Magic of Umbrella
महाड
पाऊस सुरु झाला की पहिली आठवण होते ती छत्रीची .आणि मग कपाटात, अडगळीच्या ठिकाणी असलेल्या छत्रीचा शोध सुरु होतो.नाहितर नविन छत्र्यांची खरेदी होते.आजोबांची लाकडी दांड्यांची लांब छत्री असो नाहितर पर्समध्ये राहणारी आईताईची इवलीशी छत्री असो.छत्र्यांची अनेक रंगरुपे काळानुसार बदलत राहिली.पावसात गरागरा छत्री फिरवणारी बच्चे कंपनी आणि चित्रपटातील छत्रीतील गुणगुणाविशी वाटणारी गाणी याचा आनंद काही वेगळाच. डोक्यावर केळीचे नाहितर सागाचे पान घेत सुरु झालेला या छत्रीचा प्रवास आणि रंगीबेरंगी छत्र्याची जादू आजही कायम आहे.
ऊन व पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होत असला तरी तिची खरी निकड भासते ती पावसाऴ्यात.वापरण्यास व सांभाळण्यास सोयीची असलेली ही छत्री अनेक रंगरुपात बाजारात मिळू लागली आहे.हमखास विसरली जाणारी अशी ही वस्तु असली तरी ती लोकांना फार आवडते.व्यक्तिगत उपयोगा बरोबरच, समुद्रकिनारी, उपाहारगृहात सावलीसाठी असलेल्या मोठ्या छत्र्या लक्ष वेधून घेतात.बघता बघता हॉटेलमधील मॉकटेल, कॉकटेल ही पेयं आकर्षक दिसण्यासाठी ग्लासवर देखील छोट्याशा छत्रीने जागा पटकावली आहे.
ईजिप्त, निनेव्ह, पर्सेपलिस इत्यादींमधील जुन्या धर्मग्रंथांत छत्रधारी व्यक्तींच्या आकृत्या आढळतात. फार पूर्वी ईजिप्त, ॲसिरिया इ. देशांतील गुलाम आपल्या मालकाच्या डोक्यावर सावलीसाठी धरीत असलेल्या आच्छादनासारख्या वस्तूतून छत्रीचा उदय झाला असावा.सामर्थ्य व सार्वभौमत्वचे छत्र हे एक प्रतीक आहे.राजे महाराजांसाठीही डोक्यावर धरण्यासाठी छत्र वापरले जाई.छत्रधारी,छत्रपती अशी बिरुदावली यामुळे निर्माण झाली.अशी ही महत्वाची छत्री.
आता छत्रीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वयंचलित,समुद्रकिनारा, फोल्डींग, बबल,सरळ,मुलांसाठी,क्लासिक, कॉकटेल,डिजिटल,फॅशन गोल्फ, टोपी, उलटा,पेपर, अंगण व वादळ असे छत्र्यांचे प्रकार आहेत.छत्र्या आता ऑटोमॅटिक झाल्या आहेत.काळ्या रंगापासुन आता छान आकर्षक रंग आणि हवी तशी प्रिंटेड नक्षीच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहे.काही कंपन्या जाहिरातीसाठीही छत्रीचा वापर करत आहेत.अशा छत्र्या फूकट वाटल्या जात आहेत अथवा उत्पादन खरेदीवर मोफत दिल्या जात आहेत.राजकीय पक्षांकडूनही छत्री वाटप केले जात आहे.पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर रंग बदलणारी छत्री सध्या ट्रेंडमध्ये आहे.ही छत्री तीन फोल्डमध्ये असून तिचा आकारही मोठा आहे. त्यावर फ्रॅब्रिक प्रिंट असून त्यावर पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर याचा रंग बदलतो. रंग बदलल्यानंतर त्यावरील नक्षी दिसते. या छत्रीची किंमत 800 रुपये आहे.बाजारात 200 रुपयांपासुन छत्र्यांच्या किंमती आहेत.फ्लाँवर प्रिंट,एम्ब्राँयडरी,इंद्रधनुष्य रंगी,बाटलीच्या आकारातील,ठिबक्याच्या असे अनेक रंगरुपाच्या छत्र्यांनी बाजारपेठ व्यापलेली आहे.काळनुसार बदलत गेलेल्या छत्रीची बाजारात आजही जादू कायम असल्याचे दिसत आहे.
पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्रीचा उपयोग प्रथम फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात करण्यात आला.1709 पासून ख-या अर्थाने छत्र्या बनवण्यात येत होत्या. छत्री बाळगणे सोपे जावे म्हणून फोल्डिंग छत्रीचा शोध लागला.या शोधाने छत्री व्यवसायात क्रांती झाली. फोल्डिंग छत्री खुपच लोकप्रिय झाली आहे.
.
............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा