळ्याच्या खूप वस्तू होत्या. मी माझ्या वडिलांना अनेक वेळा म्हटलं आपण त्या वस्तू मोडीत देऊ .तांब्याचे पिंप देऊन स्टीलचे पिंप घेऊ पण वडील याला तयार होत नव्हते.ते म्हणाले आपल्याकडे काही नसतांना मी या वस्तू घेतल्यात .माझ्या पगारातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून वस्तू जमवल्यात.वडिलांचे बोलणे मनावर फारसं न घेता मी एक दिवस सर्व जुन्या वस्तू बाहेर काढल्या.त्यामध्ये मला माझ्या लहानपणीचा छोटा तांब्या सापडला.मी या तांब्याशिवाय कधी पाणी प्यायलो नाही .माझा तांब्या कुणी घेतलेला मला आवडायचे नाही.हा तांब्या नसेल तर मी जेवत नसे.माझ्या लहानपणीच्या आठवणी त्या तांब्याने जाग्या केल्या.तो तांब्या मला खूप प्रिय होता वडीलांच मन मला त्या घटनेनंतर कळल होतं.माझ्याकडे मी घेतलेली पहीली बाईक जपून ठेवलेली आहे.आपल्याही असतील अश्या काही आठवणी.एखादी गाडी ,आवडती पँन्ट,चादर ,शाल चला शेअर करु या !
प्रगतीच्या वाटेवर जात असतांना मागे वळून पाहिल्यावर या आठवणी किती-किती गोड वाटतात ना !

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

भटकंती झाली सफल



एक भटकंती अशीही या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले. सौरकंदीलाच्या उजेडात ही आदिवासी वाडी उजळून निघाली आणि आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
आंबिवली गणी आदिवासी वाडीच्या प्रावासानंतर दै.सकाळ मधून "जंगलाचा राजा भिकारी' या मथळ्याखाली आदिवास्यांच्ता व्यथा मी मांडल्या .माझ्या या प्रयत्नाला यशही आले.या वृत्ताची दखल घेत गोरेगाव( जि.रायगड) येथील शेअर संस्थेने तातडीने या वाडीची माहिती घेतली. शेअरचे महाड विभागाचे कार्यकर्ते विजय रानमाळे, गणेश मुरगुडे व अमोल शिरगावकर यांनी या वाडीला भेट दिली. प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व शेअरच्या संचालिका निकोला मॅन्टेरो यांनी वाडीवर विजेची समस्या सोडविण्यासाठी 17 कुटुंबांना सौरकंदील प्रकल्प मंजूर केला. महाडचे नवनियुक्त तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या हस्ते या आदिवासींना सौरकंदीलांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला. आदिवासींनी या वेळी तहसीलदारांना आपल्या अडचणी सांगितल्या. तुषार इनामदार यांनी सौरकंदील वापरण्याची माहिती आदिवासींना दिली. या कार्यक्रमाला सरपंच प्रतिमा गायकवाड, उपसरपंच रमेश पवार, शेअरचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.पाणीटंचाईबाबत शेअर प्रयत्न करणार आहे. गणी आदिवासीवाडीवर जाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते.मीही अशी डोंगरावरून पायपीट करत गणीच्या व्यथा मांडल्या .माझी पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद मला वाटतो.

बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.
राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.
मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला ‘सर मला मारताय तुमचा बाप मरेल .‘ संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.
१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.‘असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा‘ अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.
यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला ‘दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.
‘ अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.
............
सुनिल पाटकर

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

जगाला प्रेम अर्पावे


दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली .
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेमारी,जलवाहतूक हे येथील पारंपारिक व्यवसाय.काळानुसार अन्य व्यवसायही गावात केले जातात.हे इतिहासकालिन गाव अचानक प्रकाशझोतात आले ते २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे.२५ जुलै २००५ या दिवशी या गावावर निसर्गाचा कोप झाला.या दिवशी पावसाने सर्व राज्यात हा:हाकार माजवला होता.सावित्री नदीला भयानक पूर आला होता .जवळचे महाड शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली होती.दासगावच्या किनार्‍यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरू लागले.रात्रीची वेळ. वीज गायब झालेली.अशा स्थितीत किनार्‍यालगतची माणसं डोंगरावरील घराच्या आसर्‍याला जाऊ लागली.आणि याच दरम्यान घरांच्या मागे असलेली डोंगर कोसळू लागला.काही क्षणातच दरड कोसळली .या दरडीखाली बघताबघता घरच्या घरे गाडली गेली.डोळ्या देखत निष्पाप जीव दरडीखाली गाडले गेले.या आपत्तीत दासगावने ४७ माणसे कायमची गमावली.या मध्ये प्राथमिक ,माध्यमिक शाळेतील १२ विद्यार्थी मृत झाली.दासगावच्या याच डोंगरात प्राथमिक शाळा आहे.या शाळेत शिकणारे गौरव प्रकाश खैरे, प्रतिज्ञा प्रकाश खैरे,अक्षता प्रकाश खैरे,रविराज प्रकाश निवाते,सिद्धांत संतोष तोंडकर,श्वेता सुरेश जैन ,संदेश दीनेश उकिर्डे या पहिली ते चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचाही दरडीखाली मृत्यू झाला.प्रकाश खैरे यांची तिनही मुले दगावली होती.कोसळलेला डोंगर पहाडा एवढे दु:ख पदरात टाकून गेली होता.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना सुरू केली आहे.या योजनेतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रु.ची रक्कम विमा कंपनी कडून अदा करण्यात आली.भविष्यातला आधारच निघून गेल्यांने मिळालेल्या पैशाचा आधारही पालकांना नकोसा वाटू लागला.परंतु या पालकांनी आपल्या दु:खातूनच इतरांच्या सुखाचा मार्ग शोधला. मिळालेल्या पैशातील काही रक्कम पालकांनी दासगावच्या प्राथमिक शाळेला देणगी दिली. आपल्या मृत पाल्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी शाळेला बेंचेस भेट दिल्या.आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक असतात पण असा आदर्श ठेवणारे विरळच ! आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.परंतु ‘त्या ’ मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.

ती

सर्व जेवल्यानंतर
तू जेवायला बसतेस
रिकामी भांडी पाहून
खुदकन हसतेस

तुला सवय झालेय आता
त्या रिकाम्या भांड्यांची
आणि
आम्हालाही सवय झालेय
तुझ्या अशा भरल्या प्रेमाची

सुनिल पाटकर

परदु:ख शीतल

उत्तमकथा मासिकातर्फे दरवर्षी कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. उत्तमकथा मासिकाच्या या कथा स्पर्धेत माझ्या परदु:ख शीतल या कथेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले .ही कथा ९ जून २००७ च्या उत्तमकथा मासिकात प्रसिद्ध झाली.
...........................................................................................................................



लांबलचक ढेकर देत राजाभाऊ अंगणात आला.हातात पानाची चंची अडकवलेली आणि अडकित्त्याने सुपारी कातरत राजाभाऊची नजर आजूबाजूला भिरभिरू लागली. कातरलेली सुपारी तोंडात टाकत त्यांने अडकित्ता चंचीत टाकला आनि पोटावरून हात फिरवत त्याने शतपावलीला सुरूवात केली.
नेसलेल्या लुंगीच्या वरुन डोकावणारं त्याचं भलमोठं पोट दिवसेंदिवस अधिकच वाढत होते.पोटाचा नगारा ,तब्बेतीने स्थूल आणि दिसायला घारागोरा...असा हा राजाभाऊ टिपिकल कोकणस्थ !.
शतपावलीला घालतानाच राजाभाऊ मध्येच खांद्यावर टाकलेली बनियन हाताने गरागरा फिरवून स्वत:ला वारा देत होता.राजाभाऊच्या या सवयी शेजा‌र्‍यांना तशा अगदी तोंडपाठ झालेल्या आणि त्याही पेक्षा अधिक, शेजा‌र्‍यांच्या घरी काय चाललंय हे राजाभाऊला चांगलंच ठाऊक असायचे.राजाभाऊचे गिम्हवण्याचं घरही अगदी मोक्यावर.....घराच्या अंगणात उभं राहिलं की कोणाकडे कोण जातयं..हे सारे कळायचं.घरासमोर भाजी नेणा‍र्‍या बायका घरी कोणती भाजी नेतात हे देखिल त्याला माहित असायचं आणि त्या जोरावर तो जावडेकरांना रस्त्यात थांबवायचा "काय जावडेकर , आज तोंडल्याची भाजी ?"राजाभाऊच्या या प्रश्नावर जावडेकरही अवाक व्हायचे.घराच्या आवारातून जावडेकरांच्या घरी काय चाललंय हे राजभाऊला कळायचं
गवाणकरांची सून रागाने तरातरा कुठे गेली?. जी.के.चा मुलगा आज इंटरव्हूला कुठे गेला होता ?.इथ पासून रानडेच्या मुलीला कुठले स्थळ आलयं याची इत्यंभूत माहिती राजाभाऊला असायची...आणि ती का नसावी ?.कारण दिवसभर जेवणे ,खाणे,गप्पा आणि आराम याशिवाय त्याच्या आयुष्यात विशेष काहिच नव्ह्ते.घरात म्हातारी आई अंथरुणाला खिळ्लेली असायची.तिच्या सेवेला एक मोलकरीण असे.तिचं नि राजाभाऊचं काहीतरी चक्कर असावं अशी चर्चा गावात असायची.परंतु हा भाग दुय्यम !.
सकाळी उठलं कि साफसफाई करायची, देवपूजा आणि त्यानंतर अंगणातील आरामखुर्चीत मनसोक्त अंग झोकून द्यायचं.पेपर वाचायचे .आरामखुर्ची समोर पाच सहा खुर्च्या मांडून ठेवायच्या. कमरेला लुंगी , अडकित्ता सुपारी जोडीला. सारी तयारी झाली की मग राजाभाऊची नजर शोधू लागायची गप्पा मारण्यासाठी एखाद्या जोडीदाराला.गप्पा मारण्यासाठी राजाभाऊला कोणत्याही वयोगटा्तील व्यक्ती चाले.अट एकच गप्पा रंगल्या पाहिजेत !
मुंबईत मोटारी बनवणार्‍या एका कंपनीत राजाभाऊ चांगल्या पगारावर नोकरीला होता.कंपनीने जेव्हा स्वेच्छानिवॄत्ती जाहिर केली त्यावेळी पहिली उडी मारणारा माणूस होता राजाभाऊ सोमण ! राजाभाऊने स्वेच्छानिवॄत्ती घेतली. त्यातून मिळालेले पैसे गुंतवून राजाभाऊ स्थायिक झाला तो आपल्या दापोली जवळच्या गिम्हवणे गावी ! राजाभाऊ घरही अगदी हर्णे- मुरुड रस्त्यावर.त्यामुळे घराच्या काही खोल्या पर्यटकांना भाड्यांने देऊन त्यातून बर्‍यार्पैकी उत्पन्न मिळवत असे.लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच राजाभाऊची बायको त्याला सोडून गेली.स्वच्छंदी जीवन जगणार्‍या राजाभाऊला कदाचित हा पाशही नकोसा झाला असावा ! कोणतीही काळजी नाही. कशाचीही फिकीर नाही असं बिनधास्त आयुष्य राजाभाऊच्या वाट्याला आले होते समर्थाना राजाभाऊ जर भेटला असता तर त्यांनी जगी सर्व सुखी कोण आहे ? असे विचारण्याचे धाडसच केलं नसतं
दुपारी आणि सायंकाळी अंगणात भरपूर गप्पा रंगायच्या..मनसोक्त किस्से सांगितले जायचे.आणि त्या गप्पांना हळूहळू झालर चढायची ती दु:खांची!..राजकारण ,भारनियमन,क्रिकेट पासून सुरू होणार्‍या गप्पा जेव्हा कौटुंबिक पातळीवर यायच्या तेव्हा मात्र अंगणही भारावून जायचं. राजाभाऊला नेमकं हेच हवं असायचं.जो पर्यंत गवाणकरांना सून आता कशी वागते ? हा प्रश्न विचारला जात नसे तोपर्यंत गवाणकर सूने विषयी भडाभडा बोलत नसत.मुलीचे कुठे जमतंय का ? असं विचारल्या शिवाय रानड्यांची कहाणी सुरू होत नसे.जावडेकरांची पेन्शन ,जी.के.च्या मुलाची नोकरी .याविषयांवर मग जो-तो भडाभडा बोलायचा आणि आपले मन हलके करायचा. याचा परिणाम राजाभाऊवर होत नसे.तो मात्र निर्विकारपणे आपल्या घड्याळाकडे पाही.‘चला चांगला टाईमपास झाला‘असं बोलुउन तो दुसर्या दिवशीचा विचार करत असे .दररोज घराच्या अंगणात दु:खाच्या,तक्रारीच्या कहाण्या सांगितल्या जायच्या आणि राजाभाऊ त्या ऐकून समाधानी होत असे.वेळ जात नसला कि तो एखाद्या शेजार्‍याला बोलावून घीए व त्याच्यापुढे त्याच्या वर्मी लागणारा विषय काढत असे की ज्यामुळे हा शेजारी आपल्या मनातलं सारं काही बोलून टाकायचा. शेजार्‍याचे मन हलके व्हायचं आणि .राजाभाऊचाही वेळ जायचा.वेळ घालवण्याचे एक हुकमी अस्त्र राजाभाऊकडे होते.
राजाभाऊने घड्याळात पाहिले दुपारचा एक वाजला होता.त्याने खिडकीतून आत डोकावले म्हातारी आई झोपलेली होती.दुपारी जरी ऊन असलं तरी घराजवळच्या भल्या मोठ्या झाडांमुळे अंगणात गर्द सावली येत असे.या सावलीत आरामखुर्ची सरकवत त्यावर राजाभाऊ रेलला.डोळ्यावर चष्मा लावत तो पेपर वाचू लागला.पेपर वचतानाही त्याची नजर मध्येच बाहेर भिरभिरत होती तेवढ्यात त्याला बाबुराव सावंत येताना दिसले..राजाभाऊने अंगणातून बसल्या जागेवरून हाक मारली " सावंत तात्या..... "
राजाभाऊच्या दणदणीत आवाजाने सावंत जागीच थांबले.हातातला पेपर बाजूला ठेवत राजाभाऊ फाटका पर्यंत गेला.
" कुठे गेला होतात ?" फाटक उघडत राजाभाऊनी विचारले.
" जरा भाच्याकडे गेलो होतो " सावंत रस्त्यावरूनच बोलले.
" अहो, या जरा बसा ."
" नको राजाभाऊ.अहो, घरी जायला उशीर होईल."
"अहो, या जरा .कधीमधी भेटणारी माणसं तुम्ही या ." राजाभाऊनं सावंताना गळ घातली.गोड्गोड बोलत राजाभाऊनी अखेर सावंताना अंगणात आणलचं.
" भाच्याकडे काय विशेष ?" खुर्चीत रेलत राजाभाऊनं विचारलं.
"विशेष काही नाही.अँग्रिकल्चर काँलेजला आहे.इथे हाँस्टेलला रहातो.बहिण म्हाणाली जरा लक्ष ठेवत जा."
"लक्ष ठेवायलाच पाहिजे ,त्यात तुम्ही मोठे ." सावंतांच्या वाक्यावर राजाभाऊ उत्तरला..’तुमचा मुलगा पण अँग्रिकल्चरला होता ना ?’ राजाभाऊनी खडा टाकलाच.
"तो एम.एस.सी झालाय. पुण्याला असतो.".
" मध्ये त्याला पाहिला होता ,सोबत बायको होती काय ?" राजाभाऊ हळूहळू सावंतांच्या वर्मावर घाव घालू लागला.सावंत थोडा वेळ स्तब्ध राहिले.
" लग्न कुठे पुण्याला केलं काय ? बोलवलं नाही आम्हाला ? " राजाभाऊच्या प्रश्नावर सावंतांची नजर झुकली.
" नाही,म्हणजे त्यानीच जमवलं." सावंत शांतपणे म्हणाले.
" जाऊ दे, अहो, त्यात काही विशेष नाही .हल्ली भरपूर लग्न अशीच होतात." राजाभाऊनं दिलासा दिला.
"चालायचं म्हटल की सगळं चालतं.आईवडिलांनी मुलांकडून जास्त आशा बाळगायच्या नाहीत हेच खरे" .सावंत गंभीर झाले होते.
"जातीतली आहे ना ? तुम्ही ९६ कुळी ना ?"
"जातीतली असती तर कशाला ? " सावंत तिरस्काराने म्हणाले.
"रीतभात तरी आहे का ?" राजाभाऊनं भारीला एक प्रश्न विचारलाच.
"कोण बघतंय ?.लग्न झाल्यावर सोपस्कार म्हणून गेलो होतो आम्ही .तुम्ही करा राजाराणीचा संसार ". सावंत नैराशाने म्हणाले.
"तुम्हाला सांगितलं होतं का त्याने ?"
"तो हरामखोर हो,पळून गेला आणि लग्न करून आला.आता हा शिकला सवरलेला ,२५ हजार पगार घेणारा मुलगा,त्याला आपण काय बोलणार ?" सावंत रागाने बोलले आणि राजाभाऊ त्यांच्याकडे पहात बसला.
सावंत सारं काही भरभरून बोलले.मुलाने परस्पर लग्न केल्याचे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं
" खरं सांगू राजाभाऊ म्हणून आम्ही दोघं कुठे बाहेर पडत नाही."
सावंतांच्या या वाक्यावर .राजाभाऊनं त्याना धीर दिला."तसं काही मानू नका सावंत ,अहो हल्ली चलतं सगळं".
"तुम्हाला नाही कळायचं राजाभाऊ परदु:ख शीतल असतं राजाभाऊ"
सावंतांच्या बोलण्यात अखेर ‘परदु:ख ’ हा शब्द आलाच.
‘परदु:ख शीतल असत ‘ हा शब्द या अंगणात राजाभाऊने हजारवेळा ऐकला होता.
"हे बघा तात्या, तुम्हाला काही वाईट वाटायला नको. कुठे नाही गेलात तरी माझ्याकडे या आणि तो तुमचा मुलगा आला तर त्यालाही माझ्याकडे पाठवा." राजाभाऊनं सावंताना दिलासा दिला.
राजाभाऊच्या अंगणातून सावंत हळुवार पावलं टाकत बाहेर पडले.थोडावेळही बसण्यास तयार नसलेल्या सावंतांच्या भावनेचा बांध असा काही फुटला कि तब्बल दोन तास सावंत आपल्या व्यथा राजाभाऊला सांगत होते.सावंत गेल्यावर राजाभाऊने हातपाय लांब केले.एका बाजूला शिकला सवरलेला सावंतांचा मुलगा परस्पर लग्न करून आला.तर दुसरीकडे रानड्यांची मुलगी पंधरा ठिकाणी दाखवूनही कोणाच्या पसंतीला येत नव्हती.मुलीच्या या चिंतेने रानडे हैराण झालेले असायचे.रानडे मुलगी दाखवून आले की ही बातमी राजाभाऊला कळायची आणि संध्याकाळी "मग ठरलं का मुलीच लग्न ?" असा खोचक प्रश्न राजाभाऊ रानड्यांना विचारायचा . रानडेही मन मोकळं करायचे आणि राजाभाऊचाही वेळ जायचा.
"ठरेल हो धीर धरा" असा वर दिलासा राजाभाऊ त्यांना द्यायचा." परदु:ख शीतल असतं राजाभाऊ तुम्हाला मुलगी नाही म्हणून हे दु:ख तुम्हाला कळणार नाही ." रानडे असं म्हणून गप्प व्हायचे.
घराच्या या अंगणात गप्पांतून अनेक दु:ख समोर आली. याच अंगणात ‘परदु:ख शीतल असतं ‘ हा शब्द प्रतिध्वनी सारखा उमटत असे.
राजाभाऊ मात्र निर्विकार असे .कसली दु:ख नि काय ! आपल्या सारखं आयुष्य पाहिजे.लोक काय म्हणून दु:खाच एवढ भांडवल करतात राजाभाऊच्या मनात हा विचार नेहमी येई. मुंबईतील आपली नोकरी किती चांगली होती . स्वेच्छानिवॄत्तीच्या कल्पनेने अनेक जण गळफटले.आता कसं होणार ही चिंता अनेकांना लागली होती पण आपण बिनधास्त स्वेच्छानिवॄत्ती घेतली .मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून रानडे रडतात.पुन्हा पुन्हा त्याच विषयावर दु:खी कष्टी होतात.छॆ:! च्यायला ! माझी बायको सोडून गेली तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही .सुरवतीला सगळे विचारायचे "राजाभाऊ वहिनी कुठे आहेत ? माहेरी गेल्या वाटतं ?" .त्यावेळी सगळ्यांना एकदाच सांगून टाकलं बायको मला सोडून गेली आहे.ती पुन्हा येणार नाही....एकदाच विषय फिनिश ! आरामखुर्चीत बसल्या बसल्या राजाभाऊच्या मनात विचार येत होते.
आपल्या अंगणात हजारो तक्रारी ,गार्‍हाणी ऐकून राजाभाऊ चक्रावून जायचा.जी.के म्हणायचे "राजाभाऊ दु:ख कुणाशी तरी उघडं केलं की मन हलकं होतं.एकवेळ माणूस सुख स्वार्थाने एकटा उपभोगेल पण दु:खासाठी त्याला सोबत असावी असं वाटत रहातं" .
"खरच असं वाटत असेल , दु:ख बोलून हलकं होत असेलं ?" राजाभाऊ या सार्‍या गोष्टीवर काहीकाळ विचार करत असे.
"जाऊ दे "असं म्हणून विषयही सहज सोडून देत असे. राजाभाऊकडे तसं बोलायला फारसं काही नव्हतं.माडाला नारळ किती आले आमसुलं किती विकली ....नाहीतर मुंबईतील गप्पा असे जुजबी विषय तो इतरांशी बोलायचा.पण इतरांच्या पोटात शिरून मात्र तो सारे बाहेर काढत असे.आणि नेमक्या याच गोष्टी त्याला विरंगुळा द्यायच्या.
पेपर वाचणं हा राजाभाऊचा आणखी एक छंद ! पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ,मोठ्या बातम्यांपासून अगदी छोट्या जाहिरातींपर्यंत सारा पेपर राजाभाऊ वाचून काढत असे .पेपर वाचतावाचता आजूबाजूला नजर भिरभिरत असायची.पण आज काहितरी वेगळं घडलं होतं.पेपर वाचता वाचता राजाभाऊ गंभीर झाला.एरव्ही पेपर वाचताना आजूबाजूला पाहणार्‍या राजाभाऊची नजर आज पेपरवर खिळली होती.
‘शारदा सहकारी बँन्केत आर्थिक घोटाळा बँन्क दिवाळखोरीत जाण्याची शक्यता ‘
या बातमीच्या मथळ्यावर राजाभाऊची नजर स्थिर झाली.त्याने पेपरातील संपूर्ण बातमी वाचून काढली.डोळ्यावरचा चष्मा काढला आणि गंभीर चेहर्‍याने तो खुर्चीत विचार करत बसला.बातमीतल्या ओळी तशानतशा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागल्या .
"आत्ताच्या आत्ता दापोलीली निघायला हवं". राजाभाऊ स्वत:शी पुटपुटला .खुचीतून उठत कपडे बदलण्यासठी तो मधल्या खोलीत आला.आई शांतपणे झोपली होती,कपाटाचा आवाज न करता अलगद त्याने पासबुक आणि डिपाँझिट्च्या पावत्या काढल्या.आईला झोपेतून न उठवताच शेजार्‍याला कल्पना देऊन तो घराबाहेर पडला.
शारदा सहकारी बँन्क पेपरातील बातमी राजाभाऊच्या डोळ्यासमोर येत होती.रिक्षा करून तो बँन्केत पोहचला.बँन्केसमोर खातेदारांची भलीमोठी रांग लागली होती.ते दॄश्य पाहून राजाभाऊ अवाक झाला." पैसे बुडाले बहुतेक.... झक मारली आणि इथे पैसे ठेवले"...".चेअरमनला बोलवा आणि आमचे पैसे परत करा.".अशा एकावर एक कानावर पडणार्‍या वाक्यानी त्याचे डोके चक्रावून गेलेतो शांतपणे शेजारच्या कठड्यावर बसला.स्वेच्छानिवॄत्ती घेतल्यानंतर राजाभाऊने बहुतेक पैसे याच बँन्केत गुंतविले होते.आणि त्या व्याजावर तो आपला प्रपंच चालवत असे.गेले तीन महिने पर्यटकांच्या गर्दीमुळे खोल्या बुक झाल्याने तो बँन्केत पैसे काढण्यासाठी आला नव्हता.
"तुमचे किती पैसे आहेत ?" शेजारच्या व्यक्तिच्या आवाजाने राजाभाऊ विचारातून जागा झाला.
"तीन लाख" राजाभाऊ शांतपणे म्हणाला.
"आमचे कमी आहेत ,सत्तर हजार.पैसे मिळतील का हो ? घर बांधयला काढलयं".
राजाभाऊ शेजारच्या माणसाकडे पहात बसला .ज्या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊलाही हवं होतं तोच प्रश्न ती व्यक्ति विचारत होती.बँन्केने खातेदारांनी संयम पाळावा अशी बाहेर नोटीस लावली होती.बँन्केच्या बाहेर राजाभाऊ दोन तास ताटकळत होता.परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने तो घरी परत आला.
घरची परिस्थिती गरीबीची असताना मुंबईचा रस्ता धरलेल्या राजाभाऊनं अहोरात्र मेहनत करून पैसे जमविले.हे पैसे बुडणार तर नाहीत ? या विचाराने तो कासाविस झाला.काडीकाडी जमवून साठवलेला पैसा....आपला पैसा काय हारामाचा पैसा आहे! कधी मिळतील पैसे, तो पर्यंत करायचे काय ?असे अनेक प्रश्न राजाभाऊ समोर आ वासून उभे होते.
घराकडे परततांना त्याची पावली थकली होती. डोळ्यातून फक्त अश्रू येणं बाकी होतं घरात न जाता तो अंगणातील खुर्चीत धपकन बसला.कपाळावर आलेला घाम त्याने रुमालाले पुसला.बँन्केच्या पासबुकावरून तो सारखासारखा हात फिरवत राहिला.बँन्केतील पैशाचा विमा असेल तर पैसे परत मिळतील.नाहीतर ,आयुष्याची सारी कमाई वाया जाणार या विचाराने तो चलबिचल झाला.
बँन्केतून परतल्यावर दोन दिवस झाले तरी राजाभाऊ कुणाशी काही बोलला नाही. दोन दिवसात कुणीही शेजारी फिरकलाही नाही.त्यामुळे राजाभाऊ अधिकच बेचैन झाला होता.ह्र्दयात दु:ख अगदी गच्च भरलं होतं.त्याला वाट करून दिली नाही तर त्याचा स्फोट होणार होता. दोन दिवसानंतर तो घराबाहेर पडला.घराच्या आवारात येरझार्‍या घालू लागला.रानडे ,सावंत,जावडेकर,वागळे ,गवाणकर कुणीतरी भेटतंय का? याची राजाभाऊ आतुरतेने वाट पहात होता.खूप खूप वाटू लागलं कुणाला तरी सांगावं ‘शारदा बँन्क बुडतेय.माझे पैसे बुडणार.‘. येरझारा घालताना राजाभाऊ स्वत:शीच बोलत होता.एवढ्यात त्याला गवाणकर येताना दिसले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.गवाणकरांना तरी सारं सांगता येईल या विचाराने तो पुढे आला.
"गवाणकर.." या आपल्या नेहमीच्या आवाजाने राजाभाऊने हाक मारली.
" राजाभाऊ,आता फार घाईत आहे .उद्या येतो ".गवाणकर तसेच बाहेरून निघाले.
"अहो ,गवाणकर,पाच मिनीटे तरी या "
"नको राजाभाऊ प्लीज ."राजाभाऊच्या विनंतीला मान न देताच गवाणकर सटकले.
वागळेही तसेच न थांबता निघून गेले.
रानड्यांना येताना पाहून राजाभाऊला धीर आला.रानड्यांसमोर मन मोकळं करता येईल हा विचार त्याच्या मनात येत असतांनाच नातवाला शाळेतून आणण्याची सबब पुढे करुन रानडेही निघून गेले.सावंताना भाजी आणण्याची घाई होती.त्यामुळे रात्री जेवून बसू असे आश्वासन देऊन सावंतही निघून गेले होते.
खूप वाट पाहूनही राजाभाऊला कुणीही भेटले नाही.एरव्ही तासनतास गप्पा मारून आपलं दु:ख हलकं करणारे सारे आज मात्र राजाभाऊचं एकण्याला हजर नव्हते .राजाभाऊ अक्षरश: रडकुंडीला आला. आपलं मन मोकळं करावं , आपलं दु:ख कुणा पुढेतरी हलकं करावं , आपल्याही दु:खात कुणीतरी वाटेकरी असावं असं राजाभाऊला खूप खूप वाटू लागलं .पण कुणीही त्याला भेटू शकले नाही.दु:खी मनाने तो माजघरात आला.आजारी आई काँट्वर झोपलेली होती.तिच्या पायाजवळ तो बसला.
‘आई ,मुंबईतून आणलेले पैसे ज्या बँन्केत ठेवले होते ती बँन्क.. ’...आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. एवढे दिवस दाबून ठेवलेले अश्रू डोळ्यातून भळाभळा बाहेर पडले.बिनधास्त ,स्वच्छंदी ,उद्याची तिळमात्र तमा न बाळगणारा राजाभाऊ, आईच्या पायाजवळ बसून मनसोक्त रडला.
घरा बाहेर आला तेव्हा राजाभाऊला खूप हलकं हलकं वाटलं.अंगणात ठेवल्या आरामखुर्चीत तो रेलला.त्याला खूप काही बोलयचं होतं..आभाळाकडे नजर टाकत, डोक्यावर हात ठेवून आभाळाकडे तो शांतपणे पहात होता.समोरच्या खुर्च्या रिकम्या होत्या.अंगण अगदी सामसूम होतं. परदु:ख शीतल असतं हे वेगळं सांगण्याची आता गरजच उरली नव्हती.

लेखक -सुनिल पाटकर
.........................................................समाप्त.......................

न थांबणारा पाऊस

तुझ्या अंगणातला पाऊस
माझ्या अंगणातला पाऊस

शेतात मरमर राबणा-या
ढवळ्या-पवळ्याचा पाऊस

टोपलीतून भाकरी आणणा-या
अनवाणी पावलांचा पाऊस

एका छत्रीत भिजलेल्या
अनेक प्रेमकथांचा पाऊस

रानफूलांच्या वाटेवर
हरवून गेलेला पाऊस

वाफाळलेल्या चहाच्या कपात
चिंब भिजलेला पाऊस

डोक्यावरून घेतलेल्या रजईत
दडून बसलेला पाऊस

पाण्यात भिरभिरणा-या
कागदी होड्यांचा पाऊस

गरागरा फिरणा-या
इवल्याशा छत्रीतला पाऊस

पावसात मनसोक्त भिजणारी
चिमुकली मुलं पाहिली की
आठवतो मला तो पाऊस

आभाळा एवढा डोंगर
कवेत घेऊन आलेला पाऊस

डोंगराखाली गाडलेले ते,
इवलेसे जीव आठवले की
माझ्याही डोळ्यातून बरसतो
न थांबणारा तो पाऊस

सुनिल पाटकर (५-८-२०१०)

शनिवार, ३१ जुलै, २०१०

एक भटकंती अशीही

.
सोनलीकोंडला आम्ही सकाळी ८ वा पोहचलो. आंबिवली गणी आदिवासी वाडीवर चालत जायला तेथून रस्ता होता.गावातील एका घराच्या अंगणात आम्ही दुचाकी उभी केली.गावक-यांनी दाखवल्यानुसार आम्ही गणीचा रस्ता धरला.माझा मित्र सामाजिक कार्यकर्ता होता,त्यांनी आणि मी गणीवर जाण्याचा बेत आखला.सकाळी बिस्किटे व चहा एवढ्याच आहारावर मी घरच्या बाहेर पडलो.गणीला जाण्याचा मार्ग काट्याकुट्यातून ,डोंगरातून होता.पहिल्याच पाऊलवाटेवर सापाचे दर्शन झाले.वाटेवर मोरांची पीसे पडलेली दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यांने थोडं जरी चालले तरी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.पाया खालचा सुका पालापाचोळा करर्कर वाजत होता.जंगलात गावक-यांनी गुरे मोकाट सोडलेली होती.मित्रा सोबत गप्पा सुरू असल्यांने चालणे पटकन होत होते. घामामुळे मी शर्टही काढून टाकला.डोंगर चढून झाल्यावर आम्ही एकदम पठारावर पोहचलो .आणि एकदाच आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन झाले.तेथील एका मोठ्या वृक्षाच्या गर्द सावलीत बसून आम्ही थोडी विश्रांती घेतली , पठारावर वाहाणारा वारा अंगावर घेतला आणि तिथून गणीचं जीवनमान पाहिले.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणारा भारत महासत्ता बनू पाहत आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे; परंतु इतक्‍या वर्षांनंतरही महाड तालुक्‍यातील आंबिवली गणी या आदिवासी वाडीवर कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या नाहीत. रस्ता, वीज, शाळा, घरकुले अशा सोईंपासून दूर असणारी ही वाडी सुवर्णमहोत्सव साजरा करणा-या महाराष्ट्रासाठी एक धक्काच आहे. हे मला स्पष्ट जाणवले.या माझ्या भटकंतीत मला जे जाणवले ते येथे मांडतोय.




. सरकारच्या आदिवासींसाठी अनेक योजना आहेत; परंतु आंबिवली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गणी ही आदिवासीवाडी या योजनांपासून शेकडो कोस दूर आहे. दुर्गम भागात वसलेल्या या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता सोडाच; पण कच्चा रस्ताही नाही. चोचिंदे व सोनाली कोंड या दोन ठिकाणांहून वाडीवर जाता येते. वाडीवर जाणारी वाट डोंगराळ, निसरडी आहे. थोडासा जरी पाय सरकला तरी खाली घसरण्याची भीती आहे. दगड व काट्याकुट्यांतून जाणा-या या वाटेवर भरपूर सापही आहेत. डोंगरातील या वाडीवर जाण्यासाठी एक तास पायी प्रवास करावा लागतो. याच वाटेवरून आदिवासी, त्यांच्या महिला व लहान मुले ये-जा करतात. शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात; परंतु या वाडीला साधा कच्चा रस्ताही नाही. .
.एक वृद्धा लाकडाच्या मोळ्या बांधत होती.झोपड्यांत लहान मुलं , आदिवासी महिला ओल्या काजुबिया सोलत होत्या , उदरनिर्वाहासाठी कै-या, काजूच्या बिया, लाकूडफाटा गोळा करून, तो महाडच्या बाजारपेठेत विकायला आणला जातो. प्रचंड मेहनतीनंतर चार पैसे त्यांच्या हाती लागतात .या वाडीवर 12 कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांची आठवी पिढी येथे राहत असल्याचे समजले. वाडीवर सरकारी योजनेतील एकही घरकुल नाही. गवताचे मंडप तयार करून, कुडामेढ्याच्या घरात आदिवासी राहत आहेत. काहींनी तर चक्क उघड्यावर आपला संसार थाटलेला आहे. इंदिरा आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नाही. गावोगावी, वस्तीवस्तीवर शाळा हे सरकारचे धोरण; पण या वाडीवर शाळा नाही. मुलांसाठी अंगणवाडी अथवा प्राथमिक शाळा नाही. पायथ्याशी असणाऱ्या चोचिंदे व सोनाली कोंड या शाळांमध्ये लहान मुले चालत येऊ शकत नाहीत.
वाडीवरील काही मुले रत्नागिरी जिल्ह्यातील लाटवण व महाडमधील रेवतळे येथे शिकतात; परंतु तेथूनही काही पळून येतात. मुलींना शिक्षणच नाही. वाडीवरील मुलींचे शिक्षण झालेले नाही.पाच मुले शाळेतून बाहेर पडलेली आहेत. शिक्षण नसल्याने पुढच्या पिढीची प्रगतीही थांबलेली आहे.मुलामुलींची लग्न लवकर केली जातात. तालुक्‍यात 100 टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा "महावितरण' करीत असली तरी या वाडीवर कायम अंधार असतो. वीज सोडाच; परंतु विजेचे खांबही वाडीच्या जवळपास नाहीत. पाण्याची सोय एक किलोमीटर अंतरावर. तेथून पाऊलवाटेने त्यांना पाणी आणावे लागते.लहान मुलं डोक्यावरून पाणी आणतांना मी पाहिले. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटल्यावर आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगराळ पठार असल्याने पावसाळी येथे शेती अथवा आंबा, काजू लागवडही होऊ शकते; परंतु शेती अवजारे, बैलजोडी, बियाणे, लागवडीसाठी मदत या सोई-सुविधा आदिवासींपर्यंत पोचत नाहीत. सरकारी अधिकारी वाडीवर कधी जात नसल्याने आदिवासींच्या अडचणी व गरजा यांची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही.
वाडीवरची सारीच परिस्थिती भायावह अशी होती.माझ्या मित्राने वाडीवर आदिवासी कुटुंबाच्या नोंदी व इतर सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले.तब्बल ३ तासानंतर आम्ही वाडीवरुन खाली उतरलो.परततांना आदिवासीं बांधवांनी दिलेल्या कै-या आमच्या सोबत होत्या.स्वत:विक्रीसाठी ठेवलेल्या कै-यातील काही कै-या त्यांनी आम्हाला फुकट दिल्या.आग्रह करुनही त्यांनी पैसे घेतले नाही.रस्ता, वीज, शाळा, घरकुले कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या या वाडीवर इतकी माणुसकी मात्र पोहचली होती.

बुधवार, २८ जुलै, २०१०

राजे

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे,यांना शहाणे समजू नका,
हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी,
तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो,
आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला,
ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,
तुमच्या राजेशाहीसमोर
माझा माथा टेकवतो.
राजे, चला
मी तुम्हाला
तु तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

दैवी चमत्कार `वाळणकुंड `


कोकणात निसर्गाचे तसेच अनेक दैवी चमत्कार पहावयास मिळतात. काही चमत्कार तर तोंडात बोटे घालायाला लावणारे असतात.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण अशाचा एक चमत्काराचे प्रतीक मानावे लागेल.खास माशांसाठी प्रसिद्ध असलेले वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते.खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात.येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत.पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही .नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात .माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात.माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते.लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते.या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे.वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात.येथील मासे कोणीही कधीही मारत नाही महाड़ पासून सुमारे २० कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे .थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात.झूमचा कँमेरा असेल तर फूलपाखरांना कँमेर्‍यात बंद करता येईल.पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात.ही फूलं पाहतांना जाईन विचारीत रानफूला ‘ हे गाणे आठविल्या शिवाय रहात नाही.येथे थेट वाहन जाते.चालण्याची अजिबात गरज नाही.

तर वाट कसली पहाताय ...चला निघा वाळणकुंडीला ...... येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड , शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते.ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.

अप्रतीम गांधारपाले लेणी


मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात
कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर्व १५०-२५० या कालखंडात गांधारपाले गावाचा उल्लेख पालीपट्टण अस होत असे. डोंगरात दोन स्तरामध्ये ही लेणी खोदलेली आहे.लेण्यांच्या मूळ रेखांकनावरून लेणी हिनयान काळातील असल्याचे इतिहास तज्ञांचे मत आहे.लेण्यातील सर्व खोल्यांची संख्या २९ आहे.पहिल्या वरच्या स्तरात १ ते २० आणि दुसर्‍या स्तरात २१ ते २९ अशी लेणी आहेत.सर्व लेणी पूर्वार्भिमुख आहेत.लेण्यात बसण्यासाठी दगडी बाके तयार केलेली दिसतात.२/४ खोल्या मिळून पाण्याची व्यवस्था केलेली पहावयास मिळते.ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, अनेक लोकांना बसता यावे या साठी भव्य सभागृह या लेण्यात आहे.लेण्यांच्या काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेख पहावयास मिळतात.लेणी क्र.१ मध्ये भव्य सभागृह आहे.एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायावर धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे.दोन्ही बाजूस दोन चामरधारी व वरच्या बाजूस दोन विद्याधर आहेत.यावर मकरतोरणाचे नक्षीकाम आहे यालेण्याच्या पुढील भागात पाण्याची तीन टाक्या आहेत. लेणी क्र.९ हे लेणे चैत्यगृह असून येथील सर्वात लक्षवेधी वास्तुशिल्पकाम येथे दिसून येते.या लेणीत एक शिलालेख आहे.राजपुत्र कान्यभोज, विष्णूपनीत असे नामोल्लेख आढळतात.लेणी क्र.२७ मध्ये प्राकृत ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखात वादसिरी.संघरखित ,गृह्पती श्रॆष्ठी या व्यक्ती नामांचा समावेश दिसतो. खोल्या सभागृह,दिर्घिका, स्तंभ ,
अर्धस्तंभ ,.चैत्यगृह ,शिलालेख ,ओटे, वेलबुट्टी ,नक्षीकाम.लहान मोठी प्रवेशद्वारे,भोजनगृह,स्तूप,गाभारा,दगडी पाण्याची टाके,प्रतीमा,असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.पर्यटक ,अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत.महामार्गावर असल्याने येथे यायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत.पावसाळ्यात लेण्यांच्या वरून पडणारे धबधबे ,समोर सावित्री-गांधारी नद्यांचा विस्तिर्ण जलाशय...हे दृश्य ही मनमोहक असते.कोकणात ,रायगड ,महाबळेश्वर नाहीतर गोव्याकडे जातांना थोडावेळ इथे थांबा आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा सुंदर नमुना पाहून जा.

सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर

निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ कि।मि.चा अतिशय सुन्दर,स्वछ आंणि सुरक्षित किनारा लाभाला आहे.या किनार्‍यावर केवाड्याची बने आहेत .या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे.सुवर्ण गणेश सापडलेल्या बागेत मराठीतील पहिला ताम्रपट सापडला आहे .येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते .येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत.अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनासाची फळे पहावयास मिळतात .दिवेआगारचे नारळपाणीही दिवेआगारमध्ये माघ.शु.चार ला गंणेश जन्मोस्तव तर सुवर्ण गंणेशाचा प्रकटदिन कार्तिक वद्य ४ ला साजरा होतो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे
...............................
.Diveagar Beach  and Suvarnaganesha Temple:

Diveagar Beach is located approximately 170 kilometers south of Mumbai. The beach is accessible from the Mumbai-Goa highway
Diveagar beach is or approximately six kilometers long. At one end of the beach is a fishing settlement, while the other end has a sanctuary of migratory seagulls.
The beach contains a number of Suru trees (Casuarina), which are common to coastal Maharashtra. The access to the beach has a dense cover of Belu trees, which are otherwise uncommon in the area.
Another major attraction in Diveagar village is a temple of Lord Ganesh. The idol has a mask which is made of pure gold. This mask was discovered by Mrs Patil, a few decades back buried along with other treasure in a thick copper trunk in her beetel farm, opposite Abhynkar's House.
Diveagar is a popular beach destination along with nearby towns of Shrivardhan Origin of the Peshwas and Harihareshwar.
Sand Bubble Crabs can be found on the beach and at nearby Harihareshwar one can find Dolphins.